Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोर्तुगालच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना उद्देशून वक्तव्य(7 जानेवारी 2017)

पोर्तुगालच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना उद्देशून वक्तव्य(7 जानेवारी 2017)

पोर्तुगालच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना उद्देशून वक्तव्य(7 जानेवारी 2017)


आदरणीय महोदय, पंतप्रधान अंतोनियो कोस्टा,

प्रतिष्ठित प्रतिनिधी,

प्रसारमाध्यम प्रतिनिधी,

मित्रहो,

आपणा सर्वांना शुभ संध्या.

आदरणीय महोदय,

आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. ही आपली कदाचित पहिलीच भारत भेट असेल, परंतू आपण भारतासाठी अनोळखी नाही आणि भारतही आपल्याबद्दल अनभिज्ञ नाही. म्हणूनच या शीतल संध्याकाळी आपले स्वागत करताना, पुनरागमनाबद्दल आपले स्वागत, असेच मला म्हणावे लागेल. बंगळुरू येथे आयोजित आमच्या या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होण्याचे आमचे आमंत्रण आपण स्वीकारणे, हा आमचा बहुमान आहे. कुटुंबाची मुळे भारतात असणाऱ्या आपल्यासारख्या अद्वितीय कामगिरी करणाऱ्या माननीय नेत्याला उद्या सन्मानित करण्याची संधी आम्हाला लाभते आहे. आपल्या पंतप्रधान कार्यकाळातील नेतृत्वाखाली पोर्तुगालने साध्य केलेल्या अनेक यशांबद्दलही मी आपले अभिनंदन करतो. आपल्या नेतृत्वाखाली पोर्तुगालची अर्थव्यवस्था स्थिर गतीने आणि योग्य दिशेने वाटचाल करते आहे.

मित्रांनो,

समान ऐतिहासिक दुव्यांच्या पायावर भारत आणि पोर्तुगालने आधुनिक द्विपक्षिय भागिदारी उभारली आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक जागतिक मुद्दयांबत मजबूत एककेंद्रामुखतेनेही आमची भागिदारी सुदृढ झाली आहे. पंतप्रधान कोस्टा यांच्यासह आज झालेल्या सविस्तर चर्चेत विविध क्षेत्रांमधील भारत-पोर्तुगाल संबंधांचा आम्ही आढावा घेतला. आमची भागिदारी पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी दोन्ही देशांनी कृतीशील पवित्रा घेण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, याबाबत आमचे एकमत झाले. आज आम्ही स्वाक्षरी केलेला करार, हे आमच्या या दिशेने सुरू झालेल्या प्रयत्नांचेच निदर्शक आहे.

मित्रांनो,

आमच्या दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग या क्षेत्रांतील भागिदारीचा विस्तार आणि सखोलता वाढविणे, ही आमची सामाईक प्राथमिकता आहे. पायाभूत सुविधा, कचरा आणि जल व्यवस्थापन, सौर आणि पवन उर्जा आणि नाविन्यता ही क्षेत्रे आमच्या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचे व्यायसायिक बंध सक्षम करण्यासाठी असंख्य संधींनी समृद्ध आहेत. स्टार्ट अपसाठी यंत्रणा निर्माण करण्याचा आमचा अनुभव, द्विपक्षिय संबंधांचे आणखी एक उत्साहवर्धक क्षेत्र असू शकते. त्याद्वारे आमच्या दोन्ही देशांच्या समाजांसाठी मूल्ये आणि संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने आमच्या युवा उद्योजकांमध्ये प्रोत्साहक भागिदारी उभारण्याची अद्वितीय संधी प्राप्त होऊ शकते. स्टार्ट अप पोर्तुगाल आणि स्टार्ट अप इंडिया यांच्यातील भागिदारी, नाविन्य आणि प्रगतीसाठीच्या आमच्या प्रयासांना सहायक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबतही पंतप्रधान कोस्टा आणि माझ्यात सहमती झाली. आज स्वाक्षरी करण्यात आलेला सुरक्षा सहकार्यविषयक करार, परस्परांच्या क्षमता विकसित करत परस्परांसाठी लाभदायक ठरणारा आहे. क्रीडा हे आमच्यातील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सक्षम असे आणखी एक क्षेत्र आहे. माननीय महोदय, आपण फुटबॉल या खेळाचे फार मोठे चाहते आहात, याची आम्हाला कल्पना आहे. फुटबॉल हे पोर्तुगालचे बलस्थान आहे आणि भारतातील या खेळाच्या सध्याच्या विकासावरून दोन्ही देशांतील क्रीडाविषयक भागिदारीची उत्तम कल्पना येऊ शकते.

मित्रांनो,

अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांबाबतही भारत आणि पोर्तुगालचे विचार समान आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पोर्तुगालच्या निरंतर पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान कोस्टा यांचे आभार मानतो. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण क्षेत्रातील भारताच्या सदस्यत्वाला तसेच आण्विक पुरवठादार गटातील भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिल्याबद्दलही आम्ही पोर्तुगालचे आभारी आहोत. हिंसा आणि दहशतीच्या मोठ्या आणि वेगाने वाढत्या धोक्याविरोधात जागतिक समुदायाने उचलायच्या आवश्यक अशा ठाम आणि तातडीच्या पावलांबाबतही आम्ही चर्चा केली.

माननीय महोदय,

भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील सांस्कृतिक बंधामध्येही समानता आहे. आपल्यातील तसेच गोव्याच्या आणि इंडो-पोर्तुगिज साहित्यातील आपले पिताश्री ओरलँडो कोस्टा यांच्या योगदानाबद्दलही आम्हाला आदर वाटतो. आज आम्ही दोन नृत्यशैलींच्या स्मरणार्थ दोन टपाल तिकीटे जारी केली. एक पोर्तुगिज आणि एक भारतीय, अशा या दोन नृत्यशैली आमच्या सांस्कृतिक बंधांचे उत्तम उदाहरण आहे.

माननीय महोदय,

पुढच्या दोन दिवसात आपण भारतात अनेक ठिकाणी प्रवास करणार असून अनेक भेटीही घेण्याचा आपला मानस आहे. बंगळुरू, गुजरात आणि गोव्यात आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे वास्तव्य आणि अनुभव आनंददायक असावेत, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. विशेषत: गोव्यातील आपली भेट स्मरणीय व्हावी आणि आपल्या पूर्वजांशी जोडले जाण्याचा अनुभव आपणास मिळावा, अशी सदिच्छाही मी व्यक्त करतो.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/M.Pange/Anagha