Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅलेस्टिन दौऱ्यात पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहीम राष्ट्रपती मेहमूद अब्बास ,

पॅलेस्टिनी आणि भारतीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य,

माध्यमांचे प्रतिनिधी, स्त्री आणि पुरुषगण

सबाह अल-ख़ेर [Good Morning]

एखाद्या भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या दौऱ्यात रामल्ला इथे येणे खूप आनंदाची गोष्ट आहे.

राष्ट्रपति  अब्बास,  तुम्ही  माझ्या  सन्मानार्थ जे शब्द बोललात आणि ज्या आपुलकीने माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे शानदार स्वागत केले, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो.

महामहीम, आज तुम्ही मला खूपच आत्मीयतेने पॅलेस्टिनच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवलेत. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. आणि भारतासाठी पॅलेस्टिनच्या मैत्री आणि सद्भावनेचे प्रतीक देखील आहे.

भारत आणि पॅलेस्टिन यांच्यात जे जुने आणि दृढ ऐतिहासिक संबंध आहेत ते काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. पॅलेस्टिनच्या हिताना आमचा पाठिंबा आमच्या परराष्ट्र धोरणात नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे..सातत्यपूर्ण आणि अविचल.

म्हणूनच, आज इथे रामल्ला मध्ये राष्ट्रपति मेहमूद अब्बास, जे भारताचे खूप जुने मित्र आहेत, त्यांच्याबरोबर उभे राहताना मला आनंद होत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या नवी दिल्ली येथील भेटीत त्यांचे स्वागत करण्याचे सौभाग्य मला लाभले होते.

आमची मैत्री आणि भारताच्या समर्थनाला नवीनता प्रदान करताना मला आनंद होत आहे.

या दौऱ्यात अबू अमार यांच्या मकबऱ्यात श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली. ते त्यांच्या काळातल्या अव्वल नेत्यांपैकी होते. पॅलेस्टिनी संघर्षात त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती. अबू अमार भारताचे देखील खास मित्र होते. त्यांना समर्पित संग्रहालयाचा फेरफटका देखील माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. मी अबू अमार यांना पुन्हा एकदा हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो.

स्त्री आणि पुरुषहो,

पॅलेस्टिनच्या जनतेने नेहमीच आव्हानात्मक आणि संकटाच्या स्थितीत अद्भुत दृढता आणि धाडसाचा परिचय करून दिला आहे. तुम्ही परिस्थितीशी लढा देण्यासाठी खडकासारख्या संकल्पशक्तीची ओळख करून दिली आहे.

आम्ही तुमची भावना आणि उत्तम भविष्यासाठी प्रयत्न करण्याच्या तुमच्या विश्वासाची प्रशंसा करतो.

पॅलेस्टिनच्या राष्ट्र निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये भारत त्याचा खूप जुना सहकारी आहे. आमच्यामध्ये प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत विकास, प्रकल्प सहकार्य आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या क्षेत्रात सहकार्य आहे.

आमच्या नवीन उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही इथे रामल्ला मध्ये एक तंत्रज्ञान पार्क प्रकल्प सुरु केला आहे, ज्यात सध्या बांधकाम सुरु आहे. ते तयार झाल्यानंतर ही संस्था रोजगाराला चालना देण्यासाठी कौशल्य आणि सेवा केंद्र म्हणून काम करेल अशी आम्ही आशा करतो.

भारत रामल्लामध्ये मुत्सद्देगिरी संस्था निर्माण करण्यात देखील सहकार्य करत आहे. आम्हाला खात्री आहे कि ही संस्था पॅलेस्टिनच्या तरुण राजकारण्यांसाठी एक जागतिक स्तरावरची प्रशिक्षण संस्था म्हणून उदयाला येईल.

आमच्या क्षमता निर्मिती सहकार्यामध्ये दीर्घ आणि अल्पावधीच्या अभ्यासक्रमासाठी परस्पर प्रशिक्षण समाविष्ट आहे. विविध क्षेत्रे, उदा. आघाडीच्या भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये वित्त, व्यवस्थापन, ग्रामीण विकास आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पॅलेस्टिनसाठी प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती यांचाही समावेश करण्यात आला आहे.

मला आनंद वाटत आहे की या दौऱ्यादरम्यान आपण आपले विकास सहकार्य वाढवत आहोत. भारत पॅलेस्टिनमध्ये आरोग्य आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा तसेच महिला सबलीकरण केंद्र आणि एक प्रिंटिंग प्रेस उभारण्याच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत राहील.

उर्जावान पॅलेस्टिन देशासाठी हे योगदान आम्ही बिल्डिंग ब्लॉक मानतो.

द्विपक्षीय स्तरावर, आम्ही मंत्रीस्तरीय संयुक्त आयोग बैठकीच्या माध्यमातून आपल्या संबंधांना अधिक दृढ करण्याबाबत सहमत आहोत.

प्रथमच, गेल्या वर्षी भारत आणि पॅलेस्टीनच्या युवा प्रतिनिधिं दरम्यान आदान-प्रदान झाले. आपल्या युवकांमध्ये गुंतवणूक करणे आणि त्यांच्या कौशल्य विकास आणि संबंधांमध्ये सहकार्य करणे एक समान प्राधान्यक्रम आहे.

भारत पॅलेस्टिन प्रमाणे तरुणांचा देश आहे. आमच्या महत्वाकांक्षा पॅलेस्टिनी युवकांच्या भविष्याबाबत तशाच आहेत जशा आम्ही भारताच्या तरुणांसाठी ठेवतो, ज्यात प्रगती. समृद्धी आणि स्वयंपूर्णतेच्या संधी उपलब्ध असतील. हेच आमचे भविष्य आहे आणि आमच्या मैत्रीचे उत्तराधिकारी आहेत.

मला ही घोषणा करताना आनंद होत आहे कि आम्ही यावर्षी पासून तरुणांच्या आदान प्रदानाची संख्या ५० वरून १०० पर्यंत करू.

स्त्री आणि पुरुषहो,

आमच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये मी राष्ट्रपति अब्बास यांना पुन्हा एकदा आश्वस्त केले आहे की भारत पॅलेस्टिनी जनतेच्या हितांकडे लक्ष देण्याप्रती वचनबद्ध आहे.

भारत पॅलेस्टिनच्या शांततापूर्ण वातावरणात लवकरच एक स्वयंभू, स्वतंत्र देश बनेल अशी आशा करतो.

राष्ट्रपती अब्बास आणि मी ,अलिकडच्या प्रादेशिक आणि जागतिक विकासाबाबत विचार विनिमय केला ज्याचा संबंध पॅलेस्टिनच्या शांतता, सुरक्षा आणि शांतता प्रक्रियेशी आहे.

भारत या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याची खूप उमेद बाळगून आहे.

आम्हाला वाटते की शेवटी पॅलेस्टिनच्या प्रश्नाचे स्थायी उत्तर असा संवाद आणि समजूतदारपणातच अंतर्निहित आहे ज्याच्या माध्यमातून शांततापूर्ण सह-अस्तित्वाचा मार्ग मिळू शकेल.

केवळ सखोल कूटनीती आणि दूरदर्शीपणानेच हिंसेचे चक्र आणि इतिहासाचे ओझे यापासून मुक्ती मिळवता येऊ शकेल.

आम्हाला माहित आहे हे सोपे नाही. मात्र आपण नियमितपणे प्रयत्न करत राहायला हवे कारण त्यावर खूप काही अवलंबून आहे.

महामहीम,  तुम्ही केलेल्या शानदार पाहुणचारासाठी मी मनापासून आभार मानतो.

मी सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने पॅलेस्टिनी जनतेची प्रगती आणि समृद्धीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील देतो.

धन्यवाद .

शुक़रन जज़ीलन

B.Gokhale/S.Kane