राजस्थानमधील जयपूर येथे राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 6-7 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसांची ही परिषद 5 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत होणार असून यात सायबर गुन्हे, पोलीस कार्यातील तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी कारवाईतील आव्हाने, नक्षलवाद, तुरुंग सुधारणा यासह पोलीस कार्य आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या आराखड्यावरही परिषदेत चर्चा नियोजित आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, डीपफेक इत्यादीसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि त्यांच्यावर मात करण्याचे मार्ग यांसारख्या भविष्यातील पोलीस कार्य आणि सुरक्षेशी संबंधित संकल्पनांवर या परिषदेत चर्चा होईल. ठोस कृतीचे मुद्दे निश्चित करणे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी ही परिषद पुरवते. तसेच या बाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर दरवर्षी केले जाते.
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पोलीस आणि गुप्तचर अधिकारी यांचा समावेश असलेल्या या परिषदेत निश्चित केलेल्या विषयांवर व्यापक विचारमंथन होते. प्रत्येक संकल्पनेअंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्वोत्तम पद्धती परिषदेत सादर केल्या जातील जेणेकरून राज्ये एकमेकांकडून शिकू शकतील.
वर्ष 2014 पासून पंतप्रधानांची पोलीस महासंचालक (डीजीपी) परिषदेसाठी उत्सुकता दिसून आली आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांची उपस्थिती प्रतीकात्मक असे. याउलट वर्ष 2014 पासून पंतप्रधान परिषदेच्या सर्व प्रमुख सत्रांमध्ये उपस्थित राहतात. पंतप्रधान सर्व माहिती संयमाने ऐकतात, शिवाय मुक्त आणि अनौपचारिक चर्चेला प्रोत्साहन देतात जेणेकरून नवीन कल्पना समोर येऊ शकतील. या वर्षीच्या परिषदेत न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावेळीही मुक्त प्रवाही संकल्पनात्मक चर्चा नियोजित आहे. यामुळे देशाला भेडसावणाऱ्या प्रमुख अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना त्यांचे विचार आणि शिफारशी पंतप्रधानांना सांगण्याची संधी मिळेल.
पंतप्रधानांनी 2014 पासून वार्षिक डीजीपी परिषदा देशाच्या विविध भागात आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. ही परिषद 2014 मध्ये गुवाहाटी येथे, 2015 मध्ये कच्छचे रणमधील धोरडो येथे; 2016 मध्ये हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीत, 2017 मध्ये टेकनपूर येथील बीएसएफ अकादमी, 2018 मध्ये केवडिया येथे, 2019 मध्ये आयआयएसईआर पुणे येथे, 2021 मध्ये लखनौमधील पोलीस मुख्यालयात आणि 2023 मध्ये दिल्लीतील पुसा इथल्या राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलात आयोजित करण्यात आली होती. ही परंपरा पुढे चालू ठेवत, यावर्षी जयपूर येथे ही परिषद आयोजित केली जात आहे.
या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहराज्यमंत्री, कॅबिनेट सचिव, केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व केंद्रीय पोलिस संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
***
SonalT/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai