Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 29 फेब्रुवारी 2020 रोजी देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरू करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2020 रोजी चित्रकूट येथे देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरू करणार आहेत.

देशात सुमारे 86 टक्के शेतकरी छोटे आणि अल्पभूधारक असून त्यांच्याकडे 1.1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. छोटे, मध्य आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कृषी उत्पादन टप्प्यात तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, खते आणि किटकनाशकांची उपलब्धता यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांचे उत्पादनांचे विपणन करतांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. शेतकरी उत्पादक संघटना अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांना सामूहिक बळ देतात. या संघटनांचे सदस्य तंत्रज्ञान, वित्त पुरवठा आणि बाजारपेठेत शेतमाल घेऊन जाण्यासाठी मदत करतात, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होईल.

पीएम-किसानला एक वर्ष पूर्ण

याच कार्यक्रमात पीएम-किसान योजनेच्या वर्षपूर्तीची दखल घेतली जाईल.

मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी आणि संलग्न उद्योग तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक उत्पन्न मिळू शकेल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 6000 रुपयांपर्यंत मदत दिली जाते. चार महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे थेट जमा होतात. गेल्या 24 फेब्रुवारीला ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेने 24 फेब्रुवारी 2020 रोजी यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएम-किसान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

पीएम-किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी विशेष मोहीम

पीएम किसान योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी पंतप्रधान 29 फेब्रुवारी रोजी एका विशेष मोहिमेची सुरूवात करणार आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत सुमारे 8.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 6.5 कोटी लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. या विशेष मोहिमेमुळे उर्वरित 2 कोटी लाभार्थ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड दिली जाणार आहेत.

12 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान 15 दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामध्ये एक साधा एकपानी अर्ज भरून द्यायचा होता, ज्यामध्ये बँक खाते क्रमांक, जमिनीच्या नोंदीचा तपशील आणि अन्य कुठल्याही बँकेच्या शाखेत आपण किसान क्रेडिट कार्डचा लाभार्थी नसल्याचे जाहीर करणे याचा समावेश आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना 29 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बँकांच्या शाखांमध्ये किसान क्रेडिट कार्ड सुपूर्द करण्यासाठी बोलावले जाणार आहे.

**********

R.Tidake/S.Kane/P.Kor