Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला देणार भेट


पंतप्रधान सुमारे एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन देखील होणार आहे. सुमारे दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे सव्वा तीन वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत.

पंतप्रधान संध्याकाळी 6:30 वाजता गोव्यात पोहोचतील, त्यांच्या हस्ते 37 व्या राष्ट्रीय स्पर्धांचे उद्घाटन होईल.

पंतप्रधान महाराष्ट्रात

पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन होणारे शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर 2018 मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.

पंतप्रधान निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे (85km) राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे जलवाहिन्यांद्वारे थेट पाईप मधून जल वितरण सुविधा उपलब्ध झाल्याने 7 तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील 6 आणि नाशिक जिल्ह्यातील 1) 182 गावांना याचा लाभ होईल. निळवंडे धरणाची संकल्पना सर्वप्रथम 1970 मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून ते विकसित करण्यात आले आहे.

त्यानंतर एका सार्वजनिक सभेदरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उदघाटन होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या 86 लाख लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याने त्यांना लाभ होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर मार्ग रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा इत्यादी प्रकल्पांचे उदघाटन होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील माता आणि  बाल आरोग्य विभागाची पायाभरणी देखील होईल.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुषमान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचे वाटप होईल.

पंतप्रधान गोव्यामध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडासंस्कृतीचा कायापालट झाला आहे. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत प्रचंड सुधारणा झालेली दिसून येत आहे. अव्वल दर्जाचे खेळाडू शोधून खेळांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे महत्त्व ओळखून देशात राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जात आहे.

पंतप्रधान 26 ऑक्टोबर 2023 रोजी गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. ते खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंनाही संबोधित करतील.

गोव्यामध्ये सर्वप्रथमच राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत आहेत. या स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील 10,000 हून अधिक खेळाडू 28 ठिकाणी 43 हून अधिक क्रीडा शाखांमध्ये भाग घेणार आहेत.

****

Soanl T/Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai