Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी


स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे  स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.

या प्रसंगी बोलताना, पूज्य बापू आणि लाल बहादूर शास्त्रीजी या भारतमातेच्या सुपुत्रांना त्यांनी आदरांजली वाहिली. महात्मा गांधी तसेच इतर अनेक महान व्यक्तींच्या स्वप्नपूर्तीसाठी आजचा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले. 

आज २ ऑक्टोबर रोजी आपण एकाच वेळी  कर्तव्यभावनेने आणि भावनातिरेकाने ओतप्रोत झालो आहोत असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मोहिमेच्या दशकपूर्तीचा उल्लेख करून ते म्हणाले कि “ स्वच्छ भारत अभियान कोट्यवधी भारतीयांप्रति वचनबद्धता दर्शवत आहे.” गेल्या 10 वर्षांत या मोहिमेला देशभरातून मिळालेला प्रतिसाद लक्षणीय आहे, आणि ही आता प्रत्येक नागरिकांची मोहीम झाली आहे, त्यांच्या आयुष्याचाच एक भाग बनली आहे असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मोहिमेच्या या दशकपूर्ती सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी स्वच्छ भारत मोहिमेला लोकचळवळ बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सफाईमित्र , धार्मिक नेते, खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, सेवाभावी संस्था तसेच माध्यमांची प्रशंसा केली. या मोहिमेत श्रमदान करून सहभागी झालेल्या आजी व माजी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली तसेच देशाला प्रेरित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.  देशभरातील गावे, शहरे, वसाहतींमध्ये आज होत असलेल्या अनेक स्वच्छता  उपक्रमांचा तसेच त्यात सहभागी झालेल्या मंत्री, नेते आणि प्रतिनिधींचाही त्यांनी उल्लेख केला. या स्वच्छता पंधरवड्यात सुरु असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात देशभरात 27 लाखाहून अधिक कार्यक्रमातून 28 कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी स्वच्छ भारतासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.

आजच्या महत्वाच्या टप्प्याचा उल्लेख करताना  पंतप्रधानांनी रु 10000 कोटी खर्चाचे  अनेक स्वच्छता प्रकल्प सुरु झाल्याची  माहिती दिली. मिशन अमृत या मोहिमेचा भाग म्हणून अनेक शहरांमध्ये पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले जाणार आहेत असे ते म्हणाले. नमामि गंगे तसेच  गोबरधन सारख्या प्रकल्पांद्वारे सेंद्रिय कचऱ्यातून बायोगॅस बनवला जाईल आणि अशा प्रकल्पांमुळे स्वच्छ भारत मोहीम एक नवीन उंची गाठेल. स्वच्छ भारत मोहीम जितकी यशस्वी होईल, तितका आपला देश तेजस्वी होईल असे त्यांनी सांगितले.

1000 वर्षांनंतर जेव्हा भारताबाबत अभ्यास केला जाईल तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण काढली जाईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “स्वच्छ भारत अभियान ही  या शतकातील सर्वात मोठी आणि यशस्वी लोकचळवळ आहे ज्यात लोकसहभाग आणि लोकांचे नेतृत्व आहे”, असे मोदी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की या अभियानाने लोकांची खरी ऊर्जा आणि क्षमता त्यांच्यासमोर सादर  केली आहे. त्यांच्यासाठी स्वच्छता हा जनशक्तीच्या साक्षात्काराचा उत्सव बनला आहे असे मोदी म्हणाले.  स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले  तेव्हा लाखो लोक यात सहभागी झालेमग ते लग्न असो किंवा सार्वजनिक समारंभ असो किंवा इतर कोणतेही ठिकाण असो, स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे सर्वदूर पाठवला गेला  अशी  आठवण पंतप्रधानांनी सांगितली. ते म्हणाले की असेही प्रसंग घडून गेले जेव्हा वृध्द मातांनी शौचालय बांधण्यासाठी त्यांची गुरे विकली, काही महिलांनी त्यांचे मंगळसूत्र विकले, काही लोकांनी त्यांच्या जमिनी विकल्या, काही निवृत्त शिक्षकांनी त्यांचे निवृत्तीवेतन दान केले, लष्करातील काही सेवानिवृत्त  जवानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ स्वच्छतेच्या अभियानासाठी दान केले.  तेच दान  एखाद्या मंदिरात किंवा कोणत्याही कार्यक्रमात दिले असते तर वर्तमानपत्रात ठळक मथळ्यात छापून आली असती, असे  पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, देशाला हे माहित असले पाहिजे की असे लाखो लोक आहेत, ज्यांचा चेहरा कधीही टीव्हीवर दाखवला गेला नाही किंवा त्यांचे नाव कधीही वृत्तपत्रात छापून आले नाही, ज्यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपला पैसा आणि मौल्यवान वेळ दिला आहे. या सर्व घटना भारताचे चारित्र्य प्रतिबिंबित करतात असे मोदी म्हणाले. मोदी यांनी अधोरेखित केले की जेव्हा त्यांनी एकदा  वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले तेव्हा अनेकांनी खरेदीसाठी जाताना ज्यूट आणि कापडी पिशव्या वापरण्याची परंपरा पुन्हा एकदा रुजवली. ते पुढे म्हणाले की, एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या उत्पादनात सहभागी उद्योग तसेच जनतेने  या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि यात सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचेही त्यांनी आभार मानले.

चित्रपटांच्या रूपात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गेल्या 10 वर्षांतील भारतीय चित्रपट उद्योगाने दिलेल्या  योगदानाची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि अशा प्रकारचे कार्य केवळ एकदाच करून चालणार नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले  पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात स्वच्छतेचे मुद्दे सुमारे 800 वेळा मांडल्याचे  उदाहरण दिले जे  लोकांनी ऐरणीवर  आणले.

पंतप्रधानांनी आज स्वच्छतेप्रति  लोकांच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि म्हणाले, “महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान स्वच्छतेचा मार्ग दाखवला होता”.  आणि पूर्वीच्या सरकारांनी  भारताच्या स्वातंत्र्यापासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महात्मा गांधींचा राजकीय फायद्यासाठी आणि मतपेढीसाठी वापर करणाऱ्यांना आता त्यांच्या आवडीचा विषयाचा विसर पडला आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, अस्वच्छता आणि शौचालयांचा अभाव याकडे राष्ट्रीय समस्या म्हणून  कधीच पाहिले गेले नाही. परिणामी, समाजात याविषयी कुठलीच  चर्चा झाली नाही आणि अस्वच्छता  जीवनाचा एक भाग बनली, असे पंतप्रधान म्हणाले. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागल्याची आठवणही त्यांनी सांगितली. “सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुलभ बनवणे हे पंतप्रधानांचे पहिले प्राधान्य आहे” असे सांगत त्यांनी शौचालये आणि सॅनिटरी पॅड्सबद्दल बोलण्याची त्यांची जबाबदारी अधोरेखित केली. त्याचे परिणाम आज दिसत आहेत  असे ते म्हणाले.

दहा वर्षांपूर्वीपर्यंत शौचालयांच्या अभावामुळे भारतातील 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला  उघड्यावर शौचास जाण्यास भाग पाडले जात होते, याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, हे मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे आणि देशातील गरीब, दलित, आदिवासी आणि मागासलेल्या लोकांप्रती अनादर करणारे आहे जे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालू राहिले. शौचालयांच्या अभावामुळे माता, भगिनी आणि मुलींना होणाऱ्या त्रासाची मोदींनी दखल घेतली  आणि त्यांच्या आरोग्याला  आणि सुरक्षिततेला असलेल्या धोक्यांकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले की, उघड्यावर शौचास गेल्यामुळे उद्भवलेल्या  अस्वच्छतेमुळे लहान मुलांचे जीवन धोक्यात आले होते आणि बालमृत्यूचे ते प्रमुख कारण बनले होते.

अशा दयनीय परिस्थितीत देशाचा कारभार  पुढे चालू ठेवणे कठीण होते  असे सांगून मोदी म्हणाले की, त्यांनी निर्णय घेतला की अशा  गोष्टी आहेत तशा चालू राहणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, या सरकारने हे राष्ट्रीय आणि मानवी आव्हान मानले आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक मोहीम सुरू केली आणि त्यातूनच स्वच्छ भारत मिशनचे बीज पेरले गेले. ते पुढे म्हणाले की, अल्पावधीतच कोट्यवधी भारतीयांनी चमत्कार करून दाखवला. देशात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली  आणि शौचालय सुविधेची  व्याप्ती जी पूर्वी 40 टक्क्यांहून कमी होती ती 100 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

स्वच्छ भारत मिशनचा देशातील सामान्य लोकांच्या जीवनावर  जो प्रभाव पडत आहे तो, अमूल्य असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे अभ्‍यास केला असून, त्याचे निष्‍कर्ष  एका नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्‍ये प्रसिद्ध झाले आहेत.  अलीकडेच झालेल्या या  अभ्यासाचा हवाला देऊन, पंतप्रधान मोदी म्हणाले कीस्वच्छ भारत मिशनमुळे दरवर्षाला  60 ते 70 हजार बालकांचे प्राण वाचले जात  असल्याचे समोर आले आहे.  ते पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्‍य संघटनेच्या मते, 2014 ते 2019 दरम्यान, 3 लाख लोकांचे जीव वाचले आहेत. भारतामध्‍ये   अतिसारामुळे अनेकांचे बळी जातातमात्र स्‍वच्‍छता अभियान सुरू झाल्यापासून अतिसाराने  मृत्यू पावणाऱ्यांची संख्‍या 2014 ते 2019 या कालावधीत तीन लाखांनी कमी झाली आहे. युनिसेफच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी अधोरेखित केले की, घरात शौचालये बांधल्यामुळे आता 90 टक्क्यांहून अधिक महिलांना सुरक्षित वाटू लागले आहे आणि स्वच्छ भारत मिशनमुळे महिलांमध्ये संसर्गामुळे होणारे आजारही बऱ्यापैकी कमी झाले आहेत.  यावेळी पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, लाखो शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधल्यामुळे मुलींच्‍या शाळा गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. युनिसेफच्या दुसऱ्या अभ्यासाचा हवाला देत त्यांनी नमूद केले की स्वच्छतेमुळे गावांमधील कुटुंबांकडून दरवर्षी सरासरी 50 हजार रुपयांची बचत होत होती जी पूर्वी आजारांवर उपचार करण्यासाठी खिशातून खर्च केली जात होती.

स्वच्छ भारत मिशनद्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी गोरखपूरमधील मेंदूज्वरामुळे झालेल्या बालमृत्यूचे उदाहरण दिले. येथेही  स्वच्छतेवर भर देण्यात आल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

स्वच्छतेमुळे  प्रतिष्ठेमध्‍येही  वाढी झाली आहेत्‍यामुळे  देशात मोठा मानसिक बदल घडून आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वच्छ भारत मिशनने विचारात आणलेल्या बदलाचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या लोकांचे उदाहरण दिले.  ज्यांना पूर्वी तुच्छतेने पाहिले जात होते. “जेव्हा सफाई कामगारांना सन्मान मिळाला, तेव्हा त्यांनाही देश बदलण्याच्या त्यांच्या भूमिकेचा अभिमान वाटला. स्वच्छ भारत अभियानाने लाखो सफाई मित्रांना आपण करत असलेल्या कामाचा  अभिमान वाटू लागला आहे”. पंतप्रधानांनी सफाई मित्रांसाठी सन्माननीय जीवन आणि सुरक्षिततेसाठी सरकारच्या वचनबद्धतेची नोंद केली. सेप्टिक टँकमध्ये मॅन्युअल एंट्रीमुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी  सरकारने प्रयत्न केले तसेच आता  सरकार या संदर्भात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांसोबत एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. “आम्ही व्यावसायिक आणि स्टार्टअप्सनाही प्रोत्साहन देत आहोत”, ते पुढे म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानाच्या व्यापक प्रमाणात विस्तारत असलेल्या व्याप्तीवर प्रकाश टाकताना नरेंद्र  मोदी यांनी टिप्पणी केली कीहा केवळ स्वच्छता कार्यक्रम नव्हता आणि आजची  स्वच्छता  ही  उद्यासाठी समृद्धीचा एक नवीन मार्ग तयार करत आहे.

ते पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असून गेल्या काही वर्षांत कोट्यवधी शौचालये बांधून अनेक क्षेत्रांना फायदा झाला आहे.  तसेच अनेकांना रोजगार मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, गावोगावी गवंडी, प्लंबर, मजूर असे अनेक लोक काम करतात. युनिसेफच्या अंदाजानुसार या मिशनमुळे सुमारे 1.25  कोटी लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रोजगार मिळाला असल्याचे पंतप्रधान  मोदी यांनी नमूद केले. त्यांनी अधोरेखित केले की महिला गवंड्यांची एक नवीन पिढी स्वच्छ भारत अभियानाचा एक मोठा परिणाम आहे.  आणि आमच्या तरुणांना स्वच्छ तंत्रज्ञानाद्वारे चांगल्या नोकऱ्या आणि चांगल्या संधी देखील मिळत आहेत. ते पुढे म्हणाले की, सध्या क्लीन-टेकशी संबंधित सुमारे 5 हजार स्टार्ट अप नोंदणीकृत आहेत. पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होत असल्याचे सांगण्‍यावर मोदी यांनी भर दिला. मग ते संपत्तीचा अपव्यय, कचरा संकलन आणि वाहतूक, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर असो. ते पुढे म्हणाले की, या दशकाच्या अखेरीस या क्षेत्रात 65 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे आणि स्वच्छ भारत मिशन निश्चितपणे यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

स्वच्छ भारत मिशनने भारतातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण चालना दिली आहे,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, घरांमधून निर्माण होणारा कचरा आता मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतरित होत आहे. ते म्हणाले की, घरातील कचऱ्यापासून कंपोस्ट, बायोगॅस, वीज आणि रस्ते बांधणीत वापरले जाणारे कोळशासारखे साहित्य तयार केले जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागात सारखेच बदल घडवून आणणाऱ्या गोवर्धन योजनेच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले आणि गोवर्धन योजनेअंतर्गत शेकडो बायोगॅस संयंत्रे गावांमध्ये बसवण्यात आल्याची माहिती दिली.  जिथे जनावरांच्या अपशिष्‍टाचे बायोगॅसमध्ये रूपांतर केले जात आहे. ते पुढे म्हणाले की, देशभरात शेकडो कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रेही उभारण्यात आली आहेत. आज, अनेक नवीन सीबीजर  प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आणि या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्यासाठी नवीन प्रकल्प देखील मांडण्यात आले.

भविष्यातील आव्हानांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्था आणि शहरीकरणात वेगाने होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. जलद शहरीकरण आणि कचरा निर्मितीचा सामना करण्यासाठी कार्यक्षम कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी धोरणे वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी बांधकामातील तंत्रज्ञानाच्या विकासाच्या गरजेवरही भर दिला ज्यामुळे पुनर्नवीनीकरण सामग्री आणि गृहनिर्माण संकुलांसाठी डिझाइन्सच्या वापरास प्रोत्साहन मिळेल. यामुळे  शून्य किंवा कमीतकमी कचरा निर्माण करण्‍याची  खात्री मिळेल. पाण्याचा गैरवापर होऊ नये आणि वापरण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल, यासाठी प्रयत्न करण्यावर मोदी यांनी भर दिला. नमामि गंगे मिशन हे नदी स्वच्छतेचे मॉडेल असल्याचा त्यांनी उल्‍लेख करून पंतप्रधान म्हणाले की, गंगा नदी आज लक्षणीयरीत्या स्वच्छ झाली आहे. त्यांनी अमृत मिशन आणि अमृत सरोवर उपक्रमांमुळे समाजामध्‍ये  लक्षणीय बदल घडवून आणल्याचा उल्लेख केला. तसेच  जलसंधारण  आणि नदी स्वच्छतेसाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये सतत गुंतवणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छ पर्यटन स्थळे आणि वारसा स्थळे पाहुण्यांचा अनुभव अधिक समृध्‍द करतातहे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी स्वच्छता आणि पर्यटन यांच्यातील दुवा अधोरेखित केला. ते म्हणाले की, आपली पर्यटन स्थळे, श्रद्धेची ठिकाणे आणि वारसा स्थळे स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणे अत्यावश्यक आहे.

गेल्या दशकभरात साधलेल्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “’स्वच्छ भारत’ अभियानाच्या गेल्या दहा वर्षांत आपण बरेच काही साध्य केले आहे, मात्र अद्याप आपले ध्येय पूर्ण झालेले नाही. खरा बदल तेव्हाच घडतो, जेव्हा प्रत्येक नागरिक स्वच्छतेला आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून स्वीकारतो.” पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनप्रति असलेल्या  सरकारच्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, आणि स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अभियानात प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग राहायला हवा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, स्वच्छतेचे मिशन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, ते आजीवन अंगीकारायला हवे, आणि ही परंपरा एका पिढीकडून पुढील पिढीकडे संक्रमित व्हायला हवी. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची प्रेरणा असायला हवी, आणि त्याचा प्रयोग दररोज व्हायला हवा, असे ते म्हणाले. पुढील पिढीतील बालकांनी, भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ होईपर्यंत ही सवय थांबवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य सरकारांनी जिल्हा, तालुके, गाव आणि स्थानिक पातळीवर स्वच्छता उपक्रम अधिक जोमाने राबवावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. जिल्हा आणि तालुक्यांमधील शाळा, रुग्णालये आणि कार्यालयांसाठी सर्वाधिक स्वच्छतेची स्पर्धा आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की नगरपालिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांची चांगली देखभाल करावी, आणि स्वच्छता प्रणालीची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे होणार नाही, हे सुनिश्चित करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा आणि त्याची देखभाल करायला प्राधान्य द्यावे, असे  आवाहन त्यांनी केले. सर्व नागरिकांनी, ते कुठेही, म्हणजे घरात, शेजारी किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असले, तरी त्या ठिकाणी स्वच्छता राखण्याची शपथ घ्यावी, यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले.

विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करताना, स्वच्छतेचे असलेले महत्व अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले की, आपण आपली प्रार्थना स्थळे स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्यामध्ये तसाच समर्पित भाव निर्माण व्हायला हवा.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ही उद्दिष्टे साध्य करण्यात आपल्याला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आणि नागरिकांनी महात्मा गांधी यांच्या तत्त्वांचे नवीन ऊर्जा आणि उत्साहाने पालन करून त्यांना आदरांजली वहावी, असे आवाहन केले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री तोखन साहू, आणि केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री डॉ. राजभूषण चौधरी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी 9600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये AMRUT आणि AMRUT 2.0 अंतर्गत शहरी भागात पाणी आणि सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठीचे 6,800 कोटीहून अधिक किमतीचे प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत गंगेच्या खोऱ्यातील पाण्याची गुणवत्ता आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारे 1550 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 10 प्रकल्प, आणि गोबरधन (GOBARdhan) योजनेअंतर्गत 1332 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 15 कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्लांट प्रकल्प, याचा समावेश आहे.

स्वच्छ भारत दिवस’ कार्यक्रम गेल्या दशकभरात भारताने स्वच्छतेमध्ये मिळवलेले यश, आणि नुकत्याच संपलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचे यश प्रदर्शित करतो. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरील पुढील टप्प्यासाठी पाया ठरेल. संपूर्ण स्वच्छतेची भावना भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, या अभियानात देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था, महिला गट, युवा संघटना आणि वस्ती पातळीवरील नेत्यांचा सहभागही असेल.

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’, या संकल्पनेवरील ‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेच्या माध्यमातून, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणविषयक शाश्वततेप्रति आपली वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी संपूर्ण देश पुन्हा एकत्र आला.

स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत, 17 कोटींहून अधिक नागरिकांच्या सहभागासह, 19.70 लाखाहून अधिक कार्यक्रम राबवण्यात आले. सुमारे 6.5 लाख युनिट्सचे स्वच्छते द्वारे परिवर्तन  करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाले. जवळजवळ 1 लाख सफाईमित्र सुरक्षा शिबिरांचेही आयोजन करण्यात आले असून, 30 लाखांहून अधिक सफाई मित्रांना त्याचा लाभ मिळाला. याशिवाय, ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत 45 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली.

***

M.Chopade/S.Patil/U.Raikar/S.Kane/S.Bedekar/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com