Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन


नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर  येथे रायझिंग राजस्थान  ग्लोबल  इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.

भारतातील व्यवसायासाठीच्या वातावरणामुळे व्यवसाय तज्ञ आणि गुंतवणूकदार अतिशय प्रभावित झाले आहेत,असे पंतप्रधान म्हणाले. भारताने परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म आणि रिफॉर्म या मंत्राने जी प्रगती केली आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली की स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकांमध्ये भारत जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असला तरी केवळ एका दशकात भारताने जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याइतकी मोठी झेप घेतली आहे.“गेल्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था आणि निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.अगदी थेट परकीय गुंतवणूक देखील गेल्या एका दशकात, 2014 पूर्वीच्या एका दशकाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त झाली आहे, असे देखील ते म्हणाले.भारताचा पायाभूत सुविधांवरील खर्च सुमारे दोन ट्रिलियनवरून 11 ट्रिलियनपर्यंत वाढला आहे.

“भारताचे यश लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, डिजिटल डेटा आणि वितरण यांच्या खऱ्या सामर्थ्याचे दर्शन घडवते,”असे  पंतप्रधान म्हणाले. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात लोकशाहीचे यश आणि सक्षमीकरण ही एक मोठी कामगिरी आहे,असेही ते म्हणाले. लोकशाही राष्ट्र असताना मानवतेचे कल्याण हा भारताच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  ते भारताचे मूलभूत चारित्र्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी भारतातील जनतेचे लोकशाही अधिकारांचा वापर केल्याबद्दल आणि भारतात एक स्थिर सरकार सुनिश्चित केल्याबद्दल  कौतुक केले. भारताच्या या प्राचीन परंपरांना पुढे नेण्यासाठी युवा शक्ती असलेल्या लोकसंख्येची देखील मोदींनी प्रशंसा केली.येत्या काळात पुढील अनेक वर्षांमध्ये भारत जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक असणार आहे आणि भारतामध्ये तरुणांचे सर्वात मोठे भांडार तसेच सर्वात मोठा कुशल युवा गट असेल, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, सरकार या दिशेने अनेक सकारात्मक पावले उचलत आहे.

गेल्या दशकात भारताच्या युवा शक्तीने आपल्या सामर्थ्यात आणखी एक आयामाची भर घातली आहे आणि हा नवा आयाम म्हणजे भारताची तंत्रज्ञान शक्ती आणि डेटा सामर्थ्य आहे,असे मोदी यांनी नमूद केले.  आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि डेटाचे महत्त्व यावर भर देत मोदी म्हणाले, “हे शतक तंत्रज्ञान-चलित आणि डेटा-चलित आहे”. गेल्या दशकात भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जवळपास 4 पटीने वाढली आहे असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, डिजिटल व्यवहारात नवनवीन विक्रम होत आहेत. लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा यांच्या खऱ्या सामर्थ्याचे दर्शन भारताकडून घडवले जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“डिजिटल तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणामुळे कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्र आणि समुदायाला लाभ मिळतो याचे दर्शन भारताने घडवले आहे,” मोदी यांनी सांगितले. यूपीआय,थेट लाभ हस्तांतरण प्रणाली, गव्हर्न्मेंट ई- मार्केटप्लेस(GeM), ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDVC) अशा विविध डिजिटल उपक्रमांचा दाखला देत ते म्हणाले की अशा प्रकारचे अनेक मंच आहेत ज्यांनी डिजिटल परिसंस्थेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. त्यांचा अतिमहाकाय प्रभाव राजस्थानमध्ये देखील दिसून येईल. देशाचा विकास हा या राज्याच्या विकासाच्या माध्यमातून होईल आणि ज्यावेळी राजस्थान विकासाची नवी उंची गाठेल, त्यावेळी देश देखील नव्या उंचीवर पोहोचेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य असल्याचे नमूद करत, पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानवासी मोठ्या मनाचे, कष्टाळू, प्रामाणिक, असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अतिशय कठीण ध्येये गाठण्याची वृत्ती असणाऱ्या राजस्थानी लोकांची ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यावर श्रद्धा असते आणि ते देशासाठी काहीही करायला सिद्ध असतात, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांनी देशाच्या विकासाला आणि वारशालाही डावलल्याचे दुष्परिणाम राजस्थानला सर्वाधिक भोगावे लागले, असेही ते म्हणाले. मात्र त्यांचे सरकार ‘विकास आणि वारसा’ दोन्हींना प्राधान्य देत असून त्याचा राजस्थानला मोठा फायदा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राजस्थान हे केवळ उदयोन्मुख राज्य नव्हते तर ते विश्वासार्हही आहे. तसेच परिवर्तनाचा स्वीकार करणारे आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करणारे असे हे राज्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. आह्वानांना तोंड देण्याचे आणि संधी निर्माण करण्याचे दुसरे नाव राजस्थान हे आहे, असे त्यांनी सांगितले. राजस्थानी लोकांनी निवडून दिलेले Responsive (उत्तरदायी) आणि Reformist (सुधारणावादी) सरकार हा राजस्थानच्या नावाच्या स्पेलिंगमधील R चा नवा अर्थ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अगदी कमी कालावधीत राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने मोठी कामगिरी केल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. काही दिवसातच राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण होणार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल त्यांची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी गरिब आणि शेतकऱ्यांचे कल्याण, तरुणांसाठी नवीन संधींची निर्मिती, रस्ते- वीज- जलप्रकल्प अशा विकासकामांची उभारणी इत्यादी क्षेत्रात राजस्थानच्या वेगवान विकासाचा दाखला दिला. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सरकारने दक्षपणे उपाययोजना केल्यामुळे, नागरिकांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह संचारला असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानचे खरे समर्थ ओळखणे महत्त्वाचे होते यावर पंतप्रधानांनी भर दिला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे समृद्ध साठे राजस्थानकडे आहेत, संपन्न वारशाबरोबरच येथे आधुनिक दळणवळणाचे जाळे पसरले आहे, विस्तीर्ण भूभाग राजस्थानला लाभला आहे, आणि अतिशय कार्यकुशल व सक्षम अशी तरुणाई राजस्थानकडे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्त्यांपासून रेल्वेमार्गांपर्यंत, आतिथ्यशीलतेपासून हस्तव्यवसायापर्यंत आणि शेतीपासून किल्ल्यांपर्यंत अनेक पर्याय राजस्थानच्या पोतडीत आहेत, असेही ते म्हणाले. राजस्थानचा ह्या क्षमतांच्या बळावर हे राज्य गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र ठरू पाहते आहे. राजस्थानकडे शिकून घेण्याचा आणि आपल्या क्षमता उंचावण्याचा गुणधर्म आहे, आणि त्यामुळेच येथील वाळूच्या टेकड्यांमध्येही फळांनी लगडलेली झाडे आहेत, ऑलिव्ह आणि जत्रोफाची लागवड वाढत आहे असे मोदींनी सांगितले. जयपूरची निळी कुंभारकला, प्रतापगढ़चे ‘थेवा’ प्रकारचे दागिने, आणि भीलवाडा येथील वस्त्रोद्योगातील नवोन्मेष या सर्वांचे वैभव अनोखे आहे तसेच मकराना संगमरवर आणि कोटा दोरीया जगभर प्रसिद्ध आहेत, नागौर येथील पानमेथीचा सुगंध अद्वितीय आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक जिल्ह्याचे सामर्थ्य हेरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

जस्त, शिसे, तांबे, संगमरवर, चुनखडी, ग्रॅनाईट, पोटॅश असे खनिजांचे बहुतांश साठे राजस्थानात असल्याचे नमूद करत, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा हा भक्कम पाया ठरेल आणि भारताच्या ऊर्जासुरक्षेत राजस्थानचे योगदान मोठे असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. या दशकाच्या अखेरपर्यंत 500 गिगावॅट नवीकरणक्षम ऊर्जेच्या क्षमतेची उभारणी करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. यातही राजस्थानची भूमिका महत्त्वाची आहे, कारण भारतातील अनेक मोठाली सोलर पार्क  येथे उभारली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारतातील आर्थिक विकासाची दोन मोठी केंद्रे- दिल्ली आणि मुंबई यांना राजस्थानने जोडले आहे, तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या बंदरांना उत्तर भारताशी राजस्थाननेच जोडले आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा 250 किलोमीटरचा पट्टा राजस्थानातून जातो आणि याचा राजस्थानच्या अलवार, भरतपूर, दौसा, सवाई माधोपूर, टोंक, बुंदी आणि कोटा या जिल्ह्यांना मोठा फायदा होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले. समर्पित मालवाहतूक मार्गिकेसारख्या आधुनिक रेल्वेजाळ्याचा 300 किलोमीटरचा भाग राजस्थानात येतो आणि ही मार्गिका जयपूर, अजमेर, सिकर, नागौर आणि अलवार जिल्ह्यांमधून जाते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

अशा मोठमोठ्या दळणवळण प्रकल्पांच्या केंद्रस्थानी राजस्थान असल्यामुळे ते गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र ठरत आहे. तेथे ड्रायपोर्ट आणि वाहतूक क्षेत्र यशस्वी होण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. सरकार मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क्स म्हणजे दळणवळणाचे विविध पर्याय उपलब्ध असणारी केंद्रे विकसित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जवळपास 24 क्षेत्रविशिष्ट (सेक्टर स्पेसिफिक) इंडस्ट्रिअल पार्क्स आणि 2 एअर कार्गो कॉम्प्लेक्स यांची निर्मिती सुरू आहे. यामुळे उद्योग एकमेकांशी जोडण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होईल आणि राजस्थानात उद्योग उभारणे सोपे होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या समृद्ध भविष्यात पर्यटन क्षेत्रासाठी असलेल्या प्रचंड क्षमतेवर अधिक भर देत पंतप्रधानांनी भारतात निसर्ग, संस्कृती, साहसी पर्यटन, संमेलने, विशिष्ट स्थळी करण्यात येणारे लग्न समारंभ आणि वारसा संबंधी पर्यटनाच्या अमर्याद शक्यता आहेत यावर भर दिला. भारताच्या पर्यटन विषयक नकाशावर राजस्थान हे प्रमुख केंद्रस्थानी आहे आणि या राज्याकडे सहली,पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राच्या गरजा पूर्ण करू शकेल असा इतिहास, वारसा, विस्तीर्ण वाळवंटे आणि सुंदर तलावांसह वैविध्यपूर्ण संगीत आणि पाककृतींचा खजिना आहे असे ते पुढे म्हणाले. त्यांनी सांगितले की लग्न समारंभासाठी आणि आयुष्यातील सदैव लक्षात राहण्याजोगे क्षण साजरे करण्यासाठी लोकांना जेथे जावेसे वाटते अशा जगातील काही निवडक जागांमध्ये राजस्थानचा समावेश होतो. राजस्थानमध्ये वन्यजीव पर्यटनाला मोठा वाव आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी  उदाहरणादाखल वन्यजीवप्रेमी पर्यटकांसाठी मेजवानी ठरतील अशा रणथंबोर, सरिस्का, मुकुंद्रा हिल्स , केवलादेव आणि इतर अनेक ठिकाणांचा उल्लेख केला. राजस्थान सरकार राज्यातील पर्यटन स्थळे आणि वारसा केंद्रांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अधिक उत्तम सोय करण्यासाठी त्यांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करत आहे याची नोंद घेत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने देखील विविध संकल्पनांवर आधारित परिमंडळांशी संबंधित योजना सुरु केल्या आहेत. वर्ष 2004 ते 2014 या कालावधीत सुमारे 5 कोटी परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली तर वर्ष 2014 ते 2024 दरम्यानची मधली तीन ते चार वर्षे कोविड महामारीचा प्रभाव असून देखील या काळात 7 कोटींहून अधिक परदेशी पर्यटक भारतात आले याकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. कोविड महामारीच्या काळात पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले होते तरी देखील भारत भेटीवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून आली यावर त्यांनी  भर दिला. अनेक देशांतील पर्यटकांना भारतात येण्यासाठी देण्यात आलेल्या ई-व्हिसा सुविधेमुळे परदेशी पाहुण्यांना खूप मदत झाली असे पंतप्रधानांनी याप्रसंगी नमूद केले. देशान्तर्गत पर्यटन देखील आज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, उडान योजना, वंदे भारत रेल्वे गाड्या तसेच प्रसाद योजना यांच्यासारख्या उपक्रमांचा लाभ राजस्थानला झाला आहे. ते पुढे म्हणाले की व्हायब्रंट व्हिलेज यासारख्या भारत सरकारच्या कार्यक्रमांचा देखील लाभ राजस्थानला मिळाला आहे. भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले जेणेकरून त्याचा फायदा राजस्थानला देखील होईल. राजस्थानचे वारसा पर्यटन, चित्रपटसंबंधी पर्यटन, पर्यावरणस्नेही पर्यटन, ग्रामीण पर्यटन, सीमाक्षेत्र पर्यटन यांच्यात विस्ताराची प्रचंड क्षमता आहेत असे सांगून पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांना या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. यातून राजस्थानचे पर्यटन क्षेत्र बळकट होईल आणि गुंतवणूकदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात मदत होईल असे ते म्हणाले.

जागतिक पुरवठा आणि मूल्य साखळीशी संबंधित विद्यमान समस्यांचा आढावा घेत पंतप्रधान म्हणाले की, मोठमोठ्या संकटात देखील विना अडथळा, अखंडितपणे कार्य करू शकेल अशा प्रणालीची आज जगाला गरज आहे. ते पुढे म्हणाले की यादृष्टीने भारतात केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला विस्तारित निर्मितीविषयक पाया उभारला जाणे अत्यावश्यक आहे. ही जबाबदारी समजून घेत भारताने निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञा केली अशी टिप्पणी मोदी यांनी केली. ते पुढे म्हणाले की भारताने आपल्या  मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत कमी खर्चात उत्पादन करण्यावर अधिक भर दिला असून भारतात निर्मित पेट्रोलियम उत्पादने, औषधे आणि लसी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विक्रमी प्रमाणातील उत्पादनाचा जगाला मोठा फायदा झाला आहे. गेल्या वर्षभरात राजस्थानातून चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या मालाची निर्यात झाली असून यात अभियांत्रिकी वस्तू, मौल्यवान रत्ने आणि दागिने, वस्त्रप्रावरणे, हस्तकलेच्या वस्तू तसेच कृषी खाद्यान्न उत्पादनांचा समावेश आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
 
भारतात विकसित होत असलेल्या उत्पादन क्षेत्रातील पीएलआय अर्थात उत्पादनाशी निगडीत अनुदान योजनेच्या सातत्याने वाढत्या भूमिकेवर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की आज इलेक्ट्रॉनिक, विशेषतः पोलाद, वाहन उद्योग आणि वाहनांचे सुटे भाग, सौर पीव्हीज, औषधी रसायने इत्यादींच्या उत्पादन क्षेत्रात मोठा उत्साह दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले की पीएलआय योजनेच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून सुमारे 11 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात आहे आणि निर्यातीत 4 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली दिसून आली आहे.

लाखो तरुणांना नव्याने रोजगार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.  राजस्थाननेही ऑटोमोटिव्ह आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या उद्योगांसाठी चांगला पाया तयार केला असून राजस्थानमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी भरपूर क्षमता आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही राजस्थानमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांनी राजस्थानच्या उत्पादन क्षमतेचा निश्चितपणे शोध घ्यावा असे आवाहन  पंतप्रधान मोदी यांनी केले.

रायझिंग राजस्थान ही एक मोठी शक्ती असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील पहिल्या 5 राज्यांपैकी एक आहे.  सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांवर एक स्वतंत्र कॉन्क्लेव्ह देखील होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राजस्थानमध्ये 27 लाखांहून अधिक लघु आणि सूक्ष्म उद्योग असून 50 लाखांहून अधिक लोक लघु उद्योगांमध्ये काम करत असल्याचे पंतप्रधानांनी मोदींनी नमूद केले.  या क्षेत्रात राजस्थानचे नशीब पालटण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.सरकारने अल्पावधीतच नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग धोरण आणले याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारत सरकार आपल्या धोरणाद्वारे आणि निर्णयांद्वारे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सतत बळकट करत आहे.  “भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केवळ भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करत नाहीत तर जागतिक पुरवठा आणि मूल्य साखळी सक्षम करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.  कोविड महामारीच्या काळात फार्मा-संबंधित पुरवठा साखळी संकटाचे स्मरण करून, पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले की भारताचे फार्मा क्षेत्र आपल्या मजबूत पायामुळे जगाला मदत करु शकले.  त्याचप्रमाणे, इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी भारताला एक मजबूत आधार बनवण्याचे आवाहन त्यांनी केले आणि आपले सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग  यामध्ये मोठी भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची व्याख्या बदलण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करून त्यांना वाढीच्या अधिक संधी मिळाव्यात, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने सुमारे 5 कोटी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग औपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडले असल्यामुळे त्यांची पत उपलब्धता सुलभ झाली आहे, असेही ते म्हणाले.

सरकारने कर्ज संलग्न हमी योजना देखील सुरू केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेअंतर्गत लघु उद्योगांना सुमारे 7 लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे,अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या दशकात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचा कर्ज पुरवठा दुप्पट झाला आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2014 मध्ये 10 लाख कोटी रुपये असलेला सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचा कर्ज पुरवठा आज 22 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.राजस्थान देखील याचा मोठा लाभार्थी आहे आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची ही वाढती ताकद राजस्थानच्या विकासाला नवीन स्थापित करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“आपण आत्मनिर्भर भारताच्या नव्या मार्गावरील प्रवासाला सुरुवात केली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.आत्मनिर्भर भारत अभियानाची दृष्टी जागतिक होती आणि त्याचा परिणामही जागतिक स्तरावर होत आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ते सरकारी पातळीवर ‘संपूर्ण सरकार’दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहेत.  सरकार औद्योगिक आणि उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी  प्रत्येक क्षेत्राला आणि प्रत्येक घटकाला प्रोत्साहन देत आहे.’सबका प्रयास’ ही भावना विकसित राजस्थान आणि विकसित भारत घडवेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी सर्व गुंतवणूकदारांना रायझिंग राजस्थानचा संकल्प हाती घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी आलेल्या जगभरातील प्रतिनिधींना राजस्थान आणि भारत पाहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. ही भेट त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

या वर्षी 9 ते 11 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या गुंतवणूक शिखर परिषदेची संकल्पना ‘रिप्लेट, रिस्पॉन्सिबल, रेडी’ अशी आहे.  या शिखर परिषदेत जल सुरक्षा, शाश्वत खाणकाम, शाश्वत वित्त, सर्वसमावेशक पर्यटन, कृषी-व्यवसाय नवोन्मेष आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप या विषयांवर 12 क्षेत्रीय संकल्पनांवर आधारित सत्रांचे आयोजन केले जाईल.  शिखर परिषदेदरम्यान सहभागी देशांसोबत ‘राहण्यायोग्य शहरांसाठी जल  व्यवस्थापन’, ‘उद्योगांचे वैविध्य -उत्पादन आणि त्या पलीकडे’ तसेच ‘व्यापार आणि पर्यटन’ या विषयांवर आठ देशीय सत्रेही आयोजित केली जातील.

प्रवासी राजस्थानी कॉन्क्लेव्ह आणि सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कॉन्क्लेव्हही या तीन दिवसांत होणार आहेत.राजस्थान जागतिक व्यापार प्रदर्शनात राजस्थान दालन, देशीय दालन, स्टार्टअप दालन यांसारखे विविध संकल्पनांवर आधारित दालने असतील. 16 भागीदार देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांसह 32 हून अधिक देश या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

 

SK/Shailesh/Jai/Sanjana/Shraddha/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com