Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी साधला संवाद


 

जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदींशी मन:पूर्वक संवाद साधला. पंतप्रधानांनी यावेळी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व आणि महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.

जग आज महिला दिन साजरा करत आहे, मात्र आपल्या परंपरा आणि संस्कृतीमध्ये त्याची सुरुवात आईप्रती परम आदर व्यक्त करणाऱ्या मातृ देवो भवया वचनाने होते, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्यासाठी, वर्षाचा प्रत्येक दिवस मातृ देवो भवआहे, असेही ते म्हणाले.

लखपती दीदींपैकी एकीने शिवानी महिला मंडळासोबत काम करण्याचा आपला अनुभव सर्वांना सांगितला. हे महिला मंडळ सौराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असलेले मणीकाम (मोती भारत) करतात. या महिला मंडळाने 400 हून अधिक भगिनींना मणीकामाचे प्रशिक्षण दिले आहे, तर इतर भगिनी विक्री आणि हिशेब सांभाळतात, असे या भगिनीने सांगितले. पंतप्रधानांनी विचारले की विक्री व्यवहार सांभाळणारा चमु राज्याबाहेर प्रवास करतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या भगिनीने सांगितले की त्यांनी भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांना या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. दुसऱ्या सहभागीने 40,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या आणखी एक लखपती दीदी, पारुल बहन यांच्या यशावर प्रकाश टाकला आणि लखपती दीदींच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि आपण ही संख्या पाच कोटीवर नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी एका लखपती दीदीने 65 महिलांच्या सोबतीने मिश्री (खडीसाखर) पासून सरबत तयार करण्याच्या आपल्या उद्योग प्रवासाची माहिती दिली, ज्याची वार्षिक उलाढाल 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही तिने सांगितले. सरकारने दिलेल्या व्यासपीठामुळे आपल्याला असहाय्य महिलांना आधार देणे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देणे शक्य झाले आहे असे तिने सांगितले. त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी वाहने देखील घेतली आहेत, असे तिने आपल्या इतर प्रयत्नांबद्दल माहिती देताना सांगितले. आपण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पदाचे बिरुद न बाळगता अनेक लखपती दीदींच्या स्टॉलला भेट दिली होती असे पंतप्रधान म्हणाले आणि हे आपल्यासाठी सामान्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आपला अनुभव सांगताना आणखी एका लखपती दीदीने आश्वासन दिले की ती कठोर परिश्रम करून काही वर्षांत करोडपती होईल. आपल्याला यशाचा मार्ग दाखवल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. आपण सुमारे 2 लाख रुपये कमवत असल्याचे एका ड्रोन दीदीने आपल्या अनुभव कथनात सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एका महिलेबद्दल सांगितले जिला सायकलही चालवायची येत नाही पण ती ड्रोन पायलट आहे. महाराष्ट्रातील पुण्यात प्रशिक्षण घेतलेल्या या महिलेला तिचे नातेवाईक आणि मित्रपरिवार तिला पायलटम्हणून संबोधतात असे या भगिनीने पंतप्रधानांना सांगितले. आपल्याला ड्रोन दीदी बनण्याची आणि पर्यायाने आज लखपती दीदी बनण्याची संधी दिल्याबद्दल तिने पंतप्रधानांचे आभार मानले. ड्रोन दीदी आता प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य बनल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यानंतर पंतप्रधानांनी एका बँक सखीशी संवाद साधला जी दरमहा सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे काम करते. दुसऱ्या एका महिलेने इतर महिलांनाही तिच्यासारखी लखपती दीदी बनवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवसाय मॉडेलमध्ये प्रवेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांना त्यांचे उपक्रम अपग्रेड करण्यासाठी सरकारी मदत दिली जाईल याची हमी दिली. तळागाळातील अनेक महिला कमाई करत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. जगाला हे माहित असले पाहिजे की भारतीय महिला केवळ घरगुती कामांपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या एक महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या आर्थिक बळकटीत ग्रामीण महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. महिला तंत्रज्ञानाशी लवकर जुळवून घेतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तीन ते चार दिवसांत ड्रोन चालवायला शिकलेल्या आणि प्रामाणिकपणे सराव करणाऱ्या ड्रोन दीदींबाबतचा आपला अनुभव पंतप्रधानांनी सामायिक केला. भारतातील महिलांमध्ये संघर्ष करण्याची, निर्माण करण्याची, संगोपन करण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची अंतर्निहित शक्ती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या शक्तीचा देशाला मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

JPS/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com