Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 19 मे 2018 रोजी जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2018 रोजी जम्मू आणि काश्मिरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधान लेहमध्ये 19 व्या कुशोक बकुळा रिंपोच यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात ते झोजिला बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करतील.

14 किलोमीटर लांब झोजिला बोगदा भारतातील सर्वात लांब पल्ल्याचा रस्ते बोगदा आणि आशियातील सर्वात लांब दुहेरी बोगदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने यावर्षीच्या सुरुवातीलाच श्रीनगर-लेह मार्गावरील बालताल आणि मिनामार्ग दरम्यान बोगद्याच्या बांधकाम, परिचालन आणि देखभालीसाठी 6 हजार 800 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाला मंजूरी दिली आहे. या बोगद्यामुळे झोजिला खिंड पार करण्यासाठी सध्या लागणारा साडेतीन तासांचा वेळ कमी होऊन केवळ 15 मिनिटात हे अंतर पार करता येईल. यामुळे या भागाचे आर्थिक आणि सामाजिक – सांस्कृतिक एकात्मिकरण व्हायला मदत होईल. याला धोरणात्मक महत्व देखिल आहे.

पंतप्रधान श्रीनगरमध्ये शेर-ए-काश्मिर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात 330 मेगावॅटचा किशन गंगा जलविद्युत केंद्र राष्ट्राला अर्पण करतील. श्रीनगर रिंगरोडचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल.

जम्मूमधील जनरल झोरावर सिंग सभागृहात पंतप्रधान पकुल डुल वीज प्रकल्प आणि जम्मू रिंगरोडचे भूमिपूजन करतील. तसेच ते ताराकोटे मार्ग आणि माता वैष्णवदेवी बोर्डाच्या मटेरियल रोप-वेचे उद्‌घाटन करतील.
श्रीनगर आणि जम्मूमधील रिंगरोडचा उद्देश या शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणे आणि रस्ते प्रवास सुरक्षित, वेगवान, सोयीस्कर आणि पर्यावरणाला अनुकूल बनवणे हा आहे.

पंतप्रधान जम्मूमधील शेर-ए-काश्मिर, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला देखिल उपस्थित राहणार आहेत.

B.Gokhale/S.Kane/D.Rane