Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोल (SOUL) लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोल (SOUL) लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित येथे स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप (School of Ultimate Leadership – SOUL) कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे तसेच भविष्यातील उदयोन्मुख युवा नेत्यांचेही स्वागत केली. आपल्याला काही कार्यक्रम अतिशय आवडतात, आणि आजचा हा कार्यक्रम अशाच कार्यक्रमांपैकी एक असल्याचे ते म्हणाले.  राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत चांगल्या नागरिकांची जडणघडण गरजेची असते, त्याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणेही अत्यावश्यक असते असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणे ही आजच्या काळाची गरज असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. त्यामुळेच स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप सारखा उपक्रम हा विकसीत भारताच्या विकासाच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. सोल (SOUL) हे काही या संस्थेचे केवळ संक्षिप्त स्वरुपातील नाव नाही, तर या नावातून प्रतित होणारा आत्मा हा अर्थ, हा खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक जीवनाचाही आत्मा असणार असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. SOUL या शब्दांत अतिशह सुंदरपणे आध्यात्मिक अनुभवाचे सारही सामावलेली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी सोल सोबत जोडल्या गेलेल्या सर्व भागधारकांना शुभेच्छा दिल्या. लवकरच गुजरातमधील गिफ्ट सिटी इथे सोलचे एक नवे, विस्तीर्ण प्रांगण – संकुल उभारले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

आज सोल ही संस्था आपल्या वाटचालीतले  पहिले पाऊल टाकत आहेअशावेळी अशा संस्थांचे भविष्य घडवण्यात आपलीही भूमिका महत्वाची असणार आहे, ही बाब आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवयला हवी या जबाबदारीची जाणिवही पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. यादृष्टीने त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरणाही आपल्या संबोधनातून मांडले. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने, केवळ 100 प्रभावी आणि कार्यक्षम नेत्यांच्या मदतीने भारताला गुलामगिरीच्या कचाट्यातून मुक्त करायचे आणि देशाचा कायापालट करण्याचे ध्येय बाळगले होते. त्यांच्या याच उत्साहाला घेऊनच आता आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केले. एकविसाव्या शतकातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज देशाचा प्रत्येक नागरिक अहोरात्र झटत आहे, अशावेळी 140 कोटी इतकी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रासाठी सक्षम आणि सर्वोत्तम नेतृत्वाची गरज आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशीच्या माध्यमातून जगभरात राजकीय क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप सोडणाऱ्या नेतृत्वांची जडणघडण होईल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मानवी तसेच नैसर्गिक संसाधनांची भूमिका महत्वाची असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गुजरातमध्ये पुरेशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव असूनही, आपल्या मानवी भांडवलाच्या जोरावर गुजरात आघाडीवरचे राज्य म्हणून उदयाला आले असल्याचे उदाहरणही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून मांडले. मनुष्यबळात सर्वात मोठी क्षमता असल्याची बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखीत केली. नवोन्मेषाचे नेतृत्व करता येणे आणि उपलब्ध कौशल्यांचे उपयुक्त नियोजन करता येणे ही 21 व्या शतकाची मोठी गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून विविध क्षेत्रांमधले आवश्यक कौशल्यांचे वाढते महत्त्वही उपस्थितांच्या निदर्शनाला आणून दिले. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याच्यादृष्टीनेही सक्षम नेतृत्वाची जडणजघडण होणे गरजेचे आहे, आणि वैज्ञानिक तसेच नियोजनबद्ध दृष्टिकोनातूनच आपण यासाठीचा पाठपुरावा केला पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले. अशा प्रक्रियांमध्ये  सोल सारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, आणि या संस्थेने याच दिशेने प्रत्यक्षात काम सुरू केले असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाल्याची भावना त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सर्व राज्यांचे शिक्षण सचिव, राज्य प्रकल्प संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्याचीही माहितीही पंतप्रधानांनी दिली. याव्यतिरीक्त गुजरातमध्ये तिथल्या मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ही केवळ सुरुवात आहे आणि सोल या संस्थेने नेतृत्वांची जडणघडण करणारी

जगातील आघाडीची संस्था म्हणून स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली पाहीजे असा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी दिला.

भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सर्व क्षेत्रांमध्ये ही गती आणि वेग वाढविण्यासाठी जागतिक दर्जाचे नेते आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. SOUL सारख्या नेतृत्व क्षेत्रातील संस्थांच्या गेम चेंजर होण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकत त्यांनी सांगितले की अशा आंतरराष्ट्रीय संस्था केवळ एक पर्याय नसून  एक गरज आहेत. “जागतिक स्तरावर देशहिताला प्राधान्य देताना जागतिक गुंतागुंत आणि गरजांवर उपाय शोधू शकतील अशा ऊर्जावान  नेत्यांची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे”, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

या नेत्यांनी जागतिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे परंतु स्थानिक मानसिकता देखील  कायम ठेवली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. भारतीय मानसिकता आणि आंतरराष्ट्रीय मानसिकता दोन्ही समजून घेणाऱ्या आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास, समस्या व्यवस्थापनासाठी आणि भविष्यकालीन विचारसरणीसाठी सज्ज असलेल्या व्यक्ती तयार करण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आणि जागतिक संस्थांमध्ये स्पर्धा करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यवसायाची गतिशीलता समजून घेणारे नेते आवश्यक आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी पुढे सांगितले कीमोठ्या प्रमाणात आणि व्यापक स्वरूपात तसेच उच्च अपेक्षा असलेले नेते तयार करणे ही SOUL ची भूमिका आहे.

भविष्यातील नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित राहणार नाही, तर नेतृत्वाच्या भूमिकांसाठी नावीन्यपूर्णता आणि प्रभावातील क्षमतांची आवश्यकता असेल हे लक्षात ठेवण्याचा सल्ला   मोदी यांनी सर्वांना दिला.

या गरजेनुसार देशातील व्यक्तींनी कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की SOUL या व्यक्तींमध्ये गंभीर विचारसरणी, जोखीम पत्करण्याची आणि समाधान-चालित मानसिकता विकसित करेल. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही संस्था असे नेते निर्माण करेल जे मोठ्या  बदलां (Disruptive changes) मध्ये काम करण्यास तयार असतील.

केवळ ट्रेंड्सचे अनुसरण करण्याऐवजी ट्रेंड्स सेट करणारे नेते निर्माण करण्याची गरज यावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की, भारत राजनैतिक कूटनीतिपासून तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमापर्यंतच्या क्षेत्रात नवीन नेतृत्व विकसित करत असताना, देशाचा प्रभाव आणि प्राबल्य विविध क्षेत्रांमध्ये वाढेल.

भारताचा संपूर्ण दृष्टिकोन आणि भविष्य हे एका मजबूत नेतृत्व असलेल्या  पिढीवर अवलंबून आहे हे अधोरेखित करून,   मोदी यांनी जागतिक विचारसरणी आणि स्थानिक संस्कार यांची सांगड घालून पुढे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशासन आणि धोरणनिर्मिती जागतिक दर्जाची बनवण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, धोरणकर्ते, नोकरशहा आणि उद्योजक जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करून धोरणे आखतील तेव्हा हे साध्य होऊ शकते. SOUL सारख्या संस्था या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतील यावर त्यांनी भर दिला. विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये जलद प्रगतीची गरज असल्याचा पुनरुच्चार करताना,   मोदी यांनी धर्मग्रंथांचा उल्लेख केला ज्यामध्ये लोकांनी महान व्यक्तींच्या आचरणाचे अनुसरण करावे यावर भर दिला गेला आहे.  त्यांनी भारताच्या राष्ट्रीय दृष्टिकोनानुसार स्वतःला प्रतिबिंबित करणाऱ्या आणि आचरण करणाऱ्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. विकसित भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली ताकद आणि उत्साह निर्माण करणे हे SOUL चे उद्दिष्ट असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. मजबूत नेतृत्व स्थापित झाल्यानंतर आवश्यक बदल आणि सुधारणा स्वाभाविकपणे होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक धोरण आणि सामाजिक क्षेत्रात ताकद आणि उत्साह विकसित करण्याच्या गरजेवर भर देत, पंतप्रधानांनी डीप-टेक, अवकाश, बायोटेक आणि अक्षय ऊर्जा यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांसाठी नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

क्रीडा, कृषी, उत्पादन आणि सामाजिक सेवा यासारख्या पारंपारिक क्षेत्रांसाठी नेतृत्व निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारताने केवळ सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेची आकांक्षा बाळगली पाहिजे असे नाही तर ते साध्य देखील केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

जागतिक स्तरावरील उत्कृष्टतेच्या नवीन संस्था विकसित करू शकतील अशा नेत्यांची भारताला गरज आहे ” असे मत मोदी यांनी व्यक्त केले. भारताचा इतिहास अशा संस्थांच्या गौरवशाली कथांनी भरलेला आहे असे त्यांनी नमूद केले आणि त्या भावनेला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमध्ये अनेक महत्वपूर्ण व्यक्ती असल्याचा विश्वास व्यक्त करूनमोदी म्हणाले की ही संस्था त्यांच्या स्वप्नांसाठी आणि दृष्टिकोनासाठी एक प्रयोगशाळा ठरावी. आज घातला जाणारा पाया हा भावी पिढ्यांसाठी अभिमानाचा विषय असला पाहिजे, ज्या 25-50 वर्षांनंतर अभिमानाने ते लक्षात ठेऊ शकतील, यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी संस्थेला कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांची स्पष्ट समज असावी या गरजेवर भर दिला. आव्हाने आणि संधी दोन्ही सादर करणारे क्षेत्र आणि घटक चांगल्या प्रकारे परिभाषित केले पाहिजेत असे त्यांनी नमूद केले. “जेव्हा आपण एक समान ध्येय आणि सामूहिक प्रयत्नांसह पुढे जातो तेव्हा त्याचे परिणाम असाधारण असतात”, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यांनी सांगितले की, सामायिक उद्देशाने निर्माण झालेले बंधन रक्ताच्या बंधनापेक्षाही मजबूत असते, ते मनांना एकत्र आणते, ऊर्जेला  चालना देते आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहते. एक महत्त्वपूर्ण समान ध्येय आणि उद्देश नेतृत्व आणि संघभावना विकसित करण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी नमूद केले की ज्या व्यक्ती त्यांच्या ध्येयांसाठी स्वतःला समर्पित करतात, त्यांच्या सर्वोत्तम क्षमता बाहेर येतात. सामायिक उद्देश केवळ व्यक्तींमधील सर्वोत्तम गुण बाहेर आणत नाही तर मोठ्या उद्दिष्टानुसार त्यांच्या क्षमता वाढवतात यावर मोदी यांनी भर दिला. ही प्रक्रिया असे नेते विकसित करते जे उच्च पातळी गाठण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “सामायिक उद्देश संघभावनेची अभूतपूर्व जाणीव जोपासतो.” ते म्हणाले की जेव्हा लोक सामायिक उद्देशासह सहप्रवासी म्हणून एकत्र वाटचाल करतात तेव्हा त्यांच्यात एक मजबूत बंध विकसित होतो.संघ उभारणीची ही प्रक्रिया देखील नेतृत्व  उदयाला आणते असे त्यांनी ठळकपणे नमूद केले. सामायिक उद्देशाची संकल्पना उत्तमपणे स्पष्ट करणाऱ्या, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे उदाहरण देऊन ते म्हणाले की या संग्रामातून केवळ राजकारणातच नव्हे तर इतर क्षेत्रात देखील नेते उदयाला आले. स्वातंत्र्य चळवळीची उर्जा पुनरुज्जीवित करण्याच्या गरजेवर आणि प्रगती करण्यासाठी त्यातून प्रेरणा घेण्यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.

एक संस्कृत श्लोक उद्धृत करत पंतप्रधानांनी, असा कोणताही शब्द नाही जो मंत्रात परिवर्तीत होऊ शकत नाही, अशी कोणतीही वनस्पती नाही जी औषधाचे काम करू शकत नाही तसेच असा  कोणताही मनुष्य नाही जो कोणतेच काम करण्यास सक्षम नाही हे सांगण्यावर अधिक भर दिला. नियोजकाने व्यक्तींचा योग्य पद्धतीने वापर करून घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. एसओयुएल ही संस्था अशा नियोजकाची भूमिका निभावेल अशी टिप्पणी त्यांनी केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी त्यांची नेतृत्वविषयक कौशल्ये शिकून घेतली आहेत आणि या कौशल्यांसाठी त्यांचा सन्मान देखील झाला आहे. स्वयं-विकासाच्या माध्यमातून वैयक्तिक यश, संघ विकासाच्या माध्यमातून संघटनात्मक विकास आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून अभूतपूर्व वाढ अशा विकासाच्या विविध पातळ्यांवर भर देणारे वचन मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की या तत्वांनी प्रत्येकाला त्याची कर्तव्ये आणि योगदानाची आठवण करून दिली पाहिजे.

21 व्या शतकात तसेच गेल्या शतकात जन्मलेल्या युवकांकडून देशात आकाराला येत असलेल्या नव्या सामाजिक व्यवस्थेच्या स्थापनेवर अधिक भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की ही पिढी खऱ्या अर्थाने भारतातील पहिली विकसित पिढी आहे आणि तिला “अमृत पिढी” म्हणता येईल. या “अमृत पिढी”चे नेतृत्व घडवण्यात एसओयुएल ही नवी संस्था महत्त्वाची भुमिका निभावेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी संस्थेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या.

भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोब्ग्ये, एसओयुएल मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि उपाध्यक्ष हसमुख अढिया यांची या कार्यक्रमात बीजभाषणे झाली. इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोब्ग्ये भूतानच्या राजांच्या जन्मदिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी, उपरोल्लेखित कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले.

पार्श्वभूमी

दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी या कालावधीत होणारी ही दोन दिवसीय एसओयुएल लीडरशिप कॉन्क्लेव्ह राजकारण, क्रीडा, कला आणि माध्यमे, अध्यात्मिक विश्व, सार्वजनिक नीती, व्यापार आणि सामाजिक क्षेत्र अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये कार्यरत प्रमुख व्यक्तींना ज्यावर आपापला प्रेरणादायी जीवन प्रवास सामायिक करता येईल आणि नेतृत्वाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करता येईल असा एक प्रमुख मंच म्हणून कार्य करेल. तरुण समुदायाला प्रेरित करण्याच्या दृष्टीने ही परिषद यश आणि अपयश अशा दोन्हीतून शिकवण मिळवणे सुलभ करत सहयोग आणि विचारी नेतृत्वाच्या परिसंस्थेची जोपासना करेल.

स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप ही गुजरातमध्ये उदयाला येत असलेली नेतृत्वविषयक संस्था प्रामाणिक नेत्यांना सार्वजनिक हितात वाढ करण्यास सक्षम करेल. औपचारिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतातील राजकीय नेतृत्वाच्या परिदृष्याचा विस्तार करणे तसेच केवळ राजकीय वंशावळीचा वापर करणाऱ्या नव्हे तर गुणवत्ता, बांधिलकी आणि लोकसेवेची आवड यांच्या जोरावर पुढे येणाऱ्यांना यामध्ये समाविष्ट करून घेणे हा या संस्थेचा उद्देश आहे. आजच्या जगात नेतृत्वासंदर्भात उभ्या राहणाऱ्या गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गरजेचे ठरणारे विचार, कौशल्ये आणि नैपुण्य देण्याचे कार्य एसओयुएल ही संस्था करते.

***

JPS/S.Tupe/N.Chitale/T.Pawar/H.Kulkarni/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com