Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाओस येथील 21व्या आसियान -भारत शिखर परिषदेत सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाओस येथील 21व्या आसियान -भारत शिखर परिषदेत सहभाग


नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

 

लाओसची राजधानी व्हिएन्टिन येथे 10 ऑक्टोबर 2024 रोजी 21वी आसियान-भारत शिखर परिषद पार पडली. भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाचे दशक पूर्ण होत असताना, आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्याची दिशा ठरवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘आसियान’ नेत्यांच्या या परिषदेत सहभागी झाले. पंतप्रधानांचा या शिखर परिषदेतील हा 11 वा सहभाग होता.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आसियान देशांचे ऐक्य, आसियान केंद्रित धोरण आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्राबाबत आसियान देशांच्या दृष्टीकोनाला भारताचा पाठींबा असल्याचा पुनरुच्चार केला. 21व्या शतकाला आशियाई शतक म्हणून संबोधित करत, त्यांनी भारत-आसियान संबंध आशिया खंडाच्या भविष्याला दिशा देण्यासाठी महत्वाचे असल्याचे नमूद केले. भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाच्या गतिशीलतेवर भर देत पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या दहा वर्षांत भारत-आसियान व्यापार दुप्पट वाढून तो 130 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला, आसियान आज भारताच्या सर्वात मोठ्या व्यापार आणि गुंतवणूक भागीदारांपैकी एक आहे, सात आसियान देशांशी थेट विमान सेवेद्वारे संपर्क प्रस्थापित करण्यात आला, आसियान क्षेत्रात फिन-टेक सहकार्याने केलेली सुरुवात आशादायक आहे आणि पाच आसियान देशांचा सामायिक सांस्कृतिक वारसा पुनर्संचयित करण्यात लक्षणीय प्रगती झाली. आसियान-भारत येथील मोठ्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करून तिथल्या समुदायाला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी आसियान-भारत परराष्ट्र  व्यापार कराराचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी नालंदा विद्यापीठात आसियान देशांच्या तरुणांना शिष्यवृत्ती प्रदान करून भारत-आसियान ज्ञान भागीदारीत झालेल्या प्रगतीबद्दलही माहिती दिली.

“कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता वाढवणे”, या परिषदेच्या अध्यक्षपदाच्या संकल्पनेला अनुसरून, पंतप्रधानांनी पुढील  10 कलमी योजना जाहीर केली:

  1. 2025 हे वर्ष आसियान-भारत पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणे, यामधील संयुक्त उपक्रमांसाठी  भारत 5 दशलक्ष डॉलर्स इतका निधी उपलब्ध करेल.
  2. ऍक्ट ईस्ट धोरणाचे दशक विविध लोककेंद्रित उपक्रमांद्वारे साजरे करणे, ज्यामध्ये युवा परिषद, स्टार्ट-अप महोत्सव, हॅकेथॉन, संगीत महोत्सव, आसियान-भारत नेटवर्क ऑफ थिंक टँक्स आणि दिल्ली संवाद, या उपक्रमांचा समावेश असेल.
  3. आसियान-भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास निधी अंतर्गत आसियान-भारत महिला वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करणे;
  4. नालंदा विद्यापीठातील शिष्यवृत्त्यांची संख्या दुप्पट करणे आणि भारतातील कृषी विद्यापीठांमध्ये आसियान विद्यार्थ्यांसाठी नव्या शिष्यवृत्त्यांची तरतूद करणे;
  5. वर्ष 2025 पर्यंत आसियान-भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेणे;
  6. आपत्ती प्रतिसाद संबंधी  लवचिकतेत वाढ करणे, यासाठी भारत 5 दशलक्ष डॉलर्स उपलब्ध करून देईल;
  7. आरोग्य क्षेत्रात लवचिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य मंत्र्यांच्या सहभागाने   नव्या संवादाची  सुरुवात करणे;
  8. डिजिटल तसेच सायबर क्षेत्रातील लवचिकतेला मजबुती देण्यासाठी आसियान-भारत सायबर धोरण विषयक चर्चेसाठी नियमित यंत्रणा सुरु करणे;
  9. हरित हायड्रोजनवर आधारित कार्यशाळांचे आयोजन आणि
  10. हवामान बदलाप्रती लवचिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आसियान नेत्यांना ‘मातेसाठी एक रोप लावा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले

सदर बैठकीत, आसियान-भारत भागीदारीची संपूर्ण क्षमता वापरण्यासाठी दोन्ही बाजूंसाठी मार्गदर्शक ठरेल अशी नवी आसियान-भारत कृती योजना (2026-2030) तयार करण्यासाठी उपस्थित नेत्यांनी संमती दर्शवली तसेच खालील दोन संयुक्त निवेदनांचा स्वीकार केला:  

  1. भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणाच्या पाठींब्यासह हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत आसियानच्या दृष्टीकोनाच्या संदर्भात या क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याबाबत संयुक्त निवेदन. संयुक्त निवेदनाचा संपूर्ण मजकूर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. डिजिटल परिवर्तन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आसियान-भारत संयुक्त निवेदन. बैठकीत उपस्थित नेत्यांनी डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत भारताच्या नेतृवगुणांची प्रशंसा केली आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात भारतासोबतच्या भागीदारीचे स्वागत केले. संयुक्त निवेदनाचा संपूर्ण मजकूर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

21 व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या स्नेह तसेच आदरातिथ्याबद्दल लाओसच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आभार मानले. राष्ट्र समन्वयकाच्या रुपात गेली तीन वर्षे रचनात्मक भूमिका निभावल्याबद्दल पंतप्रधानांनी सिंगापूरचे देखील आभार मानले आणि भारतासाठी नव्या राष्ट्र समन्वयकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फिलिपाईन्स देशाबरोबर काम करण्यासाठी  उत्सुक असल्याचे सांगितले. 

 

* * *

S.Kane/Rajshree/Sanjana/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai