पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे पोहोचतील आणि दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते तेथील बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होईल. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भोपाळ येथे आयोजित जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन करतील. त्यानंतर ते बिहारमधील भागलपूर येथे रवाना होतील आणि तेथील कार्यक्रमात दुपारी सव्वादोनच्या सुमाराला ते पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरीत करतील तसेच बिहारमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करतील. त्यानंतर ते गुवाहाटी येथे पोहोचतील आणि संध्याकाळी 6 वाजता ते झुमॉयर बिनंदिनी (मेगा झुमॉयर) 2025 कार्यक्रमात सहभागी होतील. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पंतप्रधान गुवाहाटी येथे आयोजित अॅडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विषयक शिखर परिषद 2025 चे उद्घाटन करतील.
पंतप्रधानांचा मध्य प्रदेश दौरा
छत्तरपूर जिल्ह्यातील गर्हा गावात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधांची सुनिश्चिती करत, सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे कर्करोग रुग्णालय गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देईल. हे रुग्णालय उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सुसज्जित असेल, तसेच तेथे अचूक रोगनिदानासाठी तज्ञ डॉक्टर देखील उपलब्ध असतील.
पंतप्रधान भोपाळ इथे आयोजित दोन दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचे (GIS) उदघाटन करतील. मध्य प्रदेशला जागतिक पातळीवरील गुंतवणूक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ असलेल्या या शिखर परिषदेत विभागीय परिषदा घेतल्या जातील, तसेच औषधनिर्मिती व वैद्यकीय उपकरण उद्योग, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे, कौशल्य विकास, पर्यटन व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी विशेष सत्रे आयोजित केली जातील. याशिवाय ग्लोबल साऊथ देशांच्या परिषदा, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन देशांसाठी सत्रे तसेच महत्वाच्या भागीदार देशांसाठी विशेष सत्रे आयोजित केली जातील.
या शिखर परिषदेदरम्यान तीन महत्वाची औद्योगिक प्रदर्शने आयोजित होणार असून मध्य प्रदेशच्या वाहन उद्योगविषयक क्षमतांच्या व भविष्यातील वाहतूक योजनांच्या प्रदर्शनासाठी ऑटो शो आयोजित केला गेला आहे. वस्त्रोद्योग व फॅशन एक्स्पो मार्फत राज्याच्या पारंपरिक व आधुनिक अशा वस्त्रोद्योगाच्या दोन्ही क्षमतांचे दर्शन घडवले जाईल. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमातून राज्याची वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले जाईल.
जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी, देशाच्या उद्योगक्षेत्रातील 300 पेक्षा जास्त महत्वाचे नेते व धोरणकर्ते या शिखरपरिषदेत सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांचा बिहार दौरा:
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान वचनबद्ध आहेत. त्यानुसार भागलपूर इथे अनेक महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात केली जाईल. पीएम किसान योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे वितरण ते भागलपूर येथे करतील. देशभरातील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण रु. 21,500 कोटी रुपयांचे थेट आर्थिक लाभ जमा होतील.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळावी यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय क्षेत्रातील 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थांच्या (FPO) योजनेची सुरुवात केली होती. या योजनेद्वारे शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या पिकांचे उत्पादन व विपणन करू शकतील. या योजनेला सुरुवात होऊन 5 वर्षे पूर्ण होताना पंतप्रधानांनी वचनपूर्ती केली असून या कार्यक्रमात ते 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थाचा टप्पा गाठल्याची घोषणा करतील.
पंतप्रधान मोतीहारी येथील स्वदेशी जनावरांच्या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करतील, जे राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा परिचय, पुढील प्रसारासाठी स्वदेशी जातींच्या उत्कृष्ट जनावरांचे उत्पादन करणे आणि शेतकरी तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांना आधुनिक पुनरुत्पादन तंत्रज्ञानात प्रशिक्षण देणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच, ते बरौनी येथील दुग्धजन्य उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करतील, जो 3 लाख दूध उत्पादकांसाठी संघटित बाजारपेठ निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासास चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान 526 कोटी रुपयांच्या खर्चाने झालेल्या वारिसालिगंज – नवादा – टिलैया रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे आणि इस्माईलपूर – रफीगंज रोड ओव्हर ब्रिज देशाला अर्पण करतील.
पंतप्रधानांचा आसाम दौरा
पंतप्रधान झुमूर बिनंदिनी (मेगा झुमूर) 2025 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहतील, ज्यामध्ये 8,000 कलाकार झुमूर नृत्यात सहभागी होतील. हे आसामच्या चहा जमाती आणि आदिवासी समुदायांचे पारंपरिक लोकनृत्य असून, समावेशकता, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. हा मेगा झुमूर कार्यक्रम आसामच्या 200 वर्षांच्या चहा उद्योगाचे आणि औद्योगिकीकरणाच्या दोन शतकांचे प्रतीक म्हणून साजरा केला जात आहे.
याशिवाय, पंतप्रधान 25 व 26 फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथे होणाऱ्या ‘ऍडव्हांटेज आसाम 2.0 इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर समिट 2025 या परिषदेचे उद्घाटन करतील. या परिषदेमध्ये उद्घाटन सत्र, सात मंत्री सत्रे आणि 14 विषयगत सत्रे असतील. तसेच, आसामच्या आर्थिक विकासाचा आढावा घेणारे विस्तृत प्रदर्शन होईल, ज्यामध्ये औद्योगिक प्रगती, जागतिक व्यापार भागीदारी, वाढते उद्योग आणि गतिमान एमएसएमई क्षेत्र यांचा समावेश असेल. या प्रदर्शनात 240 हून अधिक प्रदर्शनकर्ते सहभागी होतील.
या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, जागतिक नेते आणि गुंतवणूकदार, धोरणनिर्माते, उद्योग तज्ञ, स्टार्टअप्स प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
***
M.Pange/S.Chitnis/U.Raikar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com