Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


व्यासपीठावर विराजमान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना महोदया, पश्चिम बंगालचे राज्यपाल श्रीयुत केसरी नाथ त्रिपाठी महोदय, पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री श्रीमती ममता बनर्जी महोदया, विश्‍व भारतीच्या कुलगुरू प्राध्यापक सबूज कोलीसेन आणि रामकृष्‍ण मिशन विवेकानंद इंस्‍टीटयूट चे कुलगुरु पूज्‍य स्‍वामी आत्‍मप्रियानंद आणि येथे उपस्थित विश्‍व भारतीचे अध्‍यापकगण आणि माझे प्रिय युवा साथी,

सर्वप्रथम मी विश्वभारतीचा कुलपती या नात्याने मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, कारण जेव्हा मी या ठिकाणी ज्या रस्त्याने येत होतो तेव्हा काही बालके मला खुणा करून सांगत होती की प्यायचे पाणी देखील नाही आहे. तुम्हा सर्वांची जी काही गैरसोय झाली आहे, त्याबाबत कुलपती या नात्याने माझी ही जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.

पंतप्रधान या नात्याने मला देशातील अनेक विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्या ठिकाणी माझा सहभाग एक अतिथी या नात्याने असायचा मात्र या ठिकाणी मी एक अतिथी म्हणून नव्हे तर आचार्य म्हणजेच कुलपती या नात्याने तुमच्यात उपस्थित आहे. या ठिकाणी माझी जी भूमिका आहे ती या महान लोकशाहीमुळे आहे. पंतप्रधानपदामुळे आहे. तसे पाहायला गेले तर लोकशाही ही स्वतःच एक आचार्य आहे जी आपल्या सव्वाशे कोटींपेक्षा जास्त देशवासियांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रेरित करत आहे. लोकशाही मूल्यांच्या आलोकात जो कोणी पोषित आणि शिक्षित असतो तो श्रेष्ठ भारत आणि श्रेष्ठ भविष्याच्या निर्मितीमध्ये सहाय्यक असतो.

आपल्याकडे सांगितले आहेच कीआचार्यत विद्याविहिता साघिष्‍ठतम प्राप्‍युति इति म्हणजेच आचार्याकडे गेल्याशिवाय विद्या, श्रेष्ठत्व आणि यश मिळत नाही. गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूर यांच्या या पवित्र भूमीवर इतक्या आचार्यांच्या दरम्यान मला काही वेळ घालवण्याचे भाग्य लाभले आहे.

ज्या प्रकारे एखाद्या मंदिराच्या प्रांगणात तुम्हाला मंत्रोच्चाराची उर्जा जाणवत राहते, तशाच प्रकारच्या उर्जेचा अनुभव विश्व भारती विद्यापीठाच्या प्रांगणात मला येत आहे. ज्यावेळी गाडीतून उतरून मी या मंचाच्या दिशेने येत होतो तेव्हा प्रत्येक पावलाला माझ्या मनात असा विचार येत होता की कधी काळी या भूमीच्या प्रत्येक कणा कणावर गुरुदेवांची पावले पडली असतील. याच ठिकाणी जवळपास कुठेतरी बसून त्यांनी शब्दांना कागदावर उतरवले असेल, कोणती तरी धुन, कोणते तरी संगीत गुणगुणत राहिले असतील. कधी महात्मा गांधीजींच्या सोबत प्रदीर्घ चर्चा केली असेल. कधी एखाद्या विद्यार्थ्याला जीवनाचा, भारताचा, राष्ट्राच्या अभिमानाचा अर्थ समजावून सांगितला असेल.

मित्रांनो, आज या प्रांगणात आपण परंपरांचे पालन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे अमरकुंज सुमारे एक शतकापासून अशा अनेक क्षणांचा साक्षीदार बनले आहे. गेली काही वर्षे तुम्ही या ठिकाणी जे काही शिकला आहात त्याचा एक टप्पा आज पूर्ण होत आहे. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना आज पदवी मिळाली आहे, त्यांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करत आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देत आहे. तुमची ही पदवी, या शैक्षणिक योग्यतेचे प्रमाण आहे. या अर्थाने ही अतिशय महत्त्वाची आहे. पण तुम्ही येथे केवळ पदवीच मिळवली आहे, असे म्हणता येणार नाही. तुम्ही येथे जे काही शिकला आहात, जे काही मिळवले आहेत, ते खरोखरच अतिशय अनमोल आहे. तुम्ही एका समृद्ध वारशाचे वारसदार आहात. तुमचे नाते एका अशा गुरु शिष्य परंपरेशी आहे. जी जितकी प्राचीन आहे तितकीच आधुनिक देखील आहे.

वैदिक आणि पौराणिक काळात आपल्या ऋषी-मुनींनी ज्याचा पाया रचला. आधुनिक भारतात तिला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांसारख्या मुनींनी पुढे सुरू ठेवले.आज तुम्हाला हा जो सप्तपरिणयाचा गुच्छ दिला आहे ती देखील निव्वळ पाने नाहीत तर एक महान संदेश आहे. निसर्ग कशा प्रकारे आपल्याला एक मानव म्हणून, एक राष्ट्र म्हणून उत्तम शिकवण देत असतो, याचा हा दाखला आहे, एक उत्तम उदाहरण आहे. हीच तर या अप्रतिम संस्थेच्या उभारणीमागील भावना आहे, हाच तर गुरुदेवांचा विचार आहे, जो विश्वभारतीचा पाया बनला.

बंधु आणि भगिनींनोयत्र विश्‍वम भवेतेक निरम म्हणजेच संपूर्ण विश्व एक घरटे आहे एक घर आहे, ही वेदांची ती शिकवण आहे जिला गुरुदेवांनी आपल्या अतिशय अनमोल असा खजिना असलेल्या विश्वभारतीचे घोषवाक्य बनवले आहे. या वेदमंत्रांमध्ये भारताच्या समृद्ध परंपरेचे सार दडलेले आहे. हे स्थान उद्घोषणा बनावे ज्याला संपूर्ण जगाने आपले घर बनवावे, अशी गुरुदेवांची इच्छा होती. घरटी आणि घरांना जिथे एकाच रुपात पाहिले जाते. जिथे संपूर्ण जगाला सामावून घेण्याची भावना असेल. हेच तर भारतीयत्व आहे. हाच वसुधैव कुटुम्‍बकम्चा मंत्र आहे. जो हजारो वर्षांपासून या भारतभूमीवर नाद करत आहे आणि याच मंत्रासाठी गुरुदेवांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

मित्रांनो, वेदांमधील, उपनिषदांमधील भावना जितकी हजारो वर्षांपूर्वी सार्थ होती तितकीच शंभर वर्षांपूर्वी जेव्हा गुरुदेव शांति निकेतन मध्ये आले तेव्हा होती. आज 21व्या शतकातल्या आव्हानांशी लढा देण्यासाठी देखील ती तितकीच प्रासंगिक आहे. आज सीमांच्या कक्षांमध्ये बांधले गेलेले राष्ट्र एक वस्तुस्थिती आहे. पण हे देखील तितकेच खरे आहे की या भूभागाच्या या महान परंपरेचे आज संपूर्ण विश्व जागतिकीकरणाच्या रुपात पालन करत आहे. आज आपल्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील उपस्थित आहेत. असे क्वचितच घडले असेल की एका पदवीदान समारंभात दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत.

भारत आणि बांगलादेश ही दोन राष्ट्रे आहेत पण आमचे हितसंबंध एकमेकांच्या सोबत समन्वय आणि सहकार्याने बांधलेले आहेत. संस्कृती असो वासार्वजनिक धोरण असो, एकमेकांकडून दोन्ही देशांना बरेच काही शिकता येईल. याचेच एक उदाहरण म्हणजे बांगलादेश भवन आहे. काही वेळातच या भवनाचे आम्ही दोघे तिथे जाऊन उद्घाटन करणार आहोत. हे भवन देखील गुरुदेवांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

मित्रांनो मला अनेकदा आश्चर्य वाटते ज्यावेळी मी पाहतो की गुरुदेवांचे व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांच्या परदेश प्रवासाचा विस्तार देखील किती व्यापक होता. माझ्या परदेश प्रवासाच्या वेळी मला असे अनेक लोक भेटतात जे मला सांगतात की टागोर किती वर्षांपूर्वी त्यांच्या देशात आले होते. त्या देशात आजही अतिशय सन्मानाने गुरुदेवांचे स्मरण करण्यात येते. लोक टागोरांसोबत आपल्या देशांचा संबध जोडण्याचा प्रयत्न करतात.

जर आम्ही अफगाणिस्तानला गेलो तर प्रत्येक अफगाणिस्तानी काबुलीवाल्याच्या गोष्टीचा उल्लेख करू लागतो. मोठ्या अभिमानाने तो हा उल्लेख करतो. तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा ताजिकीस्तानला गेलो तेव्हा तिथे मला गुरुदेवांच्या एका मूर्तीचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली.तिथल्या लोकांमध्ये गुरुदेवांविषयी असलेला आदरभाव मी कधीही विसरू शकत नाही.

जगातील अनेक विद्यापीठांमध्ये आजही टागोर हे अभ्यासाचा विषय आहेत. त्यांच्या नावावर अध्यासन आहेत. जर मी असे म्हटले की गुरुदेव पूर्वी देखील जागतिक नागरिक होते आणि आजही आहेत तर ते चुकीचे ठरणार नाही. तसे पाहायला गेले तर त्यांचा गुजरातशी असलेल्या संबंधाचे वर्णन करण्याचा मोह मला आवरता येत नाही. गुरुदेवांचे गुजरातशी एक विशेष नाते होते. त्यांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर जे नागरी सेवेत दाखल होणारे पहिले भारतीय होते. ते अनेक काळ अहमदाबादमध्ये राहिले.

बहुधा ते त्यावेळी अहमदाबादचे कमिशनर होते आणि मी कुठेतरी वाचले होते की शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी सत्येंद्रनाथ यांनी आपल्या लहान भावाचा सहा महिन्यांपर्यंत इंग्रजी साहित्याचा अभ्यास अहमदाबादमध्ये करवून घेतला होता. गुरुदेवांचे वय तेव्हा केवळ 17 वर्षे होते. याच काळात गुरुदेवांनी आपले लोकप्रिय पुस्तक खुदितोपाशान यातील काही महत्त्वाचे किस्से आणि काही कविता देखील अहमदाबादमधील वास्तव्यादरम्यान लिहिल्या होत्या. म्हणजे एका प्रकारे पाहिले तर गुरुदेवांची जागतिक पटलावर विजय प्रस्थापित करण्यामधील एक लहानशी भूमिका भारताच्या प्रत्येक कानाकोप-यातून निर्माण झाली. त्यात गुजरात देखील एक आहे.

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा जन्म कोणत्या ना कोणत्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी झालेला असतो, अशी गुरुदेवांची धारणा होती. प्रत्येक बालक आपल्या लक्ष्यप्राप्तीच्या दिशेने पुढे जावे यासाठी त्याच्यात आवश्यक ती योग्यता निर्माण करण्यामध्ये शिक्षणाचे मोलाचे योगदान आहे. त्यांना बालकांना कोणत्या प्रकारचे शिक्षण अपेक्षित होते. याची एक झलक त्यांची कविता power of affection मध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. ते म्हणायचे की शिक्षण केवळ विद्यालयात दिले जाते, तेवढ्यापुरते मर्यादित नसते. शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या प्रत्येक पैलूचा संतुलित विकास आहे ज्याला काळ आणि स्थानाच्या बंधनात बांधता येत नाही आणि म्हणूनच गुरुदेवांची नेहमीच अशी इच्छा होती की भारतीय विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात जे काही चालले आहे त्याची चांगल्या प्रकारे माहिती असली पाहिजे. दुस-या देशात लोक कसे राहतात, त्यांची सामाजिक मूल्ये काय आहेत, त्यांचा सांस्कृतिक वारसा काय आहे. याविषयी माहिती घेण्यावर त्यांचा भर असायचा. पण त्याच वेळी ते हे देखील सांगायचे की आपल्या भारतीयत्वाचा देखील आपल्याला विसर पडता कामा नये.

मला सांगण्यात आले आहे की एकदा अमेरिकेत कृषिविषयक शिक्षण घ्यायला गेलेल्या आपल्या जावयाला पत्र लिहून त्यांनी ही बाब अतिशय सविस्तर पद्धतीने समजावली होती. त्यांनी आपल्या जावयाला पत्रात लिहिले होते की केवळ शेतीचा अभ्यास पुरेसा नाही तर स्थानिक लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या भेटी-गाठी घेणे हा देखील तुमच्या शिक्षणाचा भाग आहे आणि पुढे त्यांनी लिहिले होते की जर तेथील लोकांना जाणून घेण्याच्या प्रयत्नात तुमची भारतीय असण्याची ओळख हरवू लागली तर मात्र तुम्ही एका खोलीत टाळे लावून बंद राहणेच चांगले ठरेल.

भारतीय राष्ट्रीय आंदोलनात टागोरजींचे हेच शैक्षणिक आणि भारतीयत्वाचे ओतप्रोत दर्शन एक आदर्श बनले होते. त्यांच्या जीवनात राष्ट्रीय आणि वैश्विक विचारांचा समावेश होता जो आपल्या प्राचीन परंपरांचा एक भाग राहिला आहे. हे देखील कारण होते ज्यामुळे त्यांनी येथे विश्व भारतीमध्ये शिक्षणाच्या एका वेगळ्याच विश्वाची निर्मिती केली. साधेपणा हा येथील शिक्षणाचा मूलभूत सिद्धांत आहे. आजही मोकळ्या हवेत झाडांच्या खाली वर्ग भरवले जातात. जिथे मानव आणि निसर्ग यांच्यात थेट संवाद होतो. संगीत, चित्रकला, नाट्य, अभिनय यांसहित मानवी जीवनाचे जे काही पैलू आहेत, त्यांना निसर्गाच्या कुशीत बसून आणखी उत्तम बनवता येते.

ज्या स्वप्नांना उराशी बाळगून गुरुदेवांनी या महान संस्थेचा पाया घातला होता, त्यांना पूर्ण करण्याच्या दिशेने ही संस्था सातत्याने वाटचाल करत आहे, याबद्दल मला आनंद वाटत आहे. शिक्षणाला कौशल्य विकासाशी जोडून आणि त्याच्या माध्यमातून मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्याचा त्यांच्या प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे.

मला सांगण्यात आले आहे की जवळपास 50 गावांमध्ये तुम्ही लोकांनी एकत्र येऊन त्या गावातील लोकांना सोबत घेऊन विकासाची, सेवेची कामे करत आहात. जेव्हा मला तुमच्या या प्रयत्नांबद्दल सांगण्यात आले तेव्हा माझ्या तुमच्याकडून आशा आणि आकांक्षा जरा वाढल्या आहेत आणि जेव्हा कोणी काही तरी करते तेव्हाच आशा वाढतात. तुम्ही हे केले आहे म्हणूनच माझ्या तुमच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

मित्रांनो, 2021 मध्ये या महान संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. आज जो प्रयत्न तुम्ही 50 गावांत करत आहात, येत्या दोन तीन वर्षात त्यांची संख्या वाढून तुम्ही शंभर किंवा दोनशे गावांपर्यंत पोहोचू शकाल. माझा त्याबद्दल आग्रह असेल की देशाच्या गरजांशी आपल्या प्रयत्नांचा ताळमेळ राखा. 2021 पर्यंत जेव्हा आम्ही या संस्थेची शताब्दी साजरी करू, त्याच प्रकारे 2021पर्यंत अशी शंभर गावे आम्ही विकसित करू जिथे प्रत्येक घरात विजेचे कनेक्शन असेल, गॅस कनेक्शन असेल, शौचालय असेल, माता आणि बालकांचे लसीकरण झालेले असेल, घरातील लोकांना डिजिटल व्यवहार येत असतील. त्यांना सामाईक सेवा केंद्रांवर जाऊन महत्त्वाचे ऑनलाईन फॉर्म भरता येतील, अशी गावे विकसित करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता.

उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात येणारी गॅस कनेक्शन आणि स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत बांधली जाणारी शौचालयांनी महिलांचे जीवन सुकर करण्याचे काम केले आहे, याची तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. गावांमध्ये तुमचे प्रयत्न शक्तीची उपासक, या भूमीत नारी शक्तीला सशक्त करण्याचे काम करेल आणि याशिवाय हा देखील प्रयत्न करता येऊ शकेल की या शंभर गावांना निसर्ग प्रेमी, निसर्ग पूजक गावे कशा प्रकारे बनवता येईल. ज्या प्रकारे निसर्गाचे संरक्षण करण्याचे काम तुम्ही करत आहात त्याच प्रकारे या गावांना देखील या मोहिमेत सहभागी करता येईल. म्हणजेच ही शंभर गावे त्या दृष्टिकोनाला पुढे घेऊन जातील, जिथे जलसाठवणुकीच्या पुरेशा व्यवस्था विकसित करून जलसंरक्षण करण्यात येत असेल, लाकडे न जाळता वायू संरक्षण करण्यात येत असेल, स्वच्छतेचे भान राखून नैसर्गिक खतांचा वापर करून भूमी संरक्षण करण्यात येत असेल.भारत सरकारच्या गोबर धन योजनेचा पुरेपूर फायदा घेता येऊ शकतो. अशी अनेक कामे आहेत ज्यांची एक यादी तयार करून त्यांना तुम्ही पूर्ण करू शकता.

मित्रांनो, आज आपण एक वेगळ्याच विषयात वेगळ्याच आव्हानांच्या जगात जगत आहोत. 2022 पर्यंत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होईपर्यंत न्यू इंडियाची निर्मिती करण्याचा संकल्प सव्वाशे कोटी देशवासियांनी केला आहे. या संकल्पाची पूर्तता करण्यामध्ये शिक्षण आणि शिक्षणाशी संबधित तुमच्या सारख्या महान संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. अशा संस्थामधून बाहेर पडणारे युवक देशाला नवी उर्जा प्रदान करतात. एक नवी दिशा देतात. आपली विद्यापीठे निव्वळ शिक्षण संस्था बनता कामा नये. तर त्यांची सामाजिक जीवनातही सक्रिय भागीदारी असली पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सरकार द्वारे उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठांना गावांच्या विकासाशी जोडण्यात येत आहे. गुरुदेवांच्या दृष्टिकोनाबरोबरच न्यू इंडियाच्या गरजेनुसार आपल्या शिक्षण व्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

या अर्थसंकल्पात revitalizing infrastructure & system in education म्हणजेच RISE या नावाने एक नवी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत चार वर्षात देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Global Initiative of Academic Network म्हणजेच ज्ञान देखील सुरू करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून भारतीय संस्थांमध्ये शिकवण्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना आमंत्रित करण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्‍थांना पुरेशा सुविधा मिळाव्यात यासाठी एक हज़ार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे Higher Education Financing Agency सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्यास मदत होईल. कमी वयातच Innovation म्हणजेच नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी आता आम्ही या दिशेने देशभरातील 2400 शाळांची निवड केली आहे. या शाळांमध्ये Atal Tinkering Labs च्या माध्यमातून आम्ही सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. या Labs मध्ये बालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून दिला जात आहे.

मित्रांनो, तुमची ही संस्था शिक्षणात नवनिर्मितीचे जिवंत उदाहरण आहे. नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा फायदा विश्व भारतीच्या 11000 विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्व इथून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला एक दृष्टिकोन मिळाला आहे. तुम्ही तुमच्या सोबत विश्व भारतीची ओळख घेऊन बाहेर पडत आहात. हा गौरव आणखी वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा असा माझा आग्रह आहे. जेव्हा अशा बातम्या येतात की एखाद्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवनिर्मितीच्या माध्यमातून , आपल्या कार्यातून 500 किंवा हजार लोकांच्या जीवनात बदल घडवला तेव्हा लोक त्या संस्थेला देखील प्रणाम करतात.

गुरुदेवांनी जे काही सांगितले होते ते लक्षात ठेवा “जोदि तोर दक शुने केऊ ना ऐशे तबे एकला चलो रे” जर तुमच्या सोबत यायला कोणी तयार नसेल तरी देखील आपल्या लक्ष्याच्या दिशेने तुम्ही एकटेच चालत राहा. पण आज मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही जर एक पाऊल उचलणार असाल तर सरकार तुमच्या सोबत चार पावले उचलायला तयार आहे.

लोकसहभागाच्या साथीने पुढे चालणारी पावलेच आपल्या देशाला 21व्या शतकातील त्या लक्ष्यापर्यंत घेऊन जातील जो या देशाचा अधिकार आहे, ज्याचे स्वप्न गुरुदेवांनी देखील पाहिले होते.

मित्रांनो गुरुदेवांनी त्यांच्या निधनाच्या काही काळ आधी गांधीजींना सांगितले होते की विश्व भारती असे जहाज आहे ज्यात त्यांच्या आयुष्यातील सर्वात बहुमूल्य खजिना ठेवलेला आहे. त्यांनी त्यावेळी अशी अपेक्षा ठेवली होती की भारतातील लोक आपण सर्वजण या बहुमूल्य खजिन्याला खूप काळजीपूर्वक सांभाळतील. तर या खजिन्याला केवळ सांभाळण्याचीच नव्हे तर तो अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. विश्व भारती विद्यापीठ न्यू इंडिया बरोबरच जगाला मार्ग दाखवत राहो. हीच मनोकामना व्यक्त करत मी माझे म्हणणे संपवतो.

तुम्ही तुमच्या माता पित्यांचे, या संस्थेचे आणि या देशाचे स्वप्न साकार करा यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.

B. Gokhale/ S. Patil