नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशनच्या विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान, वलसाडमधील धरमपूर येथे श्रीमद राजचंद्र रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे. अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांनी युक्त असे हे 250 खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. विशेषत: दक्षिण गुजरात भागातील लोकांना हे जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करेल.
पंतप्रधान, श्रीमद राजचंद्र पशु रुग्णालयाचीही पायाभरणी करतील. सुमारे 150 खाटांचे हे रुग्णालय सुमारे 70 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. हे उच्च श्रेणीच्या सुविधांनी सुसज्ज असेल आणि पशुवैद्यक तसेच समर्पित सहायक कर्मचारीवृंद इथे तैनात असेल. रूग्णालय, प्राण्यांची काळजी आणि संगोपनासाठी पारंपारिक औषधांबरोबरच सर्वांगीण वैद्यकीय सेवा प्रदान करेल.
पंतप्रधान यावेळी श्रीमद राजचंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमनची पायाभरणी करतील. याच्या उभारणीसाठी अंदाजे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात मनोरंजनासाठी सुविधा, स्वयं-विकास सत्रांसाठी वर्गखोल्या, विश्रांती कक्ष असतील. हे 700 हून अधिक आदिवासी महिलांना रोजगार देईल तसेच इतर हजारो लोकांना उपजीविकेचे साधन देईल.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com