Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद


 

तिसऱ्या वीर बाल दिवसाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला क्षेत्रातील पुरस्कार या विजेत्यांनी मिळविले आहेत.

पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.

वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन करण्यात कुशल अन्य बालकाशी संवाद साधताना मोदी यांनी त्याच्या प्रशिक्षणाविषयी विचारले असता त्याने सांगितले की त्याने संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसून तो हिंदी, इंग्रजी, ऊर्दू आणि कश्मिरी या चार भाषांमध्ये गाऊ शकतो. तो पुढे म्हणाला की त्याची स्वतःची यूट्यूब वाहिनी असून तो कार्यक्रमांमध्येही गायन करतो. मोदी यांनी त्याच्या प्रतिभेसाठी त्याची प्रशंसा केली.

मोदी यांनी युवा बुद्धिबळपटूला विचारले की त्याला बुद्धिबळ खेळायला कुणी शिकवले. यावर तो मुलगा म्हणाला की त्याच्या वडिलांकडून आणि पुढे यूट्यूबवर पाहून तो शिकला.

25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी लदाखमधील कारगिल युद्ध स्मारकापासून ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंतचे 1251 किलोमीटर अंतर सायकल चालवित 13 दिवसांत पार करणाऱ्या एका लहान मुलाची यशोगाथा पंतप्रधानांनी ऐकली. दोन वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी याच मुलाने मणिपुरातील मोइरंग इथे असलेले आयएनए स्मारक ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंतचे 2612किलोमीटर अंतर 32 दिवसांत सायकल चालवून पूर्ण केले आहे. दिवसाला आपण कमाल 129.5 किलोमीटर अंतर सायकल चालविल्याचे या मुलाने पंतप्रधानांना सांगितले.

अर्ध-शास्त्रीय नृत्य प्रकारात एका मिनिटात 80 फिरक्या आणि एका मिनिटात 13 संस्कृत श्लोकांचे पाठांतर करण्याचे दोन आंतरराष्ट्रीय विक्रम केलेल्या बालिकेने पंतप्रधानांना सांगितले की ती हे दोन्ही प्रकार यूट्यूबवर पाहून शिकली.

राष्ट्रीय स्तरावरील ज्युडोत सुवर्ण पदक विजेतीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी तिची ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची आकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी तिला सर्वोत्तम शुभेच्छा दिल्या.

पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी ‘सेल्फ-स्टॅबिलायझिंग’ चमचा बनविणाऱ्या आणि मेंदूच्या वयाचा अंदाज बांधण्याचे मॉडेल विकसित केलेल्या मुलीशी पंतप्रधानांनी संवाद साधला. या मुलीने पंतप्रधानांना सांगितले की तिने याकरिता दोन वर्षे काम केले असून पुढेही या विषयावरील संशोधन सुरू ठेवण्याचा तिचा मानस आहे.

कर्नाटकी संगीत आणि संस्कृत श्लोकांचा मेळ साधून हरिकथा कथनाचे जवळपास 100 कार्यक्रम करणाऱ्या बालिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

गेल्या दोन वर्षांत पाच देशांमधील पाच उंच शिखरे सर केलेल्या लहान गिर्यारोहकाशी बोलताना पंतप्रधानांनी तिला इतर देशांमध्ये भारतीय म्हणून आलेल्या अनुभवाविषयी विचारले. लोकांकडून तिला भरपूर प्रेम आणि ऊबदार वागणूक मिळाल्याचे या बालिकेने सांगितले. ती पुढे म्हणाली की मुलींचे सबलीकरण आणि शारिरीक आरोग्य बळकटीकरणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवून तिने गिर्यारोहण केले.

कलात्मक रोलर स्केटिंग करणाऱ्या आणि यंदा न्यूझिलंडमध्ये झालेल्या रोलर स्केटिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेल्या, तसेच यापूर्वी 6 राष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या बालिकेची यशोगाथा पंतप्रधानांनी ऐकली. या महिन्यात थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या पॅरा-ॲथलीट बालिकेच्या यशाची कहाणी पंतप्रधानांनी ऐकली. तसेच, आणखी एका ॲथलीट बालिकेचा भारोत्तोलनाच्या विविध प्रकारांमध्ये सुवर्ण पदके जिंकताना आणि जागतिक विक्रम प्रस्थापित करतानाचे अनुभव पंतप्रधानांनी ऐकले.

आग लागलेल्या इमारतीतील अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या एका शौर्य पुरस्कार विजेत्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. बुडणाऱ्यांचे जीव वाचविलेल्या लहान मुलाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

मोदी यांनी सर्व बालकबालिकांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना उत्तमोत्तम शुभेच्छा दिल्या.

***

JPS/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com