Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत ‘मन की बात’ करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत –

पंतप्रधान (कन्नडमध्ये) – सर्वांना उगादी सणाच्या शुभेच्छा.

                     (हिंदी भाषांतर)

पुढचा संदेश आहे-

पंतप्रधान (तेलुगू भाषेत) – सर्वांना उगादी सणाच्या शुभेच्छा.

                      (हिंदी भाषांतर)

आता दुसऱ्या पत्रात लिहिले आहे –

पंतप्रधान (कोकणीमध्ये) – संसार पाडव्याच्या शुभेच्छा

                                                 (हिंदी भाषांतर)

पुढील संदेश असा आहे-

पंतप्रधान (मराठीमध्ये) – गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा

                                               (हिंदी भाषांतर)

आमच्या एका सहकाऱ्यानं लिहिलं आहे:

पंतप्रधान (मल्याळममध्ये) – सर्वांना विशु सणाच्या शुभेच्छा.

                                                 (हिंदी भाषांतर)

आणखी एक संदेश आहे-

पंतप्रधान (तमिळमध्ये) – सर्वांना नवीन वर्षाच्या (पुथांडू) शुभेच्छा.

                         (हिंदी भाषांतर)

मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच की हे वेगवेगळ्या भाषांमध्ये पाठवलेले संदेश आहेत. पण तुम्हाला यामागचं कारण माहीत आहे का? हीच ती खास गोष्ट आहे जी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आजपासून किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे. आणि हे सर्व संदेश नवीन वर्ष आणि विविध सणांच्या शुभेच्छांचे आहेत. म्हणूनच लोकांनी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये शुभेच्छा पाठवल्या आहेत. मित्रांनो, आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातोय. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशात येत्या काही दिवसांत, वेगवेगळ्या राज्यांत म्हणजे आसाममध्ये ‘रोंगाली बिहू’, बंगालमध्ये ‘पोईला बोइशाख’, काश्मीरमध्ये ‘नवरेह’ असे उत्सव साजरे केले जातील. त्याचप्रमाणे 13 ते 15 एप्रिल दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये उत्सवांचा जबरदस्त धूमधडाका दिसून येईल. यामुळेही उत्साहाचं वातावरण आहे आणि ईदचा सणही येत आहे. याचा अर्थ, हा संपूर्ण महिना सण आणि उत्सवांनी भरलेला असतो. या सणांच्या निमित्तानं मी देशातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आपले हे सण वेगवेगळ्या प्रदेशात होत असतील पण ते भारताच्या विविधतेत एकता कशी विणली गेली आहे, हे दर्शवतात. आपल्याला ही एकतेची भावना सतत बळकट करायची आहे.

मित्रांनो, जेव्हा परीक्षा येतात तेव्हा मी माझ्या तरुण मित्रांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ करतो. आता परीक्षा संपल्या आहेत. अनेक शाळांमध्ये पुन्हा वर्ग भरवण्याची तयारी सुरू आहे. यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ देखील येईल. वर्षाच्या या वेळेची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. मला माझे बालपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मी आणि माझे मित्र दिवसभर काहीतरी खोडसाळपणा करत असू. पण त्याच वेळी, आम्ही काहीतरी रचनात्मकही करत असू, काहीतरी शिकत असू. उन्हाळ्याचे दिवस मोठे असतात आणि मुलांपाशी करण्याजोगं खूप काही असतं. ही वेळ नवीन छंद जोपासण्याची तसंच आपलं कसब आणखी चमकवण्याची आहे. आज मुलांसाठी अशा व्यासपीठांची कमतरता नाही जिथे ते खूप काही शिकू शकतात. उदाहरणार्थ, जर कोणतीही संस्था तंत्रज्ञान शिबिर चालवत असेल, तर मुले तिथे ॲप्स बनवण्यासोबतच ओपन-सोर्स सॉफ्टवेअरबद्दल शिकू शकतात. जर पर्यावरण, नाट्य किंवा नेतृत्व यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासक्रम असतील तर तुम्ही त्यातही सामील होऊ शकता. भाषण किंवा नाटक शिकवणाऱ्या अनेक शाळा आहेत, त्या मुलांसाठी खूप उपयुक्त आहेत. या सर्वांव्यतिरिक्त, तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या स्वयंसेवी उपक्रमांमध्ये किंवा सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल. अशा कार्यक्रमांबाबत माझी एक विशेष विनंती आहे. जर कोणतीही संस्था, शाळा, सामाजिक संस्था किंवा विज्ञान केंद्र अशा उन्हाळी उपक्रमांचं आयोजन करत असेल तर ते #MyHolidays सोबत शेअर करा. यामुळे देशभरातली मुलं आणि त्यांच्या पालकांना याबद्दलची माहिती सहजपणे मिळू शकेल.

माझ्या तरुण मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या MY-Bharat च्या खास दिनदर्शिकेबद्दल चर्चा करू इच्छितो. या दिनदर्शिकेची एक प्रत सध्या माझ्यासमोर ठेवली आहे. यातले काही अनोखे प्रयत्न मी तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. MY-Bharat च्या अभ्यास दौऱ्याप्रमाणे तुम्हाला आपली ‘जन औषधी केंद्रे’ कशी काम करतात हे कळू शकेल. व्हायब्रंट व्हिलेज मोहिमेचा भाग बनून तुम्ही सीमावर्ती गावांमध्ये एक अनोखा अनुभव घेऊ शकता.

यासोबतच, तुम्ही तिथल्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचा भाग नक्कीच बनू शकता. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊन तुम्ही संविधानाच्या मूल्यांबद्दल जागरूकता पसरवू शकता. मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी त्यांचे सुट्टीचे अनुभव #HolidayMemories सोबत शेअर करावेत. तुमचे अनुभव मी येणाऱ्या ‘मन की बात’ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन.

माझ्या प्रिय देशवासियांनो, उन्हाळा सुरू होताच प्रत्येक शहरात आणि गावात पाणी वाचवण्याची तयारी सुरू होते. अनेक राज्यांमध्ये जलसंधारण आणि जलसंवर्धनाशी संबंधित कामांना नवीन गती मिळाली आहे. जलशक्ती मंत्रालय आणि विविध स्वयंसेवी संस्था या दिशेनं काम करत आहेत. देशात हजारो कृत्रिम तलाव, रोधी बंधारे, कूपनलिका पुनर्भरण, सामुदायिक शोषखड्डे बांधले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ‘catch the rain’ मोहिमेची तयारी करण्यात आली आहे. ही मोहीमदेखील सरकारची नाही तर समाजाची, जनता जनार्दनाची आहे. अधिकाधिक लोकांना जलसंवर्धनाशी जोडण्यासाठी, जलसंचय जनसहभाग मोहीम देखील राबवली जात आहे. आपल्याला मिळालेली नैसर्गिक संसाधनं पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मित्रांनो, पावसाच्या थेंबांचं‌ संरक्षण करून आपण पाण्याचा अपव्यय होण्यापासून बचाव करू शकतो. गेल्या काही वर्षांत या मोहिमेअंतर्गत देशाच्या अनेक भागात जलसंवर्धनाचं अभूतपूर्व काम झालं आहे. मी तुम्हाला एक मनोरंजक आकडेवारी देतो. गेल्या 7-8 वर्षांमध्ये नव्यानं बांधलेल्या टाक्या, तलाव आणि इतर जल पुनर्भरण संरचनांद्वारे 11 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 11 अब्ज घनमीटर पाणी म्हणजे किती पाणी होतं?

मित्रांनो, भाक्रा नांगल धरणात साचणाऱ्या पाण्याचे फोटो तुम्ही पाहिले असतील. या पाण्यापासून गोविंद सागर तलाव तयार होतो. या तलावाची लांबीच 90 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या तलावातही 9-10 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी साठवता येत नाही. फक्त 9-10 अब्ज घनमीटर! आणि त्यांच्या छोट्या प्रयत्नांमधून, देशवासीयांनी देशाच्या विविध भागांमध्ये 11 अब्ज घनमीटर पाणी वाचवण्यात यश मिळवले आहे – आहे ना हा एक उत्तम प्रयत्न!

मित्रांनो, कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातल्या लोकांनीही या दिशेनं एक उदाहरण घालून दिलं‌ आहे. काही वर्षांपूर्वी इथल्या दोन गावांचा तलाव पूर्णपणे कोरडे पडला. एक वेळ अशी आली की जनावरांना पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. हळूहळू तलाव गवत आणि झुडपांनी भरून गेला. पण गावातल्या काही लोकांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि ते कामाला लागले. आणि म्हणतात ना, ‘जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो’-गावातल्या लोकांचे प्रयत्न पाहून जवळच्या सामाजिक संस्थाही त्यांच्यात सामील झाल्या. सर्व लोकांनी मिळून कचरा आणि चिखल साफ केला आणि काही वेळातच तलावाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला. आता लोक पावसाळ्याची वाट पाहत आहेत. खरोखर, हे ‘catch the rain’ मोहिमेचं एक उत्तम उदाहरण आहे.

मित्रांनो, तुम्हीही सामुदायिक पातळीवर अशा प्रयत्नांमध्ये सामील होऊ शकता. ही लोकचळवळ पुढे नेण्यासाठी तुम्ही आतापासूनच नियोजन करायला हवं आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे – शक्य असल्यास, उन्हाळ्यात तुमच्या घरासमोर थंड पाण्याचं भांडे ठेवा. तुमच्या घराच्या छतावर किंवा व्हरांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. हे चांगले काम केल्यानंतर तुम्हाला किती बरं वाटेल ते पहा.

मित्रांनो, आता ‘मन की बात’ मध्ये आपण बोलू आकांक्षेच्या उड्डाणाबद्दल! आव्हानांची पर्वा न करता हिंमत दाखवण्याची. काही दिवसांपूर्वी संपलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्पणानं आणि प्रतिभेनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. यावेळी या खेळांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. यावरून पॅरा स्पोर्ट्स किती लोकप्रिय होत आहेत हे दिसून येतं. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी त्यांच्या उत्तम प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. मी हरियाणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातल्या खेळाडूंचं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन करतो. या खेळांदरम्यान आमच्या दिव्यांग खेळाडूंनी 18 राष्ट्रीय विक्रमही केले. त्यापैकी 12 आमच्या महिला खेळाडूंच्या नावे होते.

यंदाच्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुष्टियोद्धा जॉबी मॅथ्यूने मला एक पत्र लिहिले आहे. मला त्याच्या पत्रातला काही भाग वाचून दाखवावासा वाटतो. त्यानं लिहिलं आहे-

“पदक जिंकणं खूप खासच असतं, पण आमचा संघर्ष फक्त व्यासपीठावर उभं राहण्यापुरता मर्यादित नाही. आम्ही दररोज एक लढाई लढत असतो. आयुष्य अनेक प्रकारे आपली परीक्षा घेत असतं, खूप कमी लोक आमचा संघर्ष समजून घेतात. असे असूनही आम्ही धैर्यानं पुढे जातो. आम्ही आमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. पण आम्ही असा विश्वास बाळगतो की आम्ही कोणापेक्षाही कमी नाही.”

वाहवा! जॉबी मॅथ्यू, तू खूप छान लिहिलं आहेस, अप्रतिम. या पत्राबद्दल मी तुझे आभार मानतो. मी जॉबी मॅथ्यू आणि आमच्या सर्व  दिव्यांग मित्रांना सांगू इच्छितो की तुमचे प्रयत्न आमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहेत.

मित्रांनो, दिल्लीतल्या आणखी एका भव्य कार्यक्रमानं लोकांना खूप प्रेरणा दिली आहे आणि उत्साहानं भारून टाकलं आहे. पहिल्यांदाच एका नाविन्यपूर्ण कल्पनेतून फिट इंडिया कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध भागातल्या सुमारे 25 हजार लोकांनी यात सहभाग घेतला. त्या सर्वांचं ध्येय एकच होतं – तंदुरुस्त राहणं आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता पसरवणं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या आरोग्यासोबतच पोषणाविषयी माहिती मिळाली. मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या परिसरातही असे कार्निव्हल आयोजित करा. या उपक्रमात MY-Bharat तुम्हाला खूप मदत करू शकेल.

मित्रांनो, आपले स्थानिक खेळ आता लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनत आहेत. तुम्ही सर्वजण प्रसिद्ध रॅपर हनुमानकाइन्डला ओळखत असाल. आजकाल त्याचे नवीन गाणं “रन इट अप” खूप प्रसिद्ध होत आहे.

यामध्ये कलरीपयट्टू, गटका आणि थांग-ता यांसारख्या आपल्या पारंपरिक युध्दकला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. मी हनुमानकाईंडचे अभिनंदन करतो कारण त्याच्या प्रयत्नांमुळेच जगभरातल्या लोकांना आपल्या पारंपरिक युध्दकला प्रकारांची माहिती मिळत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दर महिन्यात मला मायगव्ह आणि नमो अॅपवर तुमचे खूप संदेश मिळत असतात. त्यापैकी कित्येक संदेश मनाला स्पर्श करतात तर काही संदेश अभिमान वाटायला लावतात. कित्येकदा तर या संदेशांतून आपली संस्कृती तसेच परंपरा यांच्या संदर्भात अत्यंत आगळीवेगळी माहिती मिळते. यावेळी ज्या संदेशाकडे माझं प्रकर्षानं लक्ष गेलं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. वाराणसीहून अर्थव कपूर, मुंबईहून आर्यश लीखा आणि अत्रेय मान यांनी नुकत्याच पार पडलेल्या माझ्या मॉरीशस दौऱ्याबद्दलच्या त्यांच्या भावना लिहून पाठवल्या आहेत. ते म्हणतात, या दौऱ्यादरम्यान गीत गवई यांच्या सादरीकरणातून त्यांना खूप मजा आली. उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग आणि बिहार येथून आलेल्या अनेक पत्रांमध्ये मला अशीच भावनाशीलता दिसून आली. मॉरीशसमध्ये गीत गवई यांनी केलेल्या सादरीकरणाच्या वेळी मला जो अनुभव आला तो खरोखरीच अद्भुत आहे.

मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या मुळांना घट्ट धरुन ठेवलेले असते तेव्हा कितीही मोठं वादळ आलं तरी ते वादळ आपल्याला उध्वस्त करू शकत नाही. तुम्ही जरा कल्पना करा, सुमारे 200 वर्षांपूर्वी भारतातून काही लोक गिरमिटीया मजूर म्हणून भारतातून मॉरीशसला गेले होते. त्यावेळी पुढे काय होणार हे कुणालाच माहित नव्हतं. पण कालपरत्वे, ते तिथे स्थिरावले, तिथलेच झाले. मॉरीशसमध्ये त्यांनी स्वतःची ठाम ओळख निर्माण केली. त्यांनी तिथे आपला वारसा सांभाळून ठेवला आणि स्वतःला मुळांशी जोडून ठेवलं. मॉरीशस हे असं एकच उदाहरण नाहीये. गेल्या वर्षी मी जेव्हा गयानाला गेलो होतो तेव्हा तिथल्या चौताल कार्यक्रमानं मी खूपच प्रभावित झालो.

मित्रांनो, मी आता तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवतो.

#(Audio clip Fiji)#

तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की ही तर आपल्या देशाच्या एखाद्या भागाबद्दलची फीत आहे. पण याचा संबंध फिजी देशाशी आहे हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा फिजी देशातील अत्यंत लोकप्रिय ‘फगवा चौताल’ आहे. हे गाणं आणि संगीत प्रत्येकामध्ये उत्साहाचा जोश भरून टाकतात. मी तुम्हाला आणखी एक ध्वनिफीत ऐकवतो. #(Audio clip Surinam)#

हा ध्वनी म्हणजे सुरिनाम देशातील ‘चौताल’ आहे. हा कार्यक्रम टीव्हीवर बघणारे देशवासी सुरीनामचे राष्ट्रपती आणि माझे मित्र चान संतोखी जी यांना या कार्यक्रमाचा आनंद घेताना बघू शकतात. बैठक तसेच गाण्यांची ही परंपरा त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये देखील फार लोकप्रिय आहे. या सगळ्या देशांमधले लोक मोठ्या प्रमाणात रामायणाचे वाचन करतात. इथे फगवा खूप लोकप्रिय आहे आणि सगळेच भारतीय सण आणि उत्सव फार उत्साहाने साजरे केले जातात. त्यांची अनेक गाणी भोजपुरी, अवधी भाषांमध्ये किंवा मिश्र भाषांमध्ये आहेत, कधीकधी त्यात ब्रज आणि मैथिली भाषेचा सुद्धा वापर केलेला दिसतो. या देशांमध्ये आपल्या परंपरा जपून ठेवणारे सर्व लोक कौतुकास पात्र आहेत.

मित्रांनो, जगात अनेक संस्था अशा देखील आहेत ज्या कित्येक वर्षांपासून भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य करत आहेत. त्यापैकीच एक संस्था म्हणजे- सिंगापूर इंडियन फाईन आर्ट्स सोसायटी. भारतीय नृत्यकला, संगीत तसेच संस्कृतीची जपणूक करण्यासाठी झटणाऱ्या या संस्थेनं 75 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण केली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंगापुरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या संस्थेच्या कार्याची खूप प्रशंसा केली. मी या कार्यकर्त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो, ‘मन की बात’ मध्ये आपण देशवासीयांच्या कामगिरीसोबतच अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर देखील विचारमंथन करतो. अनेकदा आव्हानांबद्दल देखील चर्चा करतो. यावेळच्या ‘मन की बात’ मध्ये मी आपल्या सर्वांशी थेट संबंधित असलेल्या अशा एका आव्हानाबद्दल चर्चा करू इच्छितो. हे आव्हान आहे ‘टेक्स्टाईल वेस्ट’चं. तुम्ही विचार कराल, हे ‘टेक्स्टाईल वेस्ट’ म्हणजे काय नवीन संकट उभं ठाकलं आहे? खरंतर, ‘टेक्स्टाईल वेस्ट’ हा विषय संपूर्ण जगासाठी एका नव्या संकटाचं मोठं कारण ठरला आहे. आजकाल जगात जुने कपडे लवकरात लवकर टाकून देऊन नवे कपडे वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जे जुने कपडे तुम्ही वापरत नाही, त्यांचं पुढे काय होतं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? हेच कपडे म्हणजे ‘टेक्स्टाईल वेस्ट’. यासंदर्भात जागतिक पातळीवर खूप संशोधन सुरु आहे. एका संशोधनातून असं दिसून आलं आहे की केवळ एक टक्क्याहूनही कमी ‘टेक्स्टाईल वेस्ट’ चं नव्या कपड्यांमध्ये पुनर्नविकरण होतं- एक टक्क्याहूनही कमी! ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘टेक्स्टाईल वेस्ट’ निर्माण होतं अशा जगातल्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. म्हणजेच आपल्या समोर उभं असलेलं आव्हान सुद्धा खूप मोठं आहे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्या देशात कितीतरी कौतुकास्पद प्रयत्न सुरु आहेत. भारतातील कित्येक स्टार्ट अप उद्योगांनी टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलीटीज संदर्भात काम सुरु केलं आहे. अशी अनेक कार्यकर्ता पथके आहेत जी कचरा वेचणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. अनेक तरुण सहकारी शाश्वत फॅशन विषयक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. हे मित्र जुने कपडे आणि चपला-बुटांना नवं रूप देऊन ते गरजवंतांपर्यंत पोहोचवत आहेत. ‘टेक्स्टाईल वेस्ट’ पासून सजावटीच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरीच्या वस्तू आणि खेळण्यांसारख्या अनेक वस्तू बनवल्या जात आहेत. अनेक संस्था आज ‘सर्क्युलर फॅशन ब्रँड’ला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनवीन रेंटल मंच देखील सुरु होऊ लागले आहेत, तिथे डिझायनर कपडे भाड्याने दिले जातात. काही संस्था जुने कपडे स्वीकारून त्यांना पुन्हा वापरण्याजोगं बनवतात आणि ते गरिबांना देतात.    

मित्रांनो, ‘टेक्स्टाईल वेस्ट’वर उपाय शोधण्याबाबत काही शहरं स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहेत. हरियाणामधील पानिपत हे शहर कपड्यांच्या पुनर्वापरासंदर्भात जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. बंगळूरुदेखील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांद्वारे स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करत आहे. तिथे अर्ध्याहून अधिक ‘टेक्स्टाईल वेस्ट’ जमा केलं जातं आणि आपल्या इतर शहरांसाठी देखील हे एक उत्तम उदाहरण आहे. याच पद्धतीनं तामिळनाडूमधील तिरुपूरनं देखील सांडपाणी प्रक्रिया आणि नवीकरणीय ऊर्जा यांच्या माध्यमातून ‘टेक्स्टाईल वेस्ट व्यवस्थापना’वर लक्ष केंद्रित केलं आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज तंदुरुस्तीबरोबरच मोजणीची भूमिका फार मोठी झाली आहे. एका दिवसात किती पावलं चाललो याची मोजणी, एका दिवसात किती उष्मांक खाल्ले याची मोजणी, किती उष्मांक जाळले याचीही गणती… इतक्या सगळ्या मोजण्यांमध्ये आता आणखीन एक उलट गणती सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीची उलट गणती. योग दिनाला आता शंभर दिवसांहूनही कमी वेळ उरला आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात अजूनही योगाचा समावेश केलेला नसेल तर आता नक्की करा, अजूनही उशीर झालेला नाही. 10 वर्षांपूर्वी 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला होता. आता या दिवसानं योगविषयक व्यापक महोत्सवाचं रूप घेतलं आहे. भारताकडून मानवतेला मिळालेला हा असा एक अनमोल उपहार आहे जो येणाऱ्या पिढ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. वर्ष 2025 च्या योग दिनाची संकल्पना आहे, ‘एक वसुंधरा, एक आरोग्य यासाठी योग’ म्हणजेच आम्ही योगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला तंदुरुस्त करण्याची इच्छा व्यक्त करतो.

मित्रांनो, आज आपला योगाभ्यास आणि पारंपरिक उपचारपद्धती यांच्या बाबत संपूर्ण जगात उत्सुकता वाढत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आज योग आणि आयुर्वेद यांना तंदुरुस्ती राखण्याचं सर्वोत्तम माध्यम मानून यांचा स्वीकार करत आहे. आता दक्षिण अमेरिकेतला चिली देश आहे, तिथे आयुर्वेदाला वेगानं लोकप्रियता लाभत आहे. गेल्या वर्षी ब्राझील दौऱ्याच्या वेळी चिलीच्या राष्ट्रपतींची भेट झाली होती. आयुर्वेदाच्या या लोकप्रियतेबद्दल आमच्यात बरीच चर्चा झाली. मला सोमोस इंडिया नामक एका पथकाची माहिती मिळाली आहे. स्पॅनिश भाषेत याचा अर्थ होतो, – आम्ही भारत आहोत. हे पथक सुमारे दशकभरापासून योग आणि आयुर्वेद यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करत आहे. उपचारांसोबत शैक्षणिक कार्यक्रमांवर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. ते लोक आयुर्वेद आणि योग यांच्याशी संबंधित माहिती स्पॅनिशमध्ये भाषांतरित देखील करत आहेत. फक्त गेल्या वर्षीचा विचार केला तर त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये तब्बल 9 हजार लोकांनी भाग घेतला. मी या पथकाशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचे तसेच त्यांच्या या उपक्रमांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये आता एक चटपटीत आणि विचित्रसा प्रश्न! तुम्ही कधी फुलांच्या प्रवासाबद्दल विचार केला आहे? वृक्ष-रोपट्यांपासून निर्मित काही फुलांचा प्रवास पार मंदिरांपर्यंत पोहोचतो. काही फुलं घराची सजावट करतात, तर काही अत्तरांच्या रुपात सगळीकडे सुगंध पसरवतात. पण आज मी तुम्हाला फुलांच्या एका वेगळ्याच प्रवासाबद्दल सांगतो. तुम्ही मोहाच्या फुलांबद्दल नक्कीच ऐकलं असेल. आपल्या गावांमधले लोक, विशेषतः आदिवासी समाजातल्या लोकांना या फुलांचं महत्त्व चांगलंच माहित आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आता मोहाच्या फुलांचा प्रवास एका नव्या मार्गानं सुरु झाला आहे. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून कुकीज तयार करण्यात येत आहेत. राजाखोह गावातल्या चार बहिणींनी केलेल्या प्रयत्नांतून बनलेल्या या कुकीज खूप लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या महिलांचा जोश पाहून एका मोठ्या कंपनीनं त्यांना कारखान्यात काम करण्याचं प्रशिक्षण दिलं. यातून प्रेरणा घेऊन गावातल्या अनेक महिला त्यांच्यासोबत काम करू लागल्या. त्यांनी तयार केलेल्या मोहाच्या कुकीजना जोरदार मागणी येत आहे. तेलंगणामधल्या आदिलाबाद जिल्ह्यात देखील दोन बहिणींनी मोहाच्या फुलांपासून नवा प्रयोग केला आहे. त्या या फुलांचा वापर करून वेगवेगळ्या मिठाया बनवतात. त्यांच्या या मिठायांमध्ये आदिवासी संस्कृतीचा गोडवा सुद्धा आहे.

मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एका अद्भुत फुलाबद्दल काही सांगू इच्छितो आणि त्याचं नाव आहे ‘कृष्ण कमळ’. तुम्ही गुजरातमध्ये एकता नगरला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला गेला होतात? स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात तुम्हाला ही ‘कृष्ण कमळा’ची खूप फुलं दिसतील. ही फुलं येणाऱ्या पर्यटकांचं मन मोहून टाकतात. ही ‘कृष्ण कमळं’ एकता नगरच्या आरोग्य वन, एकता नर्सरी, विश्व वन आणि मियावाकी वनात आकर्षणाचे केंद्र झाली आहेत. त्या परिसरात योजनाबद्ध पद्धतीनं लाखोंच्या संख्येत ‘कृष्ण कमळा’ची रोपं लावण्यात आली आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला पाहिलंत तर फुलांच्या प्रवासाच्या अनेक रोचक कहाण्या आढळतील. तुमच्या भागातल्या फुलांच्या अशा विलक्षण प्रवासाबाबत मला पत्र लिहून नक्की कळवा.

माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे विचार, अनुभव आणि माहिती माझ्याशी सामायिक करत रहा कारण, असंही असू शकतं की तुमच्या जवळपास असं काही घडत असेल जे दिसायला सामान्य दिसेल पण इतरांसाठी तो विषय खूप रोचक असेल आणि नवा असेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू आणि देशवासीयांच्या अशाच काही गोष्टींची चर्चा करू ज्या आपल्याला प्रेरणा देतात. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, नमस्कार.

***

NM/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com