पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2025 या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी भारत टेक्स 2025 या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व असून, भारत मंडपम हा यंदाच्या पर्वाचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारशाचे दर्शन तर घडलेच, आणि त्याच वेळी विकसित भारताच्या भवितव्याची झलकही पाहायला मिळली, आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारत टेक्स आता भव्य स्वरुपातील जागतिक वस्त्रोद्योग सोहळा झाला असल्याच्या शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. मूल्यसाखळीच्या परिघाशी जोडलेल्या सर्व बारा घटकांचे प्रतिनिधी यंदाच्या उपक्रमात सहभागी झाले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या निमित्ताने उपयुक्त पुरक साधने , कपडे, यंत्रसामुग्री, रसायने आणि कापडांसाठीचे रंग या आणि अशा इतर घटकांचे प्रदर्शन भरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत टेक्स हा उपक्रम जगभरातील धोरणकर्ते, या उद्योग क्षेत्रातील अग्रणी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
भारत टेक्स उपक्रमाच्या यावर्षीच्या पर्वात 120 पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत. याचाच अर्थ इथे आलेल्या प्रत्येक प्रदर्शकाला या क्षेत्राशी संबंधित 120 देशांमधली माहिती मिळणार आहे. आणि यामुळे त्यांना आपला व्यवसाय स्थानिक पातळीसह जागतिक पातळीवर विस्तारण्याची संधी मिळाली आहे ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखीत केली. आज या उपक्रमाच्या निमित्ताने नव्या बाजारपेठेच्या शोधात असलेल्या असंख्य उद्योजकांना जगभरातील विविध बाजारपेठांच्या सांस्कृतिक गरजांविषयी उपयुक्त माहिती मिळू शकते आहे हे देखील त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाला दिलेल्या भेटीचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनात केला. आपण प्रदर्शनातील अनेक दालनांना भेट दिली आणि उद्योजकांशीही संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी आपल्याला त्यांचा मागच्या वर्षी झालेल्या भारत टेक्स उपक्रमातील सहभागाचे अनुभव सांगितले. या उपक्रमामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात नवे खरेदीदार मिळवता आले, आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करता आल्याचे अनुभव त्यांनी आपल्यासोबत सामायिक केल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले. या उपक्रमामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणूक, निर्यात आणि या क्षेत्राच्या एकूण विकासालाच चालना मिळत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी बँकिंग क्षेत्राने त्यांना सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. यामुळे या उद्योजकांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकेल आणि समांतरपणे रोजगारासह नव्या संधीही निर्माण होऊ शकतील असे ते म्हणाले.
भारत टेक्स या उपक्रमाअंतर्गत भारताच्या पारंपारिक वस्त्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडत असल्याची बाबही पंतप्रधानांनी नमूद केली. देशाच्या पूर्वेकडील क्षेत्रापासून ते पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत भारतात पारंपारिक वेशभूषांचे असंख्य प्रकार आढळतात अशी माहिती त्यांनी दिली. लखनवी चिकनकरी, राजस्थान आणि गुजरातमधील बांधणी, गुजरातमधील पटोला, वाराणसीचे बनारसी रेशीम, दक्षिणेतील कांजीवरम रेशीम आणि जम्मू-काश्मीरमधील पश्मिना अशा विविध प्रकारच्या वस्त्रांच्या प्रकारांचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनात केला. आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविधता आणि या क्षेत्राच्या जगावेगळ्या वैशिष्ट्यांचा प्रचार प्रसार व्हावा तसेच या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने असे उपक्रम आयोजित करण्याची हीच योग्य वेळ असल्याची बाबही पंतप्रधानांनी अधोरेखीत केले.
या उपक्रमाच्या मागच्या वर्षी झालेल्या पर्वात आपण वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधीत farm, fiber, fabric, fashion, and foreign (शेती, वस्त्रतंतू, कापड, फॅशन आणि परदेश) अशा पाच घटकांबाबत चर्चा केल्याचे स्मरण पंतप्रधानांनी करून दिले. त्यावेळी आपण मांडलेला दृष्टीकोन आता भारतासाठी एक अभियानाचे रुप घेऊ लागला आहे, आणि यामुळे शेतकरी, विणकर, वस्त्र रचना कलाकार (designers) आणि व्यापाऱ्यांसाठी विकासाचे नवे मार्ग खुले करू लागले आहे असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात भारताची कापड आणि तयार पोषाखांची निर्यात 7% ने वाढली, आणि आज भारत कापड आणि तयार पोषाखांचा जगातील सहाव्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारताची कापड निर्यात 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 9 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे हे यश म्हणजे केंद्र सरकारने गेले दशकभर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि त्यादृष्टीने राबवलेल्या धोरणांचे फलित आहे असे पंतप्रधान म्हणाले. यामुळेच गेल्या दशकभरात वस्त्रोद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणूकही दुपटीने वाढली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
“वस्त्रोद्योग हा देशातील रोजगाराच्या संधी पुरवणाऱ्या सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे आणि हा उद्योग भारताच्या उत्पादन क्षेत्रात 11% योगदान देतो,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या मिशन मॅन्युफॅक्चरिंगकडेही लक्ष वेधले. या क्षेत्रातील गुंतवणूक आणि वाढ कोट्यवधी वस्त्रोद्योगातील कामगारांना लाभदायक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदी यांनी स्पष्ट केले की, भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील आव्हाने सोडवणे आणि त्याची क्षमता साकार करणे हा आपला संकल्प आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दशकभरातील प्रयत्न आणि धोरणे या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित होत आहेत. भारतीय कापसाचा पुरवठा स्थिर राहावा, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनावा आणि मूल्यसाखळी मजबूत होण्यासाठी ‘मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी‘ ची घोषणा करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सांगितले की, तांत्रिक वस्त्रोद्योगासारख्या नव्या क्षेत्रांवर आणि स्वदेशी कार्बन फायबर व त्याच्या उत्पादनांना चालना देण्यावर भर दिला जात आहे. त्यांनी नमूद केले की, भारत उच्च-गुणवत्तेच्या कार्बन फायबरच्या उत्पादनाकडे प्रगती करत आहे. याशिवाय, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये एमएसएमई वर्गीकरण निकषांचा विस्तार आणि वाढीव पतपुरवठा यावर भर देण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एमएसएमई क्षेत्राचा 80% वाटा वस्त्रोद्योग उद्योगात असल्यामुळे, या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
“कोणतेही क्षेत्र कुशल कार्यक्षम मनुष्यबळाने उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करत असते आणि वस्त्रोद्योगात कौशल्य फार महत्त्वाचे ठरते,” असे सांगत मोदी यांनी कौशल्यपूर्ण प्रतिभाशाली मनुष्यबळ तयार करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला.
त्यांनी नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंगच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले आणि ‘समर्थ‘ योजनेच्या मदतीने मूल्यसाखळीसाठी आवश्यक कौशल्यविकास घडवून आणला जात असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या युगात हातमाग कारागिरीची विश्वासार्हता टिकवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी हातमाग कारागिरांच्या कौशल्य वृद्धीसाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले. “गेल्या 10 वर्षांत 2400 हून अधिक मोठ्या विपणन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जे हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी ‘इंडिया-हँड-मेड‘ या ई-कॉमर्स व्यासपीठाच्या निर्मितीचा उल्लेख केला, जो हातमाग उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीस चालना देतो आणि हजारो हातमाग ब्रँड्स त्यावर नोंदणी करत आहेत. हातमाग उत्पादनांसाठी जीआय टॅगिंगच्या महत्त्वपूर्ण फायद्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘भारत टेक्स‘ कार्यक्रमात ‘टेक्सटाईल स्टार्टअप ग्रँड चॅलेंज‘ सुरू करण्यात आल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, या क्षेत्रासाठी तरुणांकडून नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना मागवण्यात आल्या होत्या. देशभरातील तरुणांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला आणि विजेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या तरुण नवकल्पकांना पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या स्टार्टअप्सनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आयआयटी मद्रास, अटल इनोव्हेशन मिशन आणि अनेक मोठ्या खाजगी वस्त्रोद्योग संस्थांच्या पाठिंब्यामुळे या ‘पिच फेस्ट‘ला चालना मिळेल आणि स्टार्टअप संस्कृतीला बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी तरुणांना नवीन तंत्रज्ञानाधारित वस्त्रोद्योग स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांवर काम करण्याचे आवाहन केले. वस्त्रोद्योगाने आयआयटी सारख्या संस्थांसोबत सहयोग करून नवी साधने विकसित करावी, अशी त्यांनी सूचना केली. त्यांनी सांगितले की, नव्या पिढीला पारंपरिक पोशाखांबद्दल वाढती आवड निर्माण होत आहे आणि त्यामुळे परंपरा आणि नाविन्याचा समन्वय साधून उत्पादने तयार करणे आवश्यक आहे, जे जागतिक स्तरावर तरुण पिढीला आकर्षित करतील.
पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन ट्रेंड शोधणे आणि नवे स्टाईल्स विकसित करण्याच्या भूमिकेवर भर दिला, ज्यामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पारंपरिक खादीला प्रोत्साहन देतानाच, फॅशन प्रवाहांचा एआय च्या मदतीने अभ्यास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पोरबंदर येथे खादी उत्पादनांचा फॅशन शो आयोजित केला होता, याची आठवण करून दिली. मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व पटवून दिले आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळात “राष्ट्रासाठी खादी” हे ब्रीद होते, मात्र आता “फॅशनसाठी खादी” असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या पॅरिस भेटीबाबत देखील सांगितले. कारण पॅरिस हे जगातील फॅशन राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांदरम्यान विविध विषयांवर महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली तसेच शाश्वत जीवनशैलीच्या महत्त्वाविषयी जागतिक पातळीवर समज वाढत आहे, ज्याचा परिणाम फॅशन जगतावरही होत आहे, असे ही त्यांनी शेवटी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, “जग पर्यावरण आणि सक्षमीकरणासाठी फॅशन या दृष्टिकोनाचा स्वीकार करत आहे आणि भारत या संदर्भात जगाला मार्गदर्शन करू शकतो.” त्यांनी सांगितले की, टिकाऊपणा हा भारतीय वस्त्रपरंपरेचा अविभाज्य भाग राहिला आहे. याचे उत्तम उदाहरणे म्हणजे खादी, आदिवासी वस्त्र आणि नैसर्गिक रंगांचा वापर. भारताच्या पारंपरिक टिकाऊ तंत्रांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम केले जात आहे. याचा लाभ कारागीर, विणकर आणि या उद्योगाशी संबंधित लाखो महिलांना होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी वस्त्र उद्योगात संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग व कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी `फास्ट फॅशन वेस्ट` या समस्येचा उल्लेख केला. बदलता कल –`ट्रेंड`मुळे दर महिन्याला कोट्यवधी कपडे टाकून दिले जातात. यामुळे पर्यावरणीय आणि परिसंस्थेवर मोठे परिणाम होतात. त्यांनी सांगितले की, 2030 पर्यंत फॅशन कचरा 148 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकतो. सध्या फक्त एक चतुर्थांश वस्त्र कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो . मोदी यांनी नमूद केले की, भारताचा वस्त्र उद्योग या समस्येला संधीमध्ये बदलू शकतो आणि कपडे पुनर्वापर व पुनःचक्रणासाठी भारतातील विविध पारंपरिक कौशल्यांचा लाभ घेऊ शकतो. त्यांनी उदाहरणे दिली की, जुन्या किंवा उरलेल्या कापडांपासून चटया, गालिचे आणि कव्हर्स तयार केले जाते. तसेच महाराष्ट्रात जुने तसेच फाटलेले कपडे वापरून उत्कृष्ट गोधड्या तयार केल्या जातात. त्यांनी स्पष्ट केले की, या पारंपरिक कला नवकल्पनांच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत संधी निर्माण करू शकतात.
पंतप्रधानांनी सांगितले की, वस्त्रोद्योग मंत्रालयाने सार्वजनिक उद्योगांची स्थायी परिषद (एससीओपीइ) आणि ई-मार्केटप्लेस सोबत एक सामंजस्य करार केला आहे. यामुळे पुनर्वापर आणि पुन:चक्रणाला चालना मिळेल. अनेक पुनर्वापर करणारे यापूर्वीच नोंदणीकृत झाले आहेत. नवी मुंबई आणि बंगळुरू येथे घराघरातून वस्त्रकचऱ्याचे संकलन करण्यासाठी पथदर्शक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी स्टार्टअपला या उपक्रमात सहभागी होण्याचे, संधी शोधण्याचे आणि जागतिक बाजारात नेतृत्व मिळवण्यासाठी लवकर पावले उचलण्याचे आवाहन केले. त्यांनी अंदाज वर्तवला की, भारताचा वस्त्र पुनर्वापर बाजार पुढील काही वर्षांत 400 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, तर जागतिक पुनर्वापर आधारित वस्त्र बाजारपेठ 7.5 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यांनी सांगितले की, योग्य दिशेने प्रयत्न केल्यास भारत या बाजारात मोठा वाटा मिळवू शकतो.
मोदी यांनी सांगितले की, शतकांपूर्वी जेव्हा भारत समृद्धीच्या शिखरावर होता, तेव्हा वस्त्र उद्योगाने त्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांनी स्पष्ट केले की `विकसित भारत` हा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत असताना वस्त्र क्षेत्र पुन्हा एक महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी नमूद केले की, `भारत टेक्स` यांसारखे कार्यक्रम भारताच्या या क्षेत्रातील स्थानाला अधिक बळकट करत आहेत. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना विश्वास व्यक्त केला की, हा कार्यक्रम दरवर्षी यशाची नवी शिखरे गाठेल आणि नवीन विक्रम रचेल. या प्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि राज्यमंत्री पबित्रा मार्घेरिटा तसेच अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी- `भारत टेक्स 2025` हा एक भव्य जागतिक कार्यक्रम आहे, जो 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान भारत मंडपम येथे आयोजित केला जात आहे. सहाय्यक साधनांचा समावेश असलेल्या कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनांपर्यंत संपूर्ण वस्त्र मूल्य साखळीला एकाच छताखाली आणणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
`भारत टेक्स` हे वस्त्र उद्योगाचे सर्वात मोठे आणि व्यापक व्यासपीठ आहे. यामध्ये दोन स्थळांवर भव्य प्रदर्शनासह संपूर्ण वस्त्रउद्योग परिसंस्था दर्शवण्यात आली आहे. यात 70 हून अधिक परिषदा, गोलमेज परिषद, गट चर्चासत्रे आणि मास्टर क्लासेस असलेली एक जागतिक स्तरावरील परिषद समाविष्ट आहे. यामध्ये स्टार्टअप आणि नवकल्पना दालन, हॅकाथॉन-आधारित `स्टार्टअप पिच फेस्ट`,` टेक टँक्स`, `डिझाईन चॅलेंजेस` यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे ज्या स्टार्टअपना आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी मिळवण्याची संधी प्रदान करतात.
या उपक्रमात धोरणनिर्माते, जागतिक सीइओ, 5000 हून अधिक प्रदर्शक, 120 हून अधिक देशांतील 6000 आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि विविध क्षेत्रातील अनेक अभ्यागत सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय वस्त्र उत्पादक महासंघ (आयटीएमएफ), आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी), इयूआरएटीइएक्स, टेक्सटाईल एक्सचेंज, अमेरिकन फॅशन उद्योग संघटना (यूएसएफआयए) यांसह 25 हून अधिक आघाडीच्या जागतिक वस्त्र संस्थांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
***
S.Kane/T.Pawar/G.Deoda/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Earlier today, attended #BharatTex2025, which showcases India’s textile diversity. I talked about the strong potential of the textiles sector and highlighted our Government’s efforts to support the sector. pic.twitter.com/ah0ANZMCN1
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2025