Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट

पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट


नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले.  पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

एकमेकांमधील द्विपक्षीय संबंधामधे होत असलेल्या  प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून, दोन्ही पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था, व्यापार, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना, हरित अर्थव्यवस्था आणि लोक संपर्क यावर लक्ष केंद्रित करून भारत-ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले. तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांसह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी यावेळी विचारांची देवाणघेवाण केली.

दोन्ही नेत्यांनी मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकरात लवकर सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वाटाघाटी करण्याच्या  आपापल्या देशांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला;जेणेकरून उर्वरित समस्या परस्परांचे हितसंबंध जपले जातील अशाप्रकारे  सोडवल्या जातील आणि त्यायोगे  एक संतुलित, परस्परांना लाभदायक  आणि अग्रेसर ठरणारा मुक्त व्यापार करार करणे सहजशक्य होईल.

वाढत्या द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर आणि युनायटेड किंगडममधील भारतीय समुदायाच्या कॉन्सुलर गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूंमधील पुढील सहभागाच्या  पुरेशा संधी ओळखून पंतप्रधान मोदींनी बेलफास्ट आणि मँचेस्टर  येथे दोन नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली. पंतप्रधान स्टार्मर  यांनी या घोषणेचे स्वागत केले.

यूके मधील भारतातील आर्थिक गुन्हेगारांच्या समस्येवर लक्ष देण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी नमूद केले. स्थलांतर आणि गतिशीलता या मुद्द्यांवर प्रगती करण्याच्या गरजेवरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा भाग असलेल्या विविध बाबींवर जलद अंमलबजावणीसाठी काम करण्याचे निर्देश दिले.भविष्यात अशाचप्रकारे अनेकदा संवाद आणि चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांतील पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान सहमती दर्शविली.

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai