Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान येत्या 31 मे रोजी सिमल्याला देणार भेट आणि गरीब कल्याण संमेलनात होणार सहभागी


नवी दिल्ली, 30 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे 2022 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान ‘गरीब कल्याण संमेलना’मध्ये सहभागी होतील. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरातील विविध राज्यांच्या राजधानीच्या  शहरांत, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवरून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.देशभरात लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी, शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबद्दलचा जनतेचा अभिप्राय समजून घेत जनतेशी थेट संवाद साधावा, ही या संमेलनांमागील संकल्पना आहे.

सकाळी 09:45 वाजता पंतप्रधानांसह राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार , विधानसभेचे सदस्य आणि इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपापल्या राज्यांतून जनतेशी थेट संवाद साधतील आणि देशभरात गरीब कल्याण संमेलनाचाप्रारंभ होईल. सकाळी 11:00 वाजता, या कार्यक्रमात पंतप्रधान सामील होतील आणि त्यानंतर, विविध राज्ये आणि स्थानिक स्तरावर होत असलेल्या कल्याणकारी योजनांची नोंद घेत हे संमेलन राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल. संमेलनादरम्यान, पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये आणि विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधतील.

देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या या संवादाचा उद्देश खुल्या वातावरणात जनतेकडून विनामूल्य आणि स्पष्ट अभिप्राय मिळविणे, लोकांच्या जीवनावरील  कल्याणकारी योजनांचा प्रभाव समजून घेणे आणि विविध सरकारी कार्यक्रमांच्या संदर्भात त्यांचे योग्य रीतीने अभिसरण आणि परिपूर्ती होत आहे का याचा अंदाज घेणे, हे आहे. देशातील नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी (ईझ ऑफ लिव्हिंग) सरकारी कार्यक्रमांची सुदुरता आणि वितरण अधिक कार्यक्षम पध्दतीने करण्याच्या प्रयत्नांत  हा उपक्रम  आयोजित करण्यात  आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेतील आर्थिक लाभाचा 11 वा हप्ता पंतप्रधान, यावेळी वितरीत करतील.  यामुळे 10 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 21,000 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करणे शक्य होईल.या प्रसंगी, पंतप्रधान देशभरातील प्रधानमंत्री  किसान योजनेच्या लाभार्थ्यांशी (PM-KISAN)संवाद देखील साधणार आहेत.

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com