Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन


नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये  सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “आव्हाने असूनही आपला  संकल्प डगमगला नाही”. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या  सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि आल्हाददायक हवामानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर अलिकडेच सामायिक केलेली छायाचित्रे पाहून जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याची आपली उत्सुकता आणखी वाढली.  आपल्या पक्षासाठी काम करत असताना सुरुवातीच्या काळात या भागाला अनेकदा भेट दिल्याची  आठवण पंतप्रधानांनी सांगितली.  सोनमर्ग, गुलमर्ग, गंदेरबल  आणि बारामुल्ला सारख्या परिसरात  बराच वेळ व्यतीत केल्याचा, कित्येकदा  तासनतास चालत अनेक किलोमीटर प्रवास केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जोरदार बर्फवृष्टी असूनही, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या स्नेहामुळे थंडी जाणवली नव्हती  असे त्यांनी नमूद केले.

आजचा दिवस विशेष होता असे सांगत  देशभरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण असल्याचे  पंतप्रधान म्हणाले. प्रयागराजमध्ये महाकुंभला प्रारंभ झाला असून लाखो लोक तिथे पवित्र स्नानासाठी जमले आहेत असे त्यांनी नमूद केले.  पंजाब आणि उत्तर भारतातील इतर भागात लोहडी साजरी  केली जात आहे असे सांगत उत्तरायण, मकर संक्रांती आणि पोंगल या सणांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. हे सण साजरे करणाऱ्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी खोऱ्यातील चिल्लई कलानच्या 40 दिवसांच्या आव्हानात्मक कालावधीची दखल घेतली  आणि तिथल्या लोकांच्या लवचिकतेची प्रशंसा केली. त्यांनी अधोरेखित केले की हा ऋतू  सोनमर्ग सारख्या पर्यटन स्थळांसाठी नवीन संधी घेऊन येतो, देशभरातील पर्यटकांना आकर्षित करतो  जे काश्मीरच्या जनतेच्या  आदरातिथ्याचा आनंद लुटतात.

जम्मू रेल्वे विभागाची नुकतीच झालेली पायाभरणी अधोरेखित करून पंतप्रधानांनी तेथील लोकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण भेट असल्याचे जाहीर केले. तेथील  जनतेची अनेक वर्षांपासूनची ही  मागणी होती असे ते म्हणाले.  सोनमर्ग बोगद्याचे  उद्घाटन आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या लोकांच्या  दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाल्याचे घोषित करत मोदी यांनी  अधोरेखित केले की हा बोगदा सोनमर्ग, कारगिल आणि लेहमधील लोकांचे जीवन  लक्षणीयरीत्या सुखकर बनवेल.हिमस्खलन, जोरदार हिमवर्षाव आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींमुळे नेहमीच रस्ते बंद होऊन निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये या बोगद्यामुळे घट होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.  तसेच या बोगद्यामुळे मोठ्या रुग्णालयांकडे जाण्यासाठी रस्त्यांच्या उपलब्धतेत सुधारणा होईल आणि अत्यावश्यक पुरवठ्याची उपलब्धता देखील सुनिश्चित झाल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये घट होणार आहे यावर त्यांनी भर दिला.

सोनमर्ग बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला आपले सरकार सत्तेत आल्यानंतर 2015 मध्ये सुरुवात झाली याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांच्या प्रशासनाखालीच या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हिवाळ्यात सोनमर्ग सोबत संपर्कव्यवस्था कायम राखण्याचे काम हा बोगदा करेल आणि या भागातील पर्यटनात वाढ करेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. येत्या काही दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक रस्ते आणि रेल्वे संपर्कव्यवस्था प्रकल्प प्रकल्प पूर्ण होणार असल्यावर त्यांनी भर दिला. जवळच काम सुरू असलेल्या आणखी एका महत्त्वाच्या संपर्कव्यवस्था प्रकल्पाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि काश्मीर खोऱ्यासोबत जोडणाऱ्या या आगामी रेल्वे जोडणी प्रकल्पाविषयी असलेल्या उत्सुकतेची दखल घेतली. नव्या जम्मू आणि काश्मीरचा भाग म्हणून नवे रस्ते, रेल्वे, रुग्णालये आणि महाविद्यालयांच्या निर्मितीला त्यांनी अधोरेखित केले. या बोगद्यासाठी आणि विकासाच्या नव्या युगासाठी प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन केले.  

2047 पर्यंत एक विकसित देश होण्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीला अधोरेखित करत पंतप्रधानांनी यावर भर दिला की कोणताही प्रदेश किंवा कुटुंब मागे राहता कामा नये. सबका साथ सबका विकास या भावनेने सरकार काम करत आहे आणि गेल्या 10 वर्षात जम्मू आणि काश्मीरसह देशभरातील 4 कोटीपेक्षा जास्त  गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढील काही वर्षात आणखी 3 कोटी नवी घरे गरिबांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेसह भारतातील लक्षावधी लोकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरात नवीन आयआयटी, आयआयएम, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये, परिचारिका महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे युवा वर्गाच्या शिक्षणाला पाठबळ  मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दशकात स्थापन झालेल्या अनेक उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांचा लाभ स्थानिक युवा वर्गाला मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तृत पायाभूत सुविधा विकासामुळे जगातील सर्वात जास्त उंचीवरील बोगद्यांपैकी काही बोगदे आणि उंचावरील रेल्वे-रस्ते पुलांची उभारणी होत असल्याने जम्मू आणि काश्मीर बोगदे, उंच पूल आणि रोपवेज यांचे केंद्र बनत असल्यावर त्यांनी भर दिला. अलीकडेच एका प्रवासी रेल्वेची यशस्वी चाचणी झालेल्या चिनाब रेल्वे पुलाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेची दखल पंतप्रधानांनी घेतली. यावेळी पंतप्रधानांनी काश्मीरची रेल्वे संपर्कव्यवस्था वृद्धिंगत करणाऱ्या केबल ब्रिजसह, झोजिला, चेन्नई नशरी आणि सोनमर्ग बोगदा प्रकल्प आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. शंकराचार्य मंदिर, शिवखोरी आणि बालताल-अमरनाथ रोपवेज बरोबरच कटरा – दिल्ली द्रुतगती मार्ग यांसारख्या योजनांची देखील माहिती दिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि दोन रिंग रोड प्रकल्पांसह 42,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाचे रस्ते संपर्कव्यवस्था प्रकल्प सुरू असल्यावर त्यांनी भर दिला. सोनमर्गसारखे 14 पेक्षा जास्त बोगदे तयार केले जात जम्मू आणि काश्मीर हा देशातील सर्वात जास्त संपर्कव्यवस्था असलेला प्रदेश बनणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.   

विकसित भारताच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासात पर्यटन क्षेत्राचे लक्षणीय योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की संपर्कव्यवस्थेमध्ये झालेल्या सुधारणांमुळे यापूर्वी अपरिचित आणि दुर्गम राहिलेल्या जम्मू काश्मीर मधील प्रदेशांना पर्यटक भेट देऊ शकतील. गेल्या दशकभरात या भागात प्रस्थापित झालेली शांतता आणि जम्मू काश्मीरच्या प्रगतीमुळे पर्यटन क्षेत्राला लाभ झाला आहे. “वर्ष 2024, मध्ये 2 कोटींहून अधिक पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली, त्यातही सोनमर्ग येथे पर्यटकांची गेल्या दहा वर्षांत सहापट  वाढ  झाली.” या वृद्धीमुळे हॉटेल, होमस्टे, ढाबा, वस्त्र प्रावरण दुकान आणि टॅक्सी सेवा अशा स्थानिक व्यापाराला चालना मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले

“एकविसाव्या शतकातील जम्मू काश्मीर विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे.” असे त्यांनी सांगितले. हा भूप्रदेश आपला सर्व कठीण काळ मागे सारत पृथ्वीवरील नंदनवन ही आपली ओळख पुन्हा नव्याने मिळवत आहे. लाल चौक भागात लोक आता रात्रीच्या वेळी देखील आईस्क्रीमचा आनंद घेत असतात आणि हा भाग अतिशय वर्दळीचा असतो, असे ते म्हणाले. पोलो व्ह्यू मार्केटला नवीन निवासस्थान केंद्रात रूपांतरित केल्याबद्दल त्यांनी स्थानिक कलाकारांचे कौतुक केले, संगीतकार, कलाकार आणि गायक या ठिकाणी वरचेवर सादरीकरण करतात.श्रीनगर मधील जनता आता चित्रपटगृहात चित्रपटांचा आणि दुकानांमध्ये कुटुंबासमवेत सहजतेने आनंद घेऊ शकते. असे लक्षणीय बदल   एकट्या सरकारद्वारे केले जाऊ शकत नाहीत असे सांगून लोकशाही मजबूत करण्याचे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे श्रेय  जम्मू-काश्मीरच्या लोकांनाही तितकेच जाते, असे ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर मधील युवकांचे भविष्य उज्ज्वल असून क्रीडा क्षेत्रात अगणित संधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. काही महिन्यांपूर्वी श्रीनगर येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा त्यांनी उल्लेख केला आणि या मॅरेथॉनला उपस्थित असलेल्या सर्वांसाठीच तो अनुभव अतिशय सुंदर असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ आणि दिल्लीत झालेल्या बैठकीत त्याबद्दलची त्यांनी केलेली उत्साही चर्चाही त्यांनी आठवली.

जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासात हा एका नव्या युगाचा आरंभ असून या प्रदेशात सुमारे चाळीस वर्षांनंतर अलीकडेच झालेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आणि रम्य अशा दल सरोवर परिसरात झालेल्या कार रेस चे उदाहरण त्यांनी दिले. गुलमर्ग येथे चार खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे आयोजन झाले असून पुढील महिन्यात या स्पर्धांची पाचवी आवृत्ती होणार आहे, त्यामुळे आता गुलमर्ग हे भारतातील हिवाळी स्पर्धांची राजधानी म्हणून उदयाला येत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत, जम्मू आणि काश्मीरमधील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देशभरातील 2,500 खेळाडूंनी सहभाग घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  या प्रदेशात 90 हून अधिक खेलो इंडिया केंद्रांच्या स्थापना झाली असून 4,500 स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर मधील युवकांना उपलब्ध होणाऱ्या नवीन संधींबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की जम्मू आणि अवंतीपोरामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स चे बांधकाम झपाट्याने सुरू आहे, ज्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी देशाच्या इतर भागांत जाण्याची गरज कमी झाली आहे.जम्मू मधील आय आय टी , आय आय एम, तसेच केंदीय विद्यापीठ परिसरांमध्ये उत्तम शिक्षण दिले जात असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. जम्मू व काश्मीर सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांचा तसेच पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन प्रगती साधत असलेल्या स्थानिक कारागीर व हस्तकलाकारांच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. या  क्षेत्रात रु 13000 कोटी च्या गुंतवणुकीसह नवे उद्योग आकर्षित करण्यासाठी सातत्याने सुरु असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले यातून युवकांसाठी हजारो रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीर बँकेचा व्यवसाय गेल्या 4 वर्षांत रु 1.6 लाख कोटींवरून वाढून रु 2.3 लाख कोटी झाला असल्याचं त्यांनी सांगितले. बँकेची कर्जवाटप करण्याची क्षमता वाढल्याचा लाभ त्या भागातील  युवक, शेतकरी, बागायतदार, दुकानदार, तसेच उद्योजकांना झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पूर्वीच्या जम्मू व काश्मीर मध्ये मोठा बदल घडून आला असून आता विकासाला चालना मिळाली आहे. भारताचा मुकुटमणी असलेले जम्मू व काश्मीर जेव्हा प्रगतीच्या रत्नांनी मढेल , तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असे ते म्हणाले. काश्मीर अधिक सुंदर आणि समृद्ध व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील आबालवृद्धांनी  प्रगतीला सतत हातभार लावल्याचे त्यांनी सांगितले. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्यायोगे त्या भागाला व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी  जम्मू व काश्मीरची जनता अथक प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आपले भाषण संपवताना पंतप्रधानांनी जम्मू व काश्मीरच्या जनतेला त्यांच्या विकासासाठी पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि नव्या विकासप्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा , मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह  व अजय टमटा तसेच इतर अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी:

सोनमर्ग बोगदा प्रकल्प 12 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी रु 2700 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये 6.4किमी लांबीचा मुख्य सोनमर्ग बोगदा, त्याला जोडणारे मार्ग समाविष्ट आहेत. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 8650 फूट उंचीवर असून लेह मार्गे  श्रीनगर ते सोनमर्ग या प्रवासासाठी सर्व मोसमांमध्ये उपयोगी पडेल. या प्रकल्पामुळे कोसळणाऱ्या दरडी व हिमस्खलनाचा धोका असणाऱ्या मार्गांना सुरक्षित पर्याय मिळाला असून लडाख या लष्करी महत्वाच्या भागाकडे होणारे  दळणवळण सुरक्षित व सुकर होईल. या मार्गामुळे सोनमर्गकडे बारमाही सुरक्षित प्रवास करता येईल.  अशा रीतीने हिवाळी पर्यटन व  साहस पर्यटनाला चालना मिळेल त्यायोगे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतील.  

झोजिला बोगदा 2028 साला पर्यंत पूर्ण होणार असून सोनमर्ग प्रकल्पामुळे या मार्गाचे अंतर 49  किमी वरून 43 किमी इतके कमी होईल व वाहनांचा वेग सध्याच्या 30  किमी प्रती तासा वरून 70 किमी प्रति तासापर्यंत वाढेल. यामुळे श्रीनगर खोरे  ते लडाख पर्यंत जाणाऱ्या  राष्ट्रीय महामार्ग क्र 1 वरील प्रवास अधिक सुरळीत होईल.

तिथल्या खराब हवेशी जुळवून घेत या अभियांत्रिकी चमत्काराला प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या बांधकाम मजुरांचीही पंतप्रधानांनी यावेळी भेट घेतली व त्यांचे कौतुक केले.

 

 

N.Chitale/Sushama/shailesh/Bhakti/Uma/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai