Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा ठाम विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या घडीला भारताने राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे जागतिक प्रतिक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आगामी वर्षात देशाची प्रतिमा आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मधील आपले संकल्पित ध्येय उद्दिष्ट देखील उपस्थितांसमोर मांडले.  जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनणे, देशातल्या युवा वर्गाचे  स्टार्ट – अप आणि उद्योजकतेच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे, कृषी क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करणे, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणे आणि जीवन सुलभतेवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हे वर्ष भारताचे असेल यावर त्यांनी आपल्या संबोधनात भर दिला.

नवी दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन आणि पायाभरणी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे अभिनंदनही केले. आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले आहे, त्यात गरिबांसाठी घरे तसेच शाळा आणि महाविद्यालयांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यावेळी जनतेला, महिलांना विशेषत: जे लोक एका अर्थाने जगण्यातल्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत अशा सर्वांना शुभेच्छाही दिल्या.  झोपड्यांच्या जागी आता पक्की घरे आणि भाड्याच्या घरांच्या जागी स्वत:ची घरे असणे म्हणजे जगण्याची खऱ्या अर्थाने नवी सुरुवात असल्याची भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. आज जनतेला दिली गेलेली घरे म्हणजे स्वाभिमानाचे, आत्मसन्माचे आणि नव्या आकांक्षा तसेच स्वप्नांचे प्रतिक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या सगळ्यांचा आनंद साजरा करण्यासाठी, त्याचा एक भाग बनण्यासाठीच आपण स्वतः उपस्थित आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतकाळातल्या आणीबाणीच्या अंधारमय दिवसांचेही स्मरण केले. आणिबाणीच्या काळात आपण तसेच आपल्या पक्षाचे अनेक सहकारी भूमिगत चळवळींमध्ये सहभागी होतो, आणि त्यावेळी आम्ही सगळे अशोक विहार इथे वास्तव्याला थांबलो होतो याची आठवण त्यांनी उपस्थितांना सांगितली.

आज अवघा देश विकसित भारताच्या जडण घडणीच्या प्रक्रियेशी जोडला गेला असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. या विकसित भारतात देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर मिळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आम्ही निर्धारपूर्वक काम करत आहोत ही बाब पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखित केली. या संकल्पपूर्तीच्या वाटचालीत दिल्लीची मोठी भूमिका असल्याचे  पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.   त्यामुळेच केंद्र सरकारने झोपड्यांच्या जागी पक्के घर देण्यासाठी योजना सुरु केली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी कालकाजी एक्सटेंशन येथे झोपडपट्टीवासियांसाठी तीन हजारांहून अधिक घरांचे उद्घाटन करण्याची आपल्याला संधी मिळाली होती, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. ते पुढे म्हणाले की, अशी कुटुंबे, ज्यांच्या अनेक पिढ्या कोणतीही आशा न ठेवता झोपडीत राहिल्या आहेत, ते प्रथमच पक्क्या घरात रहायला गेले आहेत. ही केवळ सुरुवात आहे, असे आपण म्हणालो होतो, त्या गोष्टीचेही त्यांनी स्मरण केले. सुमारे 1,500 घरांच्या चाव्या आज त्यांच्या मालकांच्या सुपूर्द करण्यात आल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. “स्वाभिमान अपार्टमेंटमुळे लोकांचा स्वाभिमान आणखी उंचावेल,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्यात एक नवीन उत्साह आणि ऊर्जा असल्याचे जाणवले, मग घराचा मालक कोणीही असो.

सरकारच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत त्यांच्या सरकारने 4 कोटींहून अधिक लोकांचे स्वतःचे पक्के घर असावे, हे स्वप्न पूर्ण केले.

आज स्वतःचे घर नसलेल्या सर्वांना मूलभूत सोयीसुविधांनी सुसज्ज घर नक्कीच मिळेल, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. ही पावले गरीब व्यक्तीचा आत्मसन्मान वाढेल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, हीच विकसित भारताची खरी ऊर्जा आहे, असे मोदी म्हणाले. दिल्लीत सुमारे तीन हजार नवीन घरे बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. येत्या वर्षभरात हजारो नवीन घरे शहरवासीयांसाठी उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “या भागात मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी राहतात आणि त्यांची घरे बरीच जुनी होती. नवीन, आधुनिक घरांच्या बांधकामामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल, जे त्यांच्या कल्याणाप्रति आमची वचनबद्धता दर्शविते.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नरेला सब-सिटीच्या बांधकामाला गती देऊन केंद्र सरकार दिल्लीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना  देणार असल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले.

विकसित भारताला आकार देण्यामधील शहरांच्या महत्वाच्या भूमिकेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, ही शहरी केंद्रे अशी आहेत, जिथे देशभरातील नागरिक आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी येतात. सर्व नागरिकांना दर्जेदार घरे आणि शिक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपली शहरे, हा विकसित भारताचा पाया आहे. लोक मोठी स्वप्न घेऊन इथे येतात आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात. आपल्या शहरातील प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार जीवन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गृहनिर्माण क्षेत्रातील महत्वाच्या प्रगतीची माहिती देताना, पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान आवास योजनेच्या (शहरी)’ यशस्वी अंमलबजावणीचा उल्लेख केला, ज्याअंतर्गत गेल्या दशकात देशभरात 1 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली. “गेल्या दहा वर्षांत या योजनेअंतर्गत दिल्लीत 30,000 पेक्षा अधिक नवीन घरे बांधण्यात आली. आता आम्ही या प्रयत्नांचा विस्तार करत आहोत, आणि पुढील टप्प्यात देशभरातील शहरी गरीब कुटुंबांसाठी आणखी एक कोटी घरे बांधली जातील.” ते म्हणाले. पंतप्रधानांनी मध्यमवर्गीय कुटुंबांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यावरही  प्रकाश टाकला, ज्यात वार्षिक नऊ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात सवलत  देण्यात आली.  “गरीब असो वा मध्यमवर्गीय, प्रत्येक कुटुंबाला आपल्या मालकीचे चांगले घर मिळावे, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे,” असे ते म्हणाले.

शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सर्व बालकांना, विशेषतः वंचित घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण आणि संधी मिळण्याचे प्रमाण वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर आहे.” प्रत्येक कुटुंबाला असे वाटते की आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे आणि म्हणूनच केंद्र सरकार सातत्याने उच्च दर्जाच्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे,” असे ते म्हणाले. याशिवाय पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे देखील कौतुक केले. याद्वारे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत असल्याने वंचित घटकांसह सर्व घटकांमधील बालकांना यशस्वी होण्याची संधी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे गरीब कुटुंबातील मुलांचा डॉक्टर, अभियंते आणि व्यावसायिक होण्याचा मार्ग प्रशस्त झाला  आहे, असे ते म्हणाले. भारताच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा विस्तार करण्यासाठी त्यांनी नवीन सीबीएसई इमारत बांधण्याची घोषणा केली. “सीबीएसईची नवीन इमारत आधुनिक शिक्षणाचा विस्तार आणि प्रगत परीक्षा पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करेल,” असे ते म्हणाले.

उच्च शिक्षण क्षेत्रात दिल्ली विद्यापीठाची प्रतिष्ठा सातत्याने मजबूत होत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दिल्लीतील युवकांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

आज पायाभरणी झालेल्या नवीन संकुलांमुळे हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. बहुप्रतिक्षित पूर्व आणि पश्चिम कॅम्पस आता अनुक्रमे सूरजमल विहार आणि द्वारका येथे विकसित केले जातील,” असे ते पुढे म्हणाले.  याशिवाय नजफगढमध्ये वीर सावरकर यांच्या नावाने नवीन महाविद्यालयही बांधले जाणार आहे.

एकीकडे  केंद्र सरकार दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार उघडपणे खोटे बोलत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. दिल्ली राज्य सरकारने विशेषत: शिक्षणासाठी असलेल्या निधीचे गैरव्यवस्थापन करून लक्षणीय नुकसान केले आहे. “परिस्थिती अशी आहे की “समग्र शिक्षा अभियान” अंतर्गत दिलेला निधीही राज्य सरकारने मुलांच्या शिक्षणावर खर्च केला नाही. असे पंतप्रधान म्हणाले. “गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचार वाढला असून मद्य घोटाळा, शालेय शिक्षण, गरिबांसाठीच्या आरोग्य सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि नोकर भर्ती अशा अनेक पातळ्यांवर विविध घोटाळे झालेले आहेत.  काही कट्टर भ्रष्ट व्यक्तींनी अण्णा हजारे यांना पुढे करून दिल्लीला या संकटात ढकलले आहे,” असे त्यांनी सांगितले. दिल्लीने नेहमीच एका उत्तम प्रशासनाची कल्पना केली आहे . परंतु सत्ताधारी राज्य सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि परिस्थिती आणखीच बिघडली आहे. आणि म्हणूनच  दिल्लीकर जनतेने या संकटाशी लढण्याचा निर्धार केला आहे, बदल घडवून आणण्याचा  आणि शहराला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

केंद्र सरकार दिल्लीत रस्ते, मेट्रो प्रकल्प, रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलांसारखे मोठे प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र  राज्य सरकार आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असून विशेषतः यमुना नदी स्वच्छ करणाच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. यमुना नदीकडे दुर्लक्ष केल्याने लोकांना प्रदूषित पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

चांगल्या राष्ट्रीय योजनांचा लाभ दिल्लीतील लोकांपर्यंत पोहोचावा, हे आपले ध्येय आहे यावर पंतप्रधान  मोदी यांनी भर दिला. केंद्र सरकारच्या योजनांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना आर्थिक लाभ आणि त्‍यातून  बचत या दोन्ही गोष्टी होत  आहेत. ते म्हणाले की, सरकार वीज बिल शून्य करत आहे आणि कुटुंबांना वीज निर्मितीची संधी देत आहे. पंतप्रधान  मोदी म्हणाले की, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून वीज उत्पादक कुटुंबे  बनत आहेत, केंद्र सरकार सौर पॅनेल बसवण्यासाठी 78,000 रुपये मदत देत आहे.

दिल्लीतील सुमारे 75 लाख गरजू लोकांना केंद्र सरकार मोफत धान्य  देत असल्याचे  मोदी यांनी  अधोरेखित केले. “वन नेशन, वन रेशन कार्ड” योजनेमुळे दिल्लीतील लोकांना मोठी मदत झाली आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, 80% पेक्षा जास्त सवलतीत स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 500 जन औषधी केंद्रे दिल्लीत स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामुळे लोकांना  दरमहा हजारो रुपयांची बचत  होण्‍यासाठी  मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  अधोरेखित केले की , दिल्लीतील लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे, ज्यामध्ये मोफत उपचार केले जातात परंतु राज्य सरकार आयुष्मान योजना दिल्लीत लागू करू देत नाही. त्यामुळे दिल्लीतील जनता त्रस्त आहे.

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून दिल्लीतील लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर भर देताना पंतप्रधान म्हणाले, “केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेचा विस्तार केला आहे, त्यानुसार आता 70  वर्षांवरील सर्व  वृद्ध नागरिकांना यातून मदत  केली जाणार  आहे. तथापि, राज्य सरकार करीत असलेला   स्वार्थी विचार, उद्दामपणा आणि आडमुठेपणामुळे दिल्लीतील लोकांना, विशेषत: वृद्धांना याचा फायदा होत नाही. दिल्लीतील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील वसाहती नियमित करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवरही पंतप्रधान  मोदी यांनी  प्रकाश टाकला आणि त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, असे ते म्हणाले.  पाणी, मलनि:स्सारण यांसारख्या अत्यावश्यक सेवा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन पंतप्रधान  मोदी यांनी दिल्लीतील जनतेला दिले.

दिल्लीच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील  प्रगतीवर प्रकाश टाकत ते म्हणालेप्रत्येक घरापर्यंत स्‍वयंपाकासाठी  पाइपद्वारे नैसर्गिक वायू पोहोचविण्‍याची  तरतूद करणेनवीन महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे.  पंतप्रधान म्हणाले, “या प्रकल्पांमध्ये राज्याचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे, ही सर्व  कामे वेगाने सुरू आहे. दिल्लीतील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासाठी या घडामोडी महत्त्वपूर्ण  ठरल्‍या आहेत. शिवमूर्ती ते नेल्सन मंडेला मार्गापर्यंत बोगदा बांधणे आणि अनेक प्रमुख द्रुतगती मार्गांना जोडणे यासह अलीकडेच प्रस्तावित करण्यात आलेल्या वाहतूक उपायांचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून भविष्यात वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी 2025 साठी तयार केलेल्‍या  त्यांच्या ‘व्हिजन’ची रूपरेषा सांगून भाषणाचा समारोप केला. “2025 हे वर्ष दिल्लीत सुशासनाचे एक नवीन युग घेऊन येईल. हे युग ‘राष्ट्र प्रथम, देशवासी प्रथम’ अशी  भावना  बळकट करेलराष्ट्र उभारणी आणि लोककल्याण  केंद्रित असलेल्या नवीन राजकारणाचा प्रारंभ होईल,” असे नरेंद्र  मोदी म्हणाले. दिल्लीतील नवीन शैक्षणिक संस्थांना  आणि  ज्या लोकांना  त्यांच्या घरकुलाच्‍या  किल्ल्या  देण्यात आल्यत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन  केले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, दिल्लीचे नायब राज्यपाल  विनय कुमार सक्सेना हे देखील इतर मान्यवरांसह  कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सर्वांसाठी घरे’ या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपरी  क्लस्टरमधील रहिवाशांसाठी नव्याने बांधलेल्या सदनिकांना भेट दिली.

पंतप्रधानांनी झुग्गी झोपरी क्लस्टरमधील रहिवाशांसाठी 1,675 नव्याने बांधलेल्या सदनिकांचे उद्घाटन केले आणि अशोक विहार, दिल्ली येथील स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द केल्या. नव्याने बांधलेल्या सदनिकांचे  उद्घाटन दिल्ली विकास प्राधिकरणद्वारे दुसऱ्या यशस्वी इन-सिटू झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या पूर्णत्वाला चिन्हांकित करेल. दिल्लीतील जेजे क्लस्टरमधील रहिवाशांना योग्य सोयी आणि सुविधांनी सुसज्ज करून चांगले आणि आरोग्यदायी राहणीमान प्रदान करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

सरकारने सदनिकांच्या बांधकामासाठी खर्च केलेल्या प्रत्येक रु. 25 लाखामागे, पात्र लाभार्थीनां एकूण रकमेच्या 7% पेक्षा कमी रक्कम द्यावी लागते, ज्यामध्ये नाममात्र योगदान म्हणून 1.42 लाख रुपये आणि पाच वर्षांच्या देखभालीसाठी 30,000 रुपये समाविष्ट आहे.

पंतप्रधानांनी नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) आणि सरोजिनी नगर येथील जनरल पूल रेसिडेन्शिअल एकोमोडेशन (GPRA) टाइप-II क्वार्टर्स या दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले..

नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरने 600 हून अधिक जीर्ण क्वार्टर्सच्या जागी अत्याधुनिक कमर्शिअल टॉवर्स उभारून  परिसराचा कायापालट केला आहे, यामुळे आता सुमारे 34 लाख स्क्वेअर फूट व्यावसायिक जागा प्रगत सुविधांसह उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पात झिरो-डिस्चार्ज संकल्पना, सौर ऊर्जा निर्मिती आणि पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली यासारख्या तरतुदींसह हरित इमारत  पद्धतींचा समावेश आहे.

सरोजिनी नगर येथील GPRA टाईप-II क्वार्टर्समध्ये 28 टॉवर्सचा समावेश आहे ज्यात 2,500 निवासी युनिट्स असून आधुनिक सुविधा आणि जागेचा कार्यक्षम वापर केला आहे. प्रकल्पाच्या आराखड्यात पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा, सांडपाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सौरऊर्जेवर चालणारे वेस्ट कॉम्पॅक्टर यांचा समावेश आहे जे पर्यावरणाविषयी जागरूक राहण्यास प्रोत्साहन देतात.

सुमारे 300 कोटी रुपये खर्चून  द्वारका, दिल्ली येथे बांधलेल्या सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यामध्ये कार्यालये, सभागृह, प्रगत डेटा सेंटर, सर्वसमावेशक जल व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश आहे. ही इको-फ्रेंडली इमारत उच्च पर्यावरणीय मानकांनुसार बांधण्यात आली आहे आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) च्या प्लॅटिनम रेटिंग मानकांनुसार डिझाइन करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठात 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यात पूर्व दिल्लीतील सूरजमल विहार येथील ईस्टर्न कॅम्पस आणि द्वारका येथील वेस्टर्न कॅम्पसचा समावेश आहे. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे वीर सावरकर महाविद्यालय बांधण्याचाही समावेश आहे, जिथे  शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा देखील असतील.

***

S.Kane/T.Pawar/R.Agashe/ B.Sontakke/S.Bedekar/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com