नवी दिल्ली, 10 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.
त्यानंतर ते मध्य प्रदेशला जातील आणि दुपारी 3:15 वाजता इसागढ येथील गुरुजी महाराज मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. तसेच, दुपारी 4:15 वाजता ते आनंदपूर धाम येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.
उत्तर प्रदेशात पंतप्रधान
पंतप्रधान वाराणसीमध्ये 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत . आपल्या वचनबद्धतेनुसार, वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, विशेषतः रस्ते संपर्क वाढवण्यासाठी ते या प्रदेशातील विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याशिवाय, ते वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानच्या रस्त्याच्या पुलाची, शहरातील भिखारीपूर आणि मंदुआदि क्रॉसिंगवर उड्डाणपूल तसेच वाराणसी आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी राष्ट्रीय महामार्ग-31 वर 980 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या महामार्ग अंडरपास बोगद्याची पायाभरणी करतील.
वीज पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान वाराणसी विभागातील जौनपूर, चंदौली आणि गाजीपूर जिल्ह्यांमध्ये 1,045 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दोन 400 केव्ही आणि एका 220 केव्ही पारेषण उपस्थानक आणि संबंधित पारेषण रेखांचे उद्घाटन करतील. ते वाराणसीतील चौकघाट येथे 220 केव्ही पारेषण उपस्थानक, गाझीपूरमध्ये 132 केव्ही पारेषण उपस्थानक तसेच 775 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाराणसी शहर वीज वितरण प्रणालीवाढीची पायाभरणी देखील करतील.
सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी सुविधा सुधारण्याकरिता पंतप्रधान पोलिस लाईन येथे ट्रान्झिट हॉस्टेल आणि पीएसी रामनगर कॅम्पसमधील बॅरेक्सचे उद्घाटन करतील. विविध पोलिस स्टेशनमधील नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलिस लाईनमध्ये निवासी वसतिगृहाची पायाभरणी देखील ते करतील.
सर्वांसाठी शिक्षणाची सुनिश्चिती करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार, पंतप्रधान पिंड्रा येथे सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बर्की गावात सरदार वल्लभभाई पटेल सरकारी महाविद्यालय, 356 ग्रामीण ग्रंथालये आणि 100 अंगणवाडी केंद्रे यासह प्रकल्पांचे उद्घाटन करतील. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 77 प्राथमिक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण आणि वाराणसीतील चोलापूर येथे कस्तुरबा गांधी शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम याचीही ते पायाभरणी करतील. शहरातील क्रीडा पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी, पंतप्रधान उदय प्रताप महाविद्यालयात फ्लडलाइट्स आणि प्रेक्षक गॅलरीसह सिंथेटिक हॉकी टर्फ आणि शिवपूर येथे मिनी स्टेडियमची कोनशिला ठेवतील.
पंतप्रधान गंगा नदीवरील सामने घाट आणि शास्त्री घाटाचा पुनर्विकास, जल जीवन अभियानांतर्गत 345 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 130 ग्रामीण पेयजल योजना, वाराणसीच्या सहा नगरपालिका वॉर्डांमध्ये सुधारणा आणि वाराणसीच्या विविध ठिकाणी लँडस्केपिंग आणि शिल्पकला प्रतिष्ठापनांचे उद्घाटन देखील करतील.
कारागिरांसाठी एमएसएमई युनिटी मॉल, मोहनसराय येथे ट्रान्सपोर्ट नगर योजनेची पायाभूत सुविधा विकास कामे, डब्ल्यूटीपी भेलुपूर येथे 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, 40 ग्रामपंचायतींमध्ये कम्युनिटी हॉल आणि वाराणसीतील विविध उद्यानांचे सुशोभीकरण यांचे भूमिपूजन देखील पंतप्रधान करतील.
पंतप्रधान 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदाच लाभार्थी म्हणून आयुष्मान वय वंदना कार्ड देखील प्रदान करतील. ते तबला, चित्रकला, थंडाई, तिरंगा बर्फी यासह विविध स्थानिक वस्तू आणि उत्पादनांना भौगोलिक संकेत (जीआय) प्रमाणपत्रे प्रदान करतील. ते बनास डेअरीशी संबंधित उत्तर प्रदेशातील दूध पुरवठादारांना 105 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोनस देखील हस्तांतरित करतील.
पंतप्रधान- मध्य प्रदेश दौरा
भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला समृद्ध करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील इसागढ तालुक्यातील आनंदपूर धामला भेट देतील. ते गुरुजी महाराज मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. ते आनंदपूर धाम येथील मंदिर संकुलालाही भेट देतील.
आनंदपूर धामची स्थापना आध्यात्मिक आणि परोपकारी उद्देशांसाठी करण्यात आली आहे. 315 हेक्टर क्षेत्रफळावर वसलेल्या या मंदिरात 500 हून अधिक गायी असलेली आधुनिक गोशाळा (गोठा) आहे आणि श्री आनंदपूर ट्रस्ट कॅम्पस अंतर्गत शेतीविषयक उपक्रम चालवले जातात. हा ट्रस्ट सुखपूर गावात एक धर्मादाय रुग्णालय, सुखपूर आणि आनंदपूरमध्ये शाळा आणि देशभरातील विविध सत्संग केंद्रे चालवत आहे.
* * *
A.Chavan/Nandini/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai