Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमाला केले संबोधित


नवी दिल्‍ली, 6 मार्च 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते तिथल्या हिवाळी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांनी मुखवा येथील माता गंगेच्या हिवाळी बैठकीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना ही केली. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी माणा गावातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. या संकटकाळात संपूर्ण राष्ट्र त्यांच्या कुटुंबियांसोबत एकत्र उभे आहे, या सोबतीमुळे पिडीत कुटुंबांना प्रचंड बळ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. 

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडची भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रत आहे आणि चार धाम तसेच असंख्य पवित्र स्थळांनी ही भूमी पवित्र झाली आहे असे पंतप्रधान म्हणाले. हा प्रदेश जीवनदायिनी माता गंगेचे हिवाळी निवासस्थान असून, या भूमीला पुन्हा भेट देण्याची आणि येथील लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली, हा आपल्याला लाभलेला आशीर्वादच आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. माता गंगेच्या कृपेमुळेच आपल्याला अनेक दशकांपासून उत्तराखंडची  सेवा करण्याचे भाग्य मिळाले असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. माता गंगेच्या आशीर्वादानेच आपल्याला काशीला नेले, आणि आता मी त्या भागाची त्या़चा संसदेतील प्रतिनिधी म्हणून सेवा करतो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांनी काशी इथे केलेल्या, माता गंगेने आपल्याला बोलावणे धाडले होते या विधानाचेही श्रोत्यांना स्मरण करून दिले, आणि आता माता गंगेने आपला स्वतःच्या  मुलासारखा स्वीकार केला आहे याचा  साक्षात्कार आपल्याला झाला असल्याची अनुभुती पंतप्रधानांनी व्यक्त केली. आज आपल्याला मुखवा गावातील माता गंगेच्या माहेरी येण्याची मिळालेली संधी आणि मुखीमठ-मुखवाचे दर्शन घेण्याची मिळालेली संधी तसेच पूजा करण्याचा मिळालेला  मान म्हणजे माता गंगेचे तिच्या अपत्यावरच्या ममतेची आणि प्रेमाची  कृपा आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पंतप्रधानांनी त्यांनी हर्षीलच्या भूमीला दिलेल्या भेटी आणि त्यावेळी इथल्या महिलांनी आपल्याप्रती आपुलकीने व्यक्त केलेल्या ममत्वाच्या आठवणीही सांगितल्या. आपण या सगळ्यांना प्रेमाने दीदी-भुलिया म्हणून संबोधतो असे ते म्हणाले. या महिलांनी आपल्याला अगदी आठवणीने हर्षीलचे राजमा आणि इतर स्थानिक पदार्थ पाठविल्याची गोष्टही त्यांनी श्रोत्यांसोबत सामायिक केली. यावेळी पंतप्रधानांनी या महिलांमधील आपुलकीची भावना, त्यांच्यासोबत जडलेले नाते आणि त्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूंबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. 

यावेळी पंतप्रधानांनी बाबा केदारनाथ इथे दिलेल्या भेटीचेही स्मरण केले. या भेटीत आपण हे दशक उत्तराखंडचे दशक असेल असे भाकित केल्याची आठवण त्यांनी करून दिली. या शब्दांमागेही बाबा केदारनाथ यांचेच बळ होते आणि आता बाबा केदारनाथांच्याच आशीर्वादाने हे स्वप्न हळूहळू साकार होत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. उत्तराखंडच्या प्रगतीसाठी नवे मार्ग अवलंबले जात आहेत, यामुळे राज्याच्या निर्मिती मागच्या आकांक्षा पूर्णत्वाला जाऊ लागल्या आहेत, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली. उत्तराखंडच्या विकासासाठी व्यक्त केलेली वचनबद्धताआता सातत्यपूर्ण यश आणि नवनव्या यशस्वी टप्प्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, असे त्यांनी सांगितले. हिवाळी पर्यटन हा उपक्रम याच दिशेच्या वाटचालीला महत्वाचा टप्पा असून, यामुळे उत्तराखंडच्या आर्थिक क्षमतेचा पूरेपूर उपयोग करून घ्यायला मदत होईल असे त्यांनी अधोरेखित केले.  उत्तराखंड सरकारच्या या नावीन्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छाही  दिल्या.

पर्यटन क्षेत्राला वैविध्यपूर्ण स्वरूप देऊन तो संपूर्ण वर्षभरासाठीचा उपक्रम असणे हे उत्तराखंडसाठी अतिशय महत्वाचे आहे, उत्तराखंड मध्ये कोणताही मोसम हा पर्यटनाच्या दृष्टीने ऑफ सीझन अर्थात कमी गर्दीचा असता कामा नये आणि प्रत्येक मोसमात पर्यटन बहरले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.  सध्या या पहाडी क्षेत्रात पर्यटन केवळ काही मोसमासाठी मर्यादित झाले असून इथे पर्यटक मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र त्यांनतर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट होऊन हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे हिवाळ्यात ओस पडतात असे निदर्शनास येते. या असंतुलनामुळे  उत्तराखंडमध्ये वर्षभरातील एका मोठ्या कालखंडासाठी आर्थिक गती मंदावते आणि  पर्यावरणाच्या दृष्टीनेही आव्हाने निर्माण होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हिवाळ्यात उत्तराखंडला भेट दिल्यास या देवभूमीच्या दिव्यत्वाची अनुभूती घेता येते असे सांगून या प्रदेशातील हिवाळी पर्यटनामुळे ट्रेकिंग आणि स्कीइंगसारख्या उपक्रमांचा थरार  अनुभवता येतो, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यात होणाऱ्या अनेक अध्यात्मिक यात्रांना विशेष महत्व असून कित्येक पवित्र स्थळांवर या कालावधीत अतिशय  अनोखे विधी आयोजित केले जातात. या संदर्भात मुखवा या गावातील धार्मिक समारंभाचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले की या प्रदेशाचा अविभाज्य भाग असलेली ही एक प्राचीन आणि उल्लेखनीय परंपरा आहे. वर्षभराच्या पर्यटनासंबंधीच्या उत्तराखंड सरकारच्या  दूरदृष्टीमुळे लोकांना अनेक दिव्य अनुभवांची प्रचिती घेण्याची संधी मिळेल असे ते म्हणाले. या उपक्रमामुळे वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि विशेषतः स्थानिक आणि युवावर्गाला त्याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमचे केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार उत्तराखंडला एक विकसित राज्य बनवण्याच्या दृष्टीने एकजुटीने कार्यरत आहे, असे सांगून गेल्या दशकांत चारधाम साठी सर्व ऋतूंमध्ये कार्यरत असणाऱ्या मार्गाची निर्मिती ,आधुनिक द्रुतगती मार्ग आणि राज्यात रेल्वे, हवाई आणि हेलिकॉप्टर सेवांचा विस्तार यांसह करण्यात आलेल्या इतर सर्व लक्षणीय प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच केदारनाथ रोपवे प्रकल्प आणि हेमकुंड रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. केदारनाथ रोपवे मुळे 8-9 तासांचा प्रवासाचा कालावधी कमी होऊन केवळ 30 मिनिटांवर येईल, ज्यामुळे वयस्कर आणि लहान मुलांना ते अधिक सोईचे होईल, असे त्यांनी सांगितले. या रोपवे प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याचे ते म्हणाले. या परिवर्तनीय उपक्रमांबद्दल त्यांनी उत्तराखंडचे आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

या पहाडी भागात इको-लॉग हट्स, कन्व्हेन्शन सेंटर्स आणि हेलिपॅडच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की तिमर-सैन महादेव, माना गाव, आणि जाडुंग गाव येथे पर्यटनाशी निगडित पायाभूत सेवा सुविधा नव्याने उभारण्यात येत आहेत. पूर्वी 1962 मध्ये निर्मनुष्य झालेल्या  माना आणि जाडुंग गावांना त्यांचे गतवैभव मिळवून देण्यासाठी सरकारने काम केले आहे. या सर्वांचा परिमाण म्हणून गेल्या दशकभरात उत्तराखंड मध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. वर्ष 2014 पूर्वी दरवर्षी चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या 18 लाख होती जी आता दरवर्षी 50 लाख यात्रेकरू इतकी झाली आहे.  यावर्षीच्या अर्थसंकल्पात 50 पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी या ठिकाणांवरील हॉटेलांना पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. या सर्व पुढाकारामुळे पर्यटकांना सोईसुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तराखंडातील सीमावर्ती क्षेत्राला देखील पर्यटन क्षेत्रापासून लाभ मिळेल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “एकेकाळी “देशाच्या भूभागाच्या शेवटी असलेली गावे” असे संबोधली गेलेली गावे आता “देशाचा भूभाग ज्यांच्यापासून सुरु होतो अशी गावे” असे बिरूद मिरवत आहेत.” अशा गावांच्या विकासासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरु करण्यात आला हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाअंतर्गत या भागातील 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे. नेलाँग आणि जादुंग या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत याकडे निर्देश करून त्यांनी सदर कार्यक्रमात सुरवातीलाच जादुंगकडे जाणाऱ्या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्याचे  नमूद केले. येथे उभारण्यात येत असलेल्या होमस्टे इमारतींना मुद्रा योजनेंतर्गत लाभ मिळतील अशी घोषणा देखील त्यांनी केली. उत्तराखंड राज्यात होमस्टे पद्धतीला चालना देण्यावर येथील राज्य सरकारने अधिक भर दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कौतुक व्यक्त केले. कित्येक दशके पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या गावांमध्ये आता नवेनवे होमस्टे सुरु होताना दिसत आहेत आणि त्यातून पर्यटनाला चलना मिळण्याबरोबरच स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ देखील होत आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना, विशेषतः युवकांना विशेष आवाहन करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागात धुके अनुभवायला मिळते पण डोंगरांमध्ये मात्र उन्हे अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो आणि हा अत्यंत अनोखा अनुभव असतो. देशातील जनतेला हिवाळ्यात उत्तराखंडात येण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांनी गढवाली भाषेतील “घाम टापो पर्यटना”च्या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला. देवभूमी उत्तराखंडात एमआयसीई म्हणजेच बैठका, प्रोत्साहन,परिषदा आणि प्रदर्शन क्षेत्रासाठी असलेल्या अफाट क्षमतेवर अधिक भर देत त्यांनी कॉर्पोरेट विश्वाला या प्रदेशात बैठका, परिषदा तसेच प्रदर्शनांचे आयोजन करून हिवाळी पर्यटनात सहभागी होण्याचा विशेष आग्रह केला. उत्तराखंड हा प्रदेश येथे येणाऱ्या अभ्यागतांना योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून पुनर्सक्रीय तसेच पुनरुत्साहित करण्याच्या संधी उपलब्ध करून देतो असे मत त्यांनी नोंदवले. विद्यार्थ्यांच्या हिवाळी सहलींसाठी उत्तराखंड राज्याचा देखील विचार करण्याची विनंती त्यांनी विद्यापीठे, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना केली.

हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असलेल्या विवाहसंबंधित अर्थव्यवस्थेच्या लक्षणीय योगदानाकडे सर्वांचे लक्ष वेधत पंतप्रधानांनी “भारतात विवाह करा” या घोषणेद्वारे देशवासियांना केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि हिवाळ्यात नियोजित लग्नांसाठी विवाहस्थळ म्हणून उत्तराखंडला प्राधान्य देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. उत्तराखंड राज्याला “सर्वाधिक चित्रपट-स्नेही राज्य” अये नामाभिधान देण्यात आले आहे याचा आवर्जून उल्लेख करत भारतीय चित्रपटसृष्टीकडून देखील त्यांच्या खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात आधुनिक सुविधांच्या विकासाचे काम जलदगतीने होत आहे यावर अधिक भर देत पंतप्रधानांनी सांगितले की यामुळे उत्तराखंड राज्य हिवाळ्याच्या काळात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आदर्श स्थळ होणार आहे.

काही देशांमधील हिवाळी पर्यटनाची लोकप्रियता अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड राज्याला, स्वत:च्या हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवातून काही शिकता येईल. उत्तराखंड मधील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससह पर्यटन क्षेत्रातील सर्व भागधारकांनी या देशांच्या मॉडेलचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. उत्तराखंड सरकारने अशा अभ्यासातून मिळालेल्या कृतीयोग्य मुद्द्यांची सक्रीय अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. स्थानिक परंपरा, संगीत, नृत्य आणि पाककृती यांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. उत्तराखंड मधील हॉट स्प्रिंग्सना (गरम पाण्याचे झरे)  वेलनेस स्पामध्ये करता येईल, तसेच शांत, बर्फाच्छादित भागात हिवाळी योग शिबिरे आयोजित करता येतील, असे सांगून पंतप्रधानांनी योग गुरूंना दरवर्षी उत्तराखंडमध्ये योग शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले. उत्तराखंडची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हिवाळा विशेष वन्यजीव सफारी आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 360 डिग्री दृष्टिकोन अवलंबण्याची आणि प्रत्येक स्तरावर काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सुविधा विकसित करण्याबरोबरच जनजागृती करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटन उपक्रमाला चालना देण्यासाठी देशातील तरुण कंटेंट क्रिएटर्सनी (आशय युक्त साहित्य निर्माते) महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कंटेंट क्रिएटर्सच्या महत्वाच्या योगदानाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांना उत्तराखंडमधील नवीन ठिकाणांचा शोध घेऊन आपले अनुभव लोकांसमोर मांडण्याचे आवाहन केले. उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कंटेंट क्रिएटर्ससाठी लघुपट बनवण्याची स्पर्धा आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली. येत्या काही वर्षांत या क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास व्यक्त करून आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी उत्तराखंड सरकारचे वर्षभरातील पर्यटन मोहिमेबद्दल अभिनंदन केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय तामता यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

उत्तराखंड सरकारने यंदा हिवाळी पर्यटन कार्यक्रम सुरू केला आहे. यंदाच्या हिवाळ्यात गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थस्थळांना हजारो भाविकांनी भेट दिली. धार्मिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला, होमस्टे, आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

 

 

 

* * *

JPS/S.Tupe/Tushar/Bhakti/Sanjana/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai