पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
संपर्क विषयक पायाभूत सुविधांच्या विस्तारावर केंद्र सरकारचा प्रामुख्याने भर आहे. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेली नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत द्वीपसमूह असलेल्या केंद्रशासित प्रदेशात कनेक्टिव्हिटीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सुमारे 40,800 चौ.मी.च्या एकूण बांधकाम क्षेत्रासह, नवीन टर्मिनल इमारत दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी हाताळू शकेल. दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त एप्रन देखील पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. यामुळे विमानतळावर आता एकाच वेळी दहा विमानांच्या पार्किंगची सोय झाली आहे.
निसर्गापासून प्रेरित, या विमानतळ टर्मिनलची स्थापत्य रचना समुद्र आणि बेटांचे वर्णन करणाऱ्या कवचाच्या आकाराच्या संरचनेसारखी आहे. नवीन विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये उष्णता वाढू नये यासाठी डबल इन्सुलेटेड रूफिंग सिस्टम, इमारतीमध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने दिवसा भरपूर नैसर्गिक सूर्यप्रकाश यावा यासाठी स्कायलाइट्स, एलईडी लाइटिंग, उष्णता रोखणाऱ्या खिडक्या यांसारखी अनेक शाश्वत स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेत. भूमिगत पाण्याच्या टाकीत पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा, लँडस्केपिंगसाठी 100% प्रक्रिया केलेले सांडपाणी पुन्हा वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि 500 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प ही टर्मिनल इमारतीची काही वैशिष्ट्ये आहेत, जी या बेटांच्या पर्यावरणावर कमीतकमी नकारात्मक प्रभाव पडेल याची काळजी घेतील.
अंदमान आणि निकोबारच्या स्वच्छ आणि सुंदर बेटांचे प्रवेशद्वार असलेले पोर्ट ब्लेअर हे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. प्रशस्त नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे विमान वाहतुकीला चालना मिळेल आणि या प्रदेशातील पर्यटन वाढण्यास मदत होईल. तसेच इथल्या स्थानिक समुदायासाठी रोजगाराच्या वाढीव संधी निर्माण करण्यास आणि प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करेल.
***
S.Thakur/S.Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai