Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद


नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.

या उच्च स्तरीय कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांनी 10 फेब्रुवारी रोजी एलिसी पॅलेसमध्ये आयोजित केलेल्या मेजवानीने झाली.यामध्ये विविध देश आणि सरकारे यांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते, प्रमुख एआय कंपन्यांचे सीईओ आणि इतर मान्यवर सहभागी झाले.

आज झालेल्या संपूर्ण सत्रात अध्यक्ष मॅक्राँ यांनी या परिषदेचे सह-अध्यक्ष म्हणून या परिषदेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केले. आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी नमूद केले की हे जग एआय युगाची पहाट अनुभवत आहे ज्यामध्ये हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने मानवतेची संहिता लिहीत आहे आणि आपले राजकीय क्षेत्र, अर्थव्यवस्था, आपली सुरक्षा व्यवस्था आणि अगदी आपल्या समाजाला नवा आकार देण्यास सुरूवात केली आहे. प्रभावाच्या दृष्टीकोनातून मानवतेच्या इतिहासात तंत्रज्ञानाने जे टप्पे गाठले त्यापेक्षा हे सर्वस्वी वेगळे असल्यावर भर देत पंतप्रधानांनी आपली सामाईक मूल्ये टिकवण्यासाठी शासन आणि मानके प्रस्थापित करण्यासाठी तसेच जोखमींचे निरसन करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी एकत्रिक जागतिक प्रयत्नांचे आवाहन केले.ते पुढे म्हणाले की शासन हे केवळ जोखीम व्यवस्थापित करण्यापुरते नाही तर नवोन्मेषाला चालना देणे आणि जागतिक कल्याणासाठी त्याचा वापर  करणे देखील आहे. या संदर्भात, त्यांनी सर्वांसाठी, विशेषत: ग्लोबल साउथसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेश सुनिश्चित करण्याचे समर्थन केले. शाश्वत विकास उद्दिष्टे प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि त्याचे लोक-केंद्रित अनुप्रयोग यांचे लोकशाहीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारत-फ्रान्स शाश्वत भागीदारी यशस्वी झाल्याचा उल्लेख करून,पंतप्रधान म्हणाले की स्मार्ट आणि जबाबदार भविष्यासाठी एक नवोन्मेष  भागीदारी तयार करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येणे स्वाभाविक आहे.

आपल्या 1.4अब्ज नागरिकांसाठी खुल्या आणि सुलभ तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात भारताने मिळवलेले यश पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताच्या एआय मोहिमेबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की भारत आपली विविधता लक्षात घेऊन, एआयसाठी स्वतःचे मोठे भाषा मॉडेल तयार करत आहे.त्यांनी अधोरेखित केले की एआयचे लाभ  सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी भारत आपला अनुभव सामायिक  करण्यास तयार आहे. भारत पुढील एआय शिखर परिषदेचे आयोजन करेल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल (सुरुवातीचे भाषण;समारोपाचे भाषण )

नेत्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून शिखर परिषदेचा समारोप झाला. समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी एआय  पायाभूत सुविधा अधिकाधिक सुलभ करणे, एआयचा जबाबदारीने वापर, सार्वजनिक हितासाठी एआय, एआय  अधिक वैविध्यपूर्ण आणि शाश्वत बनवणे तसेच एआय चा सुरक्षित आणि विश्वासार्ह कारभार सुनिश्चित करणे यासह महत्वपूर्ण विषयांवर  शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली.

 

 

 

N.Chitale/S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai