नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. हिमाचल प्रदेश मधील उना येथे पंतप्रधान, उना रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान आयआयआयटी उनाचे लोकार्पण करतील आणि उना येथील बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. त्यानंतर चंबा येथील एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि हिमाचल प्रदेश मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (पीएमजीएसवाय)-III ची सुरुवात करतील.
उना मध्ये पंतप्रधान
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासाठी केलेल्या आवाहनामुळे, सरकारच्या विविध नवीन उपक्रमांच्या मदतीने, देश अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. औषध-निर्मिती क्षेत्र हे यापैकी एक महत्वाचे क्षेत्र आहे, आणि या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी, पंतप्रधान उना जिल्ह्यात हारोली येथे बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करणार आहेत. यासाठी 1900 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. हे पार्क एपीआय आयातीवरील अवलंबित्व कमी करायला मदत करेल.
या पार्कमुळे सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि वीस हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. या पार्कमुळे या भागातील आर्थिक व्यवहारांना देखील अधिक चालना मिळेल.
पंतप्रधान या भेटीमध्ये उना येथील आयआयआयटी अर्थात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते वर्ष 2017 मध्ये या संस्थेची पायाभरणी झाली होती. सध्या या संस्थेत 530 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या भेटीदरम्यान, पंतप्रधान नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची उद्घाटनपर सेवा हिरवा झेंडा दाखवून सुरु करतील. अंब अंदौरा ते नवी दिल्ली या मार्गावर धावणारी ही गाडी, देशात सुरु करण्यात आलेली चौथी वंदे भारत गाडी आहे. यापूर्वीच्या या प्रकारातील गाड्यांचे हे अत्याधुनिक रूप असून ही गाडी वजनाने अधिक हलकी असून प्रवाशांना कमी वेळात अधिक वेगाने इच्छित स्थळी पोहोचविणारी रेल्वे गाडी आहे. केवळ 52 सेकंदांमध्ये ही गाडी ताशी100 किलोमीटरचा वेग पकडू शकते. ही गाडी सुरु झाल्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळेल आणि येथील जनतेला अधिक आरामदायी तसेच वेगवान प्रवासाची सोय उपलब्ध होईल.
पंतप्रधानांचा चंबा दौरा
पंतप्रधानांच्या हस्ते 48 मेगावॉट क्षमतेचा चांजू-3 जल-विद्युत प्रकल्प आणि 30 मेगावॉट क्षमतेचा देवथल चांजू जल-विद्युत प्रकल्प अशा दोन प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे.या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्हींतून दर वर्षी एकूण 270 दशलक्ष पेक्षा अधिक युनिट्सची वीजनिर्मिती होईल आणि या प्रकल्पांतून हिमाचल प्रदेशाला दर वर्षी सुमारे 110 कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेश राज्यातील सुमारे 3125 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना- 3 ची पंतप्रधान मोदी सुरुवात करतील. या टप्प्यात सीमावर्ती तसेच अतिदूरच्या भागातील सुमारे 440 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे अद्यायावतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 420 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.
S.Kane/Rajashree/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai