Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 8-9 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि ओदिशाला देणार भेट


नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जानेवारीला आंध्र प्रदेश आणि ओदिशाला भेट देणार आहेत. शाश्वत विकास, औद्योगिक वृद्धी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 8 जानेवारी रोजी विशाखापट्टणम् येथे संध्याकाळी साडेपाच वाजता 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ते 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे देखील उद्घाटन करतील.  

पंतप्रधानांचा आंध्र प्रदेश दौरा

हरित ऊर्जा आणि शाश्वत भविष्याप्रति  त्यांच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळ पुदिमडाका येथे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिले ग्रीन हायड्रोजन हब असलेल्या अत्याधुनिक एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पासाठी सुमारे 1,85,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. यामध्ये 20 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमधील गुंतवणुकीचा समावेश आहे ज्यामुळे हे केंद्र 1500 टीपीडी हरित हायड्रोजन आणि हरित मिथेनॉल, हरित युरिया आणि प्रामुख्याने निर्यातीच्या बाजारपेठेसाठी उत्पादित होणाऱ्या शाश्वत हवाई इंधनासह 7500 टीपीडी हरित हायड्रोजन डेरीवेटीव्ज उत्पादन करणारे भारताच्या सर्वात मोठ्या हरित हायड्रोजन उत्पादन केंद्रांपैकी एक ठरणार आहे.  या प्रकल्पामुळे 2030 पर्यंत भारताची बिगर जीवाश्म इंधन क्षमता 500 गिगावॉट करण्याच्या उद्दिष्टात महत्त्वाचे योगदान मिळणार आहे.

याशिवाय पंतप्रधान आंध्र प्रदेशमध्ये  19,500 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उदघाटन करणार असून यामध्ये विशाखापट्टणम येथील दक्षिण तटीय रेल्वे मुख्यालयाची पायाभरणी आणि इतर विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतुकीच्या ठिकाणी कोंडी कमी होईल, संपर्क व्यवस्था सुधारेल आणि प्रादेशिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.  

सर्वांसाठी सहज उपलब्ध असणारी आणि परवडण्याजोगी आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार, त्यांच्या हस्ते अनकापल्ली जिल्ह्यातील नक्कापल्ली येथे घाऊक  प्रमाणावरील औषध निर्मिती  केंद्राची पायाभरणी होणार आहे. विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि विशाखापट्टणम-काकीनाडा पेट्रोलियम, रसायन आणि पेट्रोकेमिकल गुंतवणुकीच्या क्षेत्राच्या जवळ असल्यामुळे या बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील चेन्नई बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्र (KRIS सिटी)ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्र हा राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत असलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट सिटी म्हणून त्याची निर्मिती करणे ही  यामागील संकल्पना आहे. या प्रकल्पामुळे  अंदाजे 10,500 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण उत्पादन गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे, ज्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपजीविकेचे साधन निर्माण होऊन आजीविका लक्षणीयरीत्या वाढेल आणि प्रादेशिक प्रगतीला चालना मिळेल.

पंतप्रधानांचा ओडिशा दौरा

पंतप्रधान ओडिशा मध्ये 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. प्रवासी भारतीय दिवस  संमेलन हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे. ओडिशा राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 8 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदायाचे विकसित भारतासाठीचे योगदान” ही या वर्षीच्या  अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 50 देशांतील भारतीय समुदायांच्या सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. प्रवासी भारतीय एक्सप्रेस या रेल्वेगाडीला पंतप्रधान दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वेगाडी खास परदेशातील भारतीय समुदायासाठी असून ती दिल्ली मधील निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून आपला प्रवास सुरु करेल आणि तीन आठवड्यांचा कालावधीत भारतातील विविध धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या स्थळांचे दर्शन घडवेल. प्रवासी तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत प्रवासी भारतीय एक्स्प्रेस चालवली जाईल.

S.Kane/S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai