नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे होणाऱ्या भारत टेक्स 2025 या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.
भारत मंडपम येथे दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित भारत टेक्स 2025 हा भव्य जागतिक कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हा कार्यक्रम वस्त्रोद्योगातील कच्च्या मालापासून विक्रीसाठी तयार उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीला एका छत्राखाली आणेल.
भारत टेक्स मंच हा वस्त्रोद्योगातील सर्वात मोठा आणि सर्वात व्यापक कार्यक्रम असून त्यामध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमस्थळांवरील प्रचंड मोठ्या प्रदर्शनांचा समावेश असून तेथे वस्त्रोद्योगाच्या संपूर्ण परिसंस्थेचे दर्शन घडेल. यामध्ये 70 हून अधिक परिषद सत्रे, गोलमेज बैठका, गट चर्चा तसेच मास्टर क्लासेस सारख्या जागतिक पातळीवरील परिषदेचा देखील समावेश असेल. तसेच कार्यक्रमस्थळी विशेष नवोन्मेष आणि स्टार्ट अप दालने असलेले प्रदर्शन देखील मांडण्यात येणार आहे.प्रमुख गुंतवणूकदारांच्या माध्यमातून स्टार्ट अप उद्योगांना वित्तपुरवठ्याच्या संधी उपलब्ध करून देणारे हॅकेथॉन्स आधारित स्टार्ट अप पिच फेस्ट आणि नवोन्मेष फेस्ट, टेक टँक्स आणि डिझाईन विषयक स्पर्धांचा देखील या कार्यक्रमात समावेश असेल.
इतर अनेक अभ्यागतांसह जगभरातील 120 देशांतून आलेले धोरणकर्ते आणि जागतिक उद्योगांचे प्रमुख, 5000 हून अधिक प्रदर्शक, 6000 आंतरराष्ट्रीय खरेदीदार या भारत टेक्स 2025 मध्ये सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय वस्त्र निर्माता महासंघ (आयटीएमएफ), आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी), युराटेक्स, वस्त्र विनिमय संघ, यु एस फॅशन उद्योग संघटना (युएसएफआयए) यांसारख्या आघाडीच्या 25 हून अधिक जागतिक वस्त्रोद्योग संस्था आणि संघटनांसह इतर अनेक संबंधित संस्था देखील या कार्यक्रमात भाग घेतील.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com