Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत  65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि स्वामित्व योजनेविषयीचे त्यांचे अनुभव जाणून घेतले.

मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला. मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे त्यांनी कशा प्रकारे कर्ज मिळवले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाला आहे, असे पंतप्रधानांनी मनोहर यांना विचारले. त्यावर आपल्या डेरी फार्मसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुरू करता आल्याची माहिती मनोहर यांनी दिली. आपली मुले आणि पत्नी देखील या डेरी फार्ममध्ये काम करत आहेत आणि यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे असे मनोहर यांनी सांगितले.मालमत्तेची कागदपत्रे असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे झाले असे मनोहर यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकाने त्याची मान  अभिमानाने उंचवावी  आणि त्याच्या जीवनात सुलभता अनुभवावी हे सुनिश्चित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनाचा स्वामित्व योजना ही विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.   

त्यानंतर पंतप्रधानांनी राजस्थानच्या गंगानगर येथील स्वामित्व लाभार्थी रचना यांच्यासोबत संवाद साधला. ज्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना या योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला, त्यावेळी त्या म्हणाल्या की गेल्या 20 वर्षांपासून त्या एका लहानशा घरात कोणत्याही कागदपत्रांविना राहात होत्या. त्यांनी स्वामित्व योजने अंतर्गत 7.45 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि एक दुकान सुरू केले ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे.

एकाच घरात 20 वर्षे राहूनही मालमत्तेची कागदपत्रे मिळण्याची अपेक्षा त्यांनी कधीच केली नव्हती असे तिने आनंद व्यक्त करत सांगितले. स्वामित्व योजनेमुळे आणखी कोणते लाभ मिळाले असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की स्वच्छ भारत योजनेच्या त्या लाभार्थी होत्या. त्यांनी पीएम मुद्रा योजनेंतर्गत 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले. आजीविका योजनेअंतर्गत त्या काम करत होत्या तसेच त्यांच्या कुटुंबाने आयुष्मान योजनेचा लाभ घेतला होता.

आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मुलीची स्वप्न खरी होवोत अशी इच्छा व्यक्त केली.  स्वामित्व योजना केवळ मूलभूत गरजा पूर्ण करत नाही तर नागरिकांच्या आशा-आकांक्षांना पंख देऊन नवे बळ देते अशा शब्दांत त्यांनी प्रशंसा केली.

कोणत्याही योजनेचे खरे यश हे तिच्या लोकांशी जोडले जाऊन त्यांना अधिक बळ देण्यात आहे असे पंतप्रधान म्हणाले.  आपली यशोगाथा सांगितल्याबद्दल त्यांनी रचना यांचे आभार मानले आणि सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन इतर ग्रामस्थांना केले.

त्यानंतर मोदी यांनी स्वामित्व योजनेचे महाराष्ट्रातील नागपूरचे लाभार्थी रोशन संभा पाटील यांच्याशी संवाद साधला. तुम्हाला कार्ड कसे मिळाले, त्याने तुम्हाला काय मदत झाली आणि त्यातून तुम्हाला काय लाभ मिळाले असा सवाल त्यांनी पाटील यांना केला. त्यांनी सांगितले, गावात माझे मोठे आणि जुने घर होतेप्रॉपर्टी कार्डमुळे 9 लाख रूपयांचे कर्ज मिळाले, त्यातून मी घर पुन्हा बांधले आणि शेतीसाठी जलसिंचनाची सुविधा अद्ययावत केली. त्यामुळे आपले उत्पन्न आणि पीक उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले असे सांगत त्यांनी स्वामित्व योजनेमुळे जीवनात कसा आमूलाग्र बदल झाला हे विशद केले . स्वामित्व कार्डामुळे कर्ज मिळवणे सोपे गेले का अशी चौकशी पंतप्रधानांनी रोशन यांच्याकडे केली. कागदपत्रे जमवताना आणि कर्ज मिळवताना अनेक अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले.

कर्ज मिळवण्यासाठी इतर कागदपत्रांची आवश्यकता नसून  फक्त स्वामित्व कार्ड पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वामित्व योजनेबद्दल मोदींचे आभार व्यक्त करताना  रोशन म्हणाले की ते भाजीपाला आणि इतर  तीन पिके घेतात, ज्यामुळे त्यांना नफा मिळतो आणि त्यामुळे ते कर्जाची परतफेड सहजपणे करू शकतात. केंद्र सरकारच्या इतर योजनांमधील लाभांबद्दल पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नावर, रोशन म्हणाले की ते पंतप्रधान उज्ज्वला योजना, पंतप्रधान सन्मान निधी योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचे देखील ते लाभार्थी आहेत. त्यांनी पुढे सांगितले की त्यांच्या गावातील अनेक लोकांना स्वामित्व योजनेचा खूप फायदा होत आहे आणि त्यांना स्वतःचे छोटे व्यवसाय आणि शेती करण्यासाठी सहज कर्ज मिळत आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, स्वामित्व योजनेचा  लोकांना किती लाभ होतो आहे हे पाहून आनंद होतो. लोक आपली घरे बांधत आहेत आणि कर्जाचे पैसे शेतीसाठी वापरत आहेत यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांच्या डोक्यावर छप्पर असल्याने गावांमधील राहणीमान सुधारत आहे. लोक आता त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय समृद्धीवर लक्ष केंद्रित करू शकतात यावर त्यांनी भर दिला. या चिंतांपासून मुक्त राहणे देशासाठी अत्यंत फायदेशीर आहे असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

ओडिशातील रायगड येथील स्वामित्व लाभार्थी गजेंद्र संगीता यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेशी संबंधित अनुभव सांगण्यास सांगितले. गेल्या 60 वर्षांपासून योग्य कागदपत्रे नसल्याने बराच त्रास होता परंतु आता मोठा बदल झाला आहे आणि आता स्वामित्व कार्डमुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला. यामुळे त्यांना आनंदही झाला असे त्या म्हणाल्या.  त्यांनी  पुढे सांगितले की त्यांना  कर्ज घेऊन शिवणकामाचा  व्यवसाय वाढवायचा आहे . त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. त्यांच्या  कामाच्या आणि घराच्या विस्तारासाठी शुभेच्छा देतमोदींनी अधोरेखित केले की स्वामित्व योजनेने मालमत्तेची कागदपत्रे प्रदान करून एक मोठी चिंता दूर केली आहे.

त्यांनी सांगितले की, ती स्वयं सहायता गटाची सदस्य आहे आणि सरकार महिलांच्या स्वयं सहायता गटांना कायमच पाठिंबा देत आहे. तसेच स्वामित्व योजना संपूर्ण गावांचे रूपांतर करण्यास सज्ज आहे  असेही त्यांनी पुढे नमूद केले.

पंतप्रधानांनी वरिंदर कुमार यांच्याशी संवाद साधला, जे स्वामित्व योजनेचे लाभार्थी आहेत आणि सांबा, जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी आहेत. पंतप्रधानांनी त्यांना या योजनेचा अनुभव विचारला. त्यावर कुमार म्हणाले की ते शेतकरी आहेत; त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या प्रॉपर्टी कार्डमुळे ते खूप आनंदी आहेत. ते म्हणाले, “आम्ही पिढ्यानपिढ्या ह्या जमिनीवर राहात होतो, पण आता दस्तऐवज मिळाल्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो.” 

पंतप्रधानांचे  आभार व्यक्त करत त्यांनी सांगितले की त्यांच्या गावात 100 वर्षांहून अधिक काळ राहूनही कोणत्याही व्यक्तीकडे मालमत्तेचे दस्तऐवज नव्हते. ते म्हणाले की, “मला प्राप्त झालेल्या प्रॉपर्टी कार्ड्मुळे मला माझ्या जमिनीचा  वाद सोडविण्यात मदत झाली आणि आता मी ती जमीन  गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेऊ शकतो. हे कर्ज घराची दुरुस्ती करण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी उपयोगी पडेल.” 

स्वामित्व योजनेमधून होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की त्यांच्या गावातील प्रत्येकाच्या मालकी हक्कांची स्पष्टपणे मांडणी करणारे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे जमिनी आणि मालमत्तेसंबंधी असलेले वाद मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आता गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर कर्ज घेता येईल. त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत म्हटले की हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

पंतप्रधानांनी सांगितले, “सर्वांशी बोलणे आनंददायक होते.” ते म्हणाले की लोक स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड्ला  फक्त एक साधा दस्तऐवज न मानता, प्रगती साधण्यासाठीचे एक साधन म्हणून वापरत आहेत. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की स्वामित्व उपक्रम त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करत आहे.

***

S.Kane/S.Patil/P.Jambhekar/H.Kulkarni/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com