नवी दिली 21 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या या भव्य सोहोळ्यात सर्व मराठी भाषिकांचे स्वागत केले. ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणतीही भाषा अथवा प्रदेशापुरते सीमित नाही. ते पुढे म्हणाले की या संमेलनात महाराष्ट्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सार तसेच सांस्कृतिक वारसा अंतर्भूत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 1878 मध्ये झालेल्या पहिल्या वर्षीच्या सोहोळ्यापासून आतापर्यंतच्या भारताच्या 147 वर्षांच्या वाटचालीचे हे संमेलन साक्षीदार आहे असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की महादेव गोविंद रानडे, हरि नारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, शिवराम परांजपे, वीर सावरकर यांसारख्या अनेक दिग्गजांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. अशा अभिमानास्पद परंपरेचा भाग होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल शरद पवारांचे आभार मानत पंतप्रधान मोदी यांनी देशभरातल्या तसेच जगभरातल्या सर्व मराठी रसिकांचे अभिनंदन केले.
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे याचा आवर्जून उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की जेव्हा ते मराठी भाषेबद्दल विचार करतात तेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या श्लोकांची आठवण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. संत ज्ञानेश्वरांचा एक श्लोक म्हणून दाखवत मोदी म्हणाले की मराठी भाषा अमृताहून मधुर आहे आणि म्हणूनच मराठी भाषा आणि संस्कृतीप्रती त्यांना अपरंपार प्रेम आणि आपुलकी वाटते. आपण या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक मराठी विद्वानांच्या इतका मराठीत पारंगत नाही असे सांगून पंतप्रधान नम्रतेने म्हणाले की मराठी भाषा शिकण्याचा त्यांचा निरंतर प्रयत्न असतो.
आपला देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशेवी वर्षपूर्ती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांतून निर्मिलेल्या आपल्या संविधानाची 75 वी वर्षपूर्ती यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होत असतानाच्या महत्त्वाच्या वेळी हे संमेलन होत आहे हे पंतप्रधानांनी ठळकपणे नमूद केले. एका शतकापूर्वी एका सुप्रसिध्द मराठी माणसाने महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) बीज रोवले या वास्तवाबद्दल अभिमान व्यक्त करून, या बीजाचा आता महावृक्ष झाला असून शताब्दी वर्ष साजरे करत आहे हे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या शंभर वर्षांत आरएसएसने अनेक सांस्कृतिक प्रयासांच्या माध्यमातून वेदांपासून विवेकानंदांपर्यंत चालत आलेली भारताची महान परंपरा आणि संस्कृती पुढे नेत नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे हे त्यांनी आवर्जून नमूद केले. इतर लाखो लोकांप्रमाणेच आरएसएसकडून देशासाठी जगण्याची प्रेरणा मिळणे हे आपले अहोभाग्य आहे असे मोदी यांनी सांगितले. आरएसएसच्या माध्यमातूनच आपल्याला मराठी भाषा आणि परंपरा यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळाली होती अशी पोचपावती त्यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला याचा ठळक उल्लेख करून ते म्हणाले की, भारत आणि जगभरातील 12 कोटींहून अधिक मराठी भाषिक कित्येक दशकांपासून या सन्मानाची प्रतीक्षा करत होते. हे कार्य तडीस नेण्याची संधी मिळणे हा मी माझ्या आयुष्यातील मोठा भाग्याचा क्षण समजतो असे त्यांनी सांगितले.
“भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर आपल्या संस्कृतीची वाहक आहे” असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. भाषा समाजात जन्माला येत असल्या तरी समाजाला आकार देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले. मराठीने महाराष्ट्र आणि देशातील अनेक व्यक्तींच्या विचारांना अभिव्यक्ती दिल्याने आपल्या सांस्कृतिक विकासात हातभार लागल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषेच्या महत्वाविषयी समर्थ रामदास जी यांच्या वचनांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “मराठी ही एक परिपूर्ण भाषा आहे, जी शौर्य, सौंदर्य, संवेदनशीलता, समानता, सुसंवाद, अध्यात्म आणि आधुनिकता यांचे प्रतीक आहे.” मराठीमध्ये भक्ती, शक्ती आणि विद्वत्तेचा मिलाफ असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा भारताला आध्यात्मिक उर्जेची आवश्यकता होती, तेव्हा महाराष्ट्राच्या महान संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून दिले याकडे मोदींनी लक्ष वेधले. मराठीतून भक्तिमार्गाद्वारे समाजाला नवीन दिशा दाखवणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गोरा कुंभार आणि बहिणाबाई यांच्या योगदानाची त्यांनी दखल घेतली. आधुनिक काळातील, गजानन दिगंबर माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
शतकानुशतके अत्याचाराच्या काळात, मराठी भाषा आक्रमकांपासून मुक्ततेची घोषणा बनली हे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांसारख्या मराठा योद्ध्यांच्या शौर्याचा उल्लेख केला, ज्यांनी त्यांच्या शत्रूंचा निडरपणे सामना केला. स्वातंत्र्यलढ्यात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांसारख्या योद्ध्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हलवल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यांच्या योगदानात त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. केसरी आणि मराठा यांसारख्या वर्तमानपत्रांनी, कवी गोविंदाग्रजांच्या स्फूर्तिदायक कविता आणि राम गणेश गडकरी यांच्या नाटकांनी राष्ट्रवादाची भावना जोपासली यावर मोदी यांनी प्रकाश टाकला. लोकमान्य टिळकांनी मराठीत गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला , ज्याने देशभरात नवीन ऊर्जा निर्माण केली, असे त्यांनी नमूद केले.
“मराठी भाषा आणि साहित्याने समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी सामाजिक मुक्ततेची कवाडे उघडली आहेत”, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान समाजसुधारकांच्या योगदानाचा उल्लेख केला, ज्यांनी मराठीत नवीन युगातील विचारसरणीची जोपासना केली. त्यांनी नमूद केले की मराठी भाषेने देशाला समृद्ध दलित साहित्य दिले आहे. आधुनिक विचारसरणीमुळे मराठी साहित्याने विज्ञानकथा देखील दिल्याचे त्यांनी सांगितले. भूतकाळात आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रात महाराष्ट्रातील लोकांच्या मोठ्या योगदानाची दखल घेत मोदी यांनी अधोरेखित केले की या संस्कृतीने नेहमीच नवीन कल्पना आणि प्रतिभेला वाव दिला आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली आहे. मुंबई केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईबद्दल बोलताना, चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय साहित्याची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेमा या दोन्हीचा स्तर उंचावला आहे असे मत त्यांनी मांडले. त्यांनी शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीद्वारे संभाजी महाराजांच्या शौर्याची ओळख करून देणाऱ्या ‘छावा‘ चित्रपटाला सध्या मिळणाऱ्या लोकप्रियतेचा उल्लेख केला.
कवी केशवसुत यांचे उदाहरण देत मोदी म्हणाले कि आपण जुन्या विचारांमध्ये कुंठित राहू शकत नाही कारण मानवी संस्कृती, विचार आणि भाषा सतत विकसित होत राहतात. त्यांनी अधोरेखित केले की भारत हा जगातील सर्वात जुन्या शाश्वत संस्कृतींपैकी एक आहे कारण तो सातत्याने विकसित झाला आहे, त्याने नवीन कल्पनांचा अंगीकार केला आहे आणि बदलांचे स्वागत केले आहे. भारताची विशाल भाषिक विविधता या उत्क्रांतीचा पुरावा आहे आणि एकतेचा मूलभूत आधार म्हणून काम करते हे निदर्शनास आणून देत, पंतप्रधानांनी नमूद केले की एक आई जशी भेदभाव न करता तिच्या मुलांना नवीन आणि अमाप ज्ञान देत असते तद्वत मराठी ही विविधतेचे द्योतक आहे.
भाषा प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक विकासाला सामावून घेते असेही त्यांनी सांगितले. मोदींनी नमूद केले की मराठीची उत्पत्ती संस्कृतमधून झाली आहे आणि त्यावर प्राकृत भाषेचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. मानवी भावभावनांना व्यापक करणाऱ्या महान विचारवंत आणि लेखकांच्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचाही उल्लेख केला. या ग्रंथातून टीळकांनी संस्कृत गीतेचा भावार्थ मराठी भाषेतून अधिक सुलभरित्या पोहोचवल्याची बाब अधोरेखित केली. संस्कृतमधील गीतेचे मराठी भाषांतर असलेली ज्ञानेश्वरी गीता ही आज अभ्यासक आणि संतांसाठी गीता समजून घेण्याचा एक मापदंड बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. इतर अनेक भाषांच्या योगदानामुळे मराठी ही अधिक समृद्ध भाषा झाली असून आजही या समृद्धतेत भर पडत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ‘आनंदमठ‘सारख्या ग्रंथांचे मराठीत भाषांतर करणारे भार्गवराम विठ्ठल वरेकर, पन्ना धाई, दुर्गावती आणि राणी पद्मिनी यांच्या जीवनावर आधारित विंदा करंदीकरांनी रचलेल्या साहित्य संपदेची उदाहरणे त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. भारतीय भाषांमध्ये कधीही परस्पर वैर नव्हते, त्या ऊलट भारतीय भाषांनी कायमच एकमेकांचा स्विकार करत परस्परांना समृद्ध केले असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषांमध्ये परस्पर सामायिक वारसा आहे, आणि वारशानेच देशात भाषेच्या नावाखाली फूट पाडण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखीत केली. भाषा समृद्ध करणे आणि ती आत्मसात करणे ही आपल्या सर्वांती जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली आणि भाषांबद्दलच्या कोणक्याही गैरसमजांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. आज देशातील प्रत्येक भाषांकडे मुख्य प्रवाहातील भाषा म्हणून लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात मराठीसह सर्वच प्रमुख भाषांमधून शिक्षण घेण्याला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी उल्लेख केला. आता महाराष्ट्रातील युवा वर्ग अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासह आपले उच्च शिक्षण मराठीतून घेऊ शकत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. आता केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे, असलेल्या प्रतिभांकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता बदलली आहे, ही बाबही त्यांनी आवर्जून नमूद केली.
साहित्य हे समाजासाठीचा आरसा आणि मार्गदर्शकही असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील साहित्य संमेलन आणि संबंधित संस्थांच्या भूमिका ही कायमच महत्वाची राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, आचार्य अत्रे आणि वीर सावरकर या महापुरुषांनी प्रस्थापित केलेले आदर्श, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुढे नेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनाच्या परंपरेला 2027 मध्ये 150 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी 100 व्या साहित्य संमेलनाचे आयोजन होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्या निमित्ताने होणार सोहळा खास करता यावा यासाठी सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले. समाज माध्यमांचा वापर करून मराठी साहित्याची सेवा करत असलेल्या असंख्य युवांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि त्यांच्यातील प्रतिभा हेरता यावी याकरता त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहीतही केले. यावेळी पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यासपीठांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या शिक्षणाला चालना देण्याच्या महत्त्व अधोरेखित केले आणि त्यादृष्टीने भाषिणी सारख्या उपक्रमांची उपयोगिताही उपस्थितीतांना सांगितली. युवा वर्गात मराठी भाषा आणि साहित्याशी संबंधित स्पर्धांचे आयोजन करायला हवे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. अशा प्रकारचे प्रयत्न आणि मराठी साहित्यापासून मिळणाऱ्या प्रेरणेमुळे 140 कोटी नागरिकांना विकसित भारताच्या जडणघडणीसाठी ऊर्जा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाच्या समारोपात पंतप्रधानांनी महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे आणि शिवराम परांजपे यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन करून, त्यांनी सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार शरद पवार, 98 व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते
पार्श्वभूमी
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या संमेलनात विविध चर्चासत्रे, पुस्तकांची प्रदर्शने, सांस्कृतिक सादरीकरण आणि साहित्यिकांसोबची संवाद सत्रे अशा विविधांगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याच्या कालातीत संदर्भाचा अनोखा सोहळा साजरा केला जाणार आहे. याच बरोबरीने या संमेलनाच्या निमित्ताने भाषा संवर्धन, अनुवाद आणि डिजिटलायझेशनचा साहित्यकृतींवर होणारा परिणाम या विषयांसह समकालीन घडामोडीतींल मराठी साहित्याच्या भूमिकेचाही वेध घेतला जाणार आहे.
तब्बल 71 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले आहे. यानिमित्ताने पुणे ते दिल्ली दरम्यान एक विशेष रेल्वे गाडीचा सोडण्यात आली असून त्यात साहित्यविषयक उपक्रम घेण्यात येत आहेत . यात एकूण 1,200 साहित्यरसिक सहभागी झाले असून, त्यातून साहित्याच्या एकात्मतेचे दर्शन घडते आहे. याअंतर्गत 2,600 पेक्षा जास्त कवितांचे सादरीकरण, 50 पुस्तकांचे प्रकाशन होणार आहेत. त्यासोबतच या गाडीत पुस्तकांची 100 दालनेही असणार आहेत. यात देशभरातील मान्यवर अभ्यासक,100 लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत
Addressing the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in New Delhi. https://t.co/AgVAi7GVGj
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2025
हमारी भाषा हमारी संस्कृति की संवाहक होती है: PM @narendramodi pic.twitter.com/UwwMwurkyN
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
मराठी एक सम्पूर्ण भाषा है। pic.twitter.com/ROhES7EjcX
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
महाराष्ट्र के कितने ही संतों ने भक्ति आंदोलन के जरिए मराठी भाषा में समाज को नई दिशा दिखाई: PM @narendramodi pic.twitter.com/WttQQLtz83
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
भारतीय भाषाओं में कभी कोई आपसी वैर नहीं रहा। pic.twitter.com/QeaFNFHQsd
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
***
JPS/N.Chitale/S.Chitnis/V.Joshi/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com