Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद

प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद

प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद


तत्पर प्रशासन आणि कालबध्द अंमलबजावणीसाठीचे मल्टीमोडल व्यासपीठ ‘प्रगती’चा सहावा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

देशातल्या 17 राज्यात सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याबाबतच्या प्रगतीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी अनुकूल धोरण आराखडा तयार करण्यासाठी तत्परतेनं कार्य करण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं.

पेटंट अर्थात बौध्दीक संपदा हक्क आणि नाममुद्रेसाठी केलेल्या अर्जांच्या प्रक्रियेतल्या विलंबाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विशिष्ट कालमर्यादेत या प्रक्रिया जागतिक दर्जाच्या व्हाव्या यासाठी पंतप्रधानांनी निर्देश दिले. पेटंट अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सुधारणा तसंच या प्रक्रियेसाठी आवश्यक फॉर्मची संख्या कमी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

रेल्वे, मेट्रो रेल्वे, कोळसा आणि लोखंड खाणी, रस्ते, ऊर्जा आणि हवाई क्षेत्रांतल्या अनेक राज्यात पसरलेल्या प्रमुख पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार पंतप्रधानांनी लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा 1ए) चा आढावा घेतला. प्रगतीकडून आढावा घेण्यासाठी ठेवलेल्या या प्रकल्पाला अनेक मंजूऱ्या मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार पंतप्रधानांनी खुरदा-बोलनगिर नव्या ब्रॉड गेज रेल्वे लिंकचाही आढावा घेतला. सिक्कीममधल्या नव्या पेकयाँग विमानतळाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. सिक्कीममधल्या पर्यटनाच्या विकासासाठी तसंच दळणवळणाच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्वाचा असल्याचं सांगून प्रकल्प वेळेवर होण्यासाठी तत्परतेनं कार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

मुंबई मेट्रो प्रकल्प लाईन-3 (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) या प्रकल्पाचं तसंच पूर्वेकडच्या राज्यातल्या महत्वाच्या कोळसा आणि लोह खनिजांच्या खाण प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

सलमा धरण तसंच संसद भवन सहित अफगाणिस्तानमधल्या महत्वाच्या भारतीय प्रकल्पांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. सार्क क्षेत्रात भारताद्वारे राबविल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीची खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी सर्व संबंधित खात्यांना दिले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तसंच आधार कार्ड नोंदणीच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला. याचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी त्यांच्या वेगवान अंमलबजावणीवर त्यांनी भर दिला.

N. Chitale/M. Desai