Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन


नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.

20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील.  या मंदिरात विविध विद्वान कंब रामायणातील श्लोकांचे पठणही पंतप्रधान ऐकतील.

त्यानंतर, सुमारे 2 वाजता, पंतप्रधान रामेश्वरम मंदिरात पोहोचतील आणि श्री अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजाअर्चा करतील. पंतप्रधानांच्या गेल्या काही दिवसांच्या अनेक मंदिरांच्या दौऱ्यादरम्यान पाळली जाणारी प्रथा कायम ठेवत, या ही मंदिरात, विविध भाषांमध्ये (मराठी, मल्याळम आणि तेलगू) गायल्या जाणाऱ्या रामायण पारायणाला  ते उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात आठ वेगवेगळी पारंपरिक भजनी मंडळेसंस्कृत, अवधी, काश्मिरी, गुरुमुखी, आसामी, बंगाली, मैथिली आणि गुजराती रामकथा (श्रीराम अयोध्येत परत आल्याच्या प्रसंगाचे वर्णन) वाचतील. एक भारत श्रेष्ठ भारतया भारतीय सांस्कृतिक मूल्यानुसार, पंतप्रधान विविध भाषांतील रामकथा ऐकत आहेत. श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरातील संकुलात होणाऱ्या भजन संध्येमध्येही पंतप्रधान सहभागी होतील.

21 जानेवारी रोजी पंतप्रधान धनुषकोडी येथील कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. धनुषकोडीजवळ पंतप्रधान अरिचल मुनईला देखील भेट देतील, या ठिकाणाहूनच, रामसेतू बांधण्यात आला होता असे म्हटले जाते.

श्री रंगनाथस्वामी मंदिर

श्रीरंगम, त्रिची येथे स्थित, हे मंदिर देशातील सर्वात प्राचीन मंदिर संकुलांपैकी एक आहे. पुराण आणि संगम कालीन ग्रंथांसह विविध प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. हे मंदिर त्याच्या वास्तुशास्त्रीय भव्यतेसाठी आणि त्याच्या असंख्य प्रतिष्ठित गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे. येथे भगवान विष्णूचे विराजमान रूपातील  मुख्य देवता श्री रंगनाथ स्वामी यांची येथे पूजा केली जाते. वैष्णव धर्मग्रंथांमध्ये या मंदिरात पुजल्या जाणार्‍या मूर्ती आणि अयोध्या यांच्यातील संबंधाचा उल्लेख आहे.असे मानले जाते की , विष्णूची जी प्रतिमा श्रीराम आणि त्यांचे पूर्वज पूजत असत ती लंकेला नेण्यासाठी त्यांनी बिभीषणाला दिली होती. वाटेत श्रीरंगममध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

महान तत्त्वज्ञ आणि संत श्री रामानुजाचार्य यांचाही या मंदिराच्या इतिहासाशी दृढ  संबंध आहे. याशिवाय, या मंदिरात विविध महत्त्वाची ठिकाणे आहेत – उदाहरणार्थ, प्रसिद्ध कम्ब रामायणम हे  पहिल्यांदा तमिळ कवी कंबान यांनी या संकुलातील एका विशिष्ट ठिकाणी सार्वजनिकरित्या सादर केले होते.

श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम

या मंदिरात पूजा केली जाणारी मुख्य देवता श्री रामनाथस्वामी आहे, जी भगवान शिवाचे एक रूप आहे.  या मंदिरातील मुख्य लिंगाची स्थापना आणि पूजा श्री राम आणि माता सीता यांनी केली होती, असे मानले जाते. या  मंदिरामध्ये सर्वात लांब मंदिर मार्गिका आहे, जी   सुंदर वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे.हे चार धामांपैकी एक आहे – बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

कोदंडरामस्वामी मंदिर, धनुषकोडी

हे मंदिर श्री कोदंडरामस्वामींना समर्पित आहे.हे मंदिर धनुषकोडी नावाच्या ठिकाणी आहे. असे म्हणतात की येथेच बिभीषणाने प्रथम श्री रामाची भेट घेतली आणि त्यांच्याकडे  आश्रय मागितला होता. हे तेच  ठिकाण आहे जेथे श्रीरामाने बिभीषणाचा राज्याभिषेक केला होता,अशाही काही आख्यायिका  आहेत.

 

S.Patil/R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai