Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन


नवी दिल्‍ली, 11 डिसेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रह्मण्यम भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन केले.

महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य  भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.

21 खंडांमध्ये “कालवरिसैयिल् भारतियार् पडैप्पुगळ्” या पुस्तकाच्या संकलनासाठी सहा दशकांच्या असाधारण, अभूतपूर्व आणि अथक परिश्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले की सीनी विश्वनाथन जी यांचे कठोर परिश्रम ही अशी तपश्चर्या होती, ज्याचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना होईल. विश्वनाथन यांच्या तपश्चर्येने त्यांना महा-महोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यात व्यतीत केली असे मोदी म्हणाले. सीनी विश्वनाथन यांचे कार्य शैक्षणिक जगतात एक मापदंड बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल अभिनंदन केले.

“कालवरिसैयिल् भारतियार् पडैप्पुगळ्” बाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या 23 खंडांमध्ये केवळ भारतीजींच्या रचनांचा  समावेश नाही, तर त्यात त्यांचे साहित्य किंवा साहित्यिक प्रवासाविषयी अभ्यासपूर्ण पार्श्वभूमीची  माहिती आणि त्यांच्या रचनांचे  सखोल तात्विक विश्लेषण देखील समाविष्ट आहे. प्रत्येक खंडात भाष्य, विवरण  आणि टीका समाविष्ट आहेत. मोदी म्हणाले, “भारतीजींच्या विचारांची खोली समजून घेण्यासाठी हा खंड  संशोधक विद्वान आणि विचारवंतांना त्यांच्या काळातील  दृष्टीकोन समजून घेण्यासाठी खूप मदत करेल.”

गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी  सुब्रह्मण्य  भारती यांचा गीतेच्या शिकवणींवर असलेला गाढ विश्वास आणि तितक्याच सखोल ज्ञानाबद्दल त्यांचे कौतुक केले. “त्यांनी गीतेचे तमिळ भाषेत भाषांतर केले आणि त्यातील गहन संदेशाचा सोपा आणि सुलभ अर्थ सांगितला,” मोदी म्हणाले की, आज गीता जयंती, सुब्रह्मण्य म भारती यांची जयंती आणि त्यांच्या कार्यांचे प्रकाशन हा एक प्रकारे ‘त्रिवेणी’ संगमच आहे.

भारतीय तत्वज्ञानातील शब्द ब्रह्म या संकल्पनेचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की भारताने, शब्दांना व्यक्त होण्याच्या माध्यमापेक्षा अधिक मानले असून शब्दांमध्ये अमर्यादित सामर्थ्य आहे. “संतमाहात्मे आणि विचारवंतांच्या शब्दांमधून त्यांचे चिंतन, अनुभव आणि आध्यात्मिक अभ्यासाचे सार दिसून येते, त्यामुळे भविष्यातील पिढ्यांकरता त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी ठरते. अशा प्रकारच्या महत्वपूर्ण उल्लेखनीय कार्याचे संकलन करण्याची परंपरा आज देखील प्रासंगिक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. उदाहरणार्थ अगदी पद्धतशीरपणे पुराणामध्ये जतन केलेले महर्षी वाल्मिकी यांचे साहित्य आजही मनामनात गुंजत आहे. काही उदाहरणांचा दाखला देऊन त्यांनी सांगितले की स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या संपूर्ण कार्यांनी समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तिरुक्कुरलचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्याचे प्रयत्न सुरु असून याद्वारे आपल्या साहित्यिक वारशाचे जतन करून त्याचा प्रसार करण्याच्या भारताच्या समर्पित भावनेचे दर्शन होते. पापुआ न्यू गिनीच्या भेटीदरम्यान थिरुक्कुरलचा टोक पिसिन भाषेतील अनुवाद आणि त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्याचा गुजराती अनुवाद प्रकाशित करण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.

सुब्रह्मण्य भारती हे एक थोर विचारवंत होते ज्यांनी देशाच्या आवश्यकता लक्षात घेऊन कार्य केले, त्याकाळी देशाला ज्या गोष्टींची गरज होती त्या सर्व दिशेने त्यांनी काम केले असे पंतप्रधान म्हणाले. भारतियार हे केवळ तामिळनाडू आणि तमिळ भाषेचा वारसा नव्हते तर ते एक असे थोर विचारवंत होते ज्यांचा प्रत्येक श्वास माँ भारतीच्या सेवेत समर्पित होता आणि ज्यांनी भारताच्या उदय आणि अभिमानाचे स्वप्न पाहिले. भारतियार यांच्या योगदानाविषयी देशातील नागरिकांना माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकार अथक कार्य करत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. वर्ष 2020 मध्ये संपूर्ण जग कोविड महामारीच्या विळख्यात असताना देखील केंद्र सरकारने सुब्रह्मण्य भारती यांची 100 वी पुण्यतिथी अतिशय भव्य पद्धतीने साजरी केली. आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवाचे आपण देखील एक भाग होतो, असे त्यांनी सांगितले. महाकवी भारती यांच्या विचारांच्या माध्यमातून आपण देशात आणि परदेशात नेहमीच भारताची भूमिका मांडत आलो आहोत, असे ते म्हणाले. काशी हा सुब्रह्मण्य भारती आणि आपल्यातील जिवंत आणि अध्यात्मिक बंध असल्याचे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी सांगितले की सुब्रह्मण्य भारती यांच्यासोबत व्यतीत केलेला वेळ आणि त्यांच्याशी जुळलेले नाते काशीच्या वारशाचा एक भाग बनले आहे. भारती हे ज्ञान संपादनाकरता काशीला आले आणि त्यांनतर त्यांनी तिथेच कायमचे वास्तव्य केले, त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती अजूनही काशी मध्येच राहतात. काशीमध्ये राहून भारतियार यांना आपल्या भव्य मिशा वाढवण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगून काशीमध्ये राहूनच भारतियार यांनी आपल्या अनेक कलाकृती लिहिल्या असे पंतप्रधान म्हणाले. बनारस हिंदू विद्यापीठात महाकवी भारतियार यांच्या योगदानाला समर्पित आसनाची स्थापना करण्यात आली हे सरकारचे भाग्य आहे असे सांगून वाराणसीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांनी या पवित्र कार्याचे स्वागत केले.

सुब्रह्मण्य भारती या दिग्गज कवी आणि दूरदर्शी व्यक्तीमत्वाला आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी भारताच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक जडणघडणीतील त्यांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. “सुब्रह्मण्य भारती हे एक असे व्यक्तिमत्व होते जे कैक शतकातून एकदा या जगात जन्माला येते. केवळ 39 वर्षांचे अल्प आयुष्य लाभूनही त्यांनी आपल्या देशावर अमिट छाप सोडली” असे पंतप्रधान म्हणाले.  त्यांच्या प्रभावशाली शब्दांतून त्यांनी केवळ स्वातंत्र्याची कल्पनाच केली नाही तर लोकांच्या सामूहिक चेतनाही जागृत केल्या आहेत, ज्याचे प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या “ऐंड्र तणियुम इंद सुंदंदीर तागम्” ? म्हणजे स्वातंत्र्याची ही तहान कधी शमणार? आणि ऐंड्र मडियुम येंगळ आडिमैईन मोगम?”, म्हणजे आपला दास्यत्वाचा मोह कधी संपणार? या दोन कथेतून दिसून येते. या कथा आजही आपल्या मनात रुंजी घालत आहे, असे  पंतप्रधान म्हणाले. भारतीजींचे पत्रकारिता आणि साहित्यातील योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीजींनी 1906 मध्ये राजकीय व्यंगचित्रे छापणारे पहिले तमिळ वृत्तपत्र ‘इंडिया वीकली’ सुरू करून पत्रकारितेत क्रांती घडवली. कण्णन पाट सारख्या त्यांच्या कवितेतून त्यांची प्रगल्भ अध्यात्म आणि उपेक्षितांबद्दलची खोल सहानुभूती दिसून येते. गरीबांसाठी कपडे दान करण्याचे त्यांनी केलेले आवाहनातून हे दिसून येते की त्यांच्या कार्यामुळे कृती आणि परोपकाराला कशी प्रेरणा दिली.” सुब्रह्मण्य भारती यांना प्रेरणेचा चिरंतन स्त्रोत संबोधत पंतप्रधानांनी त्यांच्या निर्भय स्पष्टतेचे आणि चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या कालातीत दृष्टीचे कौतुक केले. त्यांच्या या गुणांनी जनतेला नेहमीच स्वातंत्र्य, समानता आणि करुणेसाठी झटण्याचे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दूरदृष्टी असलेला माणूस म्हणून भारतियार यांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, समाज इतर अडचणींमध्ये अडकला असतानाही, भारतियार हे तरुण आणि महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक होते आणि त्यांचा विज्ञान आणि नवोन्मेष यावर प्रचंड विश्वास होता. भारतियार यांनी अशा संवादाची कल्पना केली होती ज्यामुळे परस्परातील अंतर कमी होईल आणि संपूर्ण देश जोडला जाईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी सुब्रह्मण्य भारती यांच्या, “काशी नगर, पुलवर पेसुम, उरई दान, कांजिईल, केटपदारकोर, करवी सैवोम”; म्हणजे कांचीमध्ये बसून बनारसचे संत काय बोलतात हे ऐकता येईल असे साधन असावे, या ओळींचे पठण केले. भारताच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भागाला जोडून डिजिटल इंडिया ही स्वप्ने प्रत्यक्षात आणत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. भाषिणी सारख्या ऍप्समुळे भाषेशी संबंधित सर्व समस्या दूर केल्या आहेत असेही पंतप्रधानांनी सांगितले. भारतातील प्रत्येक भाषेचे जतन करण्याच्या चांगल्या हेतूने भारतातील प्रत्येक भाषेबद्दल आदर आणि अभिमान बाळगून प्रत्येक भाषेची सेवा साठी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रह्मण्य भारती यांनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. सुब्रह्मण्य भारती यांचे कार्य प्राचीन तमिळ भाषेसाठी अनमोल वारसा असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. सुब्रह्मण्य भारती यांचे साहित्य हा जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक असलेल्या तमिळ भाषेतला अनमोल खजिना आहे. जेव्हा आपण त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करतो, त्यावेळी आपण अप्रत्यक्षपणे तमिळ भाषेचीही सेवा करत असतो असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या माध्यमातून आपण सगळेच आपल्या देशाचा प्राचीन वारसा जतन आणि संवर्धन करत आहोत, अशी बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली. तमिळ भाषेचा अधिक उंचिवर नेऊन ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या दशकभरात अनेक प्रयत्न केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. गेल्या दहा वर्षांत आपल्या देशाने तामिळ भाषेच्या गौरवाचा सन्मान करण्यासाठी निष्ठेने काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. आपले सरकार जगभरात तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्रांची स्थापना करत असल्याची बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केली. 

कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांचे संकलन तमिळ भाषेच्या प्रचार प्रसार आणि संवर्धनाच्या कार्यात  महत्त्वाचे योगदान देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आपण सगळे मिळून विकसित भारताचे ध्येय साध्य करू आणि सुब्रह्मण्य भारती यांनी देशासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना केले. या संग्रह निर्मितीसाठी संकलनाच्या प्रक्रियेत आणि प्रत्यक्ष प्रकाशनासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला. 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री राव इंदरजीत सिंग, एल. मुरुगन, साहित्यिक सीनी विश्वनाथन, प्रकाशक व्ही. श्रीनिवासन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 

पार्श्वभूमी

सुब्रह्मण्य भारती यांना आपल्या लेखनातून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली, त्यांनी आपल्या लिखाणातून भारतीय संस्कृतीचे मर्म आणि देशाचा आध्यात्मिक वारसा सर्वसामान्यांना समजण्यास सोपा असेल अशा भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या संपूर्ण लेखनाचा 23 खंडांचा हा संग्रह संच सीनी विश्वनाथन यांनी संकलित आणि संपादित केला असून, अलायन्स पब्लिशर्सने या संग्रहाचे प्रकाशन केले आहे. या संग्रहात सुब्रह्मण्य भारती यांच्या लेखनाच्या आवृत्त्या, स्पष्टीकरणे, दस्तऐवज, पार्श्वभूमीविषयीची माहिती आणि तत्त्वज्ञानात्मक सादरीकरण या आणि अशा मुद्यांवरचा तपशील मांडला आहे.

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/Sushma/Bhakti/Shraddha/Tushar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai