Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुणे जिल्ह्यातल्या देहू इथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

पुणे जिल्ह्यातल्या देहू इथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन


नवी दिल्ली, 14 जून 2022

 

श्री विठ्ठलाय नम

नमो सदगुरु, तुकया ज्ञानदीपा। नमो सदगुरु, सच्चिदानंद रुपा॥ नमो सदगुरु, भक्त-कल्याण मूर्ती। नमो सदगुरु, भास्करा पूर्ण कीर्ती॥ मस्तक हे पायावरी। या वारकरी सन्तांच्या॥ महाराष्ट्राचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार जी, विरोधी पक्षनेते   देवेंद्र फडणवीस जी, माजी मंत्री  चंद्रकांत पाटील  जी, वारकरी संत श्री मुरली बाबा कुरेकर जी, जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष  नितिन मोरे जी, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष  आचार्य श्री तुषार भोसले जीउपस्थित संत गण, स्त्री –  पुरुष वर्ग,

भगवान विट्ठल आणि सर्व   वारकरी संतांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.संतांचा सत्संग हा मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ आहे असे पुराणात म्हंटले आहे.संतांच्या कृपेची अनुभूती आली तर ईश्वराची अनुभूती आपोआप प्राप्त होते.आज देहूच्या या पवित्र तीर्थ भूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले आणि  मलाही इथे याची अनुभूती येत आहे. देहू, संत शिरोमणी जगतगुरू तुकाराम जी यांचे जन्मस्थानही आहे आणि कर्मस्थळही.

धन्य देहूगाव, पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग। धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे। उच्चारिती वाचे, नामघोष।

देहू मध्ये भगवान पांडुरंगाचा नित्य निवासही आहे आणि इथला प्रत्येकजण स्वतः ही भक्तीने ओतप्रोत संत स्वरूप आहे. हाच भाव घेऊन देहुचे सर्व नागरिक आणि माझ्या माता – भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.गेल्या काही महिन्यांपूर्वीच पालखी मार्गामधले दोन राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्यासाठी भूमिपूजन करण्याची संधी मला प्राप्त झाली.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्यात आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्यात पूर्ण केला जाईल. या सर्व टप्यात 350 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे महामार्ग तयार केले जाणार असून त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. या प्रयत्नांमुळे या भागाच्या विकासालाही वेग येईल. पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी देहू मध्ये येण्याचे भाग्य मला लाभले. ज्या शिळेवर  संत तुकाराम महाराजांनी स्वतः 13 दिवस तपस्या केली, जी शिळा संत तुकाराम महाराज जी यांच्या बोध आणि वैराग्य यांची साक्षीदार आहे ती केवळ शिळा नव्हे तर भक्ती आणि ज्ञान यांची आधारशीला स्वरूप आहे असे मी मानतो.देहू इथले शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे एक केंद्र आहे इतकेच नव्हे तर ते भारताचे  सांस्कृतिक भविष्यही प्रशस्त करते.या पवित्र स्थानाच्या पुनर्निर्मितीसाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जगतगुरु संत तुकाराम जी यांच्या गाथेचे ज्यांनी संवर्धन केले त्या संताजी महाराज जगनाडे जी यांचे स्थानही सदुंबरे ही जवळच आहे. त्यांनाही माझे नमन.

मित्रहो,

देश सध्या आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा  करत आहे. जगातल्या सर्वात  प्राचीन जीवित संस्कृतीपैकी आपण एक आहोत. याचे श्रेय भारताच्या संत परंपरेला जाते, भारताच्या ऋषी- मुनींना जाते. भारत शाश्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात आपल्याकडे देश आणि समाजाला दिशा देण्यासाठी एखादा तरी महात्मा अवतरत आला आहे. आज देशात संत कबीरदास यांची जयंतीही साजरी केली जात आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव आणि भगिनी आदी शक्ती मुक्ताबाई यासारख्या संतांच्या समाधीचे 725 वे वर्षही आहे. अशा महान विभूतींनी आपली शाश्वतता कायम राखत भारताला गतिमान ठेवले. संत बहिणाबाई यांनी तर संत तुकाराम यांना संत मंदिराचे कळस म्हटले. अडचणी आणि समस्यांना तोंड देत त्यांना जीवन कंठावे लागले. दुष्काळासारख्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिले. उपासमार पाहिली. दुःख आणि वेदनेच्या अशा चक्रात लोक आपली उमेदच हरवून बसतात तेव्हा संत तुकाराम जी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठीही आशेचा किरण घेऊन आले. त्यांनी आपल्या कुटुंबाची संपत्ती जनसेवेसाठी समर्पित केली. ही शिळा त्यांच्या या त्यागाची आणि वैराग्याची साक्षीदार आहे.

मित्रहो,

संत तुकाराम जी यांच्या दया,क्षमा आणि सेवा यांची शिकवण त्यांच्या अभंगांच्या रूपाने आजही आपल्याजवळ आहे.या अभंगांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे. जे भंग होत नाही,जे काळाच्या ओघातही शाश्वत आणि समर्पक राहते तेच तर अभंग. आजही देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधाराने वाटचाल करत आहे तेव्हाही संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला बळ  देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबा-काका, संत चोखामेळा यांच्या प्राचीन अभंगांमधून आपल्याला नित्यनवी प्रेरणा मिळते. आज इथे संत चोखामेळा आणि त्यांच्या परिवार द्वारे रचित सार्थ अभंगगाथेच्या प्रकाशनाचे भाग्य मला लाभले. या सार्थ अभंगगाथेमध्ये या  संत मांदियाळीचे 500 पेक्षा जास्त अभंग सोप्या भाषेतल्या अर्थासह आहेत.

बंधू-भगिनीनो,

संत तुकाराम जी म्हणत असत – उंच नीच काही नेणे भगवंत॥ म्हणजेच समाजात उच्च-नीच भेदभाव, माणसा-माणसात भेदभाव करणे हे मोठे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भागवतभक्तीसाठी जितका  आवश्यक आहे तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही महत्वाचा आहे, समाजभक्तीसाठीही महत्वाचा आहे. हाच संदेश घेऊन आमचे वारकरी बंधू- भगिनी दर वर्षी पंढरपूरची वारी करतात.म्हणूनच आज देश

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा  मंत्र घेऊन वाटचाल करत आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला मिळत आहे. वारकरी चळवळीची भावना बळकट करत देश महिला सबलीकरणासाठीही सातत्याने प्रयत्न करत आहे.पुरुषांइतक्याच जोमाने वारीमध्ये चालणाऱ्या आमच्या भगिनी, पंढरीची वारी, संधींच्या समानतेचे प्रतिक आहेत.    

मित्रांनो,

संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,

जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले,

तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।

म्हणजे समाजाच्या तळाशी  असलेल्या व्यक्तींना आपलेसे करणे, त्यांचे कल्याण करणे, हेच संताचे लक्षण आहे. हाच आज देशासाठी अंत्योदयचा संकल्प आहे, ज्यावर देश मार्गक्रमण करतो आहे. दलित, वंचित, मागास, आदिवासी, गरीब, मजूर, यांच्या कल्याणाला आज देशाचे प्राधान्य  आहे.

बंधू आणि भगिनींनो,

संत समाजाला एक उर्जा देत असतात, जे वेगवेगळ्या स्थिती- परिस्थितीमध्ये समाजाला गती द्यायला समोर येतात. आता पहा , छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांसारख्या संतांची महत्वाची भूमिका होती. स्वातंत्र्याच्या युद्धात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा तुरुंगात ते बेडयांनाच चिपळ्या समजून वाजवत तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळे कालखंड, वेगवेगळ्या विभूती, मात्र सर्वांसाठी संत तुकारामांची वाणी आणि उर्जा तितकीच प्रेरणादायी राहिली  ! हेच संतांचे महात्म्य आहे, त्यालाच   ‘नेति नेति’ म्हटलं गेलं आहे.

मित्रांनो,

तुकाराम महाराजांच्या या शिळा मंदिरात नतमस्तक होऊन आता आषाढ महिन्यात पंढरपूरची वारी सुरु होणार आहे. महाराष्ट्रातली पंढरपूरची वारी असो, की ओडिशामध्ये भगवान जगन्नाथ यात्रा, अथवा मथुरेत ब्रज प्रदक्षिणा असो, की काशीमध्ये पंचकोशी प्रदक्षिणा, चारधाम यात्रा असो, की मग अमरनाथ यात्रा, या यात्रा आपल्या सामाजिक आणि अध्यात्मिक गतीशिलतेसाठी उर्जेचा स्रोत आहेत. या यात्रांच्या माध्यमातून आपल्या संतांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ची भावना जागती ठेवली आहे. देशात इतकी विविधता असूनही, भारत हजारो वर्षांपासून एक राष्ट्र म्हणून जागृत आहे, कारण अशा यात्रा आपल्या विविधतांचा संगम घडवतात .

बंधू आणि भगिनींनो,

आपली राष्ट्रीय एकता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जागत्या  ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच, आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचा पर्याय बनत आहेत, तेव्हा विकास आणि परंपरा दोन्ही एकत्र पुढे जातील हे आपण सुनिश्चित करत आहोत. आज पंढरपूर पालखी मार्गाचं आधुनिकीकरण होत आहे.  चारधाम यात्रेसाठी देखील नवे महामार्ग बनत आहेत. आज अयोध्येत भव्य राम मंदिर बनत आहे, त्याचवेळी काशी विश्वनाथ धाम परिसर देखील नव्या रुपात तयार आहे, आणि सोमनाथ मध्ये देखील विकासाची मोठमोठी कामं करण्यात आली आहेत. संपूर्ण देशात प्रसाद योजनेअंतर्गत तीर्थस्थळाचा विकास केला जातो आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात श्री रामाशी संबंधित ज्या ज्या स्थळांचा उल्लेख केला आहे, रामायण मंडल  म्हणून त्या स्थळांचा  देखील विकास केला जात आहे. गेल्या आठ वर्षांत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच तीर्थांचा देखील विकास झाला आहे. मग ते महू मध्ये बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा विकास असो, लंडनमध्ये जिथे राहून ते शिकले, त्या घराचं स्मारकात रुपांतर करणं असो, मुंबईत चैत्यभूमीचं काम असो, नागपूरमध्ये दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तराचा विकास असो, दिल्लीत महापरीनिर्वाणस्थळावर स्मारक बनवणे  असो, हे पंचतीर्थ, नव्या पिढीत बाबासाहेबांच्या स्मृतींची कायम ओळख करून देत आहेत.

मित्रांनो,

संत तुकाराम म्हणत असत—

असाध्य ते साध्य करीता सायास।

कारण अभ्यास, तुका म्हणे॥

म्हणजे, जर, योग्य दिशेने सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर अशक्य ते शक्य करता येते. काहीही साध्य करता येते. आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने सगळी उद्दिष्टे  शंभर टक्के पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. देश गरिबांसाठी ज्या योजना राबवत आहे, त्यांना वीज, पाणी, घरे आणि उपचार यांसारख्या, आयुष्यातल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच्या गरजांची पूर्तता करत आहे. आम्हाला या सगळ्या सुविधा शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याचप्रमाणे, देशाने पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचवा यांसारख्या मोहिमाही सुरु केल्या आहेत. आम्ही निरोगी आणि निरामय भारताचा संकल्प केला आहे. आम्हाला हे  संकल्प पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी , सर्वांच्या प्रयत्नांची, सर्वांच्या सहभागाची गरज आहे. आपण सगळेच, देशसेवेच्या ह्या जबाबदाऱ्याना  आपल्या अध्यात्मिक संकल्पांचा भाग बनवला  तर देशाचाही तितकाच फायदा होईल. आपण प्लास्टिक पासून मुक्तीचा संकल्प केला, आसपासचे तलाव, पाणवठे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला तर पर्यावरण रक्षण होईल. अमृत महोत्सवात प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बनवण्याचा संकल्प केला आहे. या अमृत सरोवरांना तुम्हा सर्व संतांचा आशीर्वाद मिळावा, या तलाव निर्मितीच्या कामात आपलं सहकार्य मिळालं, तर हे काम अधिक वेगानं होईल. देशात सध्या नैसर्गिक शेती ही मोहीम सुरु आहे. हा प्रयत्न देखील वारकरी संतांच्या आदर्शांशी संबंधित आहे. नैसर्गिक शेती प्रत्येक शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आज जगभरात योग गाजतो आहे, ती आमच्या संतांचीच तर देणगी आहे. मला विश्वास आहे, आपण सर्वजण  योग दिन पूर्ण उत्साहानं साजरा कराल, आणि देशासाठीच्या आपल्या कर्तव्यांचं पालन करून नव्या भारताचं स्वप्न पूर्ण कराल. याच  भावनेसह, मी भाषणाला विराम देतो  आणि तुम्ही मला जी संधी दिलीत, जो सन्मान दिला, त्यासाठी आपल्याला मस्तक लववून अभिवादन करतो, धन्यवाद देतो.

जय-जय रामकृष्ण हरी ॥ जय-जय रामकृष्ण हरी ॥ हर हर महादेव।

 

 

 

Jaydevi PS/N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com