Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित


नवी दिल्‍ली, 11 मार्च 2025

 

मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना पंतप्रधान रामगोलम यांनी मॉरीशसच्या राष्ट्रीय दिन सोहोळ्यादरम्यान भारतीय पंतप्रधानांना ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडीयन ओशन (जी.सी.एस.के.) या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा केली. या असाधारण गौरवाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मॉरीशसच्या पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी मॉरीशसचे पंतप्रधान रामगोलम यांनी दर्शवलेला स्नेह तसेच मैत्रीबद्दल आणि दोन्ही देशांमधील चैतन्यपूर्ण आणि विशेष नाते मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.

मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांना त्यांनी आदरपूर्वक ओसीआय कार्ड सुपूर्द केले. मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या सामायिक ऐतिहासिक प्रवासाचा उल्लेख केला. मॉरिशसच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सर सीवूसागुर रामगुलाम, सर अनिरुद्ध जगन्नाथ, मणिलाल डॉक्टर आणि इतरांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे ही गोष्ट आपल्यासाठी सन्मानजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांच्या जनतेमधील घनिष्ठ संबंधांचा पाया असलेला सामायिक वारसा आणि कौटुंबिक संबंधांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या समुदायाने आपले सांस्कृतिक मूळ जपले आणि त्याची जोपासना केली, याबद्दल त्यांची प्रशंसा केली. हे बंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मॉरिशससाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, त्याद्वारे मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या सातव्या पिढीला ओसीआय कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. गिरमितिया वारसा जोपासण्यासाठी भारत अनेक उपक्रमांना पाठिंबा देईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

मॉरिशसचा घनिष्ठ विकास भागीदार होण्याचा भारताला बहुमान मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, भारत-मॉरिशस विशेष संबंधांनी भारताच्या सागर व्हिजन (SAGAR) आणि ग्लोबल साउथ बरोबरच्या संबंधांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. हवामान बदलाचे  सामायिक आव्हान हाताळण्याविषयी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि जागतिक जैवइंधन आघाडी या उपक्रमांमधील मॉरिशसच्या भागीदारीची प्रशंसा केली. या संदर्भात पंतप्रधानांनी ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमाचा उल्लेख केला , ज्याअंतर्गत त्यांनी आज सकाळी  ऐतिहासिक सर सीवूसागुर रामगुलाम बॉटनिक गार्डनमध्ये वृक्षारोपण केले.

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल:

कार्यक्रमात इंदिरा गांधी सेंटर फॉर इंडियन कल्चर (आयजीसीआयसी), महात्मा गांधी इन्स्टिट्यूट (एमजीआय) आणि अण्णा मेडिकल कॉलेजच्या कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

https://x.com/narendramodi/status/1899464844899921981

 

* * *

S.Kane/Sanjana/Rajeshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai