Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात 2.0″(12वा भाग) द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (31 मे 2020)


माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आपली मन की बात देखील कोरोनाच्या प्रभावापासून वंचित राहिलेली नाही. मागच्यावेळी मी जेव्हा तुमच्यासोबत ‘मन की बात’ केली होती तेव्हा प्रवासी ट्रेन बंद होत्या, बस बंद होत्या, विमान सेवा बंद होती. यावेळी खूप काही सुरु झाले आहे. श्रमिक विशेष गाड्या सुरू आहेत, तसंच इतर विशेष गाड्या देखील सुरू आहेत. संपूर्ण सावधगिरी बाळगून, विमाने सुरू आहेत, हळूहळू उद्योग देखील सुरु झाले आहेत, याचाच अर्थ अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा भाग आता सुरु झाला आहे. अशावेळी आता आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. सहा फुटाच्या अंतराचा नियम असो किंवा मग तोंडाला मास्क लावण्याची गोष्ट असो शक्यतोवर घरीच रहा या सर्व नियमांचे पालन करा आणि यात थोडाही निष्काळजीपणा करू नका.

प्रत्येकाच्या सामुहिक प्रयत्नांमुळे देशातील कोरोनाविरुद्धची लढाई मजबुतीने लढली जात आहे. जेव्हा आपण जगाकडे बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की, भारतवासियांचे यश किती मोठे आहे. बहुतांश देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या कित्येक पटीने जास्त आहे. आपल्या देशात विविध प्रकारची आव्हाने आहेत, परंतु तरीही, कोरोना आपल्या देशात इतक्या वेगाने पसरलेला नाही जितका तो जगातील इतर देशांमध्ये पसरला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूप कमी आहे. जे नुकसान झाले आहे त्यसाठी आम्ही सर्व दु:खी आहोत. परंतु आम्ही जे काही वाचवू शकलो ते निश्चितच देशाच्या सामुहिक संकल्प शक्तीचाच  परिणाम आहे. एवढ्या मोठ्या देशात, प्रत्येक देशवासियाने, स्वतःहून ही लढाई लढण्याचा निश्चय केला आहे, ही संपूर्ण मोहीम लोकांनी चालविली आहे.

मित्रांनो, देशवासीयांच्या दृढनिश्चयाच्या शक्तीसह, या लढाईत आणखी एक शक्ती आपली खूप मोठी ताकद आहे – ती म्हणजे – देशवासीयांची सेवाशक्ती. खरेतर, या महामारीच्या काळात, आम्ही भारतवासीयांनी हे दाखवून दिले आहे की, सेवा आणि त्यागाची आमची कल्पना हे केवळ आमचे आदर्श नाहीत, तर भारताची जीवनशैली आहे आणि आपल्या येथे तर सांगितलेच आहे –

सेवा परमो धर्म:

सेवा म्हणजेच आनंद, सेवेमध्येच समाधान आहे.

तुम्ही पाहिलेच असेल, दुसऱ्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेच नैराश्य किंवा तणाव दिसत नाही. त्याच्या आयुष्यात, आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात, नेहमीच भरपूर आत्मविश्वास, सकारात्मकता आणि चैतन्य दिसून येते.

मित्रांनो, आपले डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, पोलीस कर्मचारी, प्रसार माध्यमातील सहकारी जी सेवा करत आहेत त्याबद्दल मी अनेक वेळा चर्चा केली आहे. ‘मन की बात’ मध्ये देखील त्याचा उल्लेख केला आहे. सेवेसाठी सर्व काही समर्पित केलेल्या लोकांची संख्या अगणित आहे.

असेच एक तामिळनाडूचे गृहस्थ आहेत सी. मोहन. सी. मोहन मुदैर येथे एक सलून चालवतात. आपल्या कष्टाच्या पैशातून त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपये जमा केले होते, परंतु, त्यांनी ही सर्व रक्कम आता गरजू, गरीबांच्या सेवेसाठी खर्च केली.

याचप्रमाणे, आगरतळा येथे एक फेरीवाले आहेत गौतमदास जे याच कामातून आपला उदरनिर्वाह चालवतात, आपल्या रोजच्या कमाईतील बचतीमधून ते दररोज डाळ-तांदूळ खरेदी करून गरजू व्यक्तींना जेवण देतात.

मला पंजाबमधील पठाणकोटमधूनही असेच एक उदाहरण कळले आहे. येथील, दिव्यांग राजू यांनी दुसऱ्यांच्या मदतीने जमा केलेल्या थोड्याश्या पैशांमध्ये तीन हजारांहून अधिक मास्क तयार करून ते लोकांना वाटले. या कठीण काळात राजू यांनी सुमारे 100 कुटुंबांसाठी शिधा देखील गोळा केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला बचत गटाच्या प्रयत्नांच्या असंख्य कथा या दिवसात आपल्या निदर्शनास येत आहेत. गावांध्ये, खेड्यांमध्ये, आमच्या आया-बहिणी दररोज हजारो मास्क तयार करत आहेत. सर्व सामाजिक संस्थादेखील या कामात त्यांना सहकार्य करत आहेत.

मित्रांनो अशी अनेक उदाहरणे दररोज पाहायला आणि ऐकायला येत आहेत. कित्येक लोक, स्वत: मला नमोअॅप आणि इतर माध्यमांद्वारे त्यांच्या प्रयत्नांबद्दल सांगत आहेत.

कित्येकदा वेळेअभावी मी बऱ्याच लोकांची, संस्थांची, संघटनांची नावे घेऊ शकत नाही. सेवा भावनेने लोकांची मदत करणाऱ्या अशा सर्व लोकांचे मी कौतुक करतो, त्यांचा आदर करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, अजून एक गोष्ट जिने माझ्या मनाला स्पर्श केला आहे ती म्हणजे, या संकटाच्या काळातील, नवोन्मेश. सगळे देशवासी गावांपासून शहरांपर्यंत, आमच्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते स्टार्टअप पर्यंत, आमच्या प्रयोगशाळा कोरोना विरुद्धच्या लढाईत नवीन नवीन मार्ग शोधत आहेत, नवोन्मेश करत आहेत.

उदाहरणार्थ, नाशिकच्या राजेंद्र यादव यांचे उदाहरण खूपच रोचक आहे. राजेंद्र हे नाशिकमधील सटाणा या खेड्यातील शेतकरी आहेत. आपल्या गावाला कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या ट्रॅक्टरला एक उपकरण जोडून स्वच्छता यंत्र तयार केले असून ही नाविन्यपूर्ण मशीन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.

तसंच मी सोशल मीडियामध्ये बरीच छायाचित्रे पाहत होतो. अनेक दुकानदारांनी सहा फुट अंतरावर दुकानात एक मोठा पाइप बसवला आहे, ज्यामध्ये वरच्या एका टोकत ते माल टाकतात आणि दुसऱ्या टोकाला ग्राहक त्यांचा माल घेतात.

या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवीन कल्पना अंमलात आणल्या आहेत. ऑनलाइन वर्ग, व्हिडिओ वर्ग यांच्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळे मार्ग शोधले आहेत .

कोरोना लसी संदर्भात आमच्या प्रयोगशाळांमध्ये जे काम सुरु आहे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे आणि आम्हाला सगळ्यांना आशा देखील आहे.

कोणतीही परिस्थिती बदलण्यासाठी, इच्छाशक्ती सोबतच, बरेच काही नवोन्मेशावर अवलंबून असते. हजारो वर्षांचा मानवजातीचा प्रवास निरंतर, नाविन्यपूर्णतेसह अशा आधुनिक युगात पोहोचला आहे, म्हणूनच, या महामारीवर विजय मिळविण्यासाठी आपले हे विशेष नवोन्मेश एक भक्कम पाया आहेत.

मित्रांनो, कोरोना विरुद्धच्या लढाईचा हा मार्ग खूप मोठा आहे. एक अशी आपत्ती ज्याच्यावरील उपचार संपूर्ण जगात कोणाकडेच नाही, ज्याचा पूर्वी कोणताही अनुभव नाही, अशा परिस्थितीत आपण नवीन आव्हानांचा सामना करत आहोत आणि नवीन समस्या अनुभवत आहोत. जगातील प्रत्येक कोरोना बाधित देशात हे घडत आहे आणि म्हणूनच भारत देखील या सगळ्यातून वाचलेला नाही. आपल्या देशात असा कोणताही वर्ग नाही जो अडचणीत नाही, संकटात नाही आणि या संकटाचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर तो आपल्या गरीब, मजूर, कामगार वर्गाला झाला आहे. त्यांचे दु: ख, त्यांचा त्रास , वेदना शब्दात सांगता येणार नाहीत. आपल्यापैकी असे कोणीच नाही ज्यांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्रासाची जाणीव नाही. आपण सगळे एकत्रितपणे त्यांचे हे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, संपूर्ण देश प्रयत्न करीत आहे.

आमचे रेल्वेतील सहकारी अहोरात्र काम करीत आहेत. केंद्र असो, राज्य असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो – सगळे अहोरात्र परिश्रम करत आहेत. आज रेल्वेचे कर्मचारी ज्याप्रकारे एकत्रितपणे काम करत आहेत ते देखील एकप्रकारे आघाडीचे कोरोना योद्धेच आहेत. लाखो कामगारांना, रेल्वे आणि बसमधून सुरक्षितपणे घेऊन जायचे, त्यांच्या जेवणाची काळजी घेणे, प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण केंद्रे सुरु करणे, चाचणी करणे, तपासणी करणे, सर्वांवर उपचार करणे या सर्व गोष्टी सतत चालू आहेत, आणि मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पण, मित्रांनो, आज आपण जे दृश्य पाहत आहोत, यामुळे या देशाला भूतकाळात काय घडले ते निरीक्षण करण्याची आणि भविष्यासाठी शिकण्याची संधी मिळाली आहे. आज आपल्या कामगारांच्या यातनांमध्ये आपण देशाच्या पूर्वेकडील भागाचा त्रास पाहू शकतो. ज्या पूर्वेकडील भागात देशाच्या विकासाचे सुकाणू बनण्याची क्षमता आहे, ज्यांच्या कामगारांच्या भुजांमध्ये देशाला नवीन उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे त्या पूर्वेकडील भागाचा विकास अत्यावश्यक आहे. केवळ पूर्व भारताच्या विकासामुळेच देशाचा संतुलित आर्थिक विकास शक्य आहे. देशाने मला जेव्हा सेवा करण्याची संधी दिली तेव्हापासून आम्ही पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. मी समाधानी आहे की मागील वर्षांमध्ये या दिशेने बरेच काही घडले आहे आणि आता स्थलांतरित कामगारांच्या दृष्टीने बरीच नवीन पावले उचलणे आवश्यक झाले आहे आणि आपण सतत त्या दिशेने वाटचाल करत आहोत. जसे, कुठे कामगारांच्या कौशल्य विकासाचे काम केले जात आहे, तर कुठे स्टार्ट-अप या कामात व्यस्त आहेत, तर कुठे स्थलांतरण आयोग बनविण्याची चर्चा आहे. या व्यतिरिक्त, केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे गावांमध्ये रोजगार, स्वयंरोजगार, लघु उद्योगांशी संबंधित मोठ्या शक्यताही निर्माण झाल्या आहेत. हे निर्णय या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आहेत, स्वावलंबी भारतासाठी आहेत, जर आमची गावे स्वावलंबी असती, आपली शहरे, जिल्हे, आपली राज्ये स्वावलंबी असती तर आपल्या समोर ज्या आता समस्या उभ्या आहेत त्यापैकी बऱ्याच समस्या आपल्या समोर उभ्याच ठाकल्या नसत्या. परंतु, अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा मानवी स्वभाव आहे. या सर्व आव्हानांमध्ये मी खूष आहे की स्वावलंबी भारतासाठी आज देशात मोठ्या प्रमाणात मंथन सुरू झाले आहे. लोकांनी आता याला आपले अभियान बनविले आहे. या अभियानाचे नेतृत्व देशवासी आता आपल्या हातात घेत आहेत. बऱ्याच लोकांनी तर हे देखील सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या विभागात जे-जे सामान बनविले आहे, त्याची एक यादी तयार केली आहे. हे लोक आता ही स्थानिक उत्पादने खरेदी करत आहेत आणि व्होकल फॉर लोकल ला प्रोत्साहन देत आहेत. मेक इन इंडिया ला चालना मिळावी यासाठी प्रत्येकजण आपला निर्धार व्यक्त करत आहे.

बिहारमधील आमचे एक मित्र हिमांशु यांनी मला नमोअॅपवर लिहिले आहे की त्यांना एक असा दिवस पहायचा आहे जेव्हा भारतात परदेशातून येणारी आयात कमी असेल. मग ते पेट्रोल, डिझेल, इंधन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात असो, यूरियाची आयात किंवा मग खाद्यतेलाची आयात असो. मी त्यांच्या भावना समजू शकतो. आपल्या देशात अशा कितीतरी गोष्टी बाहेरून येतात, ज्यासाठी आपल्या प्रामाणिक करदात्यांचा पैसा खर्च केला जातो, ज्याचे पर्याय आपण सहजपणे भारतात तयार करू शकतो.

आसामच्या सुदीप यांनी मला लिहिले आहे की ते महिलांनी बनवलेल्या बांबूच्या स्थानिक उत्पादनांचा व्यवसाय करतात आणि त्यांनी निश्चय केला आहे की, येत्या 2 वर्षात ते आपल्या बांबूच्या उत्पादनाला जागतिक ब्रँड बनवतील. मला विश्वास आहे की आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना संकटाच्या या काळात, मी जगातील अनेक नेत्यांशी बोललो आहे, परंतु, आज मी तुम्हाला एक रहस्य सांगू इच्छितो – जेव्हा जगातील अनेक नेते संवाद साधतात, तेव्हा मी पाहिले आहे की, ‘योग’ आणि ‘आयुर्वेद’ यामध्ये त्यांना खूप जास्त रुची आहे. काही नेत्यांनी मला विचारले की, कोरोनाच्या या काळात ‘योग’ आणि ‘आयुर्वेद’ कशाप्रकारे मदत करू शकतील.

मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ आला आहे. जसा-जसा ‘योग’ लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनत आहे तसे लोकांमध्ये आपल्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढत आहे. सध्या, कोरोना संकटाच्या काळात देखील हॉलिवूडपासून हरिद्वारपर्यंत, घरात राहून लोक ‘योग’कडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र लोकांना ‘योग’ विषयी त्यासोबतच ‘आयुर्वेद’ विषयी अधिक जाणून घ्यायचे आहे आणि त्यांना ते स्विकारायचे आहे. कित्येक लोकं ज्यांनी कधीच योग केला नव्हता ते देखील ऑनलाईन योग वर्गात सामील झाले आहेत किंवा मग ऑनलाईन व्हिडीओच्या माध्यमातून योग शिकत आहेत. खरंच, ‘योग’ – समुदाय, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऐक्य सगळ्यासाठी उत्तम आहे.

मित्रांनो, कोरोनाच्या संकटाच्या या काळात ‘योग’ – आज यासाठी देखील अधिक महत्वाचे आहे, कारण कोरोना हा विषाणू आपल्या श्वसन प्रणालीवर सर्वाधिक परिणाम करतो. ‘योग’ मध्ये प्राणायामचे असे अनेक प्रकार आहेत जे आपली श्वसन प्रणाली मजबूत करतात ज्याचा परिणाम दीर्घकालीन राहतो. हे अनेक वर्षांपासून पारखलेले एक तंत्र आहे ज्याचे स्वतःचे महत्व आहे.  बऱ्याच लोकांना ‘कपालभाती’ आणि ‘अनुलोम-विलोम’, प्राणायाम माहित असेल. परंतु ‘भस्त्रिका’, ‘शीतली’, ‘भ्रामरी’ असे प्राणायामचे अनेक प्रकार आहेत, ज्याचे बरेच फायदे आहेत. तसेच आपल्या जीवनात ‘योग’चे महत्व वाढविण्यासाठी यंदा आयुष मंत्रालयाने देखील एक वेगळा प्रयोग केला आहे. आयुष मंत्रालयाने ‘माय लाइफ, माय योग’ नावाची आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉग स्पर्धा सुरू केली आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील लोकही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यात भाग घेण्यासाठी आपल्याला तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो अपलोड करावा लागेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग करताना किंवा एखादे आसन करतांना दाखवावे लागेल आणि आपल्या जीवनात घडलेल्या बदलांविषयी देखील सांगावे लागेल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊन या नवीन मार्गाने आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी व्हावे.

मित्रांनो, आपल्या देशात कोट्यावधी गरीब लोक अनेक दशकांपासून एका मोठ्या चिंतेत जगत आहेत – जर ते आजारी पडले तर काय? स्वतःवर उपचार करायचे की, मग कुटुंबासाठी अन्नाची चिंता करायची. ही समस्या लक्षात घेऊन त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी ‘आयुष्मान भारत’ योजना सुरू केली गेली. काही दिवसांपूर्वीच ‘आयुष्मान भारत’ च्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. एक कोटींहून अधिक रुग्ण म्हणजे देशातील एक कोटीहून अधिक कुटुंबांची सेवा झाली आहे. एक कोटीहून अधिक रुग्ण असण्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला माहिती आहे? एक कोटीहून अधिक रुग्ण, म्हणजेच, नॉर्वे, सिंगापूर सारख्या देशाने, त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी दुप्पट लोकांना विनामूल्य उपचार दिले आहेत. जर गरीबांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी पैसे द्यावे लागले असते, त्यांना मोफत उपचार मिळाले नसते, तर ढोबळमानाने विचार केला तर त्यांच्या स्वत:च्या खिशातून त्यांना अंदाजे 14 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागले असते. ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे गरिबांचे पैसे खर्च होण्यापासून वाचले आहेत. मी आयुष्मान भारतच्या सर्व लाभार्थींना तसेच रूग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. ‘आयुष्मान भारत’ योजनेचे एक खूप मोठे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टेबिलिटी सुविधा. पोर्टेबिलिटीमुळे देशाला एकतेच्या रंगात मिसळण्यास मदत झाली आहे, म्हणजेच बिहारमधील एखाद्या गरीब माणसाला जर हवे असेल तर त्याला कर्नाटकमध्येही तीच सुविधा मिळेल, जी त्याला त्याच्या राज्यात मिळेल. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील एखाद्या गरीब व्यक्तीला तमिळनाडूमध्येही तीच उपचार सुविधा मिळू शकेल. या योजनेमुळे एखाद्या भागात जिथे आरोग्याची व्यवस्था कमकुवत आहे अशा भागातील गरीबांना देशातील कोणत्याही कोपऱ्यात  उत्तम उपचार मिळण्याची सुविधा प्राप्त होते.

मित्रांनो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एक कोटी लाभार्थींपैकी 80 टक्के लाभार्थी देशातील ग्रामीण भागातील आहेत. यापैकी जवळपास 50 टक्के लाभार्थी आमच्या माता, भगिनी आणि मुली आहेत. यातील बहुतांश लाभार्थी अशा आजारांनी ग्रस्त होते ज्यांच्यावर सामान्य औषधोपचार शक्य नव्हते. यापैकी 70 टक्के लोकांवर शस्त्रक्रिया झाली आहेत. तुम्ही विचार करू शकता की, या सगळ्यांना किती मोठा दिलासा मिळाला असेल. मणिपूरच्या चुरा-चांदपूर येथील सहा वर्षांच्या केलेनसांग या मुलाला देखील आयुष्मान योजनेमुळे नवीन आयुष्य मिळाले आहे. इतक्या लहान वयात केलेनसांगला मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. या मुलाचे वडील रोजंदारीवर मजुरी करतात आणि आई विणकर आहे. अशा परिस्थितीत मुलावर उपचार करणे खूप कठीण होते. पण, ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे त्यांच्या मुलावर आता नि:शुल्क उपचार झाले आहेत. पुद्दुचेरीच्या अमृता वल्ली यांनाही असाच अनुभव आला आहे. त्यांच्यासाठीही ‘आयुष्मान भारत’ योजना संकटमोचक ठरली आहे. अमूर्था वल्ली यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा 27 वर्षाचा मुलगा जीवा यालादेखील हृदयविकाराचा आजार होता. डॉक्टरांनी जीवावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, परंतु  रोजंदारीवर काम करणाऱ्या जीवासाठी स्वखर्चाने एवढी मोठी शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते, तथापि, अमूर्था वल्ली यांनी आपल्या मुलाची ‘आयुष्मान भारत’ योजनेत नोंद केली आणि नऊ दिवसांनंतर त्यांचा मुलगा जिवाचीही हृदय शस्त्रक्रिया झाली.

मित्रांनो, मी तुम्हाला केवळ तीन-चार घटनाच सांगितल्या. ‘आयुष्मान भारत’च्या तर अशा एक कोटीहून अधिक कथा आहेत. या कथा जिवंत माणसांच्या आहेत, दु: खापासून मुक्त झालेल्या आपल्या कुटुंबियांच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्कीच ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत उपचार घेतलेल्या एका व्यक्तीशी बोला. आपण पहाल की जेव्हा एखादा गरीब आजारातून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यामध्ये गरीबीशी लढा देण्याची शक्ती देखील दिसून येते. आणि मला आपल्या देशातील प्रामाणिक करदात्यांना सांगायचे आहे की, ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत, गरीब लोकांवर मोफत उपचार केले गेले आहेत, त्यांना त्यांच्या जीवनात जो आनंद आला आहे, त्यांना जे समाधान मिळाले आहे, या सर्व पुण्य कर्माचे खरे हक्कदार तुम्ही आहात, आमचे प्रामाणिक करदाते या पुण्य कर्माचे हक्कदार आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, एकीकडे आपण साथीच्या आजाराविरुद्ध लढा देत आहोत, तर दुसरीकडे, नुकतेच पूर्व भारतातील काही भागाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फानच्या चक्रीवादळामुळे झालेली हानी देखील पाहिली आहे. या वादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. मी गेल्या आठवड्यात ओदिशा  आणि पश्चिम बंगालला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या जनतेने ज्या धैर्याने आणि निर्भयतेने परिस्थितीचा सामना केला आहे ते कौतुकास्पद आहे. संकटाच्या या काळात संपूर्ण देश येथील लोकांच्या पाठीशी उभा आहे.

मित्रांनो, एकीकडे जिथे पूर्व भारत वादळामुळे आलेल्या आपत्तीचा सामना करत आहे, तर दुसरीकडे, देशातील अनेक भागांमध्ये टोळधाडीमुळे परिणाम झाला आहे. या हल्ल्यांनी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की, हा लहान प्राणी किती मोठे नुकसान करतो. टोळधाड बरेच दिवस सुरु राहते आणि त्याचा परिणाम मोठ्या भागावर होतो. भारत सरकार असो, राज्य सरकार असो, कृषी विभाग असो, प्रशासन देखील या संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी  आधुनिक स्त्रोतांचा उपयोग करीत आहे. नवीन शोधांवरही लक्ष देत आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या शेती क्षेत्रावर आलेल्या या संकटाचा आपण एकत्रितपणे मुकाबला करू आणि आपण बरेच काही वाचवू.

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतर संपूर्ण जग 5 जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करेल. यावर्षी ‘जागतिक पर्यावरण दिन’ या विषयावरील संकल्पना आहे – बायो डायव्हर्सिटी – जैव-विविधता. सध्याच्या परिस्थितीत ही संकल्पना विशेष महत्त्वाची आहे. लॉकडाउन काळात गेल्या काही आठवड्यां दरम्यान, जीवनाची गती थोडी कमी झाली आहे, परंतु आम्हाला आपल्याभोवती असलेल्या निसर्गाची समृद्ध विविधता, जैव-विविधता पाहण्याची संधी देखील मिळाली आहे. आज असे अनेक पक्षी आहेत जे प्रदूषण आणि रोजच्या गोंगाटात  नजरेच्या टप्प्यातून दूर गेले होते. आज कित्येक वर्षांनंतर लोकांना त्यांचा आवाज त्यांच्या घरात ऐकू येत आहे. बऱ्याच ठिकाणांवरून प्राण्यांच्या मुक्त संचारच्या बातम्या येत आहेत. माझ्याप्रमाणे तुम्ही देखील सोशल मिडीयावर हे पाहिले असेल, वाचले असेल. अनेक लोकं याबद्दल बोलत आहेत, लिहित आहेत, छायाचित्रे सामयिक करत आहेत की, ते त्यांच्या घरातून दूरवरचे डोंगर पाहू शकतात, दूरवरचा प्रकाश पाहू शकत आहेत. ही चित्रे पाहून, अनेकांच्या मनात हा विचार आला असेल की, आपण ही सगळी दृश्ये अशा प्रकारे थांबवून ठेऊ शकतो का? या चित्रांनी लोकांना निसर्गासाठी काहीतरी करण्यास प्रेरित केले आहे. नद्या नेहमी स्वच्छ असल्या पाहिजेत, प्राणी आणि पक्ष्यांना मुक्तपणे जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे, आकाशसुद्धा स्वच्छ असले पाहिजे, यासाठी आपण निसर्गाशी समतोल साधत आयुष्य जगण्याची प्रेरणा प्राप्त करू शकतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही वारंवार ऐकतो ‘पाणी हे जीवन आहे, पाणी आहे तर भविष्य आहे’, पाणी ही आपली एक जबाबदारी आहे. पावसाचे पाणी – आपल्याला वाचवायचे आहे, प्रत्येक थेंब वाचवायचा आहे. आपण प्रत्येक गावातील पावसाचे पाणी कसे वाचवू शकतो? पारंपारिक खूप सोपे उपाय आहेत, त्या सोप्या उपायांनी आपण पाणी जिरवू शकतो. पाच दिवस – सात दिवस जर पाणी अडवले तर धरणी मातेची तहान शांत करेल, पाणी पुन्हा जमिनीत जाईल, तेच पाणी जीवनाची शक्ती बनेल आणि म्हणूनच या पावसाळ्यात आपण सर्वांनीच पाणी वाचविण्याचा, पाण्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ पर्यावरण हे थेट आपल्या जीवनाशी, आपल्या मुलांच्या भविष्याशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक पातळीवर देखील याबद्दल काळजी करण्याची गरज आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, या ‘पर्यावरण दिनाच्या’ दिवशी काही झाडे नक्की लावा आणि निसर्गाची सेवा करण्यासाठी एखादा असा संकल्प करा ज्यामुळे तुमचे निसर्गाशी दैनंदिन नाते जपले जाईल. होय! उष्णता वाढत आहे, म्हणूनच पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यास विसरू नका.

मित्रांनो, आपण सर्वांनी हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की किती कठोर तपश्चर्येनंतर, बऱ्याच कष्टानंतर देशाने ज्या पद्धतीने ही परिस्थिती सांभाळली आहे ती परिस्थिती आता बिघडू द्यायची नाही. आपल्याला हा लढा कमकुवत करायचा नाही. निष्काळजीपणा , सावधगिरी न बाळगणं, हा काही पर्याय नाही. कोरोना विरुद्धचा लढा अजूनही तितकाच गंभीर आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अद्यापही  कोरोनाचा गंभीर धोका असू शकतो. आम्हाला प्रत्येक मनुष्याचे प्राण वाचवायचे आहेत, म्हणूनच 6 फुट अंतर, चेहऱ्यावर मास्क, हात धुणे या सर्व सावधगिरीच्या उपायांचे आतापर्यंत जसे पालन केले तसेच यापुढेही करायचे आहे. मला विश्वास आहे, तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या प्रियजनांसाठी, आपल्या देशासाठी ही काळजी नक्की घ्याल. या विश्वासाने, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. पुढच्या महिन्यात पुन्हा बऱ्याच नवीन विषयांसह पुन्हा ‘मन की बात’ करूया.

धन्यवाद!

 * * *

S.Tupe/AIR/S.Mhatre/D.Rane