पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 फेब्रुवारी 2024 रोजी ओडिशा आणि आसामला भेट देणार आहेत.
पंतप्रधान, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास ओडिशातील संबलपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुमारे 68,000 कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान आसामला भेट देतील. ते, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता गुवाहाटी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 11,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधानांचा संबलपूर दौरा
देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीच्या अनुषंगाने, ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने ओडिशातील संबलपूर येथे सार्वजनिक कार्यक्रमात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली जाईल.
‘जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा वाहिनी प्रकल्प (जे. एच. बी. डी. पी. एल.)‘ च्या ‘धामरा-अंगुल वाहिनी विभाग‘ चे (412 कि. मी.) उद्घाटन पंतप्रधान करतील. ‘प्रधानमंत्री ऊर्जा गंगा‘ अंतर्गत 2450 कोटी रुपयांहून अधिक खर्चून बांधण्यात आलेला हा प्रकल्प ओडिशाला राष्ट्रीय गॅस ग्रीडशी जोडेल. मुंबई-नागपूर-झारसुगुडा वाहिनीच्या ‘नागपूर झारसुगुडा नैसर्गिक वायू वाहिनी विभागा‘ ची (692 किमी) पायाभरणीही पंतप्रधान करतील. 2660 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित होणाऱ्या या प्रकल्पामुळे ओडिशा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसारख्या राज्यांना होणारी नैसर्गिक वायूची उपलब्धता सुधारेल.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुमारे 28,980 कोटी रुपयांच्या अनेक ऊर्जा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणीही करतील. ओदिशातील सुंदरगड जिल्ह्यातील एन. टी. पी. सी. दारलीपाली उच्च औष्णिक ऊर्जा केंद्र (2×800 मेगावॅट) आणि एन. एस. पी. सी. एल. राउरकेला पी. पी.-2 विस्तार प्रकल्प (1×250 मेगावॅट) हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत. ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात एन. टी. पी. सी. तालचेर औष्णिक ऊर्जा प्रकल्प, टप्पा-3 (2×660 मेगावॅट) ची पायाभरणीही ते करतील. हे वीज प्रकल्प ओडिशा तसेच इतर अनेक राज्यांना कमी किमतीत वीजपुरवठा करतील.
पंतप्रधान 27000 कोटींहून अधिक खर्चाच्या नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या (एन. एल. सी.) तालाबिरा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या ध्येयदृष्टीला बळकटी देत, हा अत्याधुनिक प्रकल्प विश्वासार्ह, परवडणारा आणि चोवीस तास वीज पुरवणारा असेल तसेच देशाच्या ऊर्जा सुरक्षेत लक्षणीय योगदान देईल. देशाच्या आर्थिक विकासात आणि समृद्धीमध्येही हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
अंगुल जिल्ह्यातील तालचेर कोळसाक्षेत्रातील फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्प-भुवनेश्वर टप्पा-1 आणि लाजकुरा रॅपिड लोडिंग सिस्टम (आरएलएस) यासह महानदी कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. सुमारे 2145 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे ओडिशातील कोरड्या इंधनाची गुणवत्ता आणि पुरवठा वाढेल.
पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात 550 कोटी रुपयांहून अधिक खर्चून बांधण्यात आलेल्या आयबी व्हॅली वॉशरीचेही (कोळसा स्वच्छ करणारा प्रकल्प) पंतप्रधान उद्घाटन करतील. यामुळे गुणवत्तापूर्ण कोळसा प्रक्रियेत आदर्श बदल घडून येईल. नवोन्मेषता आणि शाश्वतता येईल. महानदी कोलफील्ड्स लिमिटेडने 878 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधलेल्या झारसुगुडा-बारपाली-सर्देगा रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 50 किलोमीटर लांबीचा दुसरा मार्ग पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.
सुमारे 2110 कोटी रुपयांच्या संचयी खर्चातून विकसित केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या तीन रस्ते क्षेत्रातील प्रकल्पांचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 215 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 520) च्या रिमुली-कोइडा विभागाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग 23 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 143) च्या बिरमित्रपूर-ब्राह्मणी बाह्यवळण अखेर विभागाचे चौपदरीकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग 23 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 143) च्या ब्राह्मणी बाह्यवळण अखेर -राजमुंडा विभागाचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दळणवळण वाढेल आणि या प्रदेशाच्या आर्थिक विकासातही योगदान मिळेल.
त्यानंतर सुमारे 2146 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. संबलपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचीही ते पायाभरणी करतील. याची वास्तुकला शैलाश्री राजवाड्यापासून प्रेरित आहे. संबलपूर-तालचेर दुहेरी रेल्वे मार्ग (168 कि. मी.) आणि झारतरभा ते सोनेपूर नवीन रेल्वे मार्गाचेही (21.7 कि. मी.) ते राष्ट्रार्पण करतील. यामुळे या भागातील रेल्वे जाळ्याची क्षमता वाढेल. पुरी-सोनेपूर-पुरी साप्ताहिक एक्स्प्रेसलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांची संपर्क व्यवस्था सुधारेल.
पंतप्रधान, आय. आय. एम. संबलपूरच्या कायमस्वरूपी प्रांगणाचेही उद्घाटन करतील. त्यानंतर ते झारसुगुडा मुख्य टपाल कार्यालय वारसा इमारत राष्ट्राला समर्पित करतील.
पंतप्रधानांचा गुवाहाटी दौरा
गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणे या क्षेत्रावरही पंतप्रधानांचा कटाक्ष राहिला आहे. या अंतर्गत आणखी एका टप्प्यात, पंतप्रधान अनेक प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘माँ कामाख्या दिव्य प्रकल्प‘ (माँ कामाख्या प्रवेश मार्गिका). याला पंतप्रधानांच्या ईशान्य प्रदेश विकास उपक्रम (पीएम-डिवाइन) योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत कामाख्या मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातील.
पंतप्रधान 3400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक रस्ते सुधारणा प्रकल्पांची पायाभरणी करतील. दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य (एस. ए. एस. ई. सी.) मार्गिका संपर्क व्यवस्थे अंतर्गत 38 पुलांसह 43 रस्त्यांचे अद्ययावतीकरण केले जाईल. दोलाबारी ते जमुगुडी आणि विश्वनाथ चरियाली ते गोहपूर या दोन चौपदरीकरणाच्या प्रकल्पांचेही उद्घाटन पंतप्रधान करतील. या प्रकल्पांमुळे इटानगरशी संपर्क व्यवस्था सुधारण्यास आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
या प्रदेशातील अफाट क्रीडा क्षमतेचा वापर करण्याच्या उद्देशाने, राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करतील. या प्रकल्पांमध्ये चंद्रपूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम आणि नेहरू स्टेडियम यांचे फिफा मानकानुरुप फुटबॉल स्टेडियम म्हणून आधुनिकीकरण यांचा समावेश आहे.
गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. त्यानंतर, करीमगंज येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासकामांची पायाभरणीही ते करणार आहेत.
***
JPS/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai