‘सर्वांसाठी घरे‘ या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमधील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपडी (जेजे) क्लस्टरमधील रहिवाशांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमान अपार्टमेंटच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला. स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये राहायला आलेल्या लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या गृहनिर्माण उपक्रमाने घडवलेल्या परिवर्तनाबद्दल समाधान व्यक्त केले. आतापर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि आता कायमस्वरूपी घरे मिळालेल्या कुटुंबांच्या जीवनातील सकारात्मक बदल या संवादामधून प्रतिबिंबित झाला.
संवादादरम्यान पंतप्रधानांनी लाभार्थ्यांना विचारले, ” तुम्हाला घर मिळाले ना?, त्यावर एका लाभार्थ्याने उत्तर दिले, “होय, सर, आम्हाला घर मिळाले. आम्ही आपले खूप आभारी आहोत, तुम्ही आम्हाला झोपडीमधून राजवाड्यात आणले”. पंतप्रधानांनी नम्रतेने सांगितले की, त्यांच्याकडे घर नाही, पण त्यांना सर्वांना घर मिळाले आहे.
संवादादरम्यान एका लाभार्थ्याने कृतज्ञता व्यक्त करत म्हटले की, होय सर, तुमचा झेंडा सदैव उंच फडकत राहो आणि तुमचा नेहमी विजय होवो. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी जनतेच्या जबाबदारीवर भर देत सांगितले की, आपला झेंडा उंच राहिला पाहिजे आणि तो उंच फडकवत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे.”
कष्टमय जीवनापासून, ते आता घर मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना लाभार्थी पुढे म्हणाला, ‘इतकी वर्षे आम्ही प्रभू रामाची वाट पाहत होतो. त्याचप्रमाणे आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि तुमच्या प्रयत्नांमधून आम्ही झोपडपट्टीतून या इमारतीमध्ये आलो. याहून अधिक कोणता आनंद असू शकतो? तुम्ही आमच्या इतके जवळ आहात, हे आमचे भाग्य आहे.”
एकता आणि प्रगतीवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या देशात आपण एकत्रितपणे बरेच काही साध्य करू शकतो, यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा इतरांना मिळायला हवी.”
गरीब कुटुंबातील मुलांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीलाच मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत असले तरी ते विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचे दर्शन घडवून देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. या मुलांनी आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिले. आपल्याला सैनिक व्हायचे आहे, असे एका लाभार्थ्याने सांगितल्यावर, पंतप्रधानांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
याशिवाय पंतप्रधानांनी लाभार्थ्यांना त्यांच्या नवीन घरांबाबतच्या आकांक्षांबद्दल विचारले. त्यावर एका मुलीने आपल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सांगितले. तिला काय व्हायचे आहे असे विचारले असता तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले, “शिक्षिका”. यानंतर झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांच्या समस्यांवर देखील चर्चा झाली. श्रमिक किंवा ऑटो रिक्षा चालक म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाना आता स्वतःसाठी उज्ज्वल संधी प्राप्त होतील असे पंतप्रधान म्हणाले. आगामी सण त्यांच्या नवीन घरात साजरे करण्याची त्यांची योजना कशी आहे, असेही पंतप्रधानांनी विचारले असता सर्वजण सण एकत्रितपणे साजरे करुन समुदायामध्ये एकता आणि आनंदाची भावना निर्माण करतील, असे लाभार्थ्यांनी सांगितले.
ज्यांना आतापर्यंत स्वतःचे कायमस्वरूपी घर मिळालेले नाही अशा सर्वांना घरे देणे ही आपली हमी असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संवादाचा समारोप करताना सांगितले. आणि या देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत असेल याची सरकार खात्री देत आहे, असे ते म्हणाले.
स्वाभिमान अपार्टमेंट्स ने दिल्ली के मेरे गरीब भाई-बहनों के सपनों को नई ऊंचाई दी है। इससे यहां के बच्चों को भी जीवन में आगे बढ़ने का एक नया हौसला मिला है। उनसे बातचीत कर मन को बहुत संतोष हुआ है। pic.twitter.com/iUFB589tAD
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2025
***
S.Kane/R.Agashe/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com