Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  जहान -ए-खुसरो 2025 या सुफी संगीत महोत्सवाला उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  जहान -ए-खुसरो 2025 या सुफी संगीत महोत्सवाला उपस्थिती


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे आयोजित जहान -ए-खुसरो 2025 या सूफी संगीत महोत्सवाला उपस्थित राहिले.

जहान -ए-खुसरो मधील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की हजरत अमीर खुसरो यांच्या समृद्ध वारशाच्या अस्तित्वात प्रफुल्लित वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी नमूद केले की वसंत ऋतू जो खुसरोंना खूप आवडायचा , तो केवळ ऋतू नाही तर आज दिल्लीतील जहान -ए-खुसरोच्या वातावरणात देखील त्याचे अस्तित्व जाणवत आहे.

देशाच्या कला आणि संस्कृतीसाठी जहान -ए-खुसरो सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मोदी म्हणाले की ते महत्त्व आणि शांती दोन्ही प्रदान करतात. त्यांनी अधोरेखित केले की, 25 वर्षे पूर्ण करत असलेल्या या कार्यक्रमाने लोकांच्या हृदयात एक महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, जी एक मोठी उपलब्धी आहे असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी डॉ. करण सिंग, मुझफ्फर अली, मीरा अली आणि इतर सहकार्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी रुमी फाउंडेशन आणि जहान ए-खुसरोशी संबंधित सर्वांना भविष्यात असेच यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी, पंतप्रधानांनी लवकरच सुरु होणाऱ्या पवित्र रमजान महिन्या निमित्त सर्व उपस्थितांना आणि देशातील नागरिकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी महामहिम प्रिन्स करीम आगा खान यांच्या योगदानाचे स्मरण केले, ज्यांचे सुंदर नर्सरी वाढवण्यातील प्रयत्न लाखो कलाप्रेमींसाठी वरदान  ठरले आहेत.

पंतप्रधानांनी गुजरातच्या सुफी परंपरेत सरखेज रोजाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की, काही वर्षांपूर्वी या जागेची स्थिती अतिशय वाईट झाली  होती, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिच्या जीर्णोद्धारावर  लक्ष केंद्रित केले. पंतप्रधानांनी सरखेज रोजामध्ये भव्य कृष्ण उत्सवाचे आयोजन केले जायचे त्या काळाची आठवणही करून दिली, ज्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहायचे. आजही वातावरणात कृष्ण भक्तीचा रस आहे असे त्यांनी नमूद केले. “मी सरखेज रोजा येथे होणाऱ्या वार्षिक सूफी संगीत महोत्सवात नियमितपणे सहभागी होत असे,” असे मोदी म्हणाले. “सूफी संगीत एक सामायिक वारसा आहे जो जीवनातील सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणतो. नजर- ए – कृष्णाच्या सादरीकरणातूनही हा सामायिक सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित झाला”, असे  मोदी यांनी  सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, जहान -ए -खुसरो आयोजनात एक अनोखा सुगंध आहे, हा हिंदुस्थानच्या मातीचा सुगंध आहे. हजरत अमीर खुसरो यांनी भारताची तुलना स्वर्गाशी केली होती याची आठवण त्यांनी करून दिली, त्यांनी देशाचे वर्णन संस्कृतीची बाग असे केले होते जिथे संस्कृतीचा प्रत्येक पैलू बहरला  आहे. “भारताच्या मातीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा सूफी परंपरा येथे आली तेव्हा तिला या भूमीशी एक नाते असल्याचे जाणवले.  बाबा फरीद यांची  आध्यात्मिक शिकवण , हजरत निजामुद्दीनच्या मैफिलींमधून प्रज्वलित झालेले प्रेम आणि हजरत अमीर खुसरो यांच्या काव्यातून निर्माण झालेले नवीन रत्न, हे  एकत्रितपणे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सार आहेत “, असे  मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी भारतातील सूफी परंपरेच्या आगळ्या ओळखीवर भर दिला, जिथे सूफी संतांनी कुराणातील शिकवणीचा वैदिक तत्त्वे आणि भक्ती संगीताशी मेळ घातला. आपल्या सूफी गीतांच्या माध्यमातून विविधतेतील एकता व्यक्त करणारे हजरत निजामुद्दीन औलिया यांची त्यांनी प्रशंसा केली. “जहान-ए-खुसरो आता या समृद्ध, समावेशक परंपरेचे आधुनिक प्रतिबिंब बनले आहे”, पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोणत्याही देशाची सभ्यता आणि संस्कृतीला तेथील संगीत आणि गाण्यांमधून स्वतःचा आवाज मिळतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “जेव्हा सूफी आणि शास्त्रीय संगीत परंपरा एकत्र आल्या, तेव्हा त्यांनी प्रेम आणि भक्तीच्या नवीन अभिव्यक्तींना जन्म दिला, जे हजरत खुसरो यांच्या कव्वाली, बाबा फरीद यांचे श्लोक, आणि बुल्लेशाह, मीर, कबीर, रहीम आणि रास खान यांच्या कवितांमधून ते प्रकट होते. या संतांनी भक्तीला नवा आयाम दिला,” ते म्हणाले. कोणी सूरदास, रहीम, रस खान यांच्या कविता वाचल्या, किंवा हजरत खुसरो यांच्या कव्वाली ऐकल्या, तर या सर्व अभिव्यक्तींमुळे तोच अध्यात्मिक भाव जागा होतो, जिथे मानवी मर्यादा ओलांडल्या जातात आणि माणूस आणि परमेश्वर यांच्यातील एकरूपता जाणवते.

रस खान हे मुस्लीम असूनही भगवान श्रीकृष्णाचे निष्ठावान अनुयायी होते, त्यांच्या कवितेतून  प्रेम आणि भक्तीचे वैश्विक रूप प्रतिबिंबित होते. या कार्यक्रमातील भव्य सादरीकरणातून आध्यात्मिक प्रेमाची ही गहन भावना प्रतिबिंबित झाली”, पंतप्रधान मोदी म्हणाले.

सूफी परंपरेमुळे माणसा-माणसातील आध्यात्मिक अंतर तर कमी झालेच, पण त्याचबरोबर देशांमधील अंतरही कमी झाले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांनी 2015 साली अफगाणिस्तानच्या संसदेला दिलेल्या आपल्या भेटीची आठवण सांगितली, जिथे त्यांनी आठ शतकांपूर्वी अफगाणिस्तानातील बल्ख येथे जन्मलेल्या रूमी बद्दलचे आपले भाव व्यक्त केले होते. भौगोलिक सीमा ओलांडणारे रूमी यांचे विचार मोदी यांनी मांडले: “मी पूर्वेकडील नाही किंवा पश्चिमेकडीलही नाही, मी समुद्रातून जन्मलो नाही, की जमिनीतून जन्मलो नाही, मी एका जागी नाही, मी सर्वत्र आहे.” पंतप्रधानांनी या तत्त्वज्ञानाचा संबंध भारताच्या वसुधैव कुटुंबकम‘ ((जग एक कुटुंब आहे) या प्राचीन तत्वज्ञानाशी जोडला, ज्या विचारांनी त्यांना जागतिक कार्यक्रमांमधून बळ दिले. इराणमधील संयुक्त पत्रकार परिषदेत मिर्झा गालिब यांचे दोहे वाचल्याची आठवणही मोदी यांनी सांगितली, ज्यामधून भारताची वैश्विक आणि सर्वसमावेशक मूल्ये प्रतिबिंबित झाली.

तूती-ए-हिंदअशी ज्यांची ओळख आहे, त्या हजरत अमीर खुसरो यांच्याबद्दल पंतप्रधान बोलले. खुसरो यांनी आपल्या लेखनातून भारताच्या महानतेची आणि ऊर्जेची प्रशंसा केली, हे त्यांच्या नूह-सिफर या पुस्तकात दिसून येते, असे त्यांनी अधोरेखित केले. खुसरो आपल्या काळातील महान राष्ट्रांपेक्षा भारताला श्रेष्ठ मानत, आणि संस्कृतला जगातील सर्वोत्तम भाषा मानत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. खुसरो भारतीयांना जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान मानत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. “भारताने जगाला शून्य, गणित, विज्ञान आणि तत्त्वज्ञान दिले, विशेषतः  भारताचे गणित अरबांपर्यंत पोहोचले आणि “हिंदसा” म्हणून ओळखले जाऊ लागले, याचाही खुसरो यांना अभिमान होता,” पंतप्रधान मोदी म्हणाले. वसाहतवादी राजवटीचा प्रदीर्घ काळ आणि त्यानंतर झालेल्या विनाशानंतरही, भारताचा समृद्ध भूतकाळ जपण्यात आणि त्याचा वारसा जिवंत ठेवण्यात हजरत खुसरो यांच्या लेखनाचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले.

गेली 25 वर्षे भारताचा सांस्कृतिक वारसा यशस्वीपणे जोपासणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या जहान-ए-खुसरो या उपक्रमाबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. पाव शतक हा उपक्रम चालू ठेवणे, ही सामान्य गोष्ट नसल्याचे मोदी यांनी नमूद केले.

या सोहळ्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी

पंतप्रधान हे देशातील वैविध्यपूर्ण कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे मोठे पुरस्कर्ते आहेत. याच अनुषंगाने ते जहान-ए-खुसरो या सुफी संगीत, कविता आणि नृत्यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होत आहेत. आमीर खुसरो यांचा वारसा साजरा करण्यासाठी जगभरातील कलाकारांना या महोत्सवाने एकत्र आणले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुजफ्फर अली यांनी 2001 साली सुरू केलेल्या, तसेच रूमी फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाचा यंदा 25 वा वर्धापनदिन असून 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

***

S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com