Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो. 

प्रत्येक प्रसंगी उपवास धरुन आणि काही प्रसंगी तर नऊ दिवसांचा उपवास धरुन मोदी यांनी जागतिक पातळीवरील नेता म्हणून त्यांची भूमिका कशी पार पाडली असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी यांनी चातुर्मासाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा ठळक उल्लेख केला. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पचनक्रिया नैसर्गिकरित्या मंदावते त्या काळात चातुर्मास पाळला जातो. ते म्हणाले की या कालावधीत अनेक भारतीय दररोज केवळ एकदाच जेवण ग्रहण करण्याची पद्धत पाळतात. मोदी म्हणाले की त्यांच्यासाठी ही परंपरा जूनच्या मध्यावर सुरु होते आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतरही काही काळ साधारण साडेचार महिन्याच्या कालावधीसाठी सुरु राहते. ते पुढे म्हणाले की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात शक्ती, भक्ती आणि अध्यात्मिक शिस्तपालनाचा उत्सव साजरा करणाऱ्या नवरात्र उत्सवादरम्यान ते संपूर्णपणे अन्न वर्ज्य करतात आणि या नऊ दिवसांत केवळ गरम पाण्याचे सेवन करतात. त्यांनी पुढे असेही सांगितले की मार्च किंवा एप्रिलमध्ये येणाऱ्या चैत्र नवरात्रीदरम्यान नऊ दिवस ते रोज केवळ एकाच प्रकारचे फळ खाऊन अनोख्या पद्धतीचा उपवास करतात. म्हणजे, जर त्यांनी पपईची निवड केली असेल तर त्या चैत्रनवरात्रीच्या उपवासाच्या कालावधीत ते केवळ पपईचेच सेवन करतात. उपवासाच्या या काही पद्धती त्यांच्या आयुष्यात खोलवर रुजलेल्या असून गेली 50 ते 55 वर्षे ते सातत्याने असे उपवास करत आहेत असे त्यांनी ठळकपणे नमूद केले. त्यांच्या उपवासाच्या पद्धती सुरुवातीला अगदी वैयक्तिक होत्या आणि त्या सार्वजनिकरित्या कोणालाही माहित नव्हत्या अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. मोदी म्हणाले की ते मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर उपवासाच्या त्यांच्या पद्धतींना अधिक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. आता आपले अनुभव सामायिक करण्यात त्यांना कोणतीही हरकत नसते, कारण इतरांचे भले करण्याच्या त्यांच्या जीवनाच्या उद्देशाच्या मार्गावर पुढे जात उपवासाची परंपरा इतरांनी अनुसरली तर त्यांच्यासाठी देखील ती लाभदायकच ठरेल असा विचार आपल्या मनात येतो असे ते म्हणाले. एकदा उपवास सुरु असताना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत व्हाईटहाऊस येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीच्या प्रसंगाचे उदाहरण देखील मोदी यांनी दिले.

जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्याविषयी विचारल्यावर पंतप्रधानांनी गुजरातच्या उत्तर भागात मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या त्यांच्या जन्मस्थानाच्या समृद्ध ऐतिहासिक महत्त्वावर अधिक भर देत उत्तर दिले. बुद्ध शिकवणीचे मुख्य केंद्र असलेल्या वडनगरने चिनी तत्वज्ञ ह्युएन त्संग सारख्या अनेक प्रज्ञावंतांना आकर्षित केले होते याकडे लक्ष वेधले. इसवी सन 1400 च्या आसपास हे नगर बौद्ध शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते असे नमूद करत ते म्हणाले की त्यांच्या गावात बौद्ध, जैन, आणि हिंदू परंपरांचे सुसंवादी सहअस्तित्व असलेले अनोखे वातावरण होते. वडनगरमध्ये इतिहास पुस्तकांपुरता मर्यादित नसून तेथील प्रत्येक दगड आणि भिंत एकेक कहाणी सांगणारी आहे यावर त्यांनी भर दिला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मोदी यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर उत्खनन प्रकल्प सुरु केले आणि त्यातून 2,800 वर्षांपूर्वीचे पुरावे हाती आले ज्यांनी या नगराचे सातत्यपूर्ण अस्तित्व सिध्द केले. या उत्खनन कार्यात मिळालेल्या निष्कर्षांतून वडनगरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील वस्तुसंग्रहालय स्थापन झाले असून ते आता अभ्यासाचे विशेषतः पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळी जन्म होणे हे आपले भाग्य असल्याचे सांगून त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी त्यांच्या बालपणीचे काही पैलू सामायिक केले. खिडक्या नसलेल्या अगदी लहान घरात त्यांच्या कुटुंबाने व्यतीत केलेल्या जीवनाचे वर्णन करत पंतप्रधानांनी अत्यंत गरिबीत मोठे झाल्याची माहिती दिली.

ते म्हणाले की त्यांना तुलनेसाठी कोणताही आधार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांच्या गरीबीचे कधीच दडपण वाटले नाही. त्यांचे वडील अत्यंत शिस्तप्रिय तसेच मेहनती होते आणि  त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिध्द होते असे ते म्हणाले.  मोदी यांनी त्यांच्या आईचे कष्ट आणि इतरांची काळजी घेण्याची वृत्ती अधोरेखित करून त्यातूनच आपल्यात सहानुभूती आणि सेवाभाव यांची जाणीव रुजल्याचे नमूद केले. त्यांची आई दररोज पहाटे आजारी मुलांना पारंपरिक औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करायची त्यामुळे पहाटे त्यांच्याकडे अनेक मुलांची गर्दी गोळा होत असे अशी आठवण सांगून मोदी म्हणाले की या अनुभवांनी त्यांचे आयुष्य आणि मूल्ये घडवली. राजकारणातील त्यांच्या वाटचालीने त्यांच्या आयुष्याची विनम्र सुरुवात उजेडात आणली असे सांगून ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना माध्यमांनी केलेल्या वृतांकनामुळे सार्वजनिकरीत्या त्यांची पार्श्वभूमी सर्वांसमोर आली .  त्यांना आयुष्यात आलेले अनुभव, मग ते भाग्य भासो की दुर्भाग्य, ते अशा पद्धतीने उलगडले आहेत की आता ते त्यांच्या सार्वजनिक जीवनाची माहिती देतात अशा शब्दात मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

तरुणांना काय सल्ला द्याल असे विचारल्यावर पंतप्रधान मोदी यांनी आव्हाने ही जीवनाचे एक अंग आहेत मात्र त्यांनी कोणाचेही उद्देश निश्चित करता कामा नयेत यावर अधिक भर देत संयम राखणे आणि आत्मविश्वास बाळगणे यासाठी तरुण वर्गाला प्रोत्साहित केले. अडचणी आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतात आणि त्या व्यक्तीला हरवण्याऐवजी तिला मजबूत बनवण्यासाठी असतात असे अधोरेखित करून पंतप्रधान पुढे म्हणाले की प्रत्येक संकट विकासाची आणि सुधारणेची संधी घेऊन येते. रेल्वे स्थानकांवर लावलेल्या, “शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करतील” या इशारावजा सूचनेचे उदाहरण देत ते म्हणाले की जीवनात कोणतेही शॉर्टकट्स नसतात. यश मिळवण्यात संयम आणि चिकाटीचे महत्त्व त्यांनी ठळकपणे सांगितले. आयुष्याच्या वाटचालीत समाधान शोधण्यासाठी, आपली प्रत्येक जबाबदारी पार पाडताना आणि उत्कटतेने आयुष्य जगताना प्रत्येकाने त्यात जीव ओतण्याच्या गरजेवर देखील त्यांनी अधिक भर दिला. केवळ विपुलता यशाची हमी देऊ शकत नाही कारण ज्यांच्याकडे विपुल प्रमाणात साधनसंपत्ती आहे त्यांनी देखील वृद्धी करणे आणि समाजामध्ये योगदान देणे आवश्यक आहे ही बाब अधोरेखित करत पंतप्रधानांनी संपूर्ण जीवनभर वैयक्तिक विकास अत्यावश्यक असल्यामुळे न थांबता सतत शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वडिलांच्या चहाच्या दुकानात होणाऱ्या संवादांतून शिकण्याचा स्वतःचा अनुभव सामायिक करत सांगितले की त्यातून त्यांना सतत शिकत राहण्याचे आणि स्वयंसुधारणेचे महत्त्व शिकता आले. अनेक जण खूप मोठे लक्ष्य निश्चित करतात आणि मग ते साध्य झाले नाही की निराश होतात याचा उल्लेख त्यांनी केला. काहीतरी होऊन दाखवण्यापेक्षा काहीतरी करत राहण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देऊन ते म्हणाले की अशा मानसिकतेमुळे निरंतर दृढनिश्चय आणि ध्येयांच्या दिशेने प्रगती करण्याची अनुमती देते. एखाद्याला काय मिळते यापेक्षा तो काय देतो यातून खरे समाधान मिळते यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यांनी युवकांना योगदान आणि सेवेवर केंद्रित मानसिकता जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले.

हिमालयातील प्रवासाविषयी विचारल्यावर मोदी यांनी सांगितले की जिथे सामुदायिक जीवन केंद्रस्थानी होते अशा लहान शहरात ते लहानाचे मोठे झाले. स्थानिक वाचनालयाला वारंवार भेट देऊन स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तींवर आधारित पुस्तकांतून प्रेरणा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या वाचनातून त्यांना स्वतःचे आयुष्य तशाच पद्धतीने घडवण्याची इच्छा जागृत झाली आणि त्यांनी स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी थंड हवामानात निवाऱ्याबाहेर उघड्यावर झोपण्यासारख्या शारीरिक मर्यादांच्या परिक्षेचे प्रयोग सुरु केले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचा प्रभाव अधोरेखित करत, विशेषतः आजारी आईसाठी मदतीची गरज असताना देखील ध्यानधारणेदरम्यान कालीमातेकडे काहीही मागू न शकलेल्या विवेकानंद यांच्यात दातृत्वाची प्रेरणा जागवणाऱ्या अनुभवाच्या कहाणीने केलेला परिणाम सांगत पंतप्रधान म्हणाले की या कहाणीतून, इतरांना देण्यातून आणि त्यांची सेवा करण्यातून खरे समाधान प्राप्त होते अशी कायमची छाप त्यांच्यावर पडली. कुटुंबातील विवाह समारंभादरम्यान इतरांसोबत न जाता एका संतांची सेवा करण्यासाठी घरीच थांबल्याची घटना सांगून त्यांनी अध्यात्मिक साधनेकडे सुरुवातीपासूनच त्यांचा असलेला ओढा सांगितला. त्यांच्या गावात सैनिकांना पाहून त्यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली मात्र त्यावेळी त्यांच्याकडे त्यासाठीचा स्पष्ट मार्ग उपलब्ध नव्हता असे मोदी म्हणाले. आयुष्याचा अर्थ समजून घेण्याची त्यांची तीव्र तळमळ आणि त्यासाठी केलेली वाटचाल पंतप्रधानांनी नमूद केली. समाज सेवेच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या स्वामी आत्मस्थानानंदजी यांच्यासारख्या संतांसोबत असलेले त्यांचे नाते अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या ध्येयाच्या दिशेने वाटचालीत त्यांना अनेक अद्भुत संत भेटले ज्यांनी त्यांच्यावर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हिमालयातील त्यांच्या अनुभवाबद्दल देखील माहिती दिली. ते म्हणाले की एकांतवास आणि तपस्वींशी झालेल्या भेटी यांनी त्यांना स्वतःला घडवण्यात तसेच त्यांच्या आंतरिक सामर्थ्याचा शोध घेण्यात मदत केली. त्यांच्या वैयक्तिक विकासामधील ध्यानधारणा, सेवाभाव आणि भक्तीच्या भूमिकेवर त्यांनी अधिक भर दिला.

रामकृष्ण मिशनमधील स्वामी आत्मस्थानानंदजी यांच्याबद्दलचा प्रत्येक स्तरावर सेवाभावी जीवन जगण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा अनुभव सामायिक करत मोदी म्हणाले की इतर लोक त्यांच्याकडे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून पाहत असतील. पण ते मात्र अध्यात्मिक तत्वांप्रती दृढतेने वचनबद्ध आहेत. ते म्हणाले की, स्वतःच्या आईला मुलांची काळजी घेण्यात मदत करणे, हिमालयात भ्रमंती करणे किंवा त्यांच्या विद्यमान जबाबदारीच्या पदावर काम करणे अशा सगळ्याच माध्यमातून त्यांची आंतरिक स्थिरता इतरांची सेवा करण्यात रुजलेली आहे.पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या मते, एखादा संत आणि एक नेता यांच्यात वास्तवात फारसा फरक नाही कारण या दोन्ही भूमिका समान मूलभूत मूल्यांद्वारे मार्गदर्शित आहेत. वेशभूषा अथवा कार्य अशा बाह्य पैलूंमध्ये बदल झाला तरीही सेवेप्रती त्यांचे समर्पण अचल असेल हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. ते त्यांची जबाबदारी त्याच स्थिरचित्त, एकाग्र आणि समर्पित भावनेने निभावतात हे त्यांनी अधोरेखित केले.

स्वतःच्या आयुष्यावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रभावाची चर्चा करताना पंतप्रधानांनी राष्ट्रभक्तीपर गीतांविषयी विशेषतः डफ घेऊन त्यांच्या गावी येणाऱ्या मकोशी नावाच्या माणसाने गायलेल्या गाण्यांविषयी बालपणी असलेल्या आकर्षणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की या गीतांनी त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श केला आणि शेवटी आरएसएसमध्ये  सहभागी होण्यात या गाण्यांची भूमिका महत्त्वाची होती. देशाप्रती योगदान देण्यासाठी प्रत्येक कार्य, मग ते अभ्यास करणे असो अथवा व्यायाम करणे, ते एका उद्देशाने करण्यासारखी मुलभूत तत्वे आरएसएसने त्यांच्यात रुजवली. लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा करण्यासारखेच आहे यावर अधिक भर देत आरएसएसने जीवनाच्या उद्देशाबाबत स्पष्ट दिशा दिली अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. आरएसएस या संघटनेची वाटचाल शतकपूर्तीकडे होत आहे असे नमूद करुन पंतप्रधान म्हणाले की, जगभरात लाखो सदस्य असलेली ही एक भव्य स्वयंसेवक संघटना आहे. सेवा भारतीसारख्या सरकारी मदतीविना झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये 1,25,000 हून अधिक सेवा प्रकल्प चालवणाऱ्या आरएसएसतर्फे प्रेरित विविध उपक्रमांवर अधिक भर देत मोदी यांनी आदिवासी भागात 70,000 हून अधिक एक-शिक्षकी शाळा स्थापन करणारा वनवासी कल्याण आश्रम तसेच सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जवळजवळ 25,000 शाळा चालवणारी विद्या भारती या  उपक्रमांचा देखील उल्लेख केला. समाजावर ओझे होणे टाळण्यासाठी विद्यार्थी मुलभूत पातळीशी जोडलेले राहतील तसेच कौशल्ये शिकतील हे सुनिश्चित करत आरएसएसने नेहमीच शिक्षण तसेच मूल्यांना प्राधान्य दिले आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. देशभरात लाखो सदस्य असलेली भारतीय कामगार संघटना पारंपरिक कामगार चळवळीच्या तत्वांपासून दूर होत “कामगारांच्या माध्यमातून जगाचे एकीकरण” या तत्वावर लक्ष एकाग्र करत अनोखा दृष्टीकोन स्वीकारत आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांना आरएसएसकडून मिळालेली जीवनमूल्ये आणि उद्देश तसेच स्वामी आत्मस्थानानंदजी यांच्यासारख्या संतांकडून मिळालेले अध्यात्मिक मार्गदर्शन यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भारताच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारत ही एक सांस्कृतिक ओळख आहे आणि हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली नागरी संस्कृती आहे. शंभरहून अधिक भाषा आणि हजारो बोलीभाषा असलेल्या भारताच्या विशालतेवर भर देत तसेच भारतात दर 20 मैलांवर भाषा, रितीरिवाज, खाद्यसंस्कृती आणि पेहराव बदलतो यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की अशा प्रचंड वैविध्यात देखील एक समान धागा असा आहे जो संपूर्ण देशाला एकत्र ठेवतो. पंतप्रधानांनी यावेळी संपूर्ण भारतभरात प्रचलित असणाऱ्या भगवान रामाच्या कहाण्यांचा ठळक उल्लेख केला आणि गुजरातेत रामभाई, महाराष्ट्रात रामभाऊ आणि तामिळनाडूमध्ये रामचंद्रन अशा पद्धतीने प्रत्येक प्रदेशात भगवान रामाच्या नावावरून प्रेरित नावे प्रचलित आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले. हा अनोखा सांस्कृतिक बंध भारताला एकाच नागरी संस्कृतीच्या रुपात एकत्र आणतो. देशातील जनता स्नान करताना गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती,नर्मदा,सिंधू आणि कावेरी यांसारख्या नद्यांची नवे उच्चारुन भारतातील सर्व नद्यांचे स्मरण करण्याची पद्धत मोदी यांनी ठळकपणे सांगितली. ते म्हणाले की, एकतेची ही भावना भारतीय परंपरेत खोलवर रुजली आहे आणि महत्त्वाचे कार्यक्रम तसेच विधी यांच्या दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक नोंदी म्हणून देखील कार्य करणाऱ्या संकल्पांतून तिचे दर्शन घडते. जंबूद्विपापासून सुरु होऊन कुलदेवतेपर्यंत सीमित होणाऱ्या समारंभांमध्ये विश्वाला आवाहन करण्यासारख्या पद्धतींमध्ये भारतीय धर्मग्रंथांचे बारकाईने केलेले मार्गदर्शन अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, या पद्धती अजूनही जिवंत असून भारतभरात त्यांचे पालन केले जाते. पाश्चिमात्य आणि जागतिक प्रारुपात देशाकडे एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून पहिले जात असताना भारताची एकता त्याच्या सांस्कृतिक नात्यामध्ये वसलेली आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणाले की इतिहासाच्या विविध काळात भारतात अनेकानेक प्रशासकीय यंत्रणांचे राज्य होते, मात्र सांस्कृतिक परंपरांच्या माध्यमातून त्याचे ऐक्य जपण्यात आले आहे. पंतप्रधानांनी भारताचे ऐक्य जपण्यात तीर्थयात्रांच्या परंपरेची भूमिका देखील अधोरेखित केली आणि शंकराचार्यांद्वारे स्थापित चार धामांचा उल्लेख केला. आजच्या काळात देखील लाखो लोक तीर्थयात्रेला जातात आणि रामेश्वरमहून काशीला आणि काशीहून रामेश्वरमला जल घेऊन जातात असे त्यांनी सांगितले. भारतातील वैविध्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या हिंदू दिनदर्शिकेच्या समृद्धतेकडे देखील त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

महात्मा गांधींचा वारसा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल चर्चा करताना, पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की त्यांचा जन्म देखील गुजरातमध्ये झाला असून  महात्मा गांधींप्रमाणेच गुजराती ही त्यांची मातृभाषा आहे. गांधीजींना परदेशात वकील म्हणून काम करण्याची संधी असूनही, कर्तव्य आणि कौटुंबिक मूल्यांच्या सखोल भावनेने त्यांनी त्यांचे जीवन भारतीय लोकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचे निवडले हे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींची तत्वे आणि कृती आजही प्रत्येक भारतीयावर प्रभाव पाडत आहेत यावर त्यांनी भर दिला. गांधीजींच्या स्वच्छतेच्या पुरस्कारावर भर देत, त्यांनी स्वतः स्वच्छतेचा अवलंब केला आणि आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी  आणला हे लक्षात आणून देत, मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या दीर्घ लढ्याबद्दल भाष्य केले.  ते म्हणाले की  या दरम्यान शतकानुशतके वसाहतवादी राजवट असूनही देशभर स्वातंत्र्याची ज्योत तेवत होती. भारताला स्वातंत्र्य प्राप्ती व्हावी म्हणून लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, तुरुंगवास आणि हौतात्म्य पत्करले, असेही ते म्हणाले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी कायमस्वरूपी प्रभाव पाडला, परंतु सत्यात रुजलेल्या जनआंदोलनाचे नेतृत्व करून महात्मा गांधींनी राष्ट्राला जागृत केले हे निरीक्षण श्री मोदी यांनी नोंदविले. त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्याची क्षमता अधोरेखित केली, सफाई कामगारांपासून ते शिक्षक, कातकरी आणि काळजी वाहकांपर्यंत, सर्वांना गंधीजींनी सामील केल्याचे ते म्हणाले. गांधीजींनी सामान्य नागरिकांना स्वातंत्र्यासाठी सैनिकांमध्ये रूपांतरित केले आणि एक अशी प्रचंड चळवळ निर्माण केली की ब्रिटिशांना ती   समजू शकली नाही असे त्यांनी म्हटले.  चिमूटभर मीठाने क्रांती घडवली अश्या दांडी यात्रेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी गोलमेज परिषदेतील एक किस्सा सांगितला, जिथे गांधीजींनी कमरेपर्यंत अंग झाकणारे कपडे घातले होते आणि बकिंघम पॅलेसमध्ये किंग जॉर्ज यांची भेट घेतली.

तुमच्या राजाने  आपल्या दोघांना पुरेसे होतील एवढे कपडे घातले आहे”हे वाक्य त्यांच्या विनोदी बुद्धीचे दर्शन घडवते असे मोदी म्हणाले.   मोदी यांनी गांधीजींच्या एकतेसाठी आणि लोकांच्या ताकदीची ओळख पटविण्यासाठीच्या आवाहनाबाबत सांगताना म्हंटले की ते आवाहन आजही प्रतिध्वनीत होत आहे. केवळ सरकारवर अवलंबून राहण्याऐवजी, प्रत्येक उपक्रमात सामान्य माणसाला सहभागी करून घेण्याच्या आणि सामाजिक बदलांना चालना देण्याच्या त्यांच्या स्वतःच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

मोदींनी पुढे नमूद केले की महात्मा गांधींचा वारसा शतकानुशतके कायम राहील आणि त्यांची प्रासंगिकता आजही कायम आहे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीची जाणीव अधोरेखित केली आणि सांगितले की त्यांची ताकद त्यांच्या नावात नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आणि हजारो वर्षांच्या कालातीत संस्कृती आणि वारशाच्या पाठिंब्यात आहे. “जेव्हा मी जागतिक नेत्याशी हस्तांदोलन करतो तेव्हा ते हस्तांदोलन केवळ मोदी करत नाहीत, तर 140  कोटी भारतीय करतात”, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. 2013  मध्ये जेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले तेव्हा त्यांच्यावर झालेल्या व्यापक टीकेची आठवण करून देताना   मोदी म्हणाले की, टीकाकारांनी परराष्ट्र धोरण आणि जागतिक राजकारणाबद्दलच्या त्यांच्या समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले, “भारत स्वतःला कधीही तुच्छ मानू देणार नाही आणि कधीही कोणाकडेही तुच्छतेने बघणार  नाही. भारत आता त्याच्या समकक्षांशी डोळ्यात डोळे घालून पुढे मार्गक्रमण करेल.” त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की हा विश्वास त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे, देश नेहमीच प्रथम येतो यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी जागतिक शांतता आणि बंधुत्वासाठी भारताच्या दीर्घकालीन समर्थनावर प्रकाश टाकला, जे जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनात रुजलेले आहे. त्यांनी जागतिक उपक्रमांमध्ये भारताच्या योगदानाबद्दल भाष्य केलेअक्षय ऊर्जेसाठी “एक सूर्य, एक जग, एक ग्रिड” आणि जागतिक आरोग्यसेवेसाठी “एक पृथ्वी, एक आरोग्य” ही संकल्पना. या दोन्ही संकल्पना सर्व वनस्पती आणि प्राण्यांपर्यंत विस्तारतात. त्यांनी जागतिक कल्याणाला चालना देण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या ब्रीदवाक्यासह भारताने आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेबद्दल बोलताना,   मोदी यांनी भारताचे कालातीत ज्ञान जगासोबत सामायिक करण्याचे कर्तव्य अधोरेखित केले. आजच्या जगाच्या परस्परसंबंधित स्वरूपावर त्यांनी भाष्य केले आणि म्हटले की, “कोणताही देश एकाकी राहून प्रगती करू शकत नाही. आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत.” जागतिक उपक्रमांना पुढे नेण्यासाठी सम-क्रमण आणि सहकार्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्यांनी संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनांच्या प्रासंगिकतेवरही भाष्य केले आणि काळानुसार विकसित होण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांच्या प्रभावीतेवर जागतिक चर्चा सुरू झाली आहे हे नमूद केले. युक्रेनमधील शांतता प्रस्थपित करण्याच्या विषयावर बोलताना, मोदी म्हणाले की ते भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भूमीचे प्रतिनिधित्व करतात. या दोघांच्या शिकवणी आणि कृती पूर्णपणे शांततेसाठी समर्पित होत्या असे ते म्हणाले. भारताची मजबूत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हे सुनिश्चित करते की जेव्हा भारत शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग ऐकते यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की भारतीय संघर्ष टाळतात आणि  त्याऐवजी सुसंवादाचे समर्थन करतात, शांततेसाठी उभे राहतात आणि शक्य असेल तिथे शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी स्वीकारतात. पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांवर प्रकाश टाकताना सांगितले की ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधू शकतात आणि हे सांगू शकतात की ही युद्धाची वेळ नाही आणि ते राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना असेही सांगू शकतात की युद्धभूमीवर नव्हे तर वाटाघाटींद्वारे तोडगा काढला जाईल. त्यांनी पुढे सांगितले की चर्चा फलदायी होण्यासाठी दोन्ही पक्षांचा समावेश असला पाहिजे आणि सध्याची परिस्थिती युक्रेन आणि रशिया यांच्यात अर्थपूर्ण चर्चेची संधी निर्माण करते हे देखील त्यांनी नमूद केले. या संघर्षामुळे ग्लोबल साऊथला  अन्न, इंधन आणि खतांचा तुटवडा या सारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला शांततेसाठी    एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भूमिकेची पुष्टी करताना म्हटले की, “मी तटस्थ नाही. माझी एक भूमिका आहे, आणि ती म्हणजे शांतता, आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”

भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या विषयावर चर्चा करताना, पंतप्रधानांनी १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेदनादायक वास्तवाला स्पर्श केला, त्यानंतर झालेल्या दुःखावर आणि रक्तपातावर प्रकाश टाकला. जखमी लोक आणि मृतदेहांनी भरलेल्या पाकिस्तानहून येणाऱ्या गाड्यांचे भयावह दृश्याचे त्यांनी वर्णन केले. त्यांनी नमूद केले की सुसंवादी सहअस्तित्वाच्या अपेक्षा असूनही, पाकिस्तानने शत्रुत्वाचा मार्ग निवडला आणि भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडले. पंतप्रधानांनी रक्तपात आणि दहशतवादावर भर देणाऱ्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दहशतवाद हा केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी एक धोका आहेअसे सांगितले . दहशतवादाचा मार्ग अनेकदा पाकिस्तानकडे जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले.  त्यांनी  ओसामा बिन लादेनचे उदाहरण दिले, जो तेथे आश्रय घेत असल्याचे आढळले होते. त्यांनी पाकिस्तान हा अशांततेचा केंद्रबिंदू बनला आहे अशी टिप्पणी केली आणि त्यांना राज्य पुरस्कृत दहशतवाद सोडून देण्याचे आवाहन केले. “तुमचा देश अधर्मी शक्तींना सोपवून तुम्हाला काय मिळेल असे वाटते आहे?”, असा प्रश्न त्यांनी केला.   मोदी यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या वैयक्तिक प्रयत्नांची माहिती दिली, ज्यामध्ये लाहोरला त्यांची भेट आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानला देण्यात आलेले आमंत्रण यांचा समावेश होता. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींमध्ये लिहिलेल्या शांतता आणि सौहार्दाच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून त्यांनी हा राजनैतिक उपक्रम अधोरेखित केला. तथापि, त्यांनी नमूद केले की या प्रयत्नांना शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला.

खेळांच्या एकत्रित शक्तीवर भर देताना,   मोदी म्हणाले की, खेळ लोकांना अधिक खोलवर जोडतात आणि जगाला ऊर्जा देतात. त्यांनी म्हटले की, “मानवी उत्क्रांतीत खेळांची मोठी भूमिका आहे. ते फक्त खेळ नाहीत; ते राष्ट्रांमधील लोकांना एकत्र आणतात.” त्यांनी नमूद केले की जरी ते क्रीडा तंत्रांमध्ये तज्ज्ञ नसले तरी, निकाल अनेकदा बऱ्याच गोष्टी दर्शवतात, जसे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलिकडच्या क्रिकेट सामन्यात दिसून आले. महिला फुटबॉल संघाच्या प्रभावी कामगिरीची आणि पुरुष संघाच्या प्रगतीची नोंद घेत पंतप्रधानांनी भारताच्या मजबूत फुटबॉल संस्कृतीवरही प्रकाश टाकला. भूतकाळाचा विचार करताना त्यांनी असे म्हटले की 1980च्या पिढीसाठी मॅराडोना खरा हिरो होता, तर आजची पिढी लगेच मेस्सीचा उल्लेख करते.  मोदींनी मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्हा असलेल्या शहडोलला दिलेल्या  एका संस्मरणीय भेटीबद्दल सांगितले जिथे त्यांची फुटबॉलसाठी समर्पित असलेल्या समुदायाशी भेट झाली. त्यांनी तरुण खेळाडूंना भेटल्याच्या आठवणींना उजाळा दिला जे अभिमानाने त्यांच्या गावाला “मिनी ब्राझील” म्हणून संबोधत होते, हे नाव फुटबॉल परंपरेच्या चार पिढ्यांमुळे आणि जवळजवळ ८० राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंमुळे मिळवले गेले असे त्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की त्यांच्या वार्षिक फुटबॉल सामन्यांना जवळपासच्या गावांमधून 20,000 ते 25000 प्रेक्षक उपस्थित राहतात  . भारतातील फुटबॉलबद्दलच्या वाढत्या आवडीबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला आणि सांगितले की यामुळे केवळ उत्साह वाढत नाही तर खऱ्या संघभावनेला देखील बळकटी मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी ह्युस्टनमधील “हाउडी मोदी” रॅलीतील एका संस्मरणीय कार्यक्रमाची आठवण करून दिली, जिथे त्यांनी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमला संबोधित केले होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नम्रतेची प्रशंसा केली, मोदींच्या भाषणादरम्यान ते प्रेक्षकांमध्ये कसे बसले होते आणि नंतर त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये फिरण्यास सहमत झाले, ज्यामुळे परस्पर विश्वास आणि मजबूत बंधन दिसून आले, असे ते म्हणाले.   त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे धाडस आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली, प्रचारादरम्यान गोळी लागल्यानंतरही त्यांनी दाखवलेल्या निर्धाराची आठवण करून दिली.  मोदी यांनी व्हाईट हाऊसला दिलेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला. या भेटीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी औपचारिक शिष्टाचार तोडून त्यांना वैयक्तिकरित्या भेट दिली. त्यांनी ट्रम्प यांना अमेरिकन इतिहासाबद्दल असलेल्या गाढ आदराचा उल्लेख केला, कारण त्यांनी भूतकाळातील राष्ट्रपतींबद्दल आणि महत्त्वाच्या क्षणांबद्दल कोणतीही नोंद किंवा मदत न घेता तपशील सामायिक केला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्यातील मजबूत विश्वास आणि संवाद अबाधित राहिला यावर त्यांनी भर दिला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक उत्तम वाटाघाटीकार म्हणून संबोधल्याबद्दल त्यांनी ट्रम्प यांच्या नम्रतेचा  उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांचा वाटाघाटी दृष्टिकोन नेहमीच भारताच्या हितांना प्राधान्य देतो, आणि कोणालाही न दुखवता आपले म्हणणे सकारात्मकतेने मांडण्यास मदत करतो. त्यांनी यावर भर दिला की त्यांचे राष्ट्र हे त्यांचे सर्वोच्च नेतृत्व आहे आणि ते भारतातील लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीचा आदर करतात. अलिकडच्याच अमेरिकेच्या भेटीदरम्यान एलन मस्क, तुलसी गॅबार्ड, विवेक रामास्वामी आणि जेडी व्हान्स सारख्या व्यक्तींसोबत झालेल्या त्यांच्या फलदायी बैठकांवर प्रकाश टाकताना,   मोदींनी तेथील उबदार, कुटुंबासारख्या वातावरणाबद्दल सांगितले आणि एलोन मस्कशी असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन ओळखीबद्दल सांगितले. त्यांनी DOGE मोहिमेबद्दल मस्क यांच्या उत्साहाबद्दल आनंद व्यक्त केला आणि 2014  मध्ये पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनातील अकार्यक्षमता आणि हानिकारक पद्धती दूर करण्याच्या त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांशी समांतरता दर्शविली. पंतप्रधानांनी प्रशासकीय सुधारणांची उदाहरणे सांगितली, ज्यात कल्याणकारी योजनांमधून १० कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकणे समाविष्ट आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचले असे ते म्हणाले.  पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि मध्यस्थांना दूर करण्यासाठी त्यांनी थेट लाभ हस्तांतरण सुरू केले, ज्यामुळे जवळजवळ तीन लाख कोटी रुपये वाचले, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी सरकारी खरेदीसाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी GeM पोर्टल सुरू केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त, त्यांनी प्रशासन सुलभ करण्यासाठी 40,000 अनावश्यक अनुपालने काढून टाकली आणि 1,500 जुने कायदे काढून टाकले असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, या धाडसी बदलांमुळे भारत जागतिक चर्चेचा विषय बनला आहे, त्याचप्रमाणे DOGE सारख्या नाविन्यपूर्ण मोहिमांनी जगभरातील लक्ष वेधून घेतले आहे.

भारत आणि चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी एकमेकांकडून शिकण्याच्या आणि जागतिक कल्याणासाठी योगदान देण्याच्या त्यांच्या सामायिक इतिहासावर भर दिला. एकेकाळी भारत आणि चीन एकत्रितपणे जगाच्या जीडीपीमध्ये ५०% पेक्षा जास्त वाटा देत होते, जे दोन्ही देशांचे मोठे योगदान दर्शवते असे मोदी म्हणाले. त्यांनी खोल सांस्कृतिक संबंधांचा दाखला दिला ज्यामध्ये भारतात उगम पावलेल्या चीनमधील बौद्ध धर्माच्या खोल प्रभावाचा समावेश आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध टिकवून ठेवण्याचे आणि मजबूत करण्याचे महत्त्व   मोदी यांनी अधोरेखित केले. शेजाऱ्यांमध्ये मतभेद स्वाभाविक आहेत हे त्यांनी मान्य केले परंतु हे मतभेद वादात रूपांतरित होण्यापासून रोखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “दोन्ही राष्ट्रांना फायदा होईल असे स्थिर आणि सहकार्यात्मक संबंध निर्माण करण्यासाठी संवाद हा एक महत्त्वाचा घटक आहे”, असे ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या सीमा वादांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी २०२० मध्ये निर्माण झालेल्या तणावाची कबुली दिली परंतु अध्यक्ष शी यांच्याशी झालेल्या त्यांच्या अलीकडील भेटीमुळे सीमेवर परिस्थिती सामान्य झाली आहे असे नमूद केले. 2020 पूर्वीच्या पातळीवर परिस्थिती पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला आणि विश्वास, उत्साह आणि ऊर्जा हळूहळू परत येईल असा आशावाद व्यक्त केला. जागतिक स्थिरता आणि समृद्धीसाठी भारत आणि चीनमधील सहकार्य आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला, संघर्षाऐवजी निरोगी स्पर्धेचा त्यानी पुरस्कार केला. जागतिक तणावांवर बोलताना, पंतप्रधानांनी कोविड-१९ मधून मिळालेल्या धड्यांवर चिंतन केले, ज्यामुळे प्रत्येक राष्ट्राच्या मर्यादा उघड झाल्या आणि एकतेची गरज अधोरेखित झाली. शांततेकडे वाटचाल करण्याऐवजी जग अधिक विखुरले आहे, ज्यामुळे अनिश्चितता आणि संघर्ष वाढत आहेत, असे त्यांनी नमूद केले. सुधारणांचा अभाव आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे दुर्लक्ष यामुळे संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची असंबद्धता त्यांनी अधोरेखित केली.  मोदी यांनी संघर्षापासून सहकार्याकडे वळण्याचे आवाहन केले आणि विकास-केंद्रित दृष्टिकोनाला पुढे जाण्याचा मार्ग म्हणून समर्थन दिले. त्यांनी पुन्हा सांगितले की परस्पर जोडलेल्या आणि परस्परावलंबी जगात विस्तारवाद काम करणार नाही, राष्ट्रांनी एकमेकांना पाठिंबा देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जागतिक व्यासपीठांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी शांतता पुनर्संचयित होण्याची आशा व्यक्त केली. 2002च्या गुजरात दंगलींच्या विषयावर, मोदींनी त्यापूर्वीच्या निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाची सविस्तर माहिती दिली, ज्यामध्ये कंधहार अपहरण, लाल किल्ल्यावरील हल्ला आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांसह जागतिक आणि राष्ट्रीय संकटांच्या मालिका आदींचा समावेश आहे . त्यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून तणावपूर्ण वातावरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांवर भाष्य केले, ज्यामध्ये विनाशकारी भूकंपानंतर पुनर्वसनाचे निरीक्षण करणे आणि गोध्रा घटनेनंतरच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश होता. २००२ च्या दंगलींबद्दलच्या गैरसमजुतींचे निराकरण पंतप्रधानांनी केले, त्यांच्या कार्यकाळापूर्वी गुजरातमध्ये जातीय हिंसाचाराचा मोठा इतिहास होता हे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावर भर दिला की न्यायपालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि त्यांना पूर्णपणे निर्दोष ठरवले. 2002  पासून 22  वर्षे गुजरात शांततापूर्ण राहिला आहे, याचे श्रेय सर्वांसाठी विकास आणि सर्वांचा विश्वास यावर केंद्रित असलेल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनाला त्यांनी दिले. टीकेबद्दल बोलतानामोदी म्हणाले, “टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे”, त्यांनी प्रामाणिक, सुज्ञ टीकेचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे चांगले धोरण ठरवता येते असे त्यांचे मत आहे. तथापि, त्यांनी निराधार आरोपांच्या व्याप्तीबद्दल चिंता व्यक्त केली. हे आरोप रचनात्मक टीकेपेक्षा फार वेगळे असतात. “आरोपांमुळे कोणालाही फायदा होत नाही; ते फक्त अनावश्यक संघर्ष निर्माण करतात.” अशी त्यांनी टिप्पणी केली. पंतप्रधानांनी पत्रकारितेबद्दलचा आपला दृष्टिकोन मांडला आणि संतुलित दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. त्यांनी एकेकाळी सामायिक  केलेली एक उपमा सांगितली, ‘पत्रकारितेची तुलना मधमाशीशी केली’ जी अमृत गोळा करते आणि गोडवा पसरवते परंतु आवश्यकतेनुसार ती जोरदारपणे डंख देखील देखील मारू शकते. त्यांनी त्यांच्या सादृश्याच्या निवडक अर्थ लावण्याबद्दल निराशा व्यक्त केली, पत्रकारितेने सनसनाटीपेक्षा सत्य आणि रचनात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज यावर त्यांनी भर दिला.

राजकारणातील त्यांच्या व्यापक अनुभवाविषयी बोलताना,त्यांनी  संघटनात्मक कार्य, निवडणुकांचे व्यवस्थापन आणि रणनीती आखण्यावर  लक्ष केंद्रित केले होते असे सांगत, मोदी म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून, गुजरात आणि भारताच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि ते या पवित्र कर्तव्याचे पालन निष्ठापूर्वक  करण्यासाठी वचनबद्ध आहेत.जात, पंथ, श्रद्धा, संपत्ती किंवा विचारधारेवर आधारित भेदभाव न करता  आपल्या कल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करण्याच्या आपल्या सरकारच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.विश्वास बळकट करणे  हा त्यांच्या शासनाच्या  प्रारुपाचा आधारस्तंभ आहे, ज्यांना योजनांचा थेट लाभ मिळत नाही त्यांचा देखील भविष्यातील संधींचा समावेश होतो आणि त्यांनासुद्धा खात्री वाटते, त्यांनी यावेळी नमूद केले.“आपले शासन लोकांमध्ये रुजलेले आहे, मतदानाशी निगडीत नाही आणि ते नागरिकांच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे”,असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्र आणि तेथील लोकांचा आदर करण्याचा त्यांचा दृष्टीकोन दैवी आहे , असे सांगत  लोकांची सेवा करणाऱ्या एका समर्पित पुजाऱ्याच्या भूमिकेशी त्याचे साम्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपले कोणाशीही कसलेही हितसंबंध नाहीत यावर  जोर देत,ते म्हणाले की हे लक्षात घेतले पाहिजे की  त्यांचे कोणतेही मित्र किंवा नातेवाईक त्यांच्या पदाचा लाभ उठवण्यासाठी उभे रहात नाहीत तर ते सामान्य माणसाला अनुसरतात आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करतात. लाखो समर्पित स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांना श्रेय देत पंतप्रधानांनी जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा अभिमान व्यक्त केला.हे स्वयंसेवक भारत आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी समर्पित असून  या स्वयंसेवकांचा राजकारणात कोणताही वैयक्तिक सहभाग नसतो आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी ते सर्वत्र ओळखले जाते, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या पक्षावरील हा विश्वास निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून येतो, ज्याचे श्रेय ते लोकांच्या आशीर्वादाला आहे,असे मोदींनी अधोरेखित केले.

भारतात  निवडणुका होण्याच्या अतुलनीय पध्दतीबद्दल बोलताना,2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे उदाहरण देऊन,मोदींनी उत्तर अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक असे 98 कोटी नोंदणीकृत मतदार देशात  असल्याचे अधोरेखित केले.यापैकी 64.6 कोटी मतदारांनी तीव्र उन्हाची झळ सहन करत मतदान केले, असेही ते म्हणाले. भारतात 10 लाख मतदान केंद्रे आणि 2,500 पेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, जे आपल्या लोकशाहीचे प्रमाण दर्शवितात  असे त्यांनी नमूद केले. दुर्गम भागात मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर वापरून अगदी दुर्गम गावांमध्येही मतदान केंद्रे तयार केली जातात असे त्यांनी नमूद केले.अगदी गुजरातच्या गीर जंगलातही केवळ  एका मतदारासाठी मतदान केंद्र उभारले गेले याचा किस्सा सांगत,त्यांनी भारताची लोकशाहीशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली.  मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी जागतिक स्तरावर मापदंड स्थापन केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय निवडणूक आयोगाची प्रशंसा केली.राजकीय जागरुकता आणि व्यवस्थापनाच्या उत्कृष्टतेची प्रचंड क्षमता लक्षात घेता, भारतीय निवडणुकांच्या व्यवस्थापनाचा जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांनी आदर्श उदाहरण म्हणून अभ्यास केला पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

आपल्या नेतृत्वाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, की ते स्वत: ला पंतप्रधान म्हणून न ओळखता ” प्रधान सेवक” म्हणून ओळखतात, सेवा हे त्यांच्या कार्य नीतिमत्तेचे मार्गदर्शक तत्व आहे.सत्ता मिळवण्यापेक्षा उत्पादनक्षमता आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यावर त्यांचा भर आहे यावर त्यांनी जोर दिला.  “मी सत्तेचा खेळ खेळण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

एकाकीपणाच्या संकल्पनेविषयी बोलताना, पंतप्रधान म्हणाले की  ते कधीही एकाकीपण अनुभवत नाहीत, कारण ते स्वतःचे आणि सर्वशक्तिमानाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या “वन प्लस वन” च्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतात.देशाची आणि तेथील लोकांची सेवा करणे हे परमात्म्याची सेवा करण्यासारखेच आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.  साथीच्या काळात, दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रशासनाचे मॉडेल तयार करण्यात आणि 70 आणि त्याहून अधिक वयाच्या पक्ष स्वयंसेवकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून, त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यात ते व्यस्त असत,असेही ते म्हणाले.

आपल्या कठोर परिश्रमाचे रहस्य विचारल्यावर,मोदींनी सांगितले  की त्यांना याची  प्रेरणा त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या कठोर परिश्रमाचे निरीक्षण करण्यापासून मिळते, ज्यात शेतकरी, सैनिक, मजूर आणि माता यांचा समावेश आहे जे अथकपणे त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी स्वतः कष्ट करत असतात. “  माझ्या प्रेरणा डोळ्यासमोर दिसत असताना मला झोप कशी येईलमी आराम कसा करू शकतो? ” असे त्यांनी विचारले. त्यांच्या  नागरिकांनी त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांना सर्वोत्कृष्ट कार्य करण्यास प्रवृत्त करतात, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी त्यांच्या 2014 च्या मोहिमेदरम्यान दिलेल्या वचनांची आठवण करून दिली: देशासाठी कठोर परिश्रम करण्यात कधीही मागे सरु नका, कधीही वाईट हेतूने वागू नका आणि वैयक्तिक  लाभांसाठी कधीही काहीही करू नका, असे सांगत ते म्हणाले की त्यांनी 24 वर्षे सरकारचे प्रमुख म्हणून या मानकांचे पालन केले आहे.140 कोटी लोकांची सेवा करणे, त्यांच्या आशाआकांक्षाना  समजून घेणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे यातून त्यांना आपल्या कार्याबद्दल प्रेरणा मिळते असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “माझ्याकडून शक्य तितके काम करण्याचा मी नेहमीच निश्चय करतो, शक्य तितके कठोर परिश्रम करतो.आजही माझी उर्जा तशीच कायम आहे.”

ज्यांना सर्वोत्कृष्ट गणितज्ञ म्हणून नेहमी ओळखले जाते,त्या श्रीनिवास रामानुजन,यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करत  मोदींनी रामानुजन यांचे जीवनकार्य, विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात गहन संबंध असल्याचे भाष्य केले. रामानुजन यांच्या  गणिताच्या कल्पना ते  ज्या देवीची उपासना करत  त्या देवतेपासून प्रेरित होत असत असे  सांगत,त्यांनी अशा संकल्पना आध्यात्मिक अनुशासनातून उद्भवतात यावर भर दिला. “शिस्त ही केवळ कठोर परिश्रमापेक्षा जास्त महत्वाची आहेयाचा अर्थ एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे आणि त्यात स्वतःला इतके बुडवणे की तुम्ही तुमच्या कामाशी एकरूप व्हाल,” असे ते म्हणाले.ज्ञानाच्या विविध स्रोतांसाठी मन मोकळे असण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि हा मोकळेपणा नवीन संकल्पना सुचण्यास  प्रोत्साहन देते.त्यांनी माहिती आणि ज्ञान यांच्यातील फरकावर भर देत सांगितले  की, “काही लोक चुकीने माहिती आणि  ज्ञान यात गोंधळ करतात. ज्ञान  सखोल आहेप्रक्रिया समजून घेऊन ते हळूहळू विकसित होते.या दोन्हीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी हा फरक ओळखण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकांवर चर्चा करताना, त्यांच्या सध्याच्या भूमिकेपूर्वी भारतातील 85-90% जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलेला विस्तृत प्रवास मोदिंनी अधोरेखित केला.या अनुभवांमुळे त्यांना तळागाळातील वास्तवाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले यावर त्यांनी भर दिला.”माझ्याकडे माझे महत्त्व कमी करणारे किंवा मला विशिष्ट पद्धतीने वागण्यास भाग पाडणारे कोणतेही साधन  नाही.” असे ते म्हणाले.”माझा देश प्रथम” हे त्यांचे मार्गदर्शक तत्त्व आहे आणि निर्णय घेताना गरीब व्यक्तीचा चेहरा लक्षात घेण्याच्या महात्मा गांधींच्या विचारांपासून ते प्रेरणा घेतात.त्यांचे असंख्य आणि सक्रिय माहिती देणारे चॅनेल्स त्यांना वैविध्यपूर्ण दृष्टीकोन प्रदान करतात हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी त्यांच्या सुसंबद्ध प्रशासनावर प्रकाश टाकला.  “जेव्हा कोणीतरी मला माहिती देण्यासाठी येतो, तेव्हा तो माझ्या माहितीचा एकमेव स्रोत नसतो.” अशी टिप्पणी त्यांनी केली.विद्यार्थ्यासारखी मानसिकता टिकवून ठेवण्यावर, विद्यार्थ्यासारखे प्रश्न विचारणे आणि विविध कोनांतून समस्यांचे विश्लेषण करणे यासाठी दक्ष असावे यावरही त्यांनी भर दिला.कोविड-19 संकटादरम्यान मोदींनी त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया सामायिक केली, जिथे त्यांना जागतिक आर्थिक सिद्धांतांचे आंधळेपणाने  पालन न करता दबावाचा प्रतिकार  करावा लागला होता. ते  म्हणाले, “मी गरीबांना उपाशी झोपू देणार नाही.  मूलभूत दैनंदिन गरजांवर मी सामाजिक तणाव निर्माण होऊ देणार नाही.”संयम आणि शिस्तीत रुजलेल्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे भारतात तीव्र चलनवाढ टाळण्यास आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्यास मदत झाली यावर त्यांनी भर दिला.  “माझ्या देशासाठी, लोकांसाठी काही योग्य असेल तर मी जोखीम पत्करण्यास नेहमीच तयार आहे,” असे सांगून पंतप्रधानांनी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता अधोरेखित केली.त्याने आपल्या निर्णयांच्या  परीणामाची जबाबदारी आपल्याकडे ठेवण्यावर जोर दिला आणि ते म्हणाले, “काही चुकले तर मी दोष इतरांवर टाकत नाही.  मी उभा राहतो, जबाबदारी घेतो आणि निकालाची हमी घेत असतो.”  त्यांनी नमूद केले की हा दृष्टिकोन त्यांच्या कार्यासंबंधी सखोल वचनबद्धता वाढवतो आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करतो.  “माझ्याकडून चुका होऊ शकतात, पण मी वाईट हेतूने वागणार नाही”,असे सांगत ते पुढे म्हणाले की, नेहमी नियोजन केल्याप्रमाणे परिणाम होत नसले तरीही समाज त्याला त्याच्या प्रामाणिक हेतूंसाठी स्वीकारतोच.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकास हा मूलभूतपणे एक सहयोगी प्रयत्न आहे, कोणतेही राष्ट्र पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करू शकत नाही”,असे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या भूमिकेबद्दल विचारले असता  मोदींनी उत्तर दिले.  ते म्हणाले, “जग कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी  काहीही करत असले तरी ते भारताच्या सहभागाशिवाय अपूर्णच राहील.”  हे सांगताना त्यांनी विशिष्ट वापराच्या प्रकरणांसाठी,कृत्रिम बुद्धिमत्ता-चालित ऍप्लिकेशन्समधील भारताच्या सक्रिय कार्यावर आणि व्यापक प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी असलेल्या त्याच्या अद्वितीय बाजारपेठ-आधारित मॉडेलवर प्रकाश टाकला. “कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेद्वारे चालते, आकार देते आणि मार्गदर्शन करते आणि भारतातील तरुणांमध्ये खरी बुद्धिमत्ता विपुल प्रमाणात असते” असे नमूद करून त्यांनी भारतातील प्रचंड प्रतिभासंचय हे देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे नमूद केले.5G रोलआउटमध्ये भारताच्या वेगवान प्रगतीचे उदाहरण पंतप्रधानांनी सामायिक केले, ज्याने जगाच्या  अपेक्षा ओलांडल्या.  त्यांनी भारताच्या चांद्रयानसारख्या अवकाश मोहिमांच्या किफायतशीरतेवर प्रकाश टाकला, ज्याची किंमत हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा कमी आहे, ज्यातून भारताची कार्यक्षमता आणि नाविन्य दिसून येते. या यशांमुळे भारतीय प्रतिभेविषयी जगात  आदर निर्माण होतो आणि त्यातून भारताचा सुसंस्कृतपणा दिसून येतो,यावर त्यांनी भर दिला.भारताच्या समर्पण, नैतिकता आणि सहयोग या सांस्कृतिक मूल्यांना श्रेय देत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाच्या धुरिणांच्या यशाचे श्रेय  मोदींनी अधोरेखित केले.  “भारतात लहानाचे मोठे झालेले लोक, विशेषत: संयुक्त कुटुंबे आणि मुक्त समाजातील लोकांना, जटिल कार्ये आणि मोठ्या समूहांचे प्रभावीपणे नेतृत्व करणे सोपे वाटते,”अशी त्यांनी टिप्पणी केली, भारतीय व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमता आणि विश्लेषणात्मक विचारांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे ते जागतिक स्तरावरील स्पर्धेत यशस्वी होतात.   मानवाला बाजूला सारण्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या चिंतेवर लक्ष वेधताना पंतप्रधानांनी टिपणी केली की तंत्रज्ञान नेहमीच मानवतेच्या बरोबरीने प्रगत झाले आहे, मानवाने नेहमी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि एक पाऊल पुढे राहिले. ते म्हणाले, “मानवी कल्पनाशक्ती हे इंधन आहे.त्यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक गोष्टी तयार करू शकते, परंतु कोणतेही तंत्रज्ञान मानवी मेंदूची  अमर्याद सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीची जागा घेऊ शकत नाही.”  त्यांनी यावर जोर दिला की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांना मानव असण्याचा खरा अर्थ काय आहे यावर विचार करण्याचे आव्हान देते, एकमेकांची काळजी घेण्याची जन्मजात मानवी क्षमता अधोरेखित करते, ज्याची प्रतिकृती कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकत नाही.

शिक्षण, परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे यश या विषयांना स्पर्श करताना  मोदी म्हणाले की, समाजाची मानसिकता विद्यार्थ्यांवर अवाजवी दबाव टाकते, शाळा आणि कुटुंबे अनेकदा मार्कांनुसार यशाचे मोजमाप करतात. या मानसिकतेमुळे मुलांचे संपूर्ण आयुष्य 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर अवलंबून रहाते यावर त्यांनी भर दिला. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणात आणलेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला आणि परीक्षा पे चर्चा सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे ओझे हलके करण्यासाठी असलेली  आपली वचनबद्धता सामायिक केली.  “बरेच लोक शैक्षणिकदृष्ट्या उच्च गुण मिळवू शकत नाहीत, तरीही क्रिकेटमध्ये शतक ठोकू शकतात कारण तिथेच त्यांची खरी ताकद एकवटलेली असते

त्यांनी त्यांच्या शालेय दिवसातील किस्से सामायिक केले, नवनवीन शिकवण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला ज्यामुळे शिक्षण आनंददायी आणि परिणामकारक होते.  अशा तंत्रांचा नव्या शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.   मोदींनी विद्यार्थ्यांना प्रत्येक काम समर्पण आणि प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला दिला आणि  कौशल्ये विकसित करत आणि क्षमता वाढवत  यशाची दारे उघडली जातात, असे सांगितले. “तुम्हाला निश्चितच काही कार्यासाठी निर्धारित केले आहे.  तुमची कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला संधी मिळतील.”,असे तरुणांना निराश न होता  प्रोत्साहन देताना त्यांनी सांगितले.प्रेरणा आणि अर्थ मिळवून देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाला एका मोठ्या उद्देशाशी जोडण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.  तणाव आणि अडचणींना तोंड देताना, पंतप्रधानांनी पालकांना त्यांच्या मुलांचा स्टेटस सिम्बॉल म्हणून वापर करणे थांबवावे आणि आयुष्य केवळ परीक्षांपुरते नाही हे समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली तयारी करण्याचा, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला जाण्याचा सल्ला दिला. परीक्षेदरम्यान येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी वेळेचे पद्धतशीर व्यवस्थापन करत  नियमित सरावाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या अद्वितीय क्षमतेवर विश्वास ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले, विद्यार्थ्यांना स्वतःवर आणि यशस्वी होण्यासाठी त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केले.

प्रत्येक क्षणाला पूर्णपणे उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर देऊन पंतप्रधानांनी त्यांचा शिकण्याचा दृष्टिकोन देखील सामायिक केला. “जेव्हा मी कोणाला भेटतो तेव्हा त्या क्षणी मी तेथे पूर्णपणे उपस्थित असतो.  हे पूर्ण लक्ष मला नवीन संकल्पना त्वरीत समजून घेण्यास अनुमती देते,” असे त्यांनी नमूद केले. यामुळे मन तीक्ष्ण होते आणि शिकण्याची क्षमता सुधारते, म्हणून त्यांनी इतरांना ही सवय अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देत सरावाचे मूल्य ठळकपणे मांडले. “केवळ महान ड्रायव्हर्सच्या जीवन कथा वाचून तुम्ही ड्रायव्हिंगमध्ये प्रभुत्व मिळवू शकत नाही. तुम्ही चाकाच्या मागे जाऊन स्वतःचा रस्ता धरला पाहिजे,”असे ते म्हणाले.

मोदींनी मृत्यूच्या शाश्वतेविषयी  चिंतन केले आणि जीवनाला आलिंगन देण्याच्या महत्त्वावर भर दिला, जीवनात उद्देश बाळगत  समृद्ध करत  मृत्यूची भीती अपरिहार्य असल्याने त्यापासून दूर जाण्याचा सल्ला दिला. “तुमचे जीवन समृद्ध करत, उन्नतीसाठी वचनबद्ध रहा जेणेकरून मृत्यू दार ठोठावण्याआधी तुम्ही पूर्णपणे आणि ध्येयनिष्ठेने जीवन जगू शकाल.” असे त्यांनी नमूद केले.,

निराशावाद आणि नकारात्मकता हा आपल्या मानसिकतेचा भाग नाही असे सांगून पंतप्रधानांनी भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला. संकटांवर मात करण्यासाठी आणि संपूर्ण इतिहासात बदल स्वीकारण्यात मानवतेच्या लवचिकतेवर त्यांनी प्रकाश टाकला. “प्रत्येक युगात, बदलाच्या सतत वाहणाऱ्या प्रवाहाशी जुळवून घेणे मानवी स्वभावात आहे.”अशी  त्यांनी टिप्पणी केली.जेव्हा लोक कालबाह्य विचार पद्धतींपासून मुक्त होतात आणि परिवर्तन स्वीकारतात तेव्हा असाधारण प्रगतीच्या संभाव्यता जोर धरतात, असे त्यांनी सांगितले.

अध्यात्म, ध्यान आणि वैश्विक कल्याण या विषयांवर बोलताना, मोदींनी गायत्री मंत्राचे महत्त्व अधोरेखित केले आणि ते सूर्याच्या तेजस्वी शक्तीला समर्पित आध्यात्मिक ज्ञानासाठी एक शक्तिशाली साधन असल्याचे सांगितले.अनेक हिंदू मंत्र हे विज्ञान आणि निसर्गाशी खोलवर गुंफलेले आहेत, दररोज जप केल्यावर सखोल आणि चिरस्थायी लाभ मिळवून देतात, असे त्यांनी नमूद केले.ध्यान म्हणजे स्वतःला विचलित होण्यापासून मुक्त करणे आणि त्या क्षणासाठी उपस्थित राहणे यावर पंतप्रधानांनी भर दिला. एका ऋषींनी त्यांना एका वाडग्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांच्या लयबद्ध आवाजावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवले, हिमालय काळातील त्यांना आलेला एक अनुभव सांगितला,जिथे त्यांनी या प्रथेचे वर्णन “दैवी अनुनाद” असे केले ज्यामुळे त्यांना  एकाग्रता विकसित करण्यात आणि ध्यान  विकसित करण्यास मदत झाली.  हिंदू तत्त्वज्ञानावर चिंतन करताना, मोदींनी जीवनातील परस्परसंबंध आणि सार्वभौम कल्याणाच्या महत्त्वावर भर देणारे मंत्र उद्धृत केले. “हिंदू कधीही केवळ वैयक्तिक कल्याणावर लक्ष केंद्रित करत नाहीत.आम्ही सर्वांच्या कल्याणाची आणि समृद्धीची इच्छा करतो.”असे त्यांनी अधोरेखित केले.प्रत्येक हिंदू मंत्र शांततेच्या आवाहनाने संपतो, जीवनाचे सार आणि ऋषीमुनींच्या आध्यात्मिक पद्धतींचे ते प्रतीक आहे.आपल्याला  विचार मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भाषणाचा समारोप केला.या संभाषणामुळे त्यांनी जपून ठेवलेले, दीर्घकाळ चिंतन केलेले विचार मांडता आले याबद्दल आभार मानले.

***

JPS/S.Tupe/S.Kane/S.Chitnis/H.Kulkarni/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com