पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी 2024 रोजी जम्मूला भेट देणार आहेत.
साधारण सकाळी 11:30 वाजता जम्मू येथील मौलाना आझाद स्टेडियम येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधानांच्या हस्ते 30,500 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, उदघाटन आणि पायाभरणी होणार आहे. हे सर्व प्रकल्प आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पेट्रोलियम, नागरी पायाभूत सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीर मधील नव्याने नियुक्त झालेल्या 1500 सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. ‘विकसित भारत विकसित जम्मू’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
शिक्षण क्षेत्राला मोठी चालना
देशातील शिक्षण आणि कौशल्याशी निगडित पायाभूत सेवा सुविधांमध्ये सुधारणा आणि विकास करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान 13,375 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. यावेळी देशाला समर्पित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, आयआयटी जम्मू, आयआयआयटीडीएम कांचीपुरमचे कायमस्वरूपी परिसर ; कानपूर येथील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित एक अग्रणी कौशल्य प्रशिक्षण संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आय आय एस ) आणि उत्तराखंड मधील देवप्रयाग आणि त्रिपुरा मधील आगरतळा या दोन केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कॅम्पस- परिसर या वास्तूंचा समावेश आहे
पंतप्रधान आय आय एम जम्मू, आय आय एम बोधगया आणि आय आय एम विशाखापट्टणम या देशातील तीन नवीन भारतीय व्यवस्थापन संस्थांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते देशभरातील केंद्रीय विद्यालयांच्या (KVs) 20 नवीन इमारती आणि नवोदय विद्यालयांच्या (NVs) 13 नवीन इमारतींचे उद्घाटन देखील करतील. पंतप्रधान देशभरातील नवोदय विद्यालयांसाठी पाच केंद्रीय विद्यालय परिसर, एक नवोदय विद्यालय परिसर आणि पाच बहुउद्देशीय हॉलची -कक्ष पायाभरणी करतील. देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पुरवण्याच्या दृष्टीने नव्याने बांधण्यात आलेल्या या केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांच्या इमारती एक महत्वाची भूमिका बजावतील.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स जम्मू
जम्मू काश्मीर मधील लोकांना एक सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण तृतीयक आरोग्य देखभाल सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जम्मू येथील सांबा मधील विजयपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स),चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनीच फेब्रुवारी 2019 मध्ये या संस्थेची पायाभरणीही मध्ये केली होती. केंद्रीय क्षेत्रातील योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
1660 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेले आणि 227 एकर क्षेत्रफळात पसरलेले हे रुग्णालय 720 खाटा, 125 जागांचे वैद्यकीय महाविद्यालय, 60 जागांचे परिचारिका महाविद्यालय, 30 खाटांसह आयुष ब्लॉक, प्राध्यापकांसाठी आणि कर्मचारीवर्गासाठी निवास व्यवस्था, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निवास, रात्र निवारा, अतिथीगृह, सभागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहे. या अत्याधुनिक रुग्णालयात 18 विशेष आणि 17 सुपर स्पेशालिटीजमध्ये उच्च दर्जाची रुग्ण सेवा प्रदान केली जाईल ज्यामध्ये कार्डियोलॉजी, गॅस्ट्रो-एंटरोलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी यांचा समावेश आहे. या संस्थेमध्ये अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा आणि ट्रॉमा युनिट, 20 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, निदान प्रयोगशाळा, ब्लड बँक, फार्मसी इ.सुविधा आहेत. याशिवाय या विभागातील दूरवरच्या, दुर्गम भागात राहणाऱ्या रुग्णांसाठी या रुग्णालयात डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचाही लाभ मिळू शकेल.
जम्मू विमानतळाची नवी टर्मिनल इमारत
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी जम्मू विमानतळ येथील नव्या टर्मिनल इमारतीचा कोनशीला समारंभ होणार आहे. सुमारे 40,000 चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारलेल्या या नव्या टर्मिनल इमारतीमध्ये सर्वाधिक गर्दीच्या वेळी सुमारे 2000 प्रवाशांची सोय करण्यासाठी आधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. ही नवी टर्मिनल इमारत पर्यावरण स्नेही असेल आणि तिच्या उभारणीतून त्या प्रदेशाच्या स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडेल. या नव्या टर्मिनलमुळे हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल, पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल तसेच त्या प्रदेशातील आर्थिक विकास वेगाने होईल.
रेल्वे प्रकल्प
यावेळच्या जम्मू भेटीदरम्यान पंतप्रधान, जम्मू आणि काश्मीरमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील. बनिहाल-खारी-सुम्बेर-संगल्दन (48किमी) दरम्यानचा नवा रेल्वे मार्ग आणि बारामुल्ला-श्रीनगर-बनिहाल-संगल्दन (185.66किमी) या नव्याने विद्युतीकरण झालेल्या टप्प्याचा त्यात समावेश आहे. पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून खोऱ्यातील पहिल्या विद्युत रेल्वेगाडीच्या सेवेची तसेच संगल्दन रेल्वे स्थानक आणि बारामुल्ला रेल्वे स्थानक यांच्या दरम्यानच्या रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात येईल.
रेल्वेच्या बनिहाल-खारी-सुम्बेर-संगल्दन टप्प्याचे कामकाज सुरु होणे महत्त्वपूर्ण आहे कारण या टप्प्यातील रेल्वेमार्गात बॅल्लास्ट लेस ट्रॅक (बीएलटी)चा वापर करण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येईल. त्याशिवाय, भारताचा सर्वाधिक लांबीचा मालवाहतूक बोगदा टी-50 (12.77किमी) देखील याच टप्प्यात खारी ते सुम्बेर दरम्यान येतो. हे रेल्वे प्रकल्प या भागातील रेल्वे संपर्क सुधारतील, पर्यावरणविषयक शाश्वतता सुनिश्चित करतील आणि या भागातील समग्र आर्थिक विकासाला चालना देतील.
रस्ते प्रकल्प
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू आणि कटरा यांना जोडणारा दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाची दोन पॅकेजेस (44.22किमी); श्रीनगर रिंग रस्त्याच्या चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा;राष्ट्रीय महामार्ग -01 वरील 161 किमी लांबीच्या श्रीनगर-बारामुल्ला-उरी टप्प्याच्या अद्यायावतीकरणाची पाच पॅकेजेस; आणि राष्ट्रीय महामार्ग-444 वरील कुलगाम बायपास तसेच पुलवामा बायपास यांचे बांधकाम या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा कोनशीला समारंभ होणार आहे.
दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाच्या दोन पॅकेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर माता वैष्णोदेवीच्या पवित्र मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे तसेच या भागातील आर्थिक प्रगतीला देखील उत्तेजन मिळेल. श्रीनगर रिंग रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग-1 वरील विद्यमान सुम्बल-वायूल टप्प्याच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे. 24.7 किमीवरील हा ब्राऊनफिल्ड प्रकारचा प्रकल्प श्रीनगर शहरातील आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करेल. तसेच या प्रकल्पामुळे मानसबल लेक आणि खीर भवानी मंदिरासारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्याच्या सोयीत सुधारणा करेल तसेच लेह,लडाख पर्यंत पोहोचण्याच्या वेळेत बचत करेल. राष्ट्रीय महामार्ग -01 वरील 161 किमी लांबीच्या श्रीनगर-बारामुल्ला-उरी टप्प्याच्या अद्यायावतीकरणाचा प्रकल्प धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या कामामुळे बारामुल्ला आणि उरी भागातील आर्थिक विकासाला अधिक चालना मिळणार आहे. काझीगुंड-कुलगाम-शोपियान-पुलवामा-बडगाम-श्रीनगर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-444 वरील कुलगाम बायपास तसेच पुलवामा बायपासयांच्यामुळे या भागातील रस्तेविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.
सीयुएफ पेट्रोलियम डेपो
पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू येथे सीयुएफ(सामायिक वापर सुविधा) पेट्रोलियम डेपो विकसित करण्यासाठीच्या प्रकल्पाची कोनशीला ठेवली जाणार आहे. अत्याधुनिक आणि संपूर्णपणे स्वयंचलित प्रकारच्या आणि 10000 किलोलीटर साठवण क्षमता असलेल्या या डेपोच्या उभारणीसाठी 677 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यात मोटर स्पिरीट (एमएस), हायस्पीड डीझेल(एचएसडी), सुपीरियर केरोसीन तेल (एसकेओ),एव्हीएशन टर्बाईन इंधन (एटीएफ), इथेनॉल, बायोडीझेल आणि विंटर ग्रेड एचएसडी यांची साठवण करता येईल.
इतर प्रकल्प
जम्मू आणि काश्मीर मध्ये नागरी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी तसेच सार्वजनिक सोयीसुविधा उभारण्यासाठी 3150 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन तसेच कोनशीला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ज्या प्रकल्पांचे यावेळी उद्घाटन होईल त्यामध्ये, रस्ते आणि पुलांचे बांधकाम, ग्रीड केंद्रे, रिसिव्हिंग स्टेशन्स ट्रान्समिशन लाईन प्रकल्प, सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे आणि मैला प्रक्रिया संयंत्रे; विविध पदवी महाविद्यालयांच्या इमारती, श्रीनगर शहरात बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली; आधुनिक नरवाल फळे मंडई; कथुआ येथील औषध चाचणी प्रयोगशाळा तसेच गंदरबल येथे 224 सदनिकांची ट्रान्झिट निवास व्यवस्था यांचा समावेश आहे. ज्या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ होणार आहे त्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच नव्या औद्योगिक मालमत्तांचा विकास, जम्मू स्मार्ट शहराच्या एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्रासाठी डाटा सेंटर/ आपत्ती रिकव्हरी केंद्र; परीम्पोरा श्रीनगर येथील ट्रान्स्पोर्ट नगरचे अद्ययावतीकरण; 62 रस्ते प्रकल्प आणि 42 पूल यांचे अद्ययावतीकरण आणि अनंतनाग,कुलगाम,कुपवाडा, शोपियान आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये 9 ठिकाणी 2816 सदनिकांची उभारणी करून ट्रान्झिट निवास व्यवस्थेच्या विकासासाठीचा प्रकल्प यांसह इतर अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
***
JaydeviPS/Sonal/BhaktiS/SanjanaC/TDY/
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai