नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून स्वारगेटला जाणाऱ्या मेट्रो रेल्वेला झेंडा दाखवून ते या सेवेची सुरुवात करतील. त्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या हस्ते 22,600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात येईल.
पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे 1,810 कोटी रुपये खर्च आला आहे.
यानंतर, सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या स्वारगेट-कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार कार्याची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दक्षिण टोकाकडील सुमारे 5.46 किमी लांबीचा हा विस्तार संपूर्णपणे भूमिगत स्वरूपाचा असून या मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज ही तीन स्थानके आहेत.
पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्याची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात येईल.
महासंगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येईल.राष्ट्रील महासंगणक अभियानाअंतर्गत (एनएसएम) सुमारे 130 कोटी रुपये खर्चासह संपूर्ण स्वदेशी पद्धतीने हे महासंगणक विकसित करण्यात आले आहेत. अग्रगण्य वैज्ञानिक संशोधन कार्याची सुलभ सोय करण्याच्या दृष्टीने हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये कार्यरत केले जाणार आहेत. पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या संस्थेतर्फे फास्ट रेडिओ बर्स्ट्स (एफआरबीज) आणि इतर खगोलीय घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी महासंगणकाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली येथील इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सिलरेटर सेंटर (आययुएसी) मध्ये भौतिक विज्ञान आणि अणुभौतिकी सारख्या क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन करण्यासाठी महासंगणक उपयुक्त ठरेल. कोलकाता येथील एस.एन.बोस केंद्रात बसवलेल्या महासंगणकामुळे भौतिकशास्त्र, कोस्मॉलॉजी आणि पृथ्वी विज्ञान या क्षेत्रांतील आधुनिक संशोधनाला मोठी चालना मिळेल.
हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) प्रणालीचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, हवामानविषयक प्रणालींमधील भारताच्या संगणकीय क्षमतांची ही लक्षणीय झेप ठरेल.
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि नोएडामधील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (NCMRWF) या दोन महत्त्वाच्या स्थळांवर स्थापन करण्यात आलेल्या या HPC प्रणालीमध्ये असाधारण संगणकीय क्षमता आहे.
नवीन HPC प्रणालींना ‘अर्का’ आणि ‘अरुणिका’ असे नाव देण्यात आले असून, यामधून त्यांचे सूर्याशी असलेले नाते प्रतिबिंबित होते. ही उच्च-रिझोल्यूशन मॉडेल अंदाजामधील अचूकता लक्षणीयरीत्या वाढवतील, आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, अतिवृष्टी, वादळी पाउस, गारपीट, उष्णतेची लाट, दुष्काळ आणि हवामान विषयक इतर महत्वाच्या घटनांशी संबंधित अचूक अंदाज वर्तवेल.
पंतप्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 10,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करतील. हे उपक्रम ऊर्जा, पायाभूत सुविधा, ट्रक आणि कॅब चालकांची सुरक्षितता आणि सुविधा, स्वच्छ प्रवास आणि शाश्वत भविष्यावर लक्ष केंद्रित करतील.
वाहन चालवणे सुलभ करण्यासाठी, पंतप्रधान ट्रक चालकांसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पंजाब मध्ये फतेहगढ साहिब, गुजरात मध्ये सोनगढ, आणि कर्नाटकमध्ये बेळगावी आणि बंगलोर ग्रामीण, या ठिकाणी महामार्गालगतच्या सुविधांचे उद्घाटन करतील.
ट्रक आणि कॅब चालकांना लांबच्या प्रवासादरम्यान, महामार्गालगत परवडणारी निवास आणि भोजन सुविधा, स्वच्छ प्रसाधन गृहे, सुरक्षित पार्किंगची जागा, स्वयंपाकाची जागा, वायफाय, जिम यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, सुमारे 2,170 कोटी रुपये खर्च करून देशभरातील महामार्गांवरील 1,000 रिटेल आउटलेटच्या ठिकाणी या सुविधा विकसित केल्या जात आहेत.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सीबीजी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) इत्यादी ऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय एकाच किरकोळ विक्री केंद्रात पुरवण्यासाठी पंतप्रधान ऊर्जा स्थानकांचे उद्घाटन करणार आहे. सुवर्ण चतुष्कोन मार्ग, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गिकांसह इतर महत्त्वाच्या महामार्गांवर येत्या 5 वर्षांत सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च करून जवळपास 4,000 ऊर्जा स्थानके उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांसाठी एकाच छताखाली पर्यायी इंधनांच्या पुरवठ्याची तरतूद असलेली ऊर्जा स्थानके वाहतूक सुलभ करण्यास मदत करतील.
हरित ऊर्जा, कार्बन उत्सर्जनाला आळा आणि एकूणच शून्य उत्सर्जनासह विद्युत वाहनचालकांना अंतराविषयी वाटणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी पंतप्रधान 500 ईव्ही चार्जिंग सुविधांचे लोकार्पण करणार आहेत. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत अंदाजे 1,500 कोटी रुपये खर्च करून 10,000 ईव्ही चार्जिंग स्थानके (ईव्हीसीएस)उभारण्याचे ध्येय आहे.
पंतप्रधान द्रवरूप नैसर्गिक वायू – एलएनजीच्या 20 स्थानकांचे लोकार्पण करणार असून त्यापैकी 3 महाराष्ट्रात आहेत. लांब अंतराच्या प्रवासात एलएनजीसारख्या स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये तेल आणि वायू कंपन्या सुमारे 500 कोटी रुपये अंदाजे किमतीत 50 एलएनजी स्थानके उभारणार आहेत.
पंतप्रधान ई20 (20% इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या सुमारे 225 कोटी रुपये अंदाजित किमतीच्या 1,500 किरकोळ विक्री केंद्रांचे लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करतील. या विमानतळामुळे हवाई मार्गाच्या जाळ्यात सुधारणा होऊन पर्यटक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना सोलापूरला सहज पोहोचणे शक्य होईल. सोलापुरात सध्या असलेली टर्मिनलची इमारत वर्षाला सुमारे 4.1 लाख प्रवासी क्षमतेसाठी पुनर्विकसित करण्यात आली आहे.
पंतप्रधान बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण करणार आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे 20 किमी अंतरावर भारत सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत हे परिवर्तनक्षम प्रकल्प क्षेत्र 7,855 एकर अशा विस्तीर्ण प्रदेशात विकसित करण्यात येत आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक जोडमार्गांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये मराठवाड्याला गजबजलेले आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 6,400 कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे.
* * *
S.Kane/Sanjana/Rajshree/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai