नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2024
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या ‘सबका प्रयास’ या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.
पंतप्रधानांनी श्रीनगर येथील नोडल केंद्र एनआयटी मधील, ‘बिग ब्रेन टीम’मधील सईदा यांच्याशी संवाद साधला. सईदा यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयासाठी ऑटिझमग्रस्त मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ‘व्हर्च्युअल रिॲलिटी फ्रेंड’ नावाचे साधन तयार केले आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांना याचा लाभ होईल.
मुले हे उपकरण संवादात्मक कौशल्य वाढवण्यासाठी वापरू शकतील आणि अशा दिव्यांगजनांसाठी ते ‘मित्र’ म्हणून काम करेल. हे उपकरण त्यांना त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप इत्यादींवर वापरात येऊ शकेल अशी माहिती सईदा यांनी दिली. हे उपकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आले असून ते व्हर्च्युअल रिॲलिटी सोल्यूशन आहे. त्यामुळे ऑटिझमग्रस्तांना भाषा शिकणे किंवा लोकांशी संभाषण करणे अशा दैनंदिन व्यवहारांमध्ये मदत होईल.
दिव्यांग मुलांच्या सामाजिक जीवनावर या साधनाचा काय प्रभाव पडतो असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारल्यावर सईदा म्हणाल्या की ते त्यांच्या सामाजिक संवादादरम्यान काय योग्य आणि काय अयोग्य हे शिकू शकतील आणि या साधनाच्या मदतीने लोकांशी कसा संपर्क साधावा हे त्यांना कळू शकेल याच ज्ञानाचा वापर ते नंतर वास्तविक जीवनात करू शकतील. आपल्या टीम मध्ये असलेल्या 6 सदस्यांना तांत्रिक ज्ञान आणि भौगोलिक स्थानाच्या बाबतीत वैविध्यपूर्ण ज्ञान असून त्यामधील एक जण परदेशी आहे अशी माहिती त्यांनी दिली. तुमच्या टीम मधील एखाद्या सदस्याने अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांबरोबर त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद साधला आहे का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. त्यावर त्यांच्या टीम मधील सदस्याच्या नातेवाईकांपैकी एक ऑटिझम ग्रस्त असून याशिवाय ऑटिझम वर उपचार करणाऱ्या केंद्रातील मुलांसोबतही त्यांच्या समोरील आव्हानांना समजून घेण्यासाठी आपण संवाद साधल्याचे सईदा यांनी सांगितले. ‘बिग ब्रेन टीम’ चे आणखी एक सदस्य, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेत असलेले यमनमधील विद्यार्थी, मोहम्मद अली यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसारख्या उत्कृष्ट उपक्रमासाठी पंतप्रधान आणि सरकारचे आभार मानले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांनी पुढील काळात अशा महान उपक्रमांत भाग घेण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. दिव्यांग बालकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी टीमचे आभार मानले. प्रत्येक मुलाला मोठे होण्याचा, स्वतःची प्रगती करण्याचा अधिकार असून समाजातील कोणीही मागे पडता कामा नये, अशा आव्हानांवर मात करण्यासाठी अभिनव उपायांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. हे उपाय लाखो मुलांसाठी उपयुक्त ठरतील आणि हे उपाय स्थानिक पातळीवर विकसित केले जात असले तरी जागतिक स्तरावरही त्याची आवश्यकता असेल आणि त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या गरजा पूर्ण करू शकतील असे उपाय संपूर्ण विश्वातील कोणत्याही राष्ट्राच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम ठरतील, असे ते म्हणाले. या उदात्त कार्याबद्दल त्यांनी टीमचे अभिनंदन केले.
आयआयटी खरगपूरमध्ये नोडल सेंटर असलेल्या ‘हॅक ड्रीमर्स’ चे नेतृत्व करणाऱ्याने भारतातील वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने सायबर सुरक्षेविषयी दिलेल्या समस्या विधानाची पंतप्रधानांना माहिती दिली. 2023 मध्ये देशात 73 दशलक्षहून अधिक सायबर हल्ले झाले जे जगातील तिसरे सर्वात मोठे हल्ले आहेत असे सांगून तिने पंतप्रधानांना अभिनव आणि व्यापक उपायाबद्दल माहिती दिली. एका टीमच्या सदस्याने स्पष्ट केले की हा उपाय जगभरात वापरल्या जाणाऱ्या बहुविध अँटीव्हायरस इंजिनांपेक्षा वेगळा आहे आणि सिस्टमला सुरक्षित मोडमध्ये ठेवून कार्यक्षम मार्गांनी व्हायरससाठी समांतरपणे स्कॅनिंग करून ऑफलाइन संरचना डिझाइन आणि थ्रेड दिशा प्रदान करते. पंतप्रधानांनी अलिकडच्या मन की बात भाषणात सायबर फसवणुकीबद्दल बोलल्याची आठवण करून दिली आणि सांगितले की मोठ्या लोकसंख्येला या ईर्षेचा फटका बसतो. सायबर धोके सतत जलद गतीने उद्भवत असल्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भारत हा जगातील आघाडीच्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि देश विविध स्तरांवर डिजिटल पद्धतीने जोडलेला असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे धोके सतत वाढत आहेत. त्यामुळे भारताच्या भविष्यासाठी सायबर गुन्ह्यांवर उपाय शोधणे महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सहभागींना शुभेच्छा दिल्या आणि असे उपाय सरकारसाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकतात असे सांगितले. मोदींनी टीमच्या सदस्यांमधील उत्साहाचीही दखल घेतली.
गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या टीम कोड ब्रो ने पंतप्रधानांना ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून काढलेल्या गडद प्रतिमा वाढवणे ‘ या इस्रोने दिलेल्या समस्या विधानावरील कामाबाबत माहिती दिली. टीमच्या एका सदस्याने या उपायाचे नाव ‘चांद वधानी ’ असे सांगत स्पष्ट केले की हे केवळ प्रतिमा वाढवत नाही तर निर्णय घेण्याचे कौशल्य देखील यात आहे. ते खड्डे आणि दगड यांचा शोध घेते त्याचबरोबर वास्तविक ठिकाणाची निवड देखील करते. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांशी, विशेषत: अहमदाबादमध्ये जिथे विशाल अंतराळ केंद्र आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली का असा प्रश्न पंतप्रधानांनी सहभागींना विचारला. चंद्राच्या भूगर्भीय आणि पर्यावरणीय परिस्थितीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळाली का असे पंतप्रधानांनी विचारल्यावर एका टीम सदस्याने होकारार्थी उत्तर दिले आणि सांगितले की याची चंद्राच्या अभ्यासात मदत होईल. आणखी एका टीम सदस्याने डार्क नेट आणि फोटो नेट या दोन व्यवस्थांचा समावेश असलेल्या मशीन लर्निंग मॉडेलचा वापर स्पष्ट केला. जग भारताच्या अंतराळ प्रवासाकडे आशेने पाहत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि प्रतिभावंत युवकांच्या समावेशामुळे हा विश्वास आणखी दृढ होत असल्याचे सांगितले. भारत जागतिक अंतराळ तंत्रज्ञान सामर्थ्यात आपली भूमिका आणखी विस्तारेल याचे हे युवा नवोन्मेषक द्योतक असल्याचे सांगत त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.
मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च मधील मिस्टिक ओरिजिनल्स या टीमचे नेतृत्व करणाऱ्याने सुरक्षा आव्हानाचा सामना करण्यासंदर्भात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने प्रदान केलेल्या मायक्रो डॉप्लर आधारित लक्ष्य वर्गीकरण बाबत माहिती दिली जे ते लक्ष्य पक्षी आहे की ड्रोन आहे हे ओळखण्यात मदत करते.तिने स्पष्ट केले की रडारवर पक्षी आणि ड्रोन सारखेच दिसतात आणि त्यामुळे खोटे अलार्म आणि इतर संभाव्य सुरक्षा धोके विशेषत: संवेदनशील भागात उद्भवू शकतात. दुसऱ्या टीम सदस्याने तपशीलवार अभ्यास केला आणि स्पष्ट केले की या उपायात मायक्रो डॉप्लर स्वाक्षरीचा वापर केला आहे जे मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण बोटांच्या ठशांप्रमाणेच वेगवेगळ्या वस्तूंद्वारे तयार झालेले अनोखे नमुने आहेत. हा उपाय वेग, दिशा आणि अंतर ओळखू शकतो का असे पंतप्रधानांनी विचारले असता, टीम सदस्याने उत्तर दिले की ते लवकरच साध्य होईल. ड्रोनचे विविध सकारात्मक उपयोग आहेत हे नमूद करून पंतप्रधानांनी निदर्शनास आणले की काही शक्ती इतरांना इजा करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत आणि हे सुरक्षेसाठी आव्हान बनले आहे. अशा आव्हानांना सामोरे जाण्यास हा उपाय सक्षम आहे का, अशी विचारणा पंतप्रधानांनी केल्यावर, एका टीम सदस्याने प्रक्रिया समजावून सांगितली. तो म्हणाला की हे एक कॉम्पॅक्ट सोल्यूशन आहे जे किफायतशीर उपकरणांवर वापरले जाऊ शकते आणि विविध प्रकारच्या वातावरणाला अनुकूल देखील आहे. राजस्थानमधील एका सीमावर्ती भागातला रहिवासी असलेल्या टीममधील आणखी एका सदस्याने माहिती दिली की पुलवामा हल्ल्यानंतर आकाशात शत्रूच्या ड्रोनची वारंवारता वेगाने वाढली आणि रात्री कोणत्याही वेळी ड्रोनविरोधी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हे समस्या विधान निवडण्यात आल्याचे त्याने सांगितले. पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रात ड्रोनचा वापर होत असल्याचे अधोरेखित केले आणि नमो ड्रोन दीदी योजनेचे उदाहरण दिले. देशातील दुर्गम भागात औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर केल्याचा उल्लेखही त्यांनी केला, तर शत्रू त्यांचा वापर सीमेपलीकडून बंदुक आणि मादक पदार्थांची तस्करी करण्यासाठी करतात. राष्ट्रीय सुरक्षेच्या अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवा नवोन्मेषक अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांच्या अभिनव कल्पनांमुळे संरक्षण तंत्रज्ञानाच्या निर्यातीला नवे आयाम मिळू शकतात. पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की टीम सदस्यांपैकी एक जो सीमावर्ती भागातील आहे तो ही समस्या आणि त्यावरील उपायांची गरज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो . रॉग ड्रोनचा वापर करणारे दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याने नवीन तंत्रज्ञानाबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनीही त्यांच्या प्रयत्नांची देखील प्रशंसा केली.
बंगळुरूच्या न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ‘निर्वाणा वन’च्या संघाच्या प्रमुखाने नदी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी पुनरुज्जीवन वृद्धिंगत करण्यासंदर्भात जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या समस्या विधानाची पंतप्रधानांना माहिती दिली. या प्रकल्पासाठी गंगा नदीची निवड तिचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन करण्यात आल्याचे संघातील आणखी एका सदस्याने सांगितले. नमामि गंगे आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान या विषयांवर केलेल्या संशोधनामुळे हा प्रकल्प सुरू झाला, अशी माहिती तिने दिली. याशिवाय, नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या जीवनात मदत करण्यासाठी उपलब्ध डेटाच्या मदतीने निर्णय समर्थन प्रणाली तयार केली असल्याचे देखील तिने सांगितले. संघाच्या प्रमुखाने माहिती दिली की 38 प्रमुख स्थाने निश्चित करण्यात आली असून फेडरेटेड लर्निंगच्या मदतीने स्थानिक प्रारुप तयार केले गेले जे मुख्य प्रारुपाशी निगडित आहे, त्यामुळे कामातील अचूकता वाढते. प्रत्येक भागधारकासाठी प्रगत डॅशबोर्ड तयार करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाकुंभात सहभागी होणारे या नवोन्मेषाचा उपयोग कसा करू शकतात याविषयी पंतप्रधानांना माहिती देताना संघ प्रमुखाने उत्तर दिले की डेटा विश्लेषण वैयक्तिक स्तरावर निर्जंतुकीकरण करण्यास मदत करेल तसेच चांगले आरोग्य सुनिश्चित करेल. औद्योगिक सांडपाण्याचे निरीक्षण, सांडपाणी प्रक्रियेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, जैवविविधता व्यवस्थापन इत्यादीसाठी वेगवेगळे पोर्टल उपलब्ध करून दिल्याची माहिती संघ प्रमुखाने दिली. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये उद्योगांमुळे होणारी प्रदूषकांची होणारी विशिष्ट मागे टाकले जाऊ शकते आणि प्रचंड प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असेही त्या प्रमुखाने पंतप्रधानांना सांगितले. पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि हा संघ अशा संवेदनशील मुद्द्यांवर काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी या संघाला शुभेच्छाही दिल्या.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) मधील सर्व सहभागींचे आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की या सर्वांशी संवाद साधणे आनंददायी आहे. भविष्यातील जग हे ज्ञान आणि नवोन्मेषाच्या मार्गावर चालणार आहे आणि बदलत्या परिस्थितीत तरुण हेच भारताच्या आशा आणि आकांक्षा आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांचा दृष्टीकोन, विचार आणि ऊर्जा वेगळी असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. सर्वांचे ध्येय एकच आहे यावर भर देत भारत हा जगातील सर्वात नवोन्मेषी, प्रगतीशील आणि समृद्ध देश बनला पाहिजे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नवोन्मेषी युवाशक्ती आणि भारताची तंत्रज्ञान शक्ती हीच भारताची ताकद असल्याचे जग मान्य करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये या सर्वांमध्ये भारताची ताकद स्पष्टपणे दिसून आली, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील तरुणांना जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे एक उत्कृष्ट व्यासपीठ बनले आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि 2 लाख संघ तयार केले होते तर सुमारे 3 हजार समस्यांवर काम केल्याचे त्यांनी नमूद केले. 6400 हून अधिक संस्था हॅकेथॉनशी निगडीत आहेत तर हॅकेथॉनमुळे शेकडो नवीन स्टार्ट-अप जन्माला आले आहेत, असे त्यांनी सांगितले. 2017 मध्ये विद्यार्थ्यांनी 7 हजारांहून अधिक कल्पना सादर केल्या होत्या, तर यावर्षी या कल्पनांची संख्या 57 हजारांहून अधिक झाली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यावरून भारतातील तरुण आपल्या देशासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत, असे ते म्हणाले.
गेल्या सात हॅकेथॉनमधील अनेक उपाय आज देशातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या हॅकेथॉनने अनेक मोठ्या समस्यांवर उपाय उपलब्ध करून दिल्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी 2022 च्या हॅकेथॉनचे उदाहरण दिले. या हॅकेथॉनमध्ये तरुणांच्या एका संघाने चक्रीवादळांची तीव्रता मोजणाऱ्या एका प्रणालीवर काम केले होते. ही प्रणाली आता इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाशी जोडली गेले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आणखी एक उदाहरण दिले. एका संघाने व्हिडीओ जिओटॅगिंग ॲप तयार केले होते, जे डेटाचे सहज संकलन सुनिश्चित करत होते. हे ॲप आता अवकाश-संबंधित संशोधनात वापरले जात आहे. दुसऱ्या संघाने रीअल-टाइम रक्त व्यवस्थापन प्रणालीवर काम केले होते जे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या रक्तपेढ्यांचे तपशील देऊ शकते. आज ही माहिती एनडीआरएफ सारख्या संस्थांना खूप साहाय्यकारक ठरते आहे, असेही त्यांनी सांगितले. हॅकेथॉनची आणखी एक यशोगाथा सांगताना पंतप्रधान म्हणाले की, काही वर्षांपूर्वी दुसऱ्या संघाने दिव्यांगजनांसाठी एक उत्पादन तयार केले जे त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. आजपर्यंतच्या अशा शेकडो यशस्वी केस स्टडीज हॅकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. देशासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, देशाच्या विकासासाठी देशातील तरुण सरकारसोबत कसे काम करत आहेत हे हॅकेथॉनने दाखविल्याचे पंतप्रधान म्हणाले. हॅकेथॉन या तरुणांना देशाच्या समस्या सोडवण्यात आणि देशाला विकासाकडे नेण्याप्रती जबाबदारीची जाणीव करून देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. विकसित भारत होण्यासाठी देश योग्य मार्गावर आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारतातील समस्यांवर तरुण ज्या तत्परतेने आणि वचनबद्धतेने नवनवीन उपाय शोधत आहेत त्याचेही मोदींनी कौतुक केले.
आजच्या काळात देशाच्या आकांक्षांपैकी प्रत्येक आव्हानासाठी चौकटीबाहेरचा विचार करण्याची गरज व्यक्त करत मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रातील आपल्या सवयींमध्ये चौकटीबाहेरचा विचार समाविष्ट करण्याच्या गरजेवर भर दिला. या हॅकेथॉनच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की उत्पादनासोबतच त्याची प्रक्रियाही महत्त्वाची आहे. एक काळ होता, जेव्हा केवळ सरकार देशाच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असे, परंतु आज अशा हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शकांनाही उपायांशी जोडले जात आहे. हे भारताचे नवीन प्रशासन प्रारूप आहे आणि ‘सबका प्रयास’ ही या प्रारूपाची प्राणशक्ती आहे, यावर त्यांनी भर दिला.
देशाची पुढील 25 वर्षांची पिढी ही भारताची अमृत पिढी आहे यावर भर देऊन पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तरुणांची आहे, तर प्रत्येक आवश्यक संसाधन योग्य वेळी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मानसिकता रुजवण्यासाठी सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे आणि शाळांमध्ये नाविन्यपूर्ण संसाधने उपलब्ध व्हावीत, यासाठी 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब उघडल्या आहेत.
या प्रयोगशाळा आता नवनवीन प्रयोगांचे केंद्र बनत असल्याचे सांगून ते म्हणाले की, एक कोटीहून अधिक मुले आता संशोधनाकडे वळली आहेत. ते पुढे म्हणाले की 14 हजाराहून अधिक पीएम श्री शाळा 21 व्या शतकातील कौशल्यांवर काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारसरणीत आणखी सुधारणा करण्यासाठी शासनाने महाविद्यालय स्तरावर इनक्युबेशन केंद्रे स्थापन केली आहेत. मोदी यांनी टिपणी केली की प्रगत रोबोटिक्स आणि एआय लॅबचा वापर व्यावहारिक शिक्षणासाठी देखील केला जात आहे, तर तरुणांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिग्यासा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे, जिथे त्यांना थेट संपर्क साधण्याची आणि शास्त्रज्ञांशी बोलण्याची संधी आहे.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आज प्रशिक्षणाव्यतिरिक्त तरुणांना स्टार्टअप इंडिया मोहिमेद्वारे आर्थिक मदत देखील दिली जात आहे तसेच त्यांना करामध्ये सवलत दिली जात आहे. ते पुढे म्हणाले की त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रा कर्जाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन कंपन्यांसाठी देशभरात टेक्नॉलॉजी पार्क आणि नवीन आयटी हब बांधले जात असल्याची माहिती मोदी यांनी दिली. सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा संशोधन निधी तयार केला आहे, तरुणांच्या गरजेनुसार काम करताना त्यांच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असेही ते म्हणाले. हॅकेथॉन्स हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून आपल्या तरुणांना नवीन संधी देणारा आहे यावर भर देऊन मोदी म्हणाले की, ही कायमस्वरूपी संस्था म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया आहे, जी त्यांच्या लोकाभिमुख प्रशासन प्रारूपाचा एक भाग आहे.
भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. डिजिटल कंटेंट निर्मिती आणि गेमिंग सारखी क्षेत्रे, जी दशकापूर्वी फारशी विकसित नव्हती, आता भारतात वेगाने विकसित होत आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ही क्षेत्रे करिअरचे नवीन मार्ग उघडत आहेत आणि तरुणांना शोध आणि प्रयोग करण्याची संधी देत आहेत. सुधारणांद्वारे अडथळे दूर करून तरुणांची जिज्ञासा आणि विश्वास वाढवण्यासाठी सरकार सक्रियपणे पाठिंबा देत आहे. सामग्री निर्मात्यांचे प्रयत्न आणि सर्जनशीलता ओळखण्याच्या उद्देशाने नुकत्याच मिळालेल्या राष्ट्रीय निर्माते पुरस्काराचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी खेलो इंडिया आणि ट़ॉप्स योजनेसारख्या उपक्रमांसह खेळांना एक व्यवहार्य करिअर पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले, जे क्रीडापटूंना ग्रामस्तरीय स्पर्धांपासून ऑलिम्पिकपर्यंत मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी मदत करत आहेत. याशिवाय, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी आधीच गेमिंगसह एक आश्वासक करिअर निवड म्हणून उदयास येत आहे.
पंतप्रधानांनी वन नेशन-वन सबस्क्रिप्शन योजना सुरू करण्याच्या सरकारच्या अलीकडील निर्णयावर प्रकाश टाकला, ज्याची जागतिक प्रशंसा झाली आहे. हा उपक्रम भारतातील तरुण, संशोधक आणि नवोन्मेषकांसाठी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचा प्रवेशमार्ग प्रदान करतो, ज्यामुळे कोणतीही तरुण व्यक्ती मौल्यवान माहितीपासून वंचित राहणार नाही. या योजनेंतर्गत, सरकार प्रतिष्ठित जर्नल्सची सदस्यता घेत आहे, ज्यामुळे ज्ञानापर्यंत व्यापकपणे पोहोचणे शक्य होईल. हॅकेथॉनमधील सहभागींना याचा होणारा फायदा आणि भारतीय तरुणांना जगातील सर्वोत्तम विचारांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याचे व्यापक ध्येय यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. त्यांनी पुनरुच्चार केला की तरुणांना यशस्वी होण्यासाठी सर्व आवश्यक प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा आहेत याची खात्री करून तरुणांच्या व्हिजनशी समरूप होण्याचे सरकारचे मिशन आहे.
ज्यांना कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही अशा देशभरातल्या एक लाख युवकांना, देशातल्या राजकीय व्यवस्थेत आणण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. भारताच्या भविष्यासाठी हे घडणे आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या दिशेने वेगवेगळे मार्ग चाचपडून पाहिले जात आहेत, असेही ते म्हणाले. जानेवारी 2025 मध्ये ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, या कार्यक्रमात देशभरातील कोट्यवधी युवा प्रतिनिधी सहभागी होतील आणि विकसित भारताबद्दलच्या आपल्या संकल्पना आणि विचार मांडतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 ते 12 जानेवारी रोजी नवी दिल्ली इथे यंग लीडर्स डायलॉग हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. युवकांनी मांडलेल्या संकल्पना आणि विचारांमधून काहींची निवड केली जाणार असून त्यांच्याशी या कार्यक्रमात संवाद साधला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात देश विदेशातील मान्यवरही सहभागी होणार आहेत, त्यांच्यासोबत आपणही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केले.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनशी संबंधित सर्व युवांनी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या कार्यक्रमातील सहभागामुळे युवा वर्गाला राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याची आणखी एक मोठी संधी मिळेल, ही बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना आगामी काळाकडे संधी आणि जबाबदारी म्हणून पाहावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केवळ भारतासमोर असलेली आव्हाने सोडवण्यावर लक्ष केंद्रित न करता जागतिक मुद्द्यांवर अधिक प्रभावीपणे काम करायला हवे असे आवाहनही त्यांनी या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांना केले. पुढच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या हॅकेथॉनपर्यंत आपल्या हाती जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी शोधलेल्या उपायांची उदाहरणे असतील असा दृढ आशावादही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. भारताला आपल्या देशातील नवोन्मेषकांवर आणि समस्या सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आणि अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखीत केले. या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञताही व्यक्त केली.
पार्श्वभूमी
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) च्या सातव्या आवृत्तीचा आज दि. 11 डिसेंबर 2024 रोजी प्रारंभ झाला. देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी या हॅकेथॉनचा प्रारंभ झाला. या हॅकेथॉन अंतर्गतचे सॉफ्टवेअर एडिशन सलग 36 तास चालणार आहे, तर हार्डवेअर एडिशन 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. या हॅकेथॉनच्या या आधीच्या आवृत्त्यांप्रमाणेच, यावेळीही सहभागी झालेले विद्यार्थ्यांचे संघ, त्यांना मंत्रालये किंवा विभागांनी, अथवा वेगवेगळ्या उद्योगांनी दिलेल्या समस्यांच्या विवरणावर आधारीत उपाययोजनांवर काम करतील किंवा ते राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांशी संबंधित 17 विषयांपैकी कोणत्याही विषयावर विद्यार्थी नवोन्मेष या श्रेणीअंतर्गत आपल्या स्वतःच्या संकल्पनांवर आधारित प्रारुप सादर करतील. यामध्ये आरोग्य सेवा विषयक व्यवस्था, पुरवठा साखळी आणि संबंधित दळणवळण, स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वतता, शिक्षण आणि कौशल्य विकास, पाणी, कृषी आणि अन्न, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश आहे.
या हॅकेथॉनच्या यंदाच्या आवृत्तीत समस्यांच्या बाबतीत काही विलक्षण रंजक विवरण नमुने सादर केले गेले आहेत. यात चंद्रावरील गडद काळोख्या प्रदेशांच्या प्रतिमांची गुणवत्ता वाढविण्याशी संबंधी इस्रोने सादर केलेल्या विवरण दस्तऐवजाचा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह, माहितीसाठी, इंटरनेट ऑफ थिंग्ज्स, आणि डायनॅमिक प्रारुपांचा वापर करून, गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेचे प्रत्यक्ष त्या त्या क्षणाला देखरेखवजा तपासणी करणारी प्रणाली विकसित करण्याशी संबंधित जलशक्ती मंत्रालयाने सादर केलेल्या विवरण दस्तऐवजाचा तसेच आयुष मंत्रालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत एकात्मिकता साधलेली स्मार्ट योगा मॅट विकसित करण्याशी संबंधित विवरण दस्तऐवजाचा समावेश आहे.
यावर्षीच्या हॅकेथॉनसाठी 54 मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी 250 पेक्षा जास्त समस्यांविषयक विवरण दस्तऐवज सादर केले आहे. तर संस्थात्मक स्तरावर अंतर्गत हॅकेथॉनमध्ये 150% पट इतकी मोठी वाढ नोंदविली गेली आहे. 2023 मध्ये आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये हे प्रमाण 900 इतके होते, तर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मध्ये त्यात प्रचंड मोठी वाढ होऊन ही संख्या 2,247 पर्यंत पोहोचली आहे. इतक्या मोठ्या संख्येमुळे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची यावर्षाची आवृत्ती ही आजवरची सर्वात मोठी आवृत्ती ठरली आहे. संस्थात्मक स्तरावर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मध्ये 86,000 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत, तर राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी सुमारे 49,000 विद्यार्थी संघांची (प्रत्येक संघामध्ये प्रत्येकी 6 विद्यार्थी आणि 2 मार्गदर्शक) शिफारस देखील या संस्थांनी केली आहे.
Addressing the young innovators at the Grand Finale of Smart India Hackathon 2024. The talent and ingenuity of our Yuva Shakti is remarkable.https://t.co/zqTp4v15gB
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2024
आज दुनिया कह रही है कि भारत की ताकत, हमारी युवाशक्ति है, हमारा innovative youth है, हमारी tech power है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 11, 2024
बीते 7 सालों में जितने भी हैकाथॉन हुए हैं, उनके बहुत सारे Solutions आज देश के लोगों के लिए बहुत उपयोगी सिद्ध हो रहे हैं।
कई बड़ी समस्याओं का समाधान इन हैकॉथान्स ने दिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 11, 2024
Students में Scientific Mindset को Nurture करने के लिए हमने नई नेशनल एजुकेशन पॉलिसी लागू की है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 11, 2024
One Nation-One Subscription स्कीम अपने आप में दुनिया की अनूठी स्कीम्स में से एक है।
जिसके तहत सरकार, प्रतिष्ठित जर्नल्स की सब्स्क्रिप्शन ले रही है, ताकि किसी भी जानकारी से भारत का कोई भी युवा वंचित ना रहे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 11, 2024
* * *
S.Patil/Bhakti/Sushma/Shraddha/Nandini/Tushar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai