Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदींनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जगन्नाथ यांची भेट घेतली. पंतप्रधान जगन्नाथ, पत्नी कविता जगन्नाथ यांच्यासोबत भारताच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत.

मोठ्या जनमताने पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल जगन्नाथ यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान जगन्नाथ यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार केला.

मॉरिशसमध्ये राबवण्यात येत असलेल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्प, ईएनटी रुग्णालये, सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प यासारख्या अनेक विकास सहकार्य प्रकल्पांमध्ये भारताने केलेल्या सहाय्याबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नवीन कार्यकाळात मॉरिशसच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आणि भारताबरोबर सहकार्याची व्याप्ती वाढवणे याला आपले प्राधान्य राहील, असे जगन्नाथ यांनी नमूद केले. या प्रयत्नात भारत महत्वाची भूमिका पार पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अधिक सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध मॉरिशसच्या निर्मितीसाठी भारताचा पाठिंबा यापुढेही राहील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

बहुआयामी द्विपक्षीय संबंध तसेच परस्पर हित आणि प्राधान्याच्या आधारे सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

N.Sapre/S.Kane/P.Kor