Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर


नवी दिल्ली, 19 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा (20- 21 जून 2024) जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत.

20 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्‌घाटन करतील.

21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील एसकेआयसीसी येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होतील.यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील आणि सीवायपी योग सत्रात भाग घेतील.

युवा सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन

“युवकांचे सशक्तीकरण,जम्मू आणि काश्मीरमध्ये  परिवर्तन” हा या भागासाठी  एक महत्त्वाचा क्षण आहे. प्रगती दर्शवणारा आणि  यशस्वी युवकांना यातून  प्रेरणा मिळेल. या प्रसंगी  पंतप्रधान स्टॉल्सची पाहणी करतील आणि जम्मू-काश्मीरच्या यशस्वी युवकांशी संवाद साधतील.

जम्मू-काश्मीरमध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 84 प्रमुख विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि  उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. रस्ते पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांचे उद्‌घाटन ते करणार आहेत. चेनानी-पटनीटॉप-नाश्री विभागातील सुधारणा, औद्योगिक वसाहतींचा विकास आणि 6 शासकीय पदवी महाविद्यालयांच्या बांधकाम प्रकल्पांची पायाभरणी ते करतील.

पंतप्रधान कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 1,800 कोटी रुपये खर्चाच्या स्पर्धात्मकता सुधारणा (जेकेसीआयपी) प्रकल्पाचेही उद्‌घाटन करतील. जम्मू आणि काश्मीर मधील 20 जिल्ह्यांतील 90 प्रभागांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून, 3,00,000 कुटुंबांमधील 15 लाख लाभार्थींपर्यंत तो पोहोचेल. 

सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 2000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरणही पंतप्रधान करतील.

या प्रकल्पांची पायाभरणी/उद्‌घाटन यांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांचे सक्षमीकरण होईल आणि तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल.

आंतरराष्ट्रीय योग दिवस

21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान श्रीनगर मधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.युवा तन-मनावर  योग साधनेचा होणारा सखोल प्रभाव यंदाचा कार्यक्रम अधोरेखित करेल.हजारो लोकांना योगसाधनेसाठी एकत्र आणणे तसेच जागतिक स्तरावर आरोग्य आणि निरामयतेला प्रोत्साहन देणे,हे योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे.

2015 या वर्षापासून, पंतप्रधानांनी दिल्लीमधील कर्तव्य पथ, चंडीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि अगदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय अशा विविध महत्वाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे.

‘योग, स्वतःसाठी आणि समाजासाठी’, ही यंदाची संकल्पना वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देण्याची दुहेरी भूमिका अधोरेखित करते. हा कार्यक्रम तळापासूनच्या लोकांच्या सहभागाला आणि ग्रामीण भागात योग साधनेच्या प्रसाराला प्रोत्साहन देईल.

 

N.Chitale/P.Jambhekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai