Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत-बांग्लादेश यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन

पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत-बांग्लादेश यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन


नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

1. बांग्लादेशच्या पंतप्रधान महामाहीम शेख हसीना, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत, 5 ते 8 सप्टेंबर 2022 या काळात भारताच्या औपचारिक दौऱ्यावर आल्या होत्या. ह्या भेटीदरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी, भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस. जयशंकर, ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्री, श्री जी. किशन रेड्डी यांनीही श्रीमती शेख हसीना यांची भेट घेतली. त्याशिवाय, पंतप्रधान शेख हसीना यांच्या दौऱ्यादरम्यान, वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान विद्यार्थी शिष्यवृत्ती ची देखील सुरुवात करण्यात आली. 1971 च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात लढतांना हौतात्म्य आलेले आणि गंभीर जखमी झालेल्या भारतीय सैनिकांच्या 200 वारसदारांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच, भारत आणि बांग्लादेशच्या उद्योग समुदायांच्या 7 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीलाही शेख हसीना यांनी संबोधित केले.

2. दोन्ही पंतप्रधानांदरम्यान 6 सप्टेंबर 2022 रोजी एक खाजगी द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधीमंडळ स्तरीय बैठकही झाली. ह्या बैठका अत्यंत सोहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाल्या दोन्ही देशांच्या, सखोल ऐतिहासिक आणि बंधुभावावर आधारित असलेल्या तसेच लोकशाही आणि बहुलवादाची समान तत्वे असलेल्या देशांच्या द्विपक्षीय संबंधाच्या प्रगतीबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले, हे संबंध सर्वव्यापी द्वीपक्षीय भागीदारीत प्रतिबिंबित होत असून, सर्वभौमत्व, समानता, विश्वास आणि धोरणात्मक भागीदारीच्या कितीतरी पलीकडे असलेल्या परस्पर सामंजस्यावर हे संबंध आधारित आहेत.

3. यावेळी दोन्ही नेत्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्च 2021 च्या बांग्लादेश दौऱ्याचे स्मरण केले. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित विशेष समारंभ, तसेच, बांग्लादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांची जन्मशताब्दी आणि भारत-बांग्लादेश यांच्यातील संबंधाना 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यानंतर, डिसेंबर 2021 मध्ये भारताचे राष्ट्रपती देखील बांग्लादेश दौऱ्यावर गेले होते, बांग्लादेशच्या विजयदिनाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात, मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी झाले होते.

4. भारत बांग्लादेश सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यात मदत करणाऱ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटीगाठी झाल्याबद्दल दोन्ही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. जून 2022 मध्ये भारतातील नवी दिल्ली येथे दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त सल्लागार आयोगाच्या सातव्या बैठकीच्या यशस्वी आयोजनाचे दोन्ही नेत्यांनी स्मरण केले.

5. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी राजकीय आणि सुरक्षाविषयक सहकार्य, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, व्यापार आणि दळणवळण, जलसंपदा, वीज आणि ऊर्जा, विकास सहकार्य, सांस्कृतिक आणि दोन्ही देशातील लोकांमधील परस्पर संबंधांसह द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण क्षेत्रावर चर्चा केली. पर्यावरण, हवामान बदल, सायबर सुरक्षा, आयसीटी, अंतराळ तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि नील अर्थव्यवस्था यांसारख्या सहकार्याच्या नवीन क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यास सहमती व्यक्त केली.

6. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक हितसंबंधविषयक विविध पैलूंवर देखील चर्चा झाली. कोविड-19 महामारीचा प्रभाव आणि त्यानंतरच्या जागतिक घडामोडींमुळे पुरवठा साखळीत आलेले अडथळे लक्षात घेऊन, या प्रदेशाच्या समृद्धी आणि विकासासाठी मैत्री आणि भागीदारीच्या भावनेने अधिक सहकार्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला.

7. भारत-बांग्लादेश दरम्यान द्विपक्षीय आणि प्रादेशिक रेल्वे, रस्ते आणि दळणवळणाच्या इतर सुविधा उभारण्याचे महत्त्व, दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. तसेच, दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचे स्वागत केले. यात, टोंगी-अखौरा मार्गाचे दुहेरी गेजमध्ये रूपांतर, रेल्वे रोलिंग स्टॉकचा पुरवठा, बांग्लादेशातील रेल्वे कर्मचार्‍यांची क्षमता बांधणी, बांग्लादेशच्या रेल्वे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना, इत्यादींची देवाणघेवाण करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. दोन्ही देशांमध्ये राबवले जाणारे नवे उपक्रम, जसे की काउनिया-लालमोनिरहाट-मोगलघाट-नवीन गितालदहा लिंक, हिली आणि बिरामपूर दरम्यान लिंक टाकणे, बेनापोल-जशोर मार्गावरील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणा तसेच आणि रेल्वे स्थानकांचे अद्ययावतीकरण, बुरीमारी आणि चांगरबांधा दरम्यान पुन्हा लिंक निर्माण करणे, सिराजगंज येथे कंटेनर डेपोचे बांधकाम अशा उपक्रमांचा समावेश आहे. द्विपक्षीय विकास सहकार्याअंतर्गत, विविध आर्थिक साधनांद्वारे या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास, दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. बांग्लादेशाला 20 ब्रॉड-गेज डिझेल लोकोमोटिव्ह अनुदानित तत्वावर देण्याच्या भारताच्या भूमिकेचे बांग्लादेशाने स्वागत केले.

8. द्वीपक्षीय व्यापारात, होत असलेल्या विकासाबद्दल, दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले, सध्या भारत, बांग्लादेशासाठी आशिया खंडातील सर्वात मोठे निर्यातीचे केंद्र ठरला आहे. भारताकडून बांग्लादेशाला काही आवश्यक खाद्यवस्तूंचा निश्चित पुरवठा केला जावा, अशी विनंती बांग्लादेशाने केली. यात, तांदूळ, गहू, साखर, कांदा, आले आणि लसूण अशा वस्तूंचा समावेश होतो. भारतात ह्या पदार्थांच्या पुरवठ्याची स्थिती बघून बांग्लादेशाची ही विनंती, प्राधान्याने पूर्ण केली जाईल, आणि ह्या बाबत आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन भारताने यावेळी दिले.

9. भारत – बांग्लादेशसीमेवर शांतता नांदली पाहिजे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे हे मान्य करून, दोन्ही नेत्यांनी शून्य रेषेपासून 150 यार्ड भागातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, यात सीमा शांत आणि गुन्हेगारी मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने त्रिपुरा क्षेत्रापासून कुंपण घालण्यास सुरवात करणे, अशा कामांचा समावेश असेल.

10. सीमेवर घडणाऱ्या घटनांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे याची नोंद घेऊन, दोन्ही बाजूंनी हा आकडा शून्यावर आणण्याच्या दिशेने काम करण्यावर सहमती दर्शविली. दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांनी शस्त्रे, अमलीपदार्थ आणि खोट्या नोटांची तस्करी तसेच मानवी तस्करी, विशेषतः महिला आणि मुलाची मानवी तस्करी थांबविण्यासाठी प्रयत्न वाढविले आहेत याची दोन्ही बाजूंनी प्रशंसा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि त्यातून तयार होणाऱ्या विविध कारवायांचा बिमोड करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करून या क्षेत्रात दहशतवादाचा प्रसार, हिंसक कट्टरता याचा सामना करून त्याला पायबंद घालण्यासाठी सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला.

11. भारत आणि बांग्लादेशच्या संयुक्त नदी आयोगाची मंत्री गटाची 38वी बैठक (23-25 ऑगस्ट 2022, नवी दिल्ली) आयोजित केल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त करून दोन्ही नेत्यांनी सीमा क्षेत्रात असलेल्या कुशियारा नदीतून भारत आणि बांग्लादेशाने पाणी उचलण्यासंबंधी जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार आणि जलसंपदा मंत्रालय, बांग्लादेश सरकार यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले. या करारामुळे बांगलादेशात सिंचनाच्या गरजा पूर्ण होतील तसेच दक्षिण आसाममध्ये जल प्रकल्पांना मदत होईल.

12. त्रिपुरा राज्याच्या सिंचनाच्या तातडीच्या गरजा लक्षात घेता, भारताच्या बाजूने फेनी नदीच्या पाणी वाटप करारावर लवकरात लवकर सह्या करण्याची विनंती केली. बांगलादेशाने भारताच्या ह्या विनंतीची नोंद घेतली. त्रिपुराच्या सबरूम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास, फेनी नदीतून 1.82 क्युसेक पाणी उचलण्यासाठी 2019 च्या सामंजस्य करारानुसार विहीर बांधण्यास मदत केल्याबद्दल भारताने बांग्लादेशचे आभार मानले.

13. द्विपक्षीय संबंधांत जल व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेऊन, नेत्यांनी अधिक नद्यांचा समावेश करून माहितीच्या देवघेवीला प्राधान्य देण्याच्या आणि अंतरिम पाणीवाटप काराराचे प्रारूप तयार करून संयुक्त नदी आयोगाचे सहकारक्षेत्र वाढविण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. गंगा पाणीवाटप करार, 1996 च्या तरतुदींनुसार बांग्लादेशला मिळणाऱ्या पाण्याच्या कमाल वापर कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त तांत्रिक समितीची स्थापना करण्याच्या निर्णयाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

14. या आधी या संदर्भात झालेल्या चर्चेचे स्मरण करून, तीस्ता नदीच्या पाणी वाटपाचा अंतरिम करार पूर्ण करण्याच्या बांग्लादेशच्या प्रदीर्घ प्रलंबित विनंतीचा पुनरुच्चार, पंतप्रधान शेख हसीना यांनी केला. ह्या कराराच्या मसुद्याला 2011 मध्येच अंतिम स्वरूप देण्यात आले होते. नद्यांमधील प्रदूषणासारख्या समस्या सोडवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील सामाईक नद्यांच्या संदर्भात नदीचे पर्यावरण आणि नदीमार्गे वाहतूक सुधारण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश दोन्ही नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

15. ह्या उपखंडातील प्रादेशिक सहकार्य वाढवण्याच्या भावनेने, दोन्ही नेत्यांनी, दोन्ही देशांच्या पॉवर ग्रिड्सना जोडण्यासाठीचे प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित करण्यावर सहमती दर्शवली. यात बांगलादेशातील पारबतीपूर मार्गे प्रस्तावित कटिहार (बिहार) ते बोरनगर (आसाम) दरम्यानच्या उच्च क्षमतेच्या 765 केव्ही ट्रान्समिशन वाहिनीचाही समावेश आहे.हा प्रकल्प, भारत-बांगलादेश दरम्यान ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ म्हणून दोन्ही देशांतर्फे संयुक्तपणे राबावला जाणार आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर यावेळी सहमती झाली. नेपाळ आणि भूतानमधून, भारत मार्गे वीज आयात करण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंती बांग्लादेशने केली. त्यावर उत्तर देतांना या संदर्भातील मार्गदर्शक सूचना भारताने आधीच तयार केल्या आहेत, अशी माहिती भारतातर्फे देण्यात आली.

16. दोन्ही नेत्यांनी भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईन च्या बाबतीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे बांगलादेशची ऊर्जेची मागणीपूर्ण करण्यात मदत होईल. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बांग्लादेशाने भारताला, पेट्रोलियम उत्पादनांची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. यावर उत्तर देतांना यासाठी, दोन्ही बाजूंच्या अधिकृत अधिकाऱ्यांमध्ये यावर चर्चा करण्याची तयारी भारताने दर्शवली. आसाम आणि मेघालयात आलेल्या भीषण पुराच्या काळात, बांगलादेशमार्गे पेट्रोलियम, तेल आणि पदार्थांवंगण यांसारख्या पदार्थांची वाहतूक बांग्लादेशामार्गे करण्याची दिलेली परवानगी आणि कठीण परिस्थितीत केलेल्या मदतीसाठी भारताने बांग्लादेशचे आभार मानले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ला बांगलादेशात रिफाईन्ड पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी, नोंदणीकृत G2G पुरवठादार म्हणून अधिकृत मान्यता देण्याच्या बांग्लादेशाच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले.

17.  विकास भागीदारीमध्ये दोन्ही देशांमधील मजबूत सहकार्याबद्दल उभय  नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारताने ज्या कार्यक्षमतेने विकास निधी वितरित केला  त्याची  बांगलादेशकडून प्रशंसा करण्यात आली.  गेल्या आर्थिक वर्षात निधी वितरणाच्या बाबतीत बांगलादेश हा सर्वात मोठा विकास भागीदार बनला आहे.

18. चितगाव आणि मोंगला बंदरांच्या (ACMP) वापरासंबंधी  कराराअंतर्गत पूर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले आणि लवकरात लवकर तो पूर्णपणे  कार्यान्वित होईल याबाबत उत्सुक असल्याचे नमूद केले. त्रयस्थ देशात  आयात निर्यात होणाऱ्या मालवाहतुकीचा समावेश करण्यासाठी  2015 च्या द्विपक्षीय तटीय नौवहन  कराराचा विस्तार करण्याच्या  दिशेने काम सुरु करावे या विनंतीचा भारताने पुनरुच्चार केला.  उभय  देशांदरम्यान  थेट सागरी वाहतुकीची  जलद गतीने चाचपणी करण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अंतर्देशीय  जल वाहतूक  आणि व्यापार प्रोटोकॉल अंतर्गत  मार्ग 5 आणि 6 (धुलियान ते राजशाही-चा अरिचा पर्यंत  विस्तार) आणि 9 आणि 10 (दौडकंडी ते सोनमुरा) नदीतून वाहतूक  सेवा सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतही त्यांनी सहमती दर्शवली. त्रिपुराला बांगलादेशशी  जोडणाऱ्या फेनी नदीवरील मैत्री पुल कार्यान्वित करण्यासाठी उर्वरित पायाभूत सुविधा, इमिग्रेशन आणि सीमाशुल्क सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती भारताने बांगलादेशला केली.

19. बीबीआयएन मोटर वाहन करार लवकर कार्यान्वित करून द्विपक्षीय आणि उप-प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्याबाबत  दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. बांगलादेशमार्गे पश्चिम बंगालमधील हिली ते  मेघालयमधील महेंद्रगंजपर्यंत महामार्गासह नवीन उप-प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती  भारताने  बांगलादेशला  केली आणि या संदर्भात विस्तृत  प्रकल्प अहवाल तयार करण्याचीही सूचना केली. याच अनुषंगाने भारत – म्यानमार – थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पाच्या विद्यमान  उपक्रमात भागीदारीसाठी उत्सुक असल्याचा पुनरुच्चार बांगलादेशने केला.

20.निर्दिष्ट सीमा शुल्क केंद्र /विमानतळ/ बंदरांद्वारे तिसर्‍या देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करण्यासाठी मोफत वाहतुकीची परवानगी बांगलादेशला दिल्याची माहिती  भारताने दिली. या संदर्भात  भारताने  बांगलादेशच्या व्यापारी समुदायाला अन्य  देशांमध्ये सागरी वाहतुकीसाठी  इथल्या बंदरातील  पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी आमंत्रित केले. नेपाळ आणि भूतानमध्ये माल  निर्यात करण्यासाठी भारत बांगलादेशला निःशुल्क संक्रमण  पुरवत आहे. अलिकडेच उद्घाटन झालेल्या चिलाहाटी-हल्दीबारी मार्गाद्वारे  भूतानबरोबर  रेल्वे कनेक्टिव्हिटीची  विनंती बांगलादेशने केली.  व्यवहार्यतेच्या आधारे या विनंतीवर  विचार करण्याचे भारताने मान्य केले. यासह सीमेपलिकडील अन्य  रेल्‍वे संपर्क सेवा व्‍यवहार्य बनण्‍यासाठी, चिलाहाटी-हल्दीबारी क्रॉसिंगवरील बंदर निर्बंध हटवण्‍याची विनंती भारताने बांगलादेशला  केली.

21.  सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल अशी शिफारस करणाऱ्या  संयुक्त व्यवहार्यता अभ्यासाला अंतिम रूप दिल्याबद्दल  दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त  केले. त्यांनी  दोन्ही देशांच्या  व्यापार अधिकार्‍यांना   2022 या वर्षातच  यासंबंधी चर्चा सुरू करण्याचे आणि बांगलादेशचा कमी विकसित देशाचा दर्जा सुधारण्यासाठी ती वेळेत  पूर्ण करण्याचे निर्देश दिले .

22. दोन्ही देशांदरम्यान  व्यापार सुलभ करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करत  त्यांनी सीमा शुल्क केंद्र /बंदरांवरील  पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांचे उन्नतीकरण तसेच काही निवडक बंदरांवरील  निर्बंध आणि इतर समस्या दूर करण्याच्या तातडीच्या गरजांवर भर दिला. भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या सीमेवर, बंदर निर्बंध  किंवा निर्बंधांची  नकारात्मक सूची नसलेले  किमान एक मोठे बंदर उभारले जावे या  विनंतीचा भारताने पुनरुच्चार केला जेणेकरून आयसीपी आगरतला -अखौरा एकात्मिक तपासणी नाक्यांवरून  बाजारपेठेतील प्रवेश सुलभ होईल. पेट्रापोल-बेनापोल एकात्मिक तपासणी नाका  येथे दुसऱ्या मालवाहतूक मार्गिकेच्या  विकासासाठी निधी पुरवण्याच्या भारताच्या प्रस्तावावरील  प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे  अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

23. द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ  झाल्याबद्दलही उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले.  संरक्षण संबंधी प्रकल्पांना कर्जपुरवठ्याबाबत लवकर अंतिम रूप देण्याबाबत  त्यांनी सहमती दर्शवली जे दोन्ही देशांसाठी लाभदायक असेल.   या संदर्भात बांगलादेश सशस्त्र दलांसाठी वाहनांच्या प्रारंभिक खरेदी योजनांना अंतिम रूप दिल्याचे भारताने स्वागत केले आणि द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. सागरी सुरक्षेसाठी तटीय  रडार प्रणाली उपलब्ध  करण्यासाठी 2019 च्या सामंजस्य कराराची त्वरित अंमलबजावणी करावी या विनंतीचा भारताने पुनरुच्चार केला.

24. कोविड-19 महामारी दरम्यान बांगलादेशला लस मैत्री अंतर्गत लसीचा पुरवठा आणि ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या द्वारे पाठवलेली मदत तसेच बांगलादेशने भारताला दिलेली औषधांची  भेट यातून दोन्ही देशांमधील  सहकार्य अधिक दृढ झाल्याचे स्वागत करून, दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील लोकांशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या  गरजेवर भर दिला. रेल्वे, रस्ते, हवाई आणि जलमार्ग  कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या संदर्भात,  भारताने बहुतेक रस्ते आणि रेल्वे  तपासणी नाक्यांवर   सुविधा पुन्हा सुरू केल्याचे बांगलादेशने  स्वागत केले आणि लवकरच सर्व बंदरे / नाक्यांवर  इमिग्रेशन सुविधा कोविड -पूर्व  स्तरावर आणायची विनंती केली.  जून 2022 पासून मिताली एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू झाल्याचे  दोन्ही नेत्यांनी स्वागत केले,  भारत आणि बांगलादेश दरम्यानची ही  तिसरी प्रवासी रेल्वेगाडी आहे.

25. वंगबंधू (मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन) हा  उभय देशांची संयुक्त निर्मिती असलेला चित्रपट लवकर प्रदर्शित होईल  याची उत्सुकतेने वाट पाहत  असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. तसेच  बांगलादेशमधील मुजीब नगरपासून पश्चिम बंगालमधील नडिया  येथील भारत-बांगलादेश सीमेपर्यंतचा  ऐतिहासिक रस्ता “शाधिनोटा शोरोक” कार्यान्वित करणे आणि 1971 मधील  बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामावरील माहितीपटाची निर्मिती करण्यासह इतर उपक्रमांवर काम करण्याबाबत  त्यांनी सहमती दर्शवली. 1971 मधील बांगलादेशच्या मुक्ति संग्रामावरील दुर्मिळ व्हिडिओ फुटेजचे संयुक्त संकलन करण्याचा  प्रस्ताव  बांगलादेशने मांडला .  दिल्ली विद्यापीठात वंगबंधू अध्यासन स्थापन केल्याबद्दल बांगलादेशने  भारताची प्रशंसा केली.

26. बांगलादेशमधील स्टार्ट-अप शिष्टमंडळाच्या पहिल्या दौऱ्याबाबत दोन्ही नेते उत्सुक असून यामुळे दोन्ही देशांमधील नावीन्यपूर्ण संशोधनातील भागीदारीला चालना मिळेल. येत्या काही महिन्यांत युवकांचा आदानप्रदान कार्यक्रम  पुन्हा सुरू करण्यात येत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. बांगलादेशने बांगलादेशच्या  मुक्तिजोधांना भारतातील रुग्णालयांमध्ये  वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या पुढाकाराचे  बांगलादेशने मनापासून कौतुक केले

27.संयुक्त कृती गट स्थापन करून ‘सुंदरबनचे संवर्धन’ विषयक  2011 च्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीवर दोन्ही नेत्यांनी भर दिला, जेणेकरुन या जंगलाची परिसंस्था आणि या परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या लोकांचे जगणे सुकर होईल.

28. सहकार्याच्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांच्या क्षमतेचा लाभ उठवण्याचे महत्त्व उभय नेत्यांनी मान्य केले आणि दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना बाह्य अवकाशाचा शांततापूर्ण वापर, हरित ऊर्जा, अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर आणि वित्त, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सक्षम सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे निर्देश दिले.

29.  म्यानमारमधील राखीन प्रांतातून बळजबरीने विस्थापित झालेल्या दहा लाखांहून अधिक लोकांना आश्रय आणि मानवतावादी सहाय्य प्रदान करून बांगलादेशने दाखवलेल्या औदार्याचे भारताने  प्रादेशिक परिस्थिती संदर्भात कौतुक केले आणि म्यानमार हा दोन्ही देशांचा शेजारी देश असून या  विस्थापित लोकांना त्यांच्या मायदेशी लवकर सुरक्षितपणे परत पाठवण्यासाठी बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांना यापुढेही  पाठिंबा देण्याची आपली  वचनबद्धता भारताने अधोरेखित केली.

30.प्रादेशिक संघटनांच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली. बिमस्टेक संघटना सचिवालयाचे यजमानपद आणि त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात बांगलादेशने दिलेल्या योगदानाची भारताने प्रशंसा केली. इंडियन ओशन रिम असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने बांगलादेशला पाठिंबा देण्याचा   भारताने  पुनरुच्चार केला.

31. या दौऱ्यादरम्यान खालील सामंजस्य करार आणि अन्य करारांवर स्वाक्षरी आणि आदानप्रदान  झाले.

अ) भारताचे जलशक्ती मंत्रालय आणि बांगलादेशचे जलसंपदा मंत्रालय यांच्यात सीमेवरील कुशियारा या सामायिक नदीतून भारत आणि बांगलादेशला पाणी वाटप बाबत  सामंजस्य करार;

ब) बांगलादेशच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भारतामध्ये प्रशिक्षण देण्याबाबत भारताचे  रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांग्लादेशचे रेल्वे मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.

क) बांगलादेशच्या  रेल्वेसाठी एफओआयएस (FOIS ) आणि इतर आयटी  ऍप्लिकेशन्स सारख्या माहिती तंत्रज्ञान  प्रणालींमध्ये सहकार्य करण्याबाबत भारताचे  रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांगलादेशचे रेल्वे मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.

ड) भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि बांगलादेशची बांगलादेश वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (बीसीएसआयआर), यांच्यात वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार

इ )न्यूजस्पेस इंडिया लिमिटेड आणि बांगलादेश सॅटेलाइट कंपनी लिमिटेड यांच्यात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत  सामंजस्य करार;

ई ) प्रसार भारती आणि बांगलादेश टेलिव्हिजन (बीटीव्ही) यांच्यात प्रसारणातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.

उ ) बांगलादेशच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी भारतामध्ये  प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भारताची राष्ट्रीय न्यायिक अकादमी आणि बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय यांच्यात सामंजस्य करार.

32. या दौऱ्यादरम्यान खालील प्रकल्पांचे  उदघाटन /अनावरण/घोषणा करण्यात आल्या :

अ) बांगलादेशमधील रामपाल  येथील  मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पच्या  युनिट-I चे  उद्‌घाटन

ब) रुपशा पुलाचे उद्‌घाटन

क) बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी  ‘‘7 मार्च ”  रोजी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाचा 23  भारतीय आणि इतर दक्षिण आशियाई देशांतील 5 भाषांमध्ये अनुवाद असलेले  पुस्तक पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले

ड) अनुदान म्हणून  बांगलादेश रेल्वेला 20 ब्रॉडगेज लोकोमोटिव्ह पुरवण्याबाबत  घोषणा.

इ) बांगलादेश सरकारच्या रस्ते आणि महामार्ग विभागाला रस्ते बांधकाम उपकरणे आणि यंत्रसामग्री पुरवण्याबाबत घोषणा.

33. पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या  अगत्यशील आणि प्रेमळ  आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान हसीना यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशला भेट देण्याचे आग्रहाचे  निमंत्रण दिले आणि  सर्व स्तरांवर आणि व्यासपीठांवर यापुढेही संवाद सुरू ठेवण्यासाठी  प्रयत्न करण्यासाठी उत्सुक असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

GC /JPS/Radhika/Sushama/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai