Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित


नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय हवामान विभागाने या दीडशे वर्षांमध्ये लाखो भारतीयांची सेवा केली असून ही संस्था भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक बनले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय हवामान विभागाची यशोगाथा सांगणाऱ्या एका विशेष टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे देखील आज अनावरण झाले, असे ते म्हणाले. 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा आय एम डी च्या भविष्याची रूपरेषा देणारे आयएमडी व्हिजन -2047 हे पत्रक देखील जारी करण्यात आले. आयएमडीच्या 150 वर्षांच्या कारकिर्दीच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय हवामान विभागाने आपल्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त देशातील युवकांनाही या कार्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय हवामान विषयक ऑलिंपियाडचे आयोजन केले होते, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या ऑलिंपियाडमध्ये हजारो मुलांनी भाग घेतला आणि भविष्यात त्यांची हवामानशास्त्रातील आवड आणखी वाढेल, असे ते म्हणाले. थोड्या वेळापूर्वी प्रदर्शनात युवकांशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करून त्यांनी या समारंभात सहभागी झालेल्या तरुणाईला शुभेच्छा दिल्या.

भारतीय हवामान विभागाची स्थापना 15 जानेवारी 1875 रोजी म्हणजे मकरसंक्रांतीच्या अगदी लगेचच झाली असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला असलेले महत्व आपण सर्वजण जाणतोच. गुजरातचे नागरिक असल्याने आपला सर्वात आवडता सण मकर संक्रांत असायचा, असे त्यांनी सांगितले.

मकर संक्रांत म्हणजे या दिवसापासून सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते आणि त्याला उत्तरायण म्हणून ओळखले जाते. हा कालावधी उत्तर गोलार्धातील सूर्यप्रकाशात हळूहळू वाढ दर्शवतो, ज्यामुळे शेतीच्या कामांची लगबग सुरू होते, असे ते म्हणाले. भारतात मकर संक्रांत हा सण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जातो. या मंगलपर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

देशाच्या वैज्ञानिक संस्थांमधील प्रगती त्या देशाची विज्ञानाविषयीची जागरुकता दर्शवते” असे पंतप्रधानांनी सांगितले. वैज्ञानिक संस्थांमधील संशोधन आणि नवोन्मेष हे नवीन भारताच्या प्रवृत्तीचा भाग आहेत, गेल्या दहा वर्षात आय एम डी ची पायाभूत सेवासुविधा आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व विस्तार झाला आहे, डॉपलर हवामान रडार, स्वयंचलित हवामान केंद्रे, धावपट्टी हवामान निरीक्षण प्रणाली आणि जिल्हानिहाय पर्जन्य निरीक्षण केंद्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ करून, या सर्वांची सुधारणा करण्यात आली आहे. अंतराळ आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा लाभ भारतातील हवामानशास्त्राला झाला आहे. अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती नावाच्या भारताच्या दोन हवामान वेधशाळा आहेत आणि गेल्या वर्षी, सुपर कॉम्प्युटर आर्क आणि अरुणिका देशाला समाप्रित करण्यात आले, ज्यामुळे आय एम डी ची विश्वासार्हता आणखी वाढली, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताला कोणत्याही प्रकारच्या हवामानासाठी सज्ज करुन  हवामानाप्रती सजग असे स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी मिशन मौसम योजना सुरु केली असून, शाश्वत भविष्य आणि भविष्यासाठी आवश्यक सज्जतेच्या दिशेने असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विज्ञानाची समर्पकता ही नवनवीन शिखरे गाठण्यात नसून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यात आहे, यावर त्यांनी भर दिला. हवामानाशी संबंधित अचूक  माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवून या निकषांवर आय एम डी ने आपले स्थान अधिक उंच केले आहे. ‘सर्वांसाठी पूर्व चेतावणी’ उपक्रमाचा लाभ  आता 90% पेक्षा जास्त लोकसंख्येला मिळतो आहे, कोणीही गेल्या दहा दिवसांतील आणि आगामी 10 दिवसांची हवामानविषयक  माहिती कधीही पाहू  शकतो , हवामान खात्याचे अंदाज व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

मेघदूत मोबाईल ऍप द्वारे हवामानासंबंधित माहिती स्थानिक भाषांमधून दिली जाते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत फक्त 10 टक्के शेतकरी हवामानाच्या अंदाजांचा वापर करत होते, पण आता हा आकडा 50 टक्क्यांवर पोचला आहे. विजा पडण्यासंबंधींची माहिती आता मोबाईल ऍप द्वारे मिळू शकते असे त्यांनी सांगितले. पूर्वी समुद्रावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या लाखो  मच्छीमारांच्या कुटुंबियांना काळजीने ग्रासले जात होते, मात्र आता त्यांना भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी इशारे मिळत असतात, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या अद्ययावत सूचनांमुळे कृषी व नील (सागरी) अर्थव्यवस्थेतील सुरक्षा राखली जाते, ते म्हणाले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेसाठी हवामानशास्त्राचे महत्व निर्विवाद आहे, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीचे विपरीत परिणाम लवकर कमी करण्यासाठी हवामानशास्त्राची अचूकता वाढवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारताला हे महत्व पूर्णपणे  ज्ञात होते, त्यामुळे एकेकाळी अपरिहार्य वाटणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन आता खूपच सुधारले आहे. कच्छ मधील कांडला इथे 1998 साली व ओडिशात 1999 साली झालेल्या चक्रीवादळामुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागल्याच्या प्रसंगांची आठवण त्यांनी करून दिली. त्या तुलनेत नुकत्याच कोसळलेल्या अशा आपत्तीमधील जीवितहानी अतिशय कमी झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

यात हवामान खात्याचे योगदान खूप महत्वाचे होते असे ते म्हणाले. विज्ञान आणि पूर्वतयारीची सांगड घातल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले व त्यायोगे अर्थव्यवस्थेची लवचिकता वाढून गुंतवणूकदारांचा भरवसा वाढला, असे ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती तसेच तिचा पुरेपूर वापर ही  जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारण्याची गुरुकिल्ली ठरू शकते , असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या हवामान खात्यातील सुधारणांमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमताही सुधारल्याचे त्यांनी सांगितले. अचानक येणाऱ्या पुराचा अंदाज वर्तवण्याच्या भारताच्या प्रणालींकडून  नेपाळ, भूतान, बांगलादेश व श्रीलंकेला देखील माहिती पुरवली जाते असे ते म्हणाले.  भारत नेहमीच विश्व बंधू या भूमिकेतून इतर देशांना आपत्तीकाळात मदत पुरवण्यात अग्रेसर राहिल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारली असून यामध्ये भारतीय हवामानखात्याच्या शास्त्रज्ञाची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय हवामानखात्याच्या 150 व्या स्थापनादिनानिमित्त भारतीय हवामानशास्त्राच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, कि मानवाच्या उत्क्रांतीत हवामानाचे योगदान मोठे असून जगभरातील मानवसमुदायांनी त्यांचे पर्यावरण व हवामान समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. वेद, संहिता आणि सूर्य सिद्धांतांसारख्या भारताच्या प्राचीन ग्रंथांमधून वर्षानुवर्षे केलेल्या हवामानाच्या निरीक्षणाच्या नोंदी व त्यांचा अभ्यास केलेला दिसून येतो. तामिळनाडूचे संगम साहित्य व घाघ भड्डारी या उत्तरेकडील लोकसाहित्यात हवामानशास्त्राची व्यापक माहिती आढळते. हवामानशात्राचे अस्तित्व पृथक नसून ते खगोलशात्रीय गणिते, वातावरणाचा अभ्यास, प्राण्याचे वागणे व सामाजिक अनुभवांशी जोडलेले होते.

कृषी पराशर व बृहत संहितेसारख्या महत्वाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये ढगांची निर्मिती प्रक्रिया व त्यांचे प्रकार, तसेच ग्रहांच्या स्थानासंबंधी केलेली गणिते नोंदवलेली आढळतात. कृषी पराशर या ग्रंथात हवेच्या दाबाचा व तापमानाचा संबंध ढगांच्या निर्मितीशी व पावसाच्या प्रमाणाशी जोडलेला दिसतो असे त्यांनी सांगितले. प्राचीन काळातील ज्ञानी व  विद्वानांनी अतिशय समर्पित भावाने व कोणत्याही आधुनिक यंत्रांचा वापर न करता केलेल्या सखोल संशोधनाचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याकडे उपलब्ध असलेले पारंपरिक ज्ञान व आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. ‘आधुनिक काळापूर्वीच्या कच्छी दिशादर्शन पद्धती व सागरी सफरी’ या पुस्तकात गुजरातच्या खलाशांच्या शतकापूर्वीपासून चालत आलेल्या सागरी प्रवासातील नोंदींचा अभ्यास  केलेला आहे.भारताच्या आदिवासी समुदायांकडे असलेल्या समृद्ध ज्ञान परंपरेचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यात निसर्गाचे सखोल ज्ञान व प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केलेला दिसतो. अशा सर्व प्रकारच्या पारंपरिक ज्ञानाचा मेळ आधुनिक वैज्ञानिक पद्धतींबरोबर घालण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

भारतीय हवामानखात्याचे अंदाज जसजसे अधिकाधिक अचूक होत जातील, तसे त्यांना अधिक महत्व प्राप्त होईल. विविध क्षेत्रांमध्ये, उद्योगांमध्ये तसेच दैनंदिन आयुष्यातही हवामानखात्याच्या माहितीची गरज वाढत जाईल असे पंतप्रधान म्हणाले. भूकंपांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनात हवामानखात्याच्या अंदाजांचे व सूचनांचे महत्व भावी काळात वाढत जाणार आहे, असे ते म्हणले. या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी वैज्ञानिक, संशोधक व हवामानखात्यासारख्या संस्थांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक सेवा व सुरक्षेप्रती भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असेल असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी व्यक्त केला. दीडशे वर्षांच्या अथक प्रवासाबद्दल त्यांनी भारतीय हवामानखाते व त्यातील तज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या.

पार्श्वभूमी

आपल्या देशाला हवामान सजग आणि वातावरण अद्यतन बनवण्याच्या उद्दिष्टासाठी  पंतप्रधानांनी मिशन मौसम ची सुरुवात केली आहे. हवामान निरीक्षण तंत्रज्ञान व  प्रणालीचा वापर, अचूक हवामान सर्वेक्षण, अत्याधुनिक रडार व उपग्रहांचा तसेच उच्च क्षमतेच्या संगणकांचा वापर ही या मिशनची उद्दिष्टे आहेत. यात हवामान व वातावरणातील घडामोडी समजून घेण्याची क्षमता वाढवणे, हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळवणे, व या सर्व माहितीच्या आधारे हवामान व्यवस्थापन व पुढील काळात गरज पडल्यास त्यात हस्तक्षेप करण्याची तयारी ठेवणे, इ च समावेश आहे. 

हवामान बदलाप्रति लवचिकता वाढवण्यासाठी भारतीय हवामान विभागाने तयार केलेल्या आयएमडी व्हिजन –2047 या पत्रकाचे पंतप्रधानांनी प्रकाशन केले. त्यात हवामान अंदाज, हवामान व्यवस्थापन व हवामान बदलाचे शमन यासाठीच्या योजनांचा समावेश आहे.

भारतीय हवामान विभागाचा 150वा स्थापना दिन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित केल्या असून त्यातून हवामान विभागाच्या गेल्या दीडशे वर्षांतील अनेक उपलब्धी सादर केल्या जातील. देशातील सर्व शासकीय संस्थांनी हवामानासंबंधित पुरवलेल्या अनेक सेवांची भारताला हवामान सजग बनवण्यात बजावलेली भूमिका त्यातून सर्वांसमोर येऊ शकेल. 

 

Jaydevi PS/S.Tupe/B.Sontakke/U.Raikar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai