Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य-पंतप्रधान

पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य-पंतप्रधान

पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य-पंतप्रधान

पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य-पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या कोल्लमला भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 66 वरील 13 किलोमीटर लांबीचा दुपदरी कोल्लम बायपास राष्ट्राला समर्पित केला. यावेळी केरळच्या राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम्, केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन, केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कोल्लममधील आसरामाम मैदानात उपस्थित समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य आहे आणि कोल्लम बायपास हे याचे उदाहरण आहे.

या प्रकल्पाला जानेवारी 2015 मध्ये अंतिम मंजुरी मिळाली होती आणि आज हा प्रकल्प पूर्ण झाला असून ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान म्हणाले की, सामान्य माणसाचे जीवन सुलभ बनवण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ यावर सरकारचा विश्वास आहे. त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात केरळ सरकारने दिलेले योगदान आणि सहकार्याची प्रशंसा केली.

कोल्लम बायपासमुळे अलाप्पुझा आणि तिरुअनंतपुरम दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल आणि कोल्लम शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.

केरळमधील प्रकल्पांबाबत पंतप्रधान म्हणाले की, भारतमाला अंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरीडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे, असे ते म्हणाले.

सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘प्रगती’च्या माध्यमातून 12 लाख कोटी रुपयांच्या सुमारे 250हून अधिक प्रकल्पांचा आपण आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते जोडणीतील ‘प्रगती’ अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते बांधणीचा वेग जवळपास दुप्पट आहे. आधीच्या सरकारमधील 56 टक्क्यांच्या तुलनेत आज 90 टक्क्यांहून अधिक ग्रामीण गावे जोडण्यात आली आहेत. लवकरच 100 टक्के ग्रामीण रस्ते जोडणीचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रादेशिक हवाई संपर्क आणि रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे लक्षणीय सुधारणा झाली असून यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे.जेव्हा आपण रस्ते आणि पुल बांधतो तेव्हा शहरे आणि गावे जोडत नाही तर आपण महत्त्वाकांक्षांना कामगिरीशी जोडतो, आशावादाला संधींशी जोडतो आणि आशेला आनंदाशी जोडतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आयुष्मान भारत बाबत बोलतांना ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत 8 लाख रुग्णांना लाभ मिळाला असून सरकारने या योजनेसाठी आतापर्यंत 1100 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. त्यांनी केरळ सरकारला आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी वेगाने करण्याचे आवाहन केले. जेणेकरून केरळच्या जनतेला लाभ होईल.

पर्यटन हा केरळच्या आर्थिक विकासाचा कणा असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचे प्रमुख योगदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. केरळची पर्यटन क्षमता ओळखून सरकारने स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत राज्यात सात प्रकल्पांना मंजुरी दिली असून यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्राच्या महत्त्वाबाबत बोलतांना त्यांनी या क्षेत्रातील उल्लेखनीय वाढ अधोरेखित केली. पर्यटन क्षेत्रात भारताने 2016 च्या तुलनेत 14 टक्के वाढ नोंदवली तर जागतिक स्तरावर या वाढीचा दर सरासरी 7 टक्के होता. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या 2018 च्या अहवालातील मानांकनात भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे, असे ते म्हणाले. भारतात परदेशी पर्यटकांची संख्या 42 टक्क्यांनी वाढली आहे. 2013 मध्ये 70 लाख परदेशी पर्यटक आले होते. 2017 मध्ये ही संख्या 1 कोटीवर गेल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनामुळे भारताला मिळालेल्या परकीय गंगाजळीतही 50 टक्के वाढ झाली असून 2013 मध्ये 18 अब्ज डॉलर्सवरुन ती 2017 मध्ये 27 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. भारतीय पर्यटनासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-व्हिसामुळे हे चित्र पालटल्याचे त्यांनी सांगितले. आज 166 देशांच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor