पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 17 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान नायजेरियाच्या भेटीवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्र्पती महामहिम बोला अहमद तिनुबू यांची अबुजा इथे भेट घेऊन, त्यांच्यासोबत औपचारिक चर्चा केली. नायजेरिया दौऱ्यासाठी स्टेट हाऊस इथे पोहोचताच पंतप्रधानांचे 21 बंदुकाच्या फैऱ्यांनी सलामी देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अल्प कालावधीसाठीच बैठक झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. आपल्या या भेटीत पंतप्रधानांनी नवी दिल्ली पार पडलेल्या जी – 20 शिखर परिषदेच्या वेळी, राष्ट्रपती तिनुबू यांच्यासोबत झालेल्या भेटीचे स्मरण केले. परस्परांचा सामायिक इतिहास, एकसमान लोकशाही मूल्ये आणि परस्परांच्या नागरिकांमधले दृढ संबंध यामुळे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे विशेष बंध असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले. नायजेरियात नुकत्याच आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती तिनुबू यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. या आपत्तीच्या काळात भारताने तातडीने मदत सामग्री आणि औषधांचा पुरवठा केल्याबद्दल नायजेरियाचे राष्ट्रपती तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्परांमधील सद्यस्थितीतील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला, तसेच भारत आणि नायजेरियामधली सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासंबंधीच्या उपाय योजनांवरही चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांमधील संबंधांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, आरोग्य, संस्कृती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध या आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या असंख्य संधींना वाव असल्यावरही सहमती व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी, परिवहन , परवडणाऱ्या दरातील औषधे, नवीकरणीय ऊर्जा आणि डिजिटल परिवर्तनातील भारताचा अनुभव नाजरियासोबत सामायिक केला. नायजेरियाच्या विकास प्रक्रियेत भारताने देऊ केलेल्या सहकार्यपूर्ण भागीदारीचे आणि त्याचा स्थानिक क्षमता, कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर पडलेल्या प्रभावाबद्दल नायजेरियाचे राष्ट्रपती तिनुबू यांनी प्रशंसा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परांमधील संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली. दहशतवाद, पायरसी आणि कट्टरतावादाविरोधात संयुक्तपणे लढा देण्याच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी यावेळी केला.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सद्यस्थितीतील जागतिक पटलावरील तसेच स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरही सविस्त चर्चा केली. व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिटच्या माध्यमातून विकसनशील देशांसमोरील आव्हानांना ठोसपणे समोर आणण्याकरता भारताने केलेल्या प्रयत्नांचेही नायजेरियाचे राष्ट्रपती तिनुबू यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या विकासा बद्दलच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावरही सहमती व्यक्त केली. पश्चिम आफ्रिकी देशांच्या अर्थविषयक संघटनेचे अध्यक्ष म्हणून नायजेरियाने बजावलेल्या भूमिकेचे आणि बहुपक्षीय आणि बहुस्तरीय संस्थांमधील योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये नायजेरिया सदस्य असल्याचे नमूद केले आणि अशाच रितीने नायजेरियाचे राष्ट्रपती तिनुबू यांनी भारताने पृथ्वीच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या इतर हरित उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आमंत्रणही दिले.
दोन्ही देशांमधील या चर्चेनंतर सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, सीमाशुल्क सहकार्य आणि सर्वेक्षण सहकार्य अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ नायजेरीयाच्या राष्ट्रपतींनी शाही स्नेह भोजनाचे आयोजनही केले होते.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Prime Minister @narendramodi held productive talks with President Tinubu in Abuja, focusing on strengthening India-Nigeria cooperation across key sectors such as trade, defence, healthcare, education and more.@officialABAT pic.twitter.com/KpKJzOFgym
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
Had a very productive discussion with President Tinubu. We talked about adding momentum to our strategic partnership. There is immense scope for ties to flourish even further in sectors like defence, energy, technology, trade, health, education and more. @officialABAT pic.twitter.com/2i4JuF9CkX
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2024