पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी बिहार मधल्या मुंगेर इथल्या एका सहभागीसोबत संवाद साधताना मुंगेरच्या भूमी प्रती आदरभावना व्यक्त करत मुंगेर हे ठिकाण जगभरात योगाभ्यासासाठी प्रसिद्ध आहे आणि आता संपूर्ण जग योगाभ्यासाचा अवलंब करू लागला असल्याचेही अधोरेखित केले.
स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांसारख्या उपक्रमांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावलाच आहे, आणि त्यासोबतच या दिशेने काम करण्याकरता युवा वर्गालाही आकर्षित केल्याची बाब एका सहभागीने या संवादात नमूद केली. प्रत्येकजण पंतप्रधानांकडे चुंबकासारखे आकर्षित होत आहेत, असे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती पंतप्रधान म्हणून लाभणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे असेही आणखी एकाने नमूद केले. 140 कोटी भारतीयांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प केला तर भारतात कायमच स्वच्छता नांदेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
ओडिशातून आलेल्या एका सहभागीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यशाच्या खऱ्या व्याख्येबद्दल विचारले. त्यावर प्रतिसाद देतांना, कधीही अपयश स्वीकारू नये. अपयश स्वीकारणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही, पण त्यातून शिकणारे शिखरावर पोहोचतात, असे मार्गदर्शनपर उत्तर पंतप्रधानांनी दिले. अपयशाची भीती बाळगू नये, तर त्यातून शिकण्याची भावना बाळगावी आणि अपयशातून शिकवण घेणारेच अखेरीला शिखरावर पोहोचतात ही बाब त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अधोरेखित केली.
यावेळी एकाने पंतप्रधानांना, त्यांना कशापासून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते याबद्दल विचारले. त्यावरही पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला. तुमच्यासारख्या तरुणांना भेटल्यानेच आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले. आपण जेव्हा देशातील शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करतो, त्यावेळी ते किती तास काम करतात याची खऱ्या अर्थाने जाणीव होते असे त्यांनी सांगितले. जेव्हा आपण सैनिकांचे स्मरण करतो, तेव्हाच आपण ते सीमेवर किती तास पहारा देत असतात याबद्दलचा विचार करू लागतो हे ही त्यांनी नमूद केले. प्रत्येकजण खूप मेहनत घेत असतो, आणि आपण जर का त्यांचे निरीक्षण केले, त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न केल्यानंतर, आपल्याला विश्रांती घेण्याचाही अधिकार नाही याची जाणिव होत असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. हे सगळेच घटक प्रचंड निष्ठेने ते आपली कर्तव्ये पार पाडत असतात, आणि त्याचप्रमाणे देशातील 140 कोटी नागरिकांनीदेखील आपल्यावर काही कर्तव्ये पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहेत ही बाब त्यांनी नमूद केली.
आपल्याला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे, आणि ही सवय आयुष्यात खूप फायद्याची ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. आपणही कधीकाळी राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक होतो, त्यावेळी शिबिरांसाठी लवकर उठावे लागे, त्यामुळेच आपल्याला ही सवय आणि शिस्त लागल्याचे त्यांनी सांगितले.आजही लवकर उठण्याची ही सवय आपल्यासाठी एक मौल्यवान संपत्ती समान आहे, ज्यामुळे आपल्याला जग जागे होण्यापूर्वीच अनेक कामे पूर्ण करण्याची संधी मिळते असे पंतप्रधान म्हणाले. लवकर उठण्याच्या सवयीमुळे खूप लाभ होणार असल्याने प्रत्येकाने ही सवय कायम ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी पंतप्रधानांनी थोर व्यक्तिमत्वांकडून शिकण्याबद्दलही सर्वांशी संवाद साधला. आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वांकडून शिकवण घेण्याची गरज आहे. भूतकाळातील थोर नेत्यांकडून आपण धडे गिरवले पाहिजेत आणि ही शिकवण देशसेवेसाठी अंमलात आणली पाहीजे यावर त्यांनी आपल्या संवादात भर दिला.
पंतप्रधानांनी एका सहभागीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान इतरांकडून शिकलेल्या गोष्टींबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की विविध सहभागींबरोबर मैत्री करणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे तसेच एकसंध भारत तयार करण्यासाठी एकमेकांमध्ये मिसळणे या गोष्टी शिकता आल्या. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत जुळवून घेण्याबाबत बरेच काही शिकवले असे ती पुढे म्हणाली. काश्मिरी पंडित कुटुंबातील एका युवा सहभागीने सांगितले की या कार्यक्रमातील सहभागाने तिला स्वावलंबी व्हायला शिकवले हे ऐकून मोदींना आनंद झाला. यापूर्वी कधीही घरातील कामे केली नव्हती , मात्र येथे स्वतंत्रपणे सर्वकाही करायला शिकणे हा एक महत्त्वपूर्ण अनुभव होता असे तिने अधोरेखित केले . घरी परत गेल्यावर अभ्यासाबरोबरच आईला घरच्या कामातही मदत करेन यावर तिने भर दिला.
आपल्यासोबत घरात राहणाऱ्यांमुळे केवळ कुटुंब बनत नाही तर इथे जे लोक आहेत – मित्र आहेत आणि ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचाही यात समावेश असतो आणि त्यातून एक मोठे कुटुंब बनते असे येथे शिकायला मिळालेल्या सर्वात महत्त्वाच्या धड्यांपैकी एक असल्याचे जेव्हा एका मुलीने सांगितले तेव्हा ही बाब पंतप्रधानांच्या मनाला स्पर्शून गेली. हा एक मौल्यवान धडा आहे जो नेहमी लक्षात ठेवू यावर सहभागीने भर दिला. या अनुभवातून “एक भारत, श्रेष्ठ भारत” ची भावना अंगीकारणे ही एक महत्त्वपूर्ण शिकवण मिळाल्याचे मोदी यांनी नमूद केले.
आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड झाली की नाही याबद्दल मोदी यांनी सहभागींना विचारले असता, एका सहभागीने उत्तर दिले की निवड होणे , न होणे ही एक वेगळी बाब आहे, परंतु प्रयत्न करणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. निकालाची पर्वा न करता तुमच्याकडून सर्वोत्तम प्रयत्न होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यावर मोदी यांनी भर दिला.
येथे एक महिना राहिलेल्या सहभागींना पंतप्रधानांनी सांगितले की, तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियामुळे ते त्यांच्या मित्रमंडळी आणि कुटुंबाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधू शकले जे आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जात आहे. जगभरात फार कमी देश आहेत जिथे भारताइतका परवडणारा डेटा उपलब्ध आहे यावर त्यांनी भर दिला. त्यामुळेच देशातील सर्वात गरीब व्यक्ती देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या प्रियजनांशी सहज बोलू शकतात असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती लोक युपीआय आणि डिजिटल पेमेंटचा वापर करतात, असे विचारले, आणि नवीन पिढी त्यांच्या खिशात रोख रक्कम फारशी ठेवत नाही असे दिसते असे नमूद केले .
एनसीसी मधून अशा कोणत्या महत्वाच्या बाबी शिकायला मिळाल्या ज्या आधी त्यांना माहित नव्हत्या असे सहभागींना मोदी यांनी विचारले असता, एका सहभागीने वक्तशीरपणा, वेळेचे व्यवस्थापन आणि नेतृत्व असे उत्तर दिले. दुसऱ्या एका सहभागीने सांगितले की एनसीसी मधून शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे लोकसेवा, उदा. रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि सभोवतालची स्वच्छता राखणे इ . भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या माय भारत किंवा मेरा युवा भारत या मंचाबाबत बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की या मंचावर तीन कोटींहून अधिक तरुण-तरुणींनी नोंदणी केली आहे. विकसित भारतावर वादविवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा याद्वारे सहभागींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे यावर त्यांनी भर दिला. देशभरातील सुमारे 30 लाख लोक या उपक्रमांमध्ये सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सहभागींना माय भारत पोर्टलवर लवकरच नोंदणी करण्याचे आवाहन केले.
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र (विकसित भारत) बनवण्याच्या भारत आणि भारतीयांनी ठरवलेल्या उद्दिष्टाबाबत चर्चा करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की जर 140 कोटी नागरिकांनी सकारात्मक बाबी करण्याचा संकल्प केला तर हे ध्येय गाठणे कठीण नाही. “आपली कर्तव्ये पार पाडून, आपण विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण ताकद बनू शकतो” यावर त्यांनी भर दिला.
आपल्यापैकी कोण आपल्या आईवर मनापासून प्रेम करतो आणि कोण पृथ्वी मातेवर तितकेच प्रेम करतो, असे उपस्थितांना विचारत पंतप्रधानांनी मोदींनी ‘एक पेड माँ के नाम‘ या कार्यक्रमावर भर दिला. हा कार्यक्रम आपली आई आणि पृथ्वी मातेबद्दल आदर व्यक्त करणारा आहे, असे ते म्हणाले. त्यांनी प्रत्येकाला आपल्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आणि ते कधीही सुकणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या नियमाचा पहिला लाभ पृथ्वी मातेला होईल, असेही ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेशातील एका सहभागीशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशचे वैशिष्ट्य म्हणजे, सूर्याची पहिली किरणे भारतात पोहोचतात ते याच प्रदेशात, हे अधोरेखित केले. अरुणाचल प्रदेशात लोक “राम राम” किंवा “नमस्ते” ऐवजी “जय हिंद” असे म्हणत एकमेकांचे स्वागत करतात असे पंतप्रधानांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील लोकांची विविधता, कला, नैसर्गिक सौंदर्य आणि प्रेम अनुभवण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना प्रोत्साहित केले. त्यांनी लोकांना मिझोरम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यासह अष्टलक्ष्मीच्या संपूर्ण प्रदेशाला भेट देण्याचे आवाहन केले. यासाठी दोन – तीन महिनेही पुरेसे नसतील, असेही ते म्हणाले.
एनएसएस संघाबरोबर काम करताना युनिटने त्यांच्या क्षेत्रात व्यापकपणे ओळखले जाईल असे कोणतेही काम केले आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांनी सहभागींना विचारले. बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुमका येथील माहिरी समुदायाला मदत करणे हा एक उल्लेखनीय प्रयत्न असल्याचे झारखंडमधील एका सहभागीने आपल्या अनुभव कथनात सांगितले. आपली उत्पादने केवळ ठराविक हंगामातच विकली जात असल्याने समुदायाला आव्हानांचा सामना करावा लागला, असे त्या सहभागीने सांगितले. युनिटने असे कारागिर शोधून त्यांना अगरबत्ती बनवणाऱ्या कारखान्यांशी जोडल्याचेही त्याने सांगितले. त्रिपुरातील आगरतळा येथील जंगलात अगर लाकूड मिळते, जे त्याच्या अद्वितीय आणि आनंददायी सुगंधासाठी ओळखले जाते, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या झाडांपासून काढलेले तेल अत्यंत मौल्यवान आणि जगातील सर्वात महाग तेलांपैकी एक आहे, असे त्यांनी सांगितले. अगर लाकडाच्या समृद्ध सुगंधामुळे या सुगंधाची अगरबत्ती बनवण्याची परंपरा निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सरकारच्या जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) पोर्टलवर प्रकाश टाकला. मोदी यांनी शिक्षित तरुणांना स्थानिक कारागीर आणि उत्पादकांना पोर्टलवर त्यांची उत्पादने नोंदणी करण्यास मदत करण्यास प्रोत्साहित केले. अशाप्रकारे उत्पादने आणि किंमतींची यादी केल्याने सरकार त्या वस्तूंसाठी ऑर्डर देऊ शकते, ज्यामुळे जलद व्यवहार शक्य होतील, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी गावातील बचत गटांमधील (SHG) 3 कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवणे हे आपले स्वप्न असल्याचे सांगितलेआणि आजवर 1.3 कोटी महिला लखपती दिदी झाल्याचे सांगितले. एका सहभागीने सांगितले की त्याची आई शिवणकाम शिकली आणि आता नवरात्रीत पारंपारिक चनिया चोली बनवते. या चनिया आता परदेशातही निर्यात केल्या जातात, असेही त्याने सांगितले. हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे असल्याचे सांगत “लखपती दीदी” कार्यक्रम विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर पंतप्रधानांनी भर दिला.
नेपाळमधील एका सहभागीने भारताला भेट देऊन पंतप्रधानांची भेट घेण्याबद्दल उत्साह व्यक्त केला, हे ऐकून आनंद झाल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधानांना केलेल्या आदरातिथ्याबद्दल या नेपाळी सहभागीने आभार मानले. मॉरिशसमधील आणखी एका सहभागीने सांगितले की त्याच्या भारतात येण्याच्या पूर्वसंध्येला, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्तांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना भारताला भेट देण्यास प्रोत्साहित केले. भारत हे या सहभागीचे “दुसरे घर” असल्याचे हे उच्चायुक्त म्हणाले होते. यावर पंतप्रधानांनी भारत हे त्यांचे दुसरे घरच नाही तर त्यांच्या पूर्वजांचे पहिले घर देखील आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
N.Chitale/T.Pawar/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com